बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3132. नाते जुळले मनाशी मनाचे

 तिचे आई - वडिल व ती माझ्यासमोर  विचारमग्न अवस्थेत बसले होते. 
ती उच्चशिक्षित तरुणी अमेरिकेत एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. 
तिला भरपूर पगार असल्याने तिथे ती तिच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती.
 सध्या ती सुट्टीत तिच्या आई - वडिलांकडे सोलापूरला आली होती.
 तिच्या विवाहाच्या संदर्भात मी तिची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासली आणि म्हणालो. "
 सध्या विवाहासाठी अत्यंत अनुकूल अशी ग्रहस्थिती आहे.
 तरीही आपण घाईने स्थळ पसंत करु नये असा माझा आपल्याला सल्ला आहे कारण पुढील एक वर्ष राहूचा सप्तम भावाच्या स्वामीशी अंशात्मक योग होत आहे. 
त्यामुळे चुकीचा निर्णय व्हायची शक्यता आहे. "
माझे बोलणे ऐकून तिचे वडील म्हणाले , " तुमचा अंदाज बरोबर आहे. 
आम्ही तिच्या लग्नासाठी स्थळ बघत आहोत. अमेरिकेतील एक मराठी तरुण आम्हाला पसंत आहे. 
तो तिच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे व तिच्यापेक्षा जास्त कमवतो. 
दोघांची पसंती झाली.
 दोघांच्या आई - वडिलांनी होकार दिला. 
मग अलीकडच्या पद्धतीप्रमाणे एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी दोघांच्या गाठीभेटी सुरु झाल्या. 
तेव्हा एक अनपेक्षित समस्या उभी राहिली आहे. 
माझी मुलगीच तुम्हाला त्याबद्दल जास्त व्यवस्थित सांगू शकेल. " 
मग ती मुलगी म्हणाली ," त्या भेटीगाठींमध्ये तो आमच्या भावी संसाराविषयी काही बोलेल असं मला वाटलं होतं. 
पण तसं न करता त्याने काही ना काही बहाण्याने मला टच करायला सुरुवात केली. 
त्याचं तसं वागणं मला अजिबात आवडलं नाही. "
मी तिला विचारलं , 
" टच दोन प्रकारचे असतात. 
एक म्हणजे नैसर्गिक वागण्यातून आपुलकीने झालेला सहजस्पर्श असतो तर दुसरा म्हणजे मनात काहीतरी विशिष्ट हेतू बाळगून जाणूनबुजून केलेला स्पर्श असतो. 
तू शाळेत असताना तुला शिकवले आहे की गुड टच आणि बॅड टच कसा ओळखायचा ते. त्या नियमांची कसोटी लावून तू मला सांग की त्याचा टच हा गुड टच होता की बॅड टच होता  ?? " 
ती काही वेळ विचार करुन म्हणाली ,
 " तो नक्कीच बॅड टच होता. " 
मग मी पुढचा प्रश्न विचारला , 
" ही बाब तू त्याला सांगितलीस का  ?? "
त्यावर ती म्हणाली , " हो. मी त्याला तसं सांगितलं. 
त्यावर त्याने मला मागासलेल्या विचारांची मुलगी ठरवलं. 
तो म्हणाला की आपण अमेरिकेत राहत आहोत.
 तू मनमोकळेपणाने वागलं पाहिजेस. 
मी त्याला उत्तर दिलं की मनमोकळेपणाने वागणं म्हणजे शारीरिक जवळीक असा अर्थ होत नाही. 
त्यावर त्याला खूप राग आला आणि तो ताडकन उठून निघून गेला.  "
मला तिचे फार कौतुक वाटले. 
मी मनोमन तिला शाबासकी दिली व म्हणालो ," मला तुझा खूप अभिमान वाटतो. 
अतिशय खंबीरपणे तू ही गंभीर परिस्थिती हाताळली आहेस. 
लग्नाआधीच्या भेटीगाठी या फक्त आणि फक्त एकमेकांना समजून घेण्यासाठीच असतात याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
 अशा भेटीगाठी म्हणजे शारीरिक जवळीक साधण्याची संधी नसते. 
मुलं अशा प्रसंगात नेहमीच युक्तिवाद करतात की आता आपलं लग्न होणारच आहे ना , मग लाजायचं कशासाठी  .....  
पण मुलींनी यातला धोका ओळखून ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे कारण ठरलेलं लग्न कोणत्याही टप्प्यावर मोडू शकतं.
लग्नाआधीच्या भेटीगाठीत मनाशी मनाचं नातं जुळवण्यावर भर दिला पाहिजे. 
एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या पाहिजेत. 
एकमेकांचे प्लस - मायनस पाॅइंट्स समजून घेतले पाहिजेत.
मनाच्या तारा एकदा व्यवस्थित जुळल्या की संसाराच्या सतारीतून मंजुळ सूर उमटायला फारसा वेळ लागत नसतो."
माझं बोलणं ऐकल्यावर ती एकदम रिलॅक्स झाली. 
तिला तिच्या समस्येचं उत्तर मिळालं होतं. 
मग मला नमस्कार करुन ते गेले. 
त्यानंतर काही दिवसांनी रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो. 
बऱ्याच दिवसांनी माझ्या पत्त्यावर एक पार्सल आले.
त्यात तिच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका व एक चिठ्ठी होती. 
त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं , " तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी आलेलं प्रत्येक स्थळ पारखून घेतलं. 
काही स्थळांना मी नकार दिल्यानंतर , मनाचं मनाशी नातं जुळवणारा एक मराठी तरुण मला भेटला. 
He really cares for me. 
तो माझी खूप काळजी घेतो. 
त्याच्याशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय मी घेतला आहे."
चिठ्ठी वाचून मला खूप समाधान वाटलं.
 भारतीय मुलगी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी भारतीय संस्कार , भारतीय परंपरा विसरत नाही हेच खरं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...