नेहमीप्रमाणं सहा वाजता अर्पिता उठली. मस्त झोप झाली होती. खूप फ्रेश वाटत होतं. थंडीचे दिवस असल्यामुळं फक्कड आल्याचा चहा घेत समोरच्या खिडकीतल्या नेहासोबत मस्त गप्पा रंगणार, ह्याचा बेत आखतच ती पांघरुणाची घडी घालू लागली.
ब्रश केलं. खिडकी उघडून चहाचं भांडं गॅसवर ठेवताना तिनं नेहमीप्रमाणं खिडकीकडे पाहून एक स्माईल दिलं. पाहते तर काय…
अशोक– नेहाचा नवरा– तिच्यापेक्षा एक फुटभर उंच; तिच्या मागं उभा राहून खाणाखुणा करत होता.
अर्पिता चक्रावूनच गेली. याला काय झालं अचानक? असा का हा बिथरलाय? सकाळच्या प्रसन्नतेचा आणि गप्पांचा यानं पार विचकाच करून टाकला!
मागच्या ए- दोन आठवड्यापासूनच त्याच्या वागण्यातला फरक तिला जाणवत होता. अधूमधून सूचक बोलणं, पाहणं याकडे तिनं दुर्लक्ष केलं होतं.
‘.पण आज तर हा फार पुढं गेलाय !’ रागानं तिचा गोरापान चेहरा लालबुंद झाला.
“आई, तुला काय झालंय? एवढी का चिडलीस?” चिडल्यावर आपली आई टोमॅटो सारखी लालबुंद होते, हे गुंजनला ठाऊक होतं.
“काही नाही रे…”
ती खूप बेचैन होती. सहजच चाळा म्हणून मोबाईल पाहू लागली; तर त्यावर अशोकचा मेसेज…
‘आज भेटशील का?’
आता मात्र आपल्या मेंदुंच्या ठिकऱ्या उडतात की काय,असं तिला वाटू लागलं. एकटी स्त्री म्हणजे पुरुषांना आपली जहागिरी वाटू लागते की काय? हवी तशी आणि हवी तेव्हा अव्हेलेबल…?
त्याच्या निर्लज्जपणाची तिला भयानक चीड आली आणि हताशपणे शेवटी रडू कोसळलं. गुंजन तिच्या आसपासच असल्यामुळं मोकळेपणानं ती रडूही शकत नव्हती.
इतक्या वर्षांचा शेजार सुद्धा ‘असाच…?’ खूप दुखावली गेली ती. उद्विग्न मनानं तिनं आईला फोन लावला.
आई तरी काय बोलणार? “मी येऊन जाईन एक-दोन दिवस…” –इति आई. बाबांच्या आजारपणामुळं तिलाही यापेक्षा जास्त काही शक्य नव्हतं. पण एक- दोन दिवसानंतर पुढं काय?
आई आली… “तू डायरेक्ट नेहाला सांग, ‘तुझा नवरा चुकीचं वागतोय. त्याला समज दे!’ इतक्या दिवसांची तुमची जुनी मैत्री. नेहा घेईल समजून.” आईचा आपला सरळधोपट विचार.
अर्पिताची जवळची मैत्रीण- साधनाला देखील आईचा विचार संयुक्तिकच वाटत होता. पण त्या दोघींपेक्षाही अर्पिता जास्त बऱ्यावाईट प्रसंगातून गेली होती… वीरेन गेल्यापासून गेल्या दहा-बारा वर्षांत ती अनुभवानं खूप शहाणी झाली होती.
ती स्वतः खूप हुशार आणि यशस्वी वकील होती. कोर्टात अन्यायाविरुध्द व्यवस्थित लढत होती… पण ह्या सामाजिक कोर्टात मात्र ‘एकटी स्त्री’ म्हणून हतबल होत होती.
ती, वीरेन आणि गुंजन… दृष्ट लागण्यासारखा संसार. वीरेन इंजिनियर. त्याची छोटी इंडस्ट्री होती. तेव्हा अर्पिता आवड म्हणून कोर्टात जात होती, पण ती आता तिची गरज बनली होती.
कारण– नैनितालची ट्रिप. त्यानंतरचा अपघात… त्यातून ती आणि गुंजन वाचले. पण मेंदूला मार लागल्यामुळं वीरेन कित्येक दिवस कोमात होता.
तिला जाणवलं की, तो कोमात होता तेव्हा त्याच्या अस्तित्वानंही तिला सुरक्षित वाटत असे. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण त्यातून तो बाहेर आला नाही.
नंतर तिचं आणि गुंजनचं एक नवं जग तिला उभं करावं लागलं. ते निर्माण करताना खूप त्रास झाला. ती अगदी तावून सुलाखून निघाली. एकटी सुंदर स्त्री असण्याचा सगळा अनुभव तिला आला…
तो प्रत्येक वेळी सकारात्मक पद्धतीनं कसा घ्यायचा, सतत मन कसं स्थिर ठेवायचं, ‘सिंगल पॅरेंट’ म्हणून गुंजनला कसं सांभाळायचं… सगळ्या गोष्टींची उत्तरं तिच्या समुपदेशक– देशपांडे मॅडमकडे असायचीच. त्यांच्यामुळंच वीरेनचं ‘नसणं’ ती धैर्यानं निभावून नेत होती.
अशोकच्या बाबतीतही ती त्यांचाच सल्ला घेणार होती. तिनं दुसऱ्याच दिवशीची अपॉइंटमेंट मिळवली. ह्या सगळ्या ताणाताणीतच कधी झोप लागली, हे तिलाही समजलं नाही.
त्या दिवशी शनिवार असल्यामुळं दुपारीच ती देशपांडे मॅडमकडे गेली.
“ये…” अगदी मनापासून मॅडमनी तिचं स्वागत केलं. त्यांनाही अर्पिताबद्दल आदर होता. तिच्या बुद्धिमत्तेचं, मनोबलाचं आणि ठामपणाचं मनापासून कौतुक करायच्या.
नेहमीप्रमाणं शांतपणे त्यांनी सगळी परिस्थिती ऐकली.
“आत्ता ताबडतोब माझ्यासमोर त्याचा नंबर ब्लॉक कर. म्हणजे संवादाचा सेतूच तोडला जाईल.” अगदी ठामपणानं त्यांनी सांगितलं आणि नंबर ब्लॉक करायलाच लावला.
“…आणि अजून एक गोष्ट– काही त्याच्या बायकोला सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस! माझा नवरा ‘असा’ वागतो, हे कुठलीही स्त्री मान्य करणार नाही… तिच्या मनाला हे ठाऊक असलं, तरीही…!
“तिला तो तिच्या स्त्रीत्वाचा अपमान वाटत असतो. आपला नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागतोय; याहीपेक्षा ‘तो आपल्याला विसरतोय’, याचं दुःख तिच्या दृष्टीनं जास्त मोठं असतं… कारण तिनं त्याच्यावर सर्वस्व ओवाळून टाकलेलं असतं.
“त्यामुळं नवऱ्याला दोष देण्यापेक्षा कदाचित ती तुलाच दोषी ठरवू शकते… आणि याच भ्रामक कल्पनेत सुख मानण्याची सामान्य स्त्रीची तयारी असते. याबाबतीत नवराही तिला मनापासून साथ देणार… त्याच्यासाठीही हे:खूपच फायदेशीर!
“स्वतःची चूक समाजापुढं येण्याची भीती असते, तेव्हा ती तिसऱ्या कुणावर तरी… म्हणजे पर्यायानं तुझ्यावर ढकलून देणं दोघांनाही सोयीचं आहे. कारण, तू एकटी आहेस! आणि एकट्या स्त्रीवर आपल्या समाजानं ‘अव्हेलेबल’चा पक्का शिक्का मारून ठेवलाय…!
“नवरा म्हणून ठोकळा जरी उभा केला, तरी त्याचं अस्तित्व समाज मान्य करतो… पण एकटी स्त्री कितीही कर्तृत्ववान असेल, तरीदेखील समाज तिला त्रासच देतो! स्त्री-पुरुष संदर्भ हे पौराणिक काळापासून ते आजतागायत, आहेत तस्सेच आहेत!
“यावर एकच उपाय… तुमच्या दोघींमधला दुवा असलेली नेहाच्या खिडकीसमोरली तुझी खिडकी कायमच बंद ठेवायची. आणि कोंडलेली वाफ, फोडणीचा तडका बाहेर जाण्यासाठी इलेकट्रीकची ‘चिमनी’ बसवून घ्यायची…
“कारण, एकट्या स्त्रीनं मनात कोंडलेली भावभावनांची वाफ आणि तडका हा खिडकीतल्या मोकळ्या हवेच्या झुळूकीनं बाहेर सोडण्याचा आनंद घेण्याऐवजी ‘चिमनी’च्या धुरांड्यातूनच शिस्तीत सोडला पाहिजे… हाच आपला शिरस्ता आहे!”
— डॉ. शुभांगीनी कपिल महाजन
धन्वंतरी हॉस्पिटल, उमरगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा