खांद्यावरचा टॅावेल हातात घेऊन सदू टेबलाजवळ आला. रिकाम्या प्लेट, भांडी, चमचे उचलून त्यानं टेबल स्वच्छ पुसून घेतलं. आज त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. घरखर्च भागवता भागवता जीव शिणून गेला होता. अचानक टेबलाखाली पडलेलं काहीतरी उचलायला खाली वाकला तर चक्क ५०० रूपयाची नोट पडलेली दिसली. त्यानं ती पटकन् उचलली व शर्टाच्या खिशात टाकली. कावराबावरा होऊन कुणी आपल्याकडे बघत नाही ना हे बघितलं व तो पुढचे टेबल साफ करायला लागला.
आईचा खोकला फार वाढला आहे. तिला चांगल्या डॅाक्टर कडे नेलं पाहिजे.
सावित्री साठी साडी घ्यावी नाहीतर.
बायको अगदी खऱ्या अर्थानं सावित्री होती म्हणून तर आपण मागच्या वर्षीच्या आजारातून उभे राहिलो.
पण ऐश्वर्या आता पाचवीत जायची. लेकीला नवं दप्तर हवय.
शंकर चौथीत. लेकाला तो ब्याटम्यान का काय हवा आहे.
का सगळ्यांना मस्त गुलाबजाम घेऊन जावं?
ती पार्वतीबाई राहते शेजारी तिचा नवरा वारला. दोन लहान मुलं पदरात आहेत. तिलाच द्यावी ही नोट.
“सदू, यांना टेबल स्वच्छ करून दे रे..” मालक ओरडून म्हणाले.
एक नवरा बायको व सात आठ वर्षाचा मुलगा टेबलावर बसले. सदू ॲार्डर घ्यायला गेला.
“बाबा, काय होतय हो मी हा बॅटमॅन ठेवला तर? बघा कसे हात पाय हलवतो आहे ! “ मुलगा बाबांना म्हणाला.
“विक्रम, कुणाचा तरी पडलेला बॅटमॅन तू का ठेवणार सांग बरं? तुझ्या सारखाच बॅटमॅन खूप आवडणारा एक मुलगा असेल. तो आपला बॅटमॅन कुठे हरवला म्हणून आत्ता शोधत असेल. तो हरवला म्हणून त्याला केवढं वाईट वाटत असेल ना? चल आपण हा मालकांना परत देऊ. मालकांना तो मुलगा कदाचित माहित असेल.” बाबा त्या मुलाला समजावत म्हणाले.
विक्रमनं काही विचार केला. तो बाबांबरोबर मालकांकडे गेला व त्याने बॅटमॅन परत दिला. त्याला वाईट वाटत होतं पण बाबांचं म्हणणं सुध्दा पटलं होतं. ते परत टेबलवर येऊन बसले. जेवण झाल्यावर बाबांनी सदूला विक्रमचं आवडतं आईस्क्रिम द्यायला सांगितलं. विक्रम खूष होऊन आईस्क्रिम खात होता. ते कुटूंब जेवून बाहेर पडलं. “लई शाणं हाये पोर” सदू टेबल पुसत म्हणाला.
काही विचार करून, निर्धाराने सदू मालकांकडे गेला व त्यानं पाचशे रूपयाची नोट मालकांना दाखवली. मालक जोशी साहेबांचे बिल घेत त्यांच्याशी गप्पा मारण्यात मग्न होते पण सदूला पाचशेची नोट मिळाली हे बघताच मालक म्हणाले,
“अरे, सकाळ पासून आपली दोन नेहमीचीच गिऱ्हाईकं त्या टेबलावर बसली होती. विचारतो त्यांना पैसे पडले का म्हणून.”
मालकांनी काही वेळात सदूला सांगितले, “सदू, सकाळी ते कोरे साहेब येऊन गेले ना त्यांच्या पाकिटातून बिल देताना ही नोट पडली. पण ते म्हणाले की तुमच्या प्रामाणिक सदूलाच बक्षिस म्हणून द्या ती नोट.”
सदूच्या डोळ्यात पाणी आलं. हात जोडून त्यानं नोट हातात घेतली. काल देवाचा धावा केला होता तो पोचला वाटतं त्याच्यापाशी.
दोन दिवसांनी जोशी साहेब आले व सदू आहे का विचारू लागले. सदू घाबरत पुढे आला. जोशी साहेब म्हणाले,
”मला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस माझ्या कंपनीमध्ये हवा आहे. माझ्या कंपनीमध्ये रेस्टॅारंट आहे त्याची देखरेख करशील का? उत्तम पगार आहे. बोनस आहे. तुझे मालक म्हणाले तुला हे काम उत्तम जमेल. दोन आठवड्यात सुरू कर.” नेहमी ओरडणारे मालकही आज त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. पगाराची व बोनसची रक्कम ऐकून सदूला काय बोलावे तेच कळेना. प्रामाणिकपणाची किंमत एवढी मोठी असते? परवा पाचशे रूपयात करू वाटणाऱ्या सर्व गोष्टी करणं आता शक्य होतं.
भारत फार्मा लिमिटेडच्या जोशी साहेबांना हात जोडून तो सद्गदित कंठानं “थॅंक्यु सर” म्हणाला. घरी जाताच सावित्री म्हणाली,
”मला नोकरी लागलीये त्या कुलकर्णी म्याडम कडे. त्यांच्या आजीचे करायचे फक्त. घ्येऊ ना?”
चांगलं झालं तरी माणूस गडबडून जातो. सदू पुटपुटला,”प्रामानिक पनाचं बक्षीस हाय ह्ये“ सावित्रीला म्हणाला,
”हे पाचशे रूपये देवापुडं ठेव. प्रामानिकपणा असा दिसतो हे माहित्यै का तुला?” त्यानं पाचशेची नोट सावित्रीकडे दिली. तिला काही उलगडलं नाही पण आईनं हात जोडले. आता विक्रमाचे बाबा कधी येतील हॅाटेलात याची सदू वाट पहात होता. मोहाचा क्षण आला होता. तो टाळण्यात केवढी मदत केली होती त्यांनी ! परमेश्वरानं परीक्षाच घेतली होती जणू. त्या परिक्षेत आपण एकटे पास होऊ शकलो नसतो हे मनोमन लक्षात ठेवून विक्रमच्या बाबांचे आभार मानायचे होते. विक्रम आला की स्वखर्चानं त्याला आईस्क्रीम द्यायचं होत.
आणि ऐश्वर्या व शंकरला शिकवायचं होतं की कुठल्याही परिस्थितीत नेहमी चांगलं वागायचं. प्रामानिकच रहायचं. मोहाचे हजार क्षण येतील पण डगमगायचं नाही. कारण
विश्वास ठेवा अगर न ठेवा पण ईश्वर बघत असतो.
©® ज्योती रानडे. ✍️
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा