काही दिवस असे असतात, जेव्हा दिवसभर माणूस कितीही धावपळ करत असला, कितीही लोकांमध्ये वावरत असला, तरी दिवस संपता-संपता मन मात्र कुठेतरी हरवून जातं. कालचा दिवसही असाच धावपळीत गेला. सगळं नेहमीसारखंच होतं. पण संध्याकाळनंतर अचानक मन खूप शांत झालं आणि जाणवलं. कुठेच मन लागत नाहीये.
अचानक एका मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर आला.
मनाने सांगितलं, “फोन कर… कदाचित मन हलकं होईल.”
फोन केला…पण तिचा फोन बिझी. क्षणभर वाईट वाटलं. पण काही मिनिटांतच तिचा मेसेज आला.
“अरे… कसं काय आठवण आली? थांब, फोन करते.”
तो छोटासा मेसेज वाचूनही मनाला कुठेतरी आधार मिळाला. फोन हातात घेऊन तिच्या फोनची शांतपणे वाट पाहत होतो. तेवढ्यात फोन वाजला. पलीकडून तिचा नेहमीसारखा आपुलकीचा आवाज -
“बोल रे… काय मग? आज कशी काय माझी आठवण आली?”
मी हसत म्हणालो,
“काही नाही गं… असंच… तुला मिस केलं म्हणून फोन केला.”
ती लगेच म्हणाली,
“काय रे… आज सगळं ओके आहे ना?”
मी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं,
“हो गं… एकदम ओके.”
पण खरी मैत्री शब्दांपेक्षा मनाचा आवाज ऐकते…
ती पुन्हा म्हणाली,
“बोल… काय झालंय? काहीतरी आहे.”
मी थोडा शांत होऊन म्हणालो,
“काही नाही गं… थोडं एकटं वाटतंय.”
ती लगेच म्हणाली,
“काय झालं? सांग ना…”
मनात आलं, सगळं फोनवर सांगण्यापेक्षा समोर बसून बोलावं.
मी म्हणालो,
“चल... चहा घेऊया.”
ती म्हणाली,
“आज वेळ नाहीये रे... पण प्रयत्न करते. थांब पाच मिनिटं.”
फोन ठेवला.. मन पुन्हा शांत झालं. मूड आधीच खराब होता, पण तिचा फोन येईल या एका आशेने मन कुठेतरी थांबून राहिलं. आणि खरंच दोनच मिनिटांत फोन पुन्हा वाजला.
“तू चौकात ये… गाडी घेऊन. मी येतेय.”
त्या चार शब्दांनी मनावरचं ओझं थोडं हलकं झालं.
काही वेळात ती गाडी घेऊन आली.
शहराच्या गर्दीपासून थोडं दूर गेलो.
निवांत ठिकाणी गाडी थांबवली.
समोर चहाचा कप होता आणि मनात खूप काही साचलेलं होतं.
मी मनातलं सगळं तिच्यासमोर मोकळं केलं.
तिने मध्ये एकदाही थांबवलं नाही.
प्रश्नांचा भडिमार केला नाही.
दोष दिला नाही.
फक्त शांतपणे ऐकलं.
आणि शेवटी...
एक घट्ट, निरागस मिठी मारली. 🫂
त्या मिठीत शब्द नव्हते.
पण हजार शब्दांपेक्षा मोठा आधार होता.
तिने हळूच म्हटलं -
“मी आहे ना… काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.”
कधी कधी मनाला औषधाची गरज नसते…
फक्त कोणीतरी आपलं आहे, एवढी जाणीव पुरेशी असते.
परत निघताना चेहऱ्यावर पुन्हा थोडी उदासी होती.
तिने पुन्हा हसत म्हटलं-
“काळजी करू नकोस… होईल सगळं ठीक.”
आणि शेवटी नेहमीच्या हक्काने म्हणाली -
“चल आता… लवकर.”
गाडी पुन्हा शहराकडे निघाली.
पण यावेळी मनातलं वादळ मागे कुठेतरी राहून गेलं होतं.
कधी कधी आयुष्यात मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते.
एक आपुलकीचा फोन,
एक कप चहा,
मन मोकळं करून ऐकणारा मित्र,
आणि शेवटी मिळालेली एक निरागस घट्ट मिठी.
एवढंच पुरेसं असतं मनाला पुन्हा उभं राहायला. ❤️
काही नाती नावाने मैत्रीची असतात.
पण मनासाठी ती त्यापेक्षा खूप मोठी असतात.
अशी मैत्री आयुष्यात असणं, हेही एक सुंदर भाग्यच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा