अमेरिकेतील केंटकी नावाच्या स्टेटमध्ये एक वयस्क आजी आजोबा रहात होते.
दोघांच्या तब्येती ठीकच म्हणायच्या अशा होत्या.
एका रणरणत्या उन्हाच्या दिवशी आजी हळूहळू गाडी चालवत किराणा मालाच्या दुकानात पोचली.
दुपारचा उन्हातला थकवा अंगावर येत होता.
दुकानात खरेदी करून ती तिच्या गाडीजवळ आली.
पण तिला गाडीची किल्ली सापडेना.
तिनं दोन्ही खिसे चाचपले. पर्स उपडी करून दोन वेळा किल्ली मिळते का बघितलं.
तेवढ्यात तिला गाडीच्या आत किल्ली व तिचा मोबाईल दिसला.
“अरे देवा” किल्ली व मोबाईल गाडीत. गाडी लॅाक केलेली व आजी बाहेर. भाजून काढणाऱ्या उन्हात. अशी परिस्थिती होती.
तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ऊन सोसत नव्हतं.
तेवढ्यात सायकलवरून जात असलेला एक १६-१७ वर्षांचा मुलगा आजीला रडताना बघून थांबला.
“काय झालं?” त्याने विचारलं.
ती हताश झाली होती! “किल्ली गाडीत राहिली आहे आणि फोनही. आणि माझ्या नवऱ्याला फोन केला तरी काही उपयोग नाही कारण आमच्याकडे एकच गाडी आहे.”
तो मुलगा क्षणभर शांतपणे उभा राहिला..
“माझा फोन वापरा. तुमच्या नवऱ्याला सांगा की जॅक नावाचा मुलगा थोड्या वेळात घरी येईल. त्याला गाडीची दुसरी किल्ली दे!”
आजी चकित झाली.
“अरे, साडेतीन मैलावर घर आहे..म्हणजे जाऊन येऊन सात मैल अंतर..
एवढ्या भाजून काढणाऱ्या उन्हात तू कसा जाणार? तुला फार त्रास होईल.”
तो हसला.
“त्रास नाही होणार आजी.. डोन्ट वरी अबाऊट मी! तू दुकानात एअर कंडिशनिंग मधे जाऊन बस..येतो मी!” तो सायकलवर टांग टाकून रवाना झाला..
आजी त्याच्याकडे पाहत राहिली..
या वयात एवढी संवेदनशीलता कुठून आली?
या वयात अनोळखी व्यक्तीसाठी काही करावंसं का वाटलं?
तो सायकलवर बसला आणि निघून गेला.
उन्हात त्याची सावली लांब लांब होत गेली…
आजी दुकानात जाऊन बसली..
एक तासानंतर तो परत आला..
घामाच्या धारा लागलेल्या, गर्मीने त्याचा पांढरा टी शर्ट कच्च ओला झाला होता पण चेहऱ्यावर अतीव समाधान होतं.
“ही तुमची किल्ली,” त्यानं किल्ली पुढे केली.
आजीनं पर्स उघडली व त्याला पैसे देऊ केले.
तो हसली..“नको. नको..आज मला व्यायामाची गरज होती. आणि आजी तू उन्हात उभी राहिली असतीस तर तुला चक्कर आली असती..
मला काही नाही होत. मला उन्हात काम करण्याची सवय आहे. सो डोन्ट वरी अबाऊट इट. निघू मी?” आजी गाडी सुरू करेपर्यंत तो सायकल वर एक टांग टाकून बघत उभा होता.
आजीनं गाडी सुरू केली..
खिडकी उघडून तिनं त्याला हात जोडले.. गॅाड ब्लेस यु! असा आशीर्वाद दिला.
तो वळला.
सूर्य मावळतीकडे झुकत होता.
त्याच्या सायकलची चाकं त्या सोनेरी प्रकाशात चमकत होती.
तो मुलगा तिथून निघून गेला..
आजी घरी पोचली..
आजोबांजवळ जॅकचं कौतुक करत तिनं व आजोबांनी त्याला मनोमन आशीर्वाद दिले..
आजही कोणीतरी माहित नसलेल्या कुणासाठीतरी सात मैल जाण्यास तयार आहे..
जॅक सारखे लोक माणुसकीचं नातं कसं जगायचं जगाला समजावून सांगत असतात..
देण्यासाठी पैसा लागत नाही..ऐश्वर्य लागतं नाही..
लागतं फक्त एक संवेदनशील मन..करूणा असणारं..
May God bless people like Jack ..the quiet angels who make life brighter without asking for anything in return.
©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
सत्य घटनेवर आधारित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा