बुधवार, ३१ जुलै, २०२४

1314. कोल्ड कॉफी

 आज जवळपास पंधरा वर्षांनी ती दिसली होती त्याला ! त्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारी  त्याची स्वप्नसुंदरी ! पण आज पंधरा वर्षांनी ही त्याने तिला अचूक ओळखले होते. तोच कमनीय बांधा ज्यामुळे ती चालताना तिच्या लयबध्द हालचालीवर नजर खिळून रहायची. तोच चेहरा ज्याकडे पाहून त्याच्या काळजात थंडावा पसरायचा. तेच गालातल्या गालात हसणं ज्याकडे पाहून तो वेडा व्हायचा. अन् तोच सावळा रंग ज्याची त्याला भुरळ पडायची. तेच कुरळे केस जे तिच्या कपाळावर नागमोडी वळणे घेत तिच्या गालांवर रुळत.तेच काळेभोर गहिरे डोळे ज्यात तो स्वतःला विसरून जात असे. वयाची थोडीफार चाहूल तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती वगळता तिच्यात काडीचाही बदल झाला नव्हता. तिचे लक्ष नव्हतेच गेले त्याच्याकडे..त्यानेच मग हाक मारली, 
"मयु."
ही हाक ऐकताच तिने पटकन मागे वळून बघितले. त्याला पहाताच तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंदलहरी उमटल्या.
उत्स्फूर्तपणे ती म्हणाली,
"अय्या तू! इतक्या वर्षांनी"!
"ओळखलेस मयु मला? आठवण आहे म्हणायची माझी"!
"म्हणजे? तुला काय वाटले मी तुला विसरले"?
"सांगून तर तसेच गेली होतीस ना की मला विसरुन जा. यापुढे पुन्हा कधीच भेटू नकोस.".
"पण तू आजही कुठे विसरला आहेस मला? पहाता क्षणी ओळखलेस की इतक्या वर्षांनी ही"!
"आपल्या जीवाला कधी कोण विसरु शकते का? माझा जीव तेव्हा तुझ्यात किती गुंतला होता ते चांगलेच माहीत आहे तुला ".
"हेच तुझे स्वतःला  प्रेमात झोकून देणे मला नको होते. माझ्या प्रेमात तू स्वतःचे अस्तित्व विसरत चालला होतास. तुझे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करु शकले नसते सुमित" !
"उलट तुझ्या सोबतीने वेगळा परिणाम झाला असता मयु. तू सोबत असतीस तर आज मी हिमालयाएवढी उंची गाठली असती."
"माझ्यामुळे तुझे आयुष्य बर्बाद झाले हे जगाकडून ऐकून घ्यायचे नव्हते मला सुमित. म्हणून काळजावर दगड ठेवून मी तो निर्णय घेतला होता.".
"मग आज त्या जगात तू तरी आनंदात आहेस ना मयु, ज्या जगासाठी तू मला दूर केलेस !" 
"चार दिवसांनी तू मला विसरुन जाशील, आपले मन अभ्यासात रमवशील असे वाटले होते मला. आणि तसे झाले ही होते. मी जरी हे शहर सोडून गेले होते तरीही तुझी सगळी चौकशी करत होते मी"."अस्सं? मग मला नोकरी मिळाली तेव्हा का आली नाहीस? तुझी इच्छा तर पूर्ण झाली होती ना! मी माझे शिक्षण पूर्ण करुन चांगली नोकरी ही पटकावली होती."
"हो, पण इतक्या वर्षांत तू मला विसरून गेला असशील असे वाटले मला. कारण तू परत कधीच माझ्याकडे आला नाहीस".
"हे बरे आहे मयु. आधी शपथा घालून तुझ्याजवळ कधीच यायचे नाही असे वदवून घ्यायचे आणि वरुन असे बोलायचे."
"खूप वाट पाहिली मी तुझी.मला वाटले होते तू नक्की येशील परतून तुझ्या मयुकडे. कारण मयु तुझा श्वास आहे हे मी जाणले होते. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तुझ्या परतून येण्याची आशा अंधुक झाली. मी तुझी वाट पहाणे सोडून दिले".
"मयु, तुला दिलेली शपथ मोडावी असे अनेकदा मनात आले. मन खूपदा बंड करुन उठले पण मग प्रेमाला काय अर्थ राहिला असता? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले होते मयु."
"हं... आता यावर बोलून काय उपयोग? चल काॅफी घेऊया."
समोरच्या काॅफीशाॅप मध्ये दोघे शिरले. समोरासमोर बसल्यावर सुमितने  दोन कोल्डकाॅफीची ऑर्डर दिली.
"माझी आवड आजही  लक्षात आहे तुझ्या"? यावर सुमितने तिच्याकडे पाहून फक्त स्मित केले.
त्याच्या बोटातील अंगठी पाहून तिने विचारले,"काय नाव आहे बायकोचे? बघू फोटो"!
त्याने  हसून पाकीट उघडले आणि तिच्यासमोर फोटो धरला. फोटो पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
"म्हणजे सुमित तू आजही..."
सुमित ने मान हलवली.
 ते पाहून मयु म्हणाली," माफ कर मला सुमित ! तुझे तारुण्य मी वाया घालवले."
"मयु, असे बोलू नकोस गं. तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं मी. तू माझ्यापासून दूर असलीस म्हणून काय झाले ! ते फक्त शारीरिक आकर्षण नव्हते. तुला वाटले होते की शरीराच्या आकर्षणामुळे मी वाहवत जाईन. पण तू समजूच शकली नाहीस माझ्या प्रेमाची खोली. तुझ्या जवळ नसण्याने ही मला काहीच फरक पडला नाही मयु .कारण माझ्या अंत:र्चक्षुंनी मी तुला कायमच माझ्या हृदयात पहात होतो. तुझी निकटता कायमच अनुभवत होतो. म्हणूनच वेगळ्या जोडीदाराची गरज मला आजवर भासली नाही, इथून पुढे ही भासणार नाही."
" तुझ्या हृदयस्थ मयुचीच सोबत पत्नी म्हणून चालेल का तुला"?
"म्हणजे मयु..तू ही"?
"हो.आजही मी तुझीच वाट पहातेय सुमित !"  
पंधरा वर्षांचे निःशब्द हितगुज करत दोन वेडे आवेगाने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकमेकांच्या नजरेत  हरवले होते. शेजारी कोल्ड कॉफीचे मग तसेच पडले होते ओठांनी उष्टावण्याची वाट पहात.

©® सौ.हेमा पाटील
दिनांक २४/७/२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...