डोळ्यावर उजेड आला आणि त्याला जाग आली. भिंतीवरच्या घड्याळाकडे त्याचे लक्ष गेले. अरे बापरे ! आठ वाजले. आता ऑफिसला जायला उशीर होईल. तो ताडकन अंथरुणातून उठून उभा राहिला. आता भरभर आवरायला लागेल. अंथरुणे घडी करता करता त्याची टाइम मॅनेजमेंट सुरू झाली. बिछाना नेहमीप्रमाणे लख्ख आवरून तो स्वयंपाकघरात गेला .
बायकोची आणि सुनेची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. "हे काय कोणी मला उठवलं का नाही?" तो बायकोला म्हणाला. "आता काय करायचे लवकर उठून? "बायको म्हणाली. "अय्या बाबा तुम्ही विसरलात की काय ! कालच तुम्ही रिटायर झालात ना ! किती मज्जा!" सून म्हणाली. त्याच्या रिटायरमेंटचा आनंद तिच्या चेहऱ्यावर फुलून आला होता. त्याला वस्तुस्थितीची जाणीव झाली. तो खिन्नपणे वळला. गॅलरीत गेला. खाली रस्त्यावरची गजबज पाहू लागला. किती वर्ष आपण या गजबज गलबल्याचा एक भाग होतो. आता मात्र रिकामपण.
"अहो चहा घ्या." बायको म्हणाली "थोडं थांब. अजून आवरलं नाही" "आवरुन घ्या न् पटकन" तिने चहा झाकून ठेवला. अन्हिकं आवरून तो अंमळ सोफ्यावर टेकला. नाही म्हणायला थोडेसे निवांत वाटत होते. त्याने चहाचा एक घोट घेतला. चहाच्या त्या चवीने त्यांच्या मनाची खिन्नता दूर पळाली. थोडासा उत्साह वाटला. त्याने वर्तमानपत्र वाचायला घेतले. खूप काही असतं वाचायला पण एरवी जमत नव्हतं. आज अख्खं वर्तमानपत्र वाचून काढू या. त्याच्या मनाने ठरवलं.
"बाबा बाबा जरा देता का पेपर? चाळून लगेच तुम्हाला परत देतो." मुलगा म्हणाला. त्याला आठवलं, तो सुद्धा निघता निघता वर्तमानपत्र चाळत असे. काही महत्त्वाच्या बातम्या वाचायच्या. बाकीचा सगळा पेपर ट्रेनमध्ये वाचायचा. "म्हणजे तू नेणार आहेस का पेपर बरोबर.?" "नाही हो बाबा. मी गाडीत ऑनलाइन पेपर वाचतो. पण सकाळी निघता निघता अंमळ थोडसं." मुलगा म्हणाला. वरवर वर्तमानपत्र चाळून त्याने पेपर आपल्या वडिलांच्या हातात दिला. "चला बाबा मी निघतो. तुम्ही बसा आता निवांत."
मुलगा आणि सून कामाला निघून गेले. बायको स्वयंपाक घरात रमून गेली. घरात एक प्रकारची शांतता पसरली. काय करावं ते त्याला समजेना. त्याने पुन्हा घडय़ाळ्याकडे पाहिलं. सकाळचे अकरा वाजले होते. त्याला ऑफिसमधल्या त्याच्या सहकाऱ्यांची आठवण झाली. मोबाइल कुठे गेला? तो मोबईल शोधू लागला. सकाळपासून त्याला मोबाइलची आठवण नव्हती. बेडरूममध्ये जाऊन त्याने त्याची ऑफिसची बॅग उघडली. आत त्याचा मोबाईल वाजत होता. त्यांने घाई घाईने मोबाइल बॅग मधून बाहेर काढला.
त्याच्या सहकाऱ्याचा फोन होता. "काय रे! केव्हापासून फोन करतोय. घरकामात दंग झालास की काय?" फोनवर त्याच्या सहकाऱ्यांची सरबत्ती सुरूच झाली. "अरे नाही रे असाच बसलो होतो. सगळ्या आठवणी येत आहेत." "अरे लेका आता निवांत बस. चाळीस वर्ष मरमर काम केलस ना" सहकारी म्हणत होता. एका पाठोपाठ सगळे सहकारी आळीपाळीने फोनवर बोलत होते. त्याची चौकशी करत होते. त्याचं मन आनंदाने भरून आलं.सहकाऱ्यांशी बोलून त्याने फोन ठेवला. ते आपल्याला विसरलेले नाहीत या विचाराने त्याच्या मनावर फुंकर घातली.
"जरा बाजारात जाऊन येते हं." बायकोच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. बायको पायात चपला सरकवत होती. "मी पण येऊ का तुझ्या बरोबर" बायकोच्या उत्तराची वाट न बघता पायात चपला सरकवून तो तिच्या बरोबर चालू लागला. कितीतरी वर्षांनी तो सकाळच्या वेळी घाई गर्दी न करता घराबाहेर पडला होता. चढते ऊन होते. हलकासा गार वारा देखील होता. लहान मुलाच्या उत्साहाने तो बाजारात निघाला. बाजारातही त्याला वेगळा उत्साह जाणवत होता हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन वेगवेगळ्या भाज्या भजीवाल्यांच्या टोपलीत विसावल्या होत्या. "आज कोणती भाजी घेऊ?" "कोणतीही घे." तो खुशीत म्हणाला. "बघा. हं. मागाहून पानावर बसल्यावर कुरकुरत राहाल." "नाही ग." बायकोने तीन चार भाज्या घेतल्या . दोघे घरी निघाले .
वाटेत त्याने बायकोसाठी मोगऱ्याचा गजरा घेतला. तिने तो आनंदाने केसात माळला. तिच्या मनातली खुशी न बोलताही त्याच्या मनापर्यंत पोहोचली. दोघंजण घरी आले तेव्हा तासभर उलटून गेला होता. बायको पुन्हा स्वयंपाकघरात रमली. "मी काहीतरी मदत करतो. असं म्हणून त्याने स्वयंपाकघरात थोडीशी लुडबुड केली. पान वाढायला मदत केली. जेवून तो दुपारी जरा लवंडला. त्याने घड्याळाकडे पाहिले. दुपारचे तीन वाजले होते. अर्धा दिवस तर संपला होता. त्याच्या इतक्या वर्षांच्या नोकरदार आयुष्यात तो कधीच बिनकामाचा घरी बसला नव्हता. विचार करता करता त्याचा डोळा लागला. तो उठला तेव्हा संध्याकाळ घरात शिरली होती.
एवढी सुंदर संध्याकाळ तो प्रथमच अनुभवत होता. त्याची संध्याकाळ ही कायम थकलेली दमलेली असायची. ही उतरती उन्हं आता जरा आराम करा असंच सांगतायेत असं त्याला वाटलं. नव्या उत्साहाने तो गॅलरी पाशी गेला. त्याचं लक्ष बायकोने लावलेल्या फुलझाडांकडे गेलं. तिथे फुललेल्या छोट्याश्या ताटव्यांवर एक फुलपाखरू उडत होतं. त्याने फुलपाखरांचा पंखाला हलकेच स्पर्श केला. एक नवीन जग त्याच्यासमोर उलगडत होते. त्याच्या मनाने हळूहळू त्या जगाचा स्वीकार करायचे ठरवले होते.
मधुरा भरत चव्हाण ✍️
Repost
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा