कधी आपल्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो, जिथे आपण बाहेरून शांत असतो, पण आतून भीतीची एक लाट उसळलेली असते. मानसशास्त्र सांगतं, त्या एका क्षणातील भावनिक प्रतिक्रिया आपल्या शरीरावरच नाही, तर आपल्या निर्णयांवर आणि कधी कधी आपल्या आयुष्याच्या दिशेवरही परिणाम करते. अंबालिकेकडे पाहताना मला नेहमी हाच प्रश्न पडतो, त्या एका क्षणात तिच्या मनात नेमकं काय चाललं असेल? ती फक्त एक राणी नव्हती; ती एक स्त्री होती, जी भीती अनुभवत होती आणि नकळत त्या भीतीने इतिहासालाच एक वेगळा रंग दिला. महाभारताच्या कथेमध्ये काही क्षण असे असतात, जे दिसायला क्षुल्लक वाटतात; पण त्यातून निर्माण होणारे परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतात. अंबालिकेचा तो एक क्षण, भीतीने फिकट पडलेला चेहरा, इतिहासाच्या प्रवाहात एक वेगळच वळणं निर्माण करून जातो. अंबिका जिथे डोळे मिटते, तिथे अंबालिका डोळे उघडे ठेवते; पण तिच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती तिच्या संततीच्या स्वभावात उतरते.
अंबालिका ही काशीराजाची कन्या, अंबिका आणि अंबा हिची धाकटी बहीण, आणि हस्तिनापूरच्या राजा विचित्रवीर्याची राणी. तिचं आयुष्यही बहिणींसारखंच, स्वतःच्या इच्छेपेक्षा परिस्थितीच्या हातात दिलेलं. भीष्मांनी स्वयंवरातून तिला हस्तिनापूरात आणलं, आणि तिचं जीवन एका अशा प्रवासाला लागलं जिथे निर्णय तिचे नव्हते, पण परिणाम तिच्यावरच उमटले. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर सत्यवतीने वंशवृद्धीसाठी व्यासांना बोलावलं. अंबालिकेसमोरही तोच प्रसंग उभा राहिला. व्यासांचे तेजस्वी, कठोर तपस्वी रूप पाहून अंबालिका घाबरली, तिचा चेहरा फिकट पडला. त्या एका क्षणातून जन्माला आला पडूं ज्याचा वर्ण पांढरट, अशक्त आणि शरीराने दुर्बल होता.
महाभारताच्या आदिपर्वात वर्णन केलेली अंबिका आणि अंबालिका यांची नियोग क्रिया ही केवळ एक कौटुंबिक घटना नव्हती; ती हस्तिनापूरच्या राजवंशाच्या अस्तित्वाशी, राज्याच्या स्थैर्याशी आणि धर्मपरंपरेशी निगडित असलेला अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय होता.
राजा विचित्रवीर्य यांचे अल्पवयात निधन झाले आणि ते निःसंतान राहिले. त्या काळात हस्तिनापूरसारख्या विशाल साम्राज्यात उत्तराधिकारी नसणे म्हणजे केवळ सिंहासनाचा प्रश्न नव्हता, तर धर्म, प्रजा आणि सामाजिक व्यवस्थेच्या विघटनाची चाहूल होती. भीष्मांनी त्यांच्या भीष्म प्रतिज्ञेमुळे विवाह आणि संततीच्या अधिकाराचा स्वतःहून त्याग केला होता. अशा वेळी वंशपरंपरा चालू ठेवण्यासाठी वैदिक परंपरेत मान्य असलेला एकमेव उपाय म्हणजे नियोग.
नियोग क्रियेचा हेतू कामभावना किंवा वैयक्तिक इच्छा नव्हती, तर कुल, राज्य आणि धर्माचे रक्षण होता. जर हा नियोग झाला नसता तर, हस्तिनापूरचा चंद्रवंश तेथेच संपुष्टात आला असता, राज्यात उत्तराधिकाराचा संघर्ष पेटला असता, आणि महाभारतासारख्या धर्मयुद्धाचा इतिहास घडणंच अशक्य झालं नसतं. पांडव आणि कौरव, दोघांचाही जन्म नियोगाच्या या परंपरेशी जोडलेला आहे. यासाठी वेदव्यासच का निवडले गेले? वेदव्यास हे केवळ ऋषी नव्हते, ते सत्यवतीचे पुत्र होते, म्हणजेच राजवंशाशी त्यांचा नैसर्गिक आणि वैध संबंध होता. ते ब्रह्मर्षी, त्रिकालदर्शी, वेदांचे ज्ञाता आणि पूर्ण ब्रह्मचर्य व नियमात स्थिर होते. शास्त्रांनुसार नियोगासाठी जो पुरुष निवडला जाई तो, कामविकारांपासून मुक्त, उच्च कोटीचा तपस्वी, आणि शुद्ध बीजधारी असावा लागतो. या सर्व कसोट्यांवर वेदव्यासच अगदी योग्य होते.
अंबालिकेच्या बाबतीत काय घडले? ती देखील व्यासांचे तेजस्वी, तपोबल रूप बघून भीतीने थरथर कापू लागली; तिचा चेहरा पांढराफटक पडला. तिच्या पोटी जन्मलेला पंडू दुर्बल देहाचा झाला आणि पुढे संततीप्राप्तीस असमर्थ ठरला. हे मातेच्या मानसिक अवस्थेचे प्रतिबिंब मानले गेले आहे. मग दासीला का पाठवले गेले? सत्यवती आणि वेदव्यास यांनी ओळखले की, राजपुत्रांमध्ये काही दोष निर्माण झाले आहेत,
आणि वंशासाठी स्थिर बुद्धी आणि संतुलित मन असलेली संततीही आवश्यक आहे. म्हणूनच राजमहलातील एका दासीला नियोगासाठी पाठवण्यात आले. ती भयमुक्त होती, आज्ञाधारक होती, मानसिकदृष्ट्या संतुलित होती, आणि ऋषींना देवतुल्य मानून सेवाभावाने समोर आली होती. त्यातून जन्म झाला, विदुराचा, जो अत्यंत बुद्धिमान, धर्मज्ञ, नीतिज्ञ, आणि महाभारतातील सर्वांत विवेकी पात्र ठरला. इथे एक महत्त्वपूर्ण शास्त्रीय संकेत फार महत्वाचा आहे. संतान केवळ देहातून नव्हे, तर मातेच्या मन, भावना आणि संस्कारातून जन्माला येते. म्हणूनच, राजा अंध झाला, राजा दुर्बल झाला, आणि दासीपुत्र असूनही विदुर महान ठरला.
शास्त्रांच्या दृष्टीने गर्भाधान ही केवळ शारीरिक प्रक्रिया नव्हती; ती देह + प्राण + संस्कार + चेतना यांचा एकत्रित परिणाम मानली जात होती. ऋषींना ठाऊक होते की संततीचे गुण केवळ बीजावर अवलंबून नसतात, तर मातेची भावना, पित्याची चेतना आणि काळाची ऊर्जा यावरही ते ठरतात. म्हणून कृत्रिम पद्धतींची संकल्पना नव्हती; गर्भाधान हे एक पवित्र, धार्मिक आणि आध्यात्मिक कृत्य मानले जात होते.
यद्भावं तद्भवति (जशी भावना, तसाच परिणाम.)
अंबालिकेच्या प्रसंगाकडे पाहताना, हा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. तिच्या मनातील भीतीने तिच्या शरीरावर परिणाम केला, आणि त्या अवस्थेचा प्रभाव तिच्या संततीवरही पडला. आजही गर्भावस्थेत आईच्या मानसिक स्थितीचा बाळावर परिणाम होतो, हे विज्ञान मान्य करतं. अंबिका जिथे भीतीमुळे डोळे मिटते, तिथे अंबालिका भीती अनुभवते, पण त्या प्रसंगाला सामोरी जाते. तिचा चेहरा फिकट पडतो, पण ती पळून जात नाही. यातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू दिसतो, ती परिस्थिती स्वीकारते. ती भीती मान्य करते. पण ती जबाबदारीपासून दूर जात नाही. हा स्वीकारच पुढे तिच्या आयुष्याचा आधार ठरतो.
पडूं, अंबालिकेचा पुत्र, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असला तरी, तो एक समर्थ राजा बनतो. पण त्याच्या आयुष्यातही एक अंतर्गत संघर्ष दिसतो. त्याला राज्य, सत्ता, कर्तव्य यांची जाणीव आहे. पण त्याची शारीरिक मर्यादा त्याच्या कामावर बंधनं आणते. त्याच्या आयुष्यातील शाप आणि त्यातून निर्माण झालेली भीती, ही त्याच्या जन्माच्या क्षणाशी जोडलेली वाटते. अंबालिकेच्या भीतीचा हा सूक्ष्म परिणाम पडूंच्या संपूर्ण जीवनात जाणवतो. महाभारताच्या ‘आदि पर्वा’त अंबालिकेचा उल्लेख स्पष्टपणे येतो. या प्रसंगावर अनेक अभ्यासकांनी भाष्य केलं आहे. इरावती कर्वे (युगांत) यामध्ये अंबालिकेच्या अनुभवाकडे स्त्रीच्या मानसिक अवस्थेच्या दृष्टीने पाहतात. त्या सांगतात की, या कथा केवळ प्रतीकात्मक नसून, त्या काळातील स्त्रीच्या भावनिक स्थितीचं प्रतिबिंब आहेत.
आजच्या स्त्रीसाठी अंबालिका एक वेगळीच शिकवण देते असं वाटतं. भीती वाटणं हे चुकीचं नक्कीच नाही, तर त्या भीतीला स्वीकारून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आपल्या भावनांना नाकारण्यापेक्षा त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. अंबालिका ही ना पूर्णपणे धाडसी, ना पूर्णपणे दुर्बल. ती एक सामान्य स्त्री आहे, जी भीती अनुभवते, पण त्यातून मार्ग काढते. तिच्या आयुष्यातील तो एक क्षण आपल्याला नक्कीच हेच सांगतो की भीती टाळता येत नाही, कारण ते आपल्या हातात पूर्णपणे नसतं; पण तिच्याशी कसं वागायचं हे आपल्या हातात असतं. अंबालिकेची कथा आपल्याला आपल्या मनाशी प्रामाणिक राहायला शिकवते.
© सोनाली तेलंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा