अवंतीनं भराभर पोळ्या लाटल्या. चिंचगुळाची आमटी केली आणि कोथिंबीर चिरायला घेईपर्यंत अजिंक्य घरी आला. त्याने कामाची बॅग सोफ्यावर टाकली आणि तो थेट शॉवर घ्यायला गेला. अवंती त्याच्या आधी अर्धा तास घरी आली होती. चहादेखील न घेता ती स्वयंपाकाला लागली होती, कारण अजिंक्यनेच अचानक त्याच्या मित्राला आणि त्याच्या बायकोला जेवायला बोलावलं होतं.
“अजिंक्य, मस्त शॉवर घ्यायला गेलास. निदान विचारायचं तरी, मला काही मदत हवी आहे का?” अजिंक्य न समजल्यासारखा तिच्याकडे बघत होता.
“अरे, तू अचानक बोलावलंस ना त्या दोघांना. निदान मदत तरी कर.”
ती साडी बदलायला आत गेली. एवढं बोलूनही अजिंक्य मात्र वर्तमानपत्र घेऊन बसला होता. आपण बोलतो ते याच्या मेंदूपर्यंत पोहोचतं तरी का? तिला हल्ली सतत वाटायचं. तो आपल्या बोलण्याला “हं” म्हणतो, पण लक्ष असतच असं नाही. थोड्याच वेळात ती मोरपंखी रंगाची साडी नेसून बाहेर आली. त्या साडीत तिला पाहून अजिंक्य एकेकाळी फिदा झाला होता. आज मात्र ती त्याच्या समोरून गेली, तरी वर्तमानपत्रावरून त्याची नजर वर झाली नाही. तेवढ्यात अनु आणि प्रकाश आले. थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पांनंतर अनुनं विषयाला हात घातला.
“प्रकाशच्या आणि माझ्या लग्नाला सोळा वर्षं होतील. पहिली काही वर्ष एकमेकांशिवाय करमत नसे. मग मितीचा जन्म झाला. नंतर मयूरचा. आम्ही दूर होत गेलो कारण आईपणाच्या डिमांड अशाच असतात ना! आमचं संभाषण मुलं, त्यांच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स आणि कामाच्या डेडलाइन्सपुरतंच मर्यादित रहातं गेलं”
ती थांबली.
“हल्ली आम्ही चक्क रूममेट्ससारखे राहतो. काही वेळा मी बोलले की प्रकाश ‘हं’ म्हणतो, पण मेकॅनिकली. लक्ष नसतं. एकमेकांशिवाय जगता येणार नाही असं वाटायचं ते दिवस कुठे गेले, कळलंच नाही.”
प्रकाश खाली मान घालून बसला होता.
“नुकतंच वाचलं, या प्रकारच्या लग्नाला वेस्टर्न वर्ल्ड मध्ये ‘Quiet Quitting’ म्हणतात.
मी कशी आहे, मला काही ताण आहे की मी लो फील करतेय हे खरंच त्याला दिसत नाही. एकेकाळी डोळ्यांच्या इशाऱ्यांनी एकमेकांचं मन ओळखायचो. आता तेच डोळे एकमेकांचे चेहरे कणभरही वाचत नाहीत.”
अनुचे डोळे भरून आले.
“प्रेमात पडलो तेव्हा आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट मिळाली या आनंदात होतो पण संसाराच्या घोळात प्रेम हरवून गेलंय. आणि हो, हे फक्त आमचंच झालंय का? का बाकीची कपल्स पण थोड्याफार फरकानं अशीच राहतात?”
अवंतीच्या अंतरंगातील खळबळ तिनं चेहऱ्यावर व्यक्त न करण्याचा प्रयत्न केला.
“प्रकाश, तू बोल ना !”
“काय बोलू? मरमर काम करून बंगला, गाडी, सगळं उभं केलं. अनुची नोकरीही महत्त्वाची आहे. तिला बाहेर जावं लागतं तेव्हा मी मुलांचं बघतो. दोघंही आपापल्या परीने झटतोय. आणि काय करायचं असतं माणसानं?”
“पण अनुच्या भावनिक विश्वात काय चाललंय याची तुला कल्पना असते का?” अवंती एकदम उभी राहिली.
“तीही कितीतरी गोष्टी सांभाळतेय. संसाराच्या ताणानं कधी मन घाबरतं, कधी लो वाटतं. अशा वेळी जोडीदारानं फक्त एवढं विचारावं -‘कशी आहेस ग? काही टेन्शन आहे का?’ एवढीच अपेक्षा असते.”
“असं तुलाही वाटतं, अवंती?” अजिंक्यचा आवाज अचानक कठोर झाला. “तू पण Quiet Quitting करत जगते आहेस?”
अवंती काही बोलली नाही. पण तिच्या शांततेत चौघांनाही उत्तर मिळालं. एकत्र राहणं आणि एकमेकांसोबत राहणं यातला फरक कधीच हरवून गेला होता. दुसऱ्या दिवशी अवंतीनं अनुला फोन केला.
“कसं संपवायचं हे Quiet Quitting, अनु? मी इतर मैत्रिणींशी पण बोलले आहे. थोड्याफार फरकानं बहुतेक जणी अशाच जगत आहेत.”
दोघीनी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुमती व्यास यांना भेटायचं ठरवलं. त्यांचं बोलणं ऐकल्यावर डॉक्टर हसल्या.. पूर्वी घरादाराला वाहून घेतलेली गृहिणी पण हेच सहन करायची व आज शिकून ॲाफिसर झालेली युवती पण त्याच परिस्थितीत आहे.. का होतं असं? नातेसंबंध ताजे ठेवून त्यातला गोडवा जपण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. जाता जाता हे साधत नाही.
“आज तुम्हाला तुमचे नवरे आवडत नाहीत असं नाही. पण तुम्ही एकमेकांना गृहीत धरायला लागलात. अपेक्षा ठेवू लागलात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की मन खट्टू होतं. बरोबर?”
दोघींनी मान डोलावली.
“शेवटचं तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी काही केव्हा केलं होतं? कर्तव्य म्हणून नाही, तर प्रेम म्हणून?”
अवंती आणि अनु एकमेकींकडे पाहत राहिल्या. उत्तर आठवायला वेळ लागला. डॉक्टर हलकेच हसल्या.
“मग तिथूनच सुरुवात करा. दिवसातून फक्त दहा मिनिटं एकत्र बसा. फोन नाही. मुलांचा विषय नाही. ऑफिस नाही. तक्रारी नाहीत. समस्या सोडवायच्या नाहीत. फक्त एकमेकांसोबत असायचं.”
त्या क्षणभर थांबल्या.
“हवं तर तुमच्या आराध्य दैवताचं नाव घ्या, आवडतं गाणं लावा नाहीतर शांत बसा. एकमेकांच्या मनाशी पुन्हा संधान बांधण्याचा हा एक मार्ग आहे.”
त्या रात्री जेवणं झाल्यावर आणि मुलं झोपल्यावर अवंतीनं अजिंक्यला गच्चीत बोलावलं. रातराणीचा वास दरवळत होता. मंद वारं अंगावर येत होतं. दोघं शेजारी बसले. अजिंक्यनं हातातला फोन काढला, पण पुन्हा खिशात ठेवला. कुणी काही बोललं नाही. काही वेळानं त्याची नजर अवंतीकडे वळली आणि सकाळचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर आला. मोरपंखी साडीतील अवंती. गोरा रंग, मोठे डोळे व कुरळे केस ! एकेकाळी ती साडी नेसली की तो तिच्याकडे पाहतच राहायचा. आज ती त्याच्या समोरून गेली होती आणि त्याने नजरही वर केली नव्हती. कधीपासून मी तिला पाहणंच बंद केलं? हा प्रश्न त्याच्या मनात पहिल्यांदाच उमटला. घर, मुलं, सुरक्षितता, पैसे वगैरे सगळं देताना तिच्या मनाला काय हवं आहे, हे विचारायलाच तो विसरला होता. दहा मिनिटं कधी संपली, कळलंच नाही. कुणी काही बोललं नव्हतं. तरीही कित्येक दिवसांनी ते खऱ्या अर्थानं एकमेकांसोबत बसले होते.
“झाली आपली दहा मिनिटं,” अवंती हसून म्हणाली.
ती आत गेली. अजिंक्य मात्र तिथेच बसून राहिला.
उद्याच्या दहा मिनिटांची वाट बघावीशी वाटतेय. वाटलं त्याला. अवंती सकाळी अनुशी बोलली. तिचाही अनुभव सकारात्मक होता. आवाजात जान आली होती. आशेचा किरण प्रकाशमान झाला होता.. ती खळखळून हसली होती. अवंतीनं आत येऊन रोजनिशीत लिहिलं..
“Quiet Quitting खूप वर्षं करत आले. कळत.. नकळत.
कदाचित नातं संपलं नव्हतं...आम्ही फक्त त्याकडे लक्ष देणं थांबवलं होतं. आता मात्र या नात्यात हरवलेलं प्रेम पुन्हा शोधायला निघाले आहे. ज्याच्याबरोबर सात पावलं चालताना शपथा घेतल्या, त्या प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.”
तिनं वही बंद केली. उद्याच्या दहा मिनिटांसाठी बिस्मिल्ला खान यांचा राग ललित लावायचा, असं तिनं ठरवलं. अजिंक्य कडे पाहून ती हसली. तो गोंधळला. बाहेर रात्र शांत होती. पण त्या शांततेत एक नातं पुन्हा हळूहळू बोलू लागलं होतं. उद्याच्या दहा मिनिटांची वाट पाहत.
©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा