बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3126. दुर्लक्ष

 “डॉक्टऽऽऽर… आजी हलू-डुलू नाय रायली.” 
एक इसम अक्षरशः ओरडतच ओपीडीत घुसला.
“आजी हलायला-डुलायला कशाला पाहिजे?” मी मुद्दाम निर्विकारपणे विचारलं. त्याच्या आवाजातली घाई दिसत होती; परंतु शब्दांमध्ये मात्र वस्तुस्थिती नव्हती.
“म्हणजे... ती सकाळपासून हलत-डुलत नाही…”
“रोज हलते-डुलते?”
“हो… म्हणजे.… चालते-फिरते घरात…”
“मग घेऊन या, उचलून आणा…”
“तुम्ही... कुणाला पाठवलंत तर…?”
“का?”
आता मात्र त्याचा चेहरा बदलला.
“काल तशी चांगली होती. रात्री थोडं दुखत होतं म्हणाली. चार दिवस झाले, बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या. मी आणायचं विसरलो. सकाळी उठलीच नाही. आवाज दिला. हलवून बघितलं. मला वाटतं ती गेली.”
मी शेवटी थेट विचारलं, ”म्हणजे तुम्हाला फक्त डेथ कन्फर्म करायचीये?”
“हो...” तो शांतपणे म्हणाला.
हे संभाषण ऐकायला विनोदी वाटेल, पण प्रत्यक्षात ते आपल्या समाजाच्या आरशात दिसणारं अत्यंत अस्वस्थ करणारं प्रतिबिंब आहे.
भारतीय माणूस अनेकदा सत्य सांगत नाही; तो फक्त परिस्थितीभोवती शब्दांची चादर गुंडाळतो.
‘मरण पावली’ हे दोन शब्द उच्चारण्याचं धैर्य नसतं, म्हणून मग…
“हलत-डुलत नाही.”
“उठत नाही.”
“डोळे उघडत नाही.”
“काही प्रतिसाद देत नाही.”
“बहुतेक गेली असावी…”
जणू ‘मृत्यू’ हा शब्द उच्चारला, तर तो अधिक खरा होईल अशी भीती मनात बसलेली असते.
यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे या कथेत लपलेली दुसरी ओळ…
‘चार दिवस झाले बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या… मी विसरलो.’
हे वाक्य सहज बोललं जातं… जणू एखाद्या घरात साखर संपली होती आणि आणायची राहिली.
पण ही गोष्ट औषधाची नव्हती, ती एका माणसाच्या आयुष्याची होती. उच्च रक्तदाबाचा आजार अनेकदा आवाज न करता शरीरात विध्वंस करत असतो. औषधं थांबवली की त्याचा परिणाम कधी होईल, हे सांगता येत नाही.
प्रत्येक वेळी मृत्यूच होतो असं नाही, पण गंभीर गुंतागुंत होऊ शकते. म्हणूनच नियमित औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा असतो.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस जिवंत असताना डॉक्टरांना घरी बोलवायची गरज वाटत नाही, पण मृत्यू झाल्याचा संशय आला की पहिला प्रश्न…
“डॉक्टर,घरी याल का?”
यामागं भावनिक कारणंही असतात… परंतु अनेकदा त्यात एक व्यवहारही दडलेला असतो.
डॉक्टरांनी येऊन, “हो, मृत्यू झालाय,” असं सांगावं.
मग पुढची प्रक्रिया सुरू करावी.
जिवंतपणी उपचारांसाठी वेळ, पैसा किंवा नियोजन कठीण वाटतं, पण मृत्यूनंतर प्रमाणपत्रासाठी डॉक्टर हवाच असतो.
आपल्या समाजात आजाराकडे पाहण्याची पद्धतही विचित्र आहे…
गोळ्या संपल्या तरी चालतात. तपासणी पुढं ढकलली तरी चालते. बीपी मोजलं नाही तरी चालतं… पण अचानक काही बिघडलं की प्रश्न एकच–
“रात्रीपर्यंत तर चांगले होते, अचानक कसं काय झालं?”
अचानक?
खरंच अचानक…?
की आपण अनेक छोट्या इशाऱ्यांकडं दुर्लक्ष करत होतो?
यात दोष फक्त त्या इसमाचा नाही. आपल्या संपूर्ण समाजाचा आहे. आपण आजारापेक्षा लग्नाच्या तयारीवर जास्त चर्चा करतो…
औषधांच्या वेळेपेक्षा मोबाईलचा रिचार्ज वेळेवर करतो…
ज्येष्ठांच्या नियमित तपासणीपेक्षा त्यांच्या वाढदिवसाचा केक महत्त्वाचा वाटतो…
आणि मग एखाद्या सकाळी,
“डॉक्टऽऽर… आजी हलू-डुलू नाय रायली…” हे वाक्य आपल्या घरातही घुमू शकतं.
डॉक्टर म्हणून गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट वारंवार जाणवते…
‘लोक डॉक्टरांकडे रोग घेऊन कमी येतात;
ते अनेकदा दुर्लक्षाचे परिणाम घेऊन येतात!’
औषध वेळेवर घेतलं असतं, रक्तदाब तपासला असता, लक्षणं सुरू झाल्यावर लगेच उपचार घेतले असते, तर काही प्रसंग कदाचित टाळता आले असते. प्रत्येक वेळी नाही पण अनेकदा होऊ शकतं.
या घटनेत मला सर्वात जास्त अस्वस्थ करणारा शब्द कोणता होता माहीत आहे?
‘मी विसरलो.’
माणसं विसरतात. मोबाईल चार्ज करायला विसरत नाहीत.
टीव्हीचा रिमोट कुठे ठेवला हे आठवतं. ऑनलाइन सेलची तारीख लक्षात राहते. पण आईच्या बीपीच्या गोळ्या आणायच्या राहतात!
हे विस्मरण नसतं. ही आपल्या प्राधान्यक्रमांची यादी असते.
कदाचित म्हणूनच डॉक्टरांचं काम फक्त औषध लिहिणं नसतं. समाजाला पुन्हा पुन्हा आठवण करून देणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
रोग अचानक येत नाहीत, तर दुर्लक्ष हळूहळू वाढतं आणि अनेकदा मृत्यू एका सकाळी अचानक दिसतो; पण त्याची सावली बऱ्याच दिवसांपासून घरात वावरत असते.
पुढच्या वेळी घरातल्या ज्येष्ठांच्या औषधांचा डबा हातात घ्या. गोळ्या किती शिल्लक आहेत ते पाहा. कारण ‘डॉक्टर, आजी हलू-डुलू नाय रायली’ हे वाक्य कधीही एका कुटुंबाची उशिरा झालेली जाणीव ठरू नये !

- डॉ प्रज्ञावंत देवळेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...