गेल्या दोन तासांपासून चालू असलेली मिटींग संपण्यात आली होती. शेवटच्या मुद्द्यावर नजर टाकून जी. एम. साहेबांनी बोलायला सुरुवात केली.
"पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीत काही अमेरिकन डेलिगेटस् येताहेत. त्यांना आपल्या नवीन प्राॅडक्टबद्दल प्रेझेन्टेशन द्यायचंय. कोण करु शकेल हे काम?" जी.एम.साहेबांनी समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं.
"सर आपले प्राॅडक्शन मॅनेजर अभिषेक काळकर आहेत ना ! त्यांना या प्राॅडक्टची चांगली माहिती आहे" कुणीतरी सुचवलं. जी.एम.साहेबांनी तोंड वाकडं केलं.
"अभिषेक तसा ठीक आहे, हुशार आहे पण या कामासाठी योग्य नाही. मला असा माणूस हवाय जो उंच आणि रुबाबदार असेल जेणेकरुन या डेलिगेटसवर त्याचं इंप्रेशन पडेल. यु नो फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन. आणि अभिषेकचं किती इंप्रेशन पडेल हे तुम्हांला माहितच आहे"
त्यांनी असं म्हंटल्यावर एकच हशा पिकला.
"सर मग मला वाटतं अभिषेकचा असिस्टंट, वैभव त्यासाठी योग्य राहील. तुम्हांला हवी तशी पर्सनॅलिटी आहे त्याची. पण नाॅलेजच्या बाबतीत अभिषेकच्या तुलनेत तो झिरोच म्हंटला पाहिजे."
एक अधिकारी बोलले
"हरकत नाही आपण त्याला ट्रेन करु. म्हणजे नंतर अमेरिकेत जायलाही त्याला प्राॅब्लेम रहाणार नाही. एक आठवडा पडलाय आपल्याकडे. चला लागूया कामाला."
मिटींग संपली. नेहमीप्रमाणे अभिषेकला महत्वाच्या कामगिरीतून डावलण्यात आलं होतं. अतिशय हुशार आणि पात्र असतांनाही केवळ व्यक्तिमत्त्व चांगलं नाही म्हणून त्याच्याऐवजी पात्र नसणाऱ्या व्यक्तीची निवड झाली. त्याचा असिस्टंट वैभवला ट्रेनिंग देऊन पुढे अमेरिकेला पाठवण्यात आलं. अभिषेकला हात चोळत बसण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. त्यांच्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच झालं होतं असं नाही तर नेहमीच घडत आलं होतं. जन्मापासूनच तो उपेक्षित होता.
दोन मुलं आणि एका मुलीनंतर नको असतांनाही त्याचा जन्म झाला. खाणारं एक तोंड वाढलं याचा त्याच्या वडिलांना राग आला होता. आईने तर तो पोटात तीन महिन्यांचा झाला असतांनाच त्याला मारुन टाकायचा प्रयत्न केला होता पण डाॅक्टरांनी काही कारणास्तव नकार दिला. सहसा मुली नकोशा असतात पण इथे हा मुलगा असूनही नकोसा होता. त्यातून तीन वर्षाचा झाला तरी तो बोलेना. मुका निघतोय की काय ही भिती वाटत असतांनाच तो थोडा थोडा बोलायला लागला. घरची गरीबी. त्यामुळे तीन मुलांच्या तुलनेत त्याचे कधी लाड झाले नाहीत. उलट आईवडिलांचा तिरस्कारच त्याच्या नशीबी आला. त्याचं दुर्दैव असं की तो सात आठ वर्षांचा असतांना कसल्यातरी रोगाने आजारी पडला. त्याला लोकलाजेस्तव वाचवण्यात त्याच्या बापाची सगळी पुंजी संपली. तो वाचला पण त्याची शारीरिक वाढ मात्र खुंटली. घरात सगळे उंच आणि देखणे असतांना हा मात्र ठिंगूच राहिला. शाळेत सगळे त्याला बुटूबैंगन म्हणून चिडवत. कबड्डी, खोखो,बँडमिंटन या खेळात केवळ तो बुटका आहे म्हणून त्याची निवड व्हायची नाही. शारीरिक वाढ जरी कमी असली तरी तो अतिशय हुशार होता. मात्र वर्गात नेहमी तो दुसराच यायचा. पहिल्या नंबरची व्यक्ती बदलायची पण हा दोन नंबरला कायम रहायचा. इंजीनियरींग काॅलेजमध्ये तो आला तेव्हा सगळ्यात
लहान दिसायचा. त्याची ५ फुट ३ इंच उंची, किरकोळ देहयष्टी. साधारण चेहरा पाहिला की कुणालाही तो काॅलेज स्टुडंट वाटायचा नाही. तो हसला की रडल्यासारखा दिसायचा आणि रडला की हसल्यासारखा दिसायचा. कुणी त्याला विदुषक म्हणायचं, कुणी उंदीर तर कुणी ठिंगूजी. परीक्षांचे निकाल लागू लागले आणि त्याचा शाळेप्रमाणेच इथेही दुसराच नंबर येऊ लागला. मग त्याला नंबर दोन हे नावच पडलं. त्याला पाहिलं की आचरट मुलं नंबर दोनवरुन घाणेरडे विनोद करायची. तो सगळं ऐकायचा आणि दुर्लक्ष करायचा. ही टिंगलटवाळी थांबवायची असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करुन दाखवावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं. त्याने बाजारातून बासरी आणली आणि स्वतःच शिकून तरबेज झाला. मग वेगवेगळी वाद्यं शिकायचा त्याने सपाटाच लावला. काॅलेजच्या इलेक्ट्रीकल ब्रँचच्या क्रिकेट टिममध्ये त्याला कुणी घेईना. हाता पाया पडून तो कसाबसा सामिल झाला. बॅटींगला सगळ्यात शेवटी त्याला पाठवण्यात आलं. एकाच षटकांत पाच षटकार मारुन त्याने सनसनाटी निर्माण केली. कॅप्टन त्याला बाँलिंग देईना. पण जेव्हा प्रतिस्पर्धी टिम जिंकणार अशी परीस्थिती निर्माण झाली तेव्हा याला बाॅलिंग देण्यात आली. पठ्ठ्याने दोन षटकातच सहा बळी घेऊन हवा करुन टाकली. सुट्यांमध्ये काहीजणांचा ग्रुप हिमालयात ट्रेकिंगला गेला त्यांच्याबरोबर हाही ते नको म्हणत असतांना गेला. तिथे सर्वांना हा काही अवघड ट्रेकिंग पुर्ण करु शकणार नाही असं वाटत असतांना हा प्रत्येक दिवशी सर्वांच्या अगोदर कँपवर पोहचू लागला. राॅक क्लायंबिंग आणि रॅपलिंग तो लिलया करायचा. काॅलेजच्या गॅदरींगमध्ये नाटक होणार असलं की हा नाटकात रोल मागायचा पण याचं व्यक्तिमत्व बघुनच दिग्दर्शक त्याला नाही म्हणायचे. मग हा बासरी वादनाचा कार्यक्रम करायचा. ते ऐकून खरे संगीतप्रेमी टाळ्या वाजवायचे. उरलेले त्याच्यावर घाणेरडे फिशपाँड्स टाकण्यात धन्यता मानायचे. तो खऱ्या अर्थाने अष्टपैलू होता. कोणत्याही क्षेत्रात त्याला टाका तो त्यात एक्सपर्ट व्हायचा. पण दुर्दैवाने त्याचं हे अष्टपैलूत्व त्याच्या व्यक्तिमत्वाने झाकोळून टाकलं होतं. काॅलेजमध्ये अनेक सुंदर सुंदर मुली होत्या. एखादी तरी मुलगी आपल्या अष्टपैलूत्वावर, आपल्या गुणांवर भाळून आपल्यावर प्रेम करेल अशी त्याला आशा वाटायची. स्त्री पुरुषाच्या रुपावर नाही तर त्याच्या पराक्रमावर भाळते असं कुठतरी त्याने वाचलं होतं म्हणून त्याच्यापेक्षा बुटक्या मुलींकडून तरी प्रतिसाद मिळेल असं त्याला वाटायचं. पण व्हायचं उलटच ! या बुटक्या मुली त्यांच्यापेक्षा कितीतरी उंच असणाऱ्या मुलांसोबत प्रेमप्रकरणं करायच्या पण याच्याकडे ढुंकूनही पहात नसत. काॅलेजमध्ये ह्याला मित्र नव्हते. हाच कुणाकुणाबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करायचा. पण बहुतेक वेळा त्याच्या पदरी निराशाच यायची. कुणाच्याही मदतीला धावून जायची त्याला सवय होती. त्याच्या मदतीला मात्र कुणीच यायचं नाही. काॅलेज संपलं. हा परत एकदा दोन नंबरने पास झाला. कौतुक करायचं सोडून आख्खं काॅलेज खदाखदा हसलं.
काॅलेज सुटलं आता नोकरीसाठी प्रयत्न सुरु झाले. इंटरव्ह्यूलाही तोच प्रकार घडु लागला. ह्याची शैक्षणिक कारकीर्द पाहून इंटरव्ह्यू घेणारे प्रभावित व्हायचे पण ह्याला प्रत्यक्ष पाहून तोंड वाकडं करायचे. जुजबी प्रश्न विचारुन त्याची हकालपट्टी होऊ लागली. एक वर्ष झालं तरी तो बेकारच होता. भाऊ त्याला वाटेल ते बोलू लागले. वहिनी टोमणे मारायच्या. आईने तर त्याला जीव नकोसा करुन टाकला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाला ती त्याला टाकून बोलायची. आईचं असं वागणं पाहून तो दुःखी व्हायचा. कधीकधी ती आपली खरी आई नसावी अशी शंकाही त्याला वाटून जायची. खरं तर आपलं सर्व शिक्षण त्याने स्वतःच्या स्काॅलरशिपवर केलं होतं. भावांना कधीही त्याने खर्चात पाडलं नव्हतं. घरीही तो सगळी कामं करायचा. त्याला उत्तम स्वयंपाक येत होता. आई आणि वहिनींपेक्षा चांगले पदार्थ तो करायचा. इतकं असुनही त्याचा पदोपदी अपमान केला जायचा. एक दिवस मात्र त्याचं नशीब पालटलं. एका कंपनीत इंटरव्ह्यूमध्ये ह्याने इतकी छान उत्तरं दिली की कंपनीचा मालक खुश झाला. बाकीच्यांनी ह्याच्या व्यक्तीमत्वावर बोट ठेवलं पण मालकाला हुशार माणसांची पारख होती. त्याने सगळ्यांचा विरोध डावलून ह्याची निवड केली. त्याने मग मागे वळून पाहिलं नाही. आपल्या हुशारीने आणि मेहनतीने त्याने कंपनीला प्रगतीपथावर नेऊन सोडलं. हे करत असतांनाच त्याला शेअर मार्केटचा रस्ता सापडला. त्याने त्याचा सुक्ष्म अभ्यास केला आणि पैसा गुंतवायला सुरुवात केली. दोनच वर्षात लाखो रुपये त्याच्या हातात खेळू लागले. मग त्याने मोक्याची जागा बघून तिथे अपार्टमेंट बांधायला घेतलं. त्यात त्याला प्रचंड फायदा झाला. थोड्याच अवधीत तो लखपतीचा करोडपती झाला. मग त्याने एक प्लाॅट घेऊन एक शानदार बंगला बांधला. अर्ध आयुष्य उलटून गेलं तरी स्वतःचं घर घेऊ न शकलेल्या भावांना त्याचा मत्सर वाटू लागला. वन बीएचके च्या वडिलोपार्जित घरातून एवढ्या मोठ्या फॅमिलीने आपल्या मोठ्या बंगल्यात रहायला चलावं यासाठी त्यांने भावांची आणि वहिनींची मिनतवारी केली. पण कुणीही तयार झालं नाही. "मोठ्या घरात आम्हांला करमत नाही. आमचा श्वास कोंडतो. आम्हाला आमच्या वडिलांचं घर मुळीच सोडायचं नाही" असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी आईला त्याने कसंबसं तयार केलं.
आता तो सत्तावीस वर्षाचा झाला होता. कुणीतरी आपल्या लग्नाचं बघायला हवं असं त्याला वाटू लागलं. शेवटी तोही एक पुरुष होता. एका चांगल्या मुलीशी लग्न करुन संसार थाटावा असं त्याला वाटणं साहजिकच होतं. पण त्याचे भाऊ आणि जवळचे नातेवाईक याबाबतीत दुर्लक्ष करत होते. कदाचित त्याचं रुप पाहून कोणतीही मुलगी त्याला पसंत करणार नाही असं त्यांना वाटत असावं. नाही म्हणायला चारपाच स्थळं त्याला विवाह संस्थेकडून आली होती. पण त्या मुली इतक्या वाईट होत्या की त्यांना तो हो म्हणणं शक्यच नव्हतं. एक दिवस त्याच्या मोठ्या वहिनीने तिच्या दुरच्या नात्यातल्या बहिणीचं स्थळ आणलं फोटोवरुन तरी मुलगी बरी वाटत होती. तिचं एक जुळलेलं लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडलं होतं. अभिषेकला तिच्याबद्दल सहानभुती वाटली. बघण्याचा कार्यक्रम झाला. अभिषेकने तिला छंदाबद्दल विचारलं पण टिव्ही पहाण्याव्यतिरिक्त तिला कोणताही छंद नव्हता. अभिषेकच्या प्रश्नांना ती मनमोकळे उत्तरंही देत नव्हती. ती लाजत होती असं नंतर सगळ्यांचं मत पडलं पण अभिषेकला ते काही चांगलं लक्षण वाटलं नाही. सगळ्यांनीच दबाव आणल्यावर त्याने शेवटी होकार दिला. अखेरीस साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतरच्या काही दिवसातच त्याला कामानिमित्त अहमदनगरला जावं लागलं. तिथे शाळेतला वर्गमित्र सुरेशशी योगायोगाने भेट झाली. सुरेश अहमदनगरजवळच्या एका गांवात अनाथाश्रम चालवत होता. त्याने अभिषेकला आपल्या अनाथाश्रमाला भेट देण्याची विनंती केली. त्याने ती मान्य केली. आपल्यासारख्याच उपेक्षित मुलांना भेटायला, त्यांची दुःख जाणून घ्यायला तो आतूर होता. अनाथाश्रमाच्या अंगणात त्याने आपली गाडी लावली. तिथला स्वच्छ आणि सुंदर परीसर पाहून तो चकीतच झाला. सुरेशच्या कार्यालयात बसुन दोघं चर्चा करु लागले. सुरेश माहिती देत असतांनाच एक मुलगी आत आली आणि म्हणाली
"सुरेशदादा जेवण तयार आहे. चलताय ना जेवायला?"
अभिषेकने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्या गोड आणि सुंदर चेहऱ्याकडे पहातच राहिला.
"ही स्मिता. अगोदर आपल्याच आश्रमात होती. आजकाल आपल्या इथे फक्त स्वयंपाक करायला येते आणि स्मिता हा माझा मित्र अभिषेक नाशिकमध्ये एका कंपनीत सिनीयर इंजीनियर आहे. खुप हुशार आहे बरं का ! शाळेत असतांना नेहमी टाॅपला असायचा." स्मिताने गोड हसून त्याला नमस्कार केला आणि सुरेशला म्हणाली.
"मी तयारी करते. तुम्ही या दोघं मागून" आणि ती निघून गेली. भारावलेल्या अवस्थेत तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत अभिषेक सुरेशला म्हणाला
"इतकी सुंदर मुलगी तुझ्या आश्रमात कशी काय?"
"तुला माहित नसेल माझे वडिलही अनाथच होते. त्यांना एका श्रीमंत माणसाने म्हणजे माझ्या आजोबांनी दत्तक घेतलं होतं. वडिलांनी त्यांचे जसे हाल झाले तसे इतर अनाथ मुलांचे होऊ नयेत म्हणून हा आश्रम सुरु केला. एक दिवस रस्त्याने जातांना बाबांना ही मुलगी झाडाखाली ठेवलेली सापडली. त्यांनी तिला घरी आणलं. तिला वाढवलं. ती इतकी गोड आणि हसरी होती की तिचं नाव त्यांनी स्मिता ठेवलं. काही वर्षांनी तीसुद्धा अनाथाश्रमातील या मुलांमध्ये सामील झाली. सध्या आम्ही तिला माझ्या मावशीकडे ठेवलंय कारण नियमानुसार १८ वर्षांपुढच्या मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही. ती स्वयंपाक फार सुरेख करते म्हणून आम्ही तिला स्वयंपाकाला बोलावून घेतोे. तू पाहिलंच तिचा आवाज किती गोड आहे ते. ती गातेही फार सुरेख. तिला हार्मोनियमही छान वाजवता येतं"
"इतक्या सुंदर मुलीला बेवारस सोडून देणारी तिची आई किती कठोर म्हणावी." अभिषेक दुःखाने म्हणाला
" हो ना ! नक्कीच ते एखाद्या उच्चभ्रू सौंदर्यवतीचं पाप असावं"
"पण त्यात या बिचाऱ्या मुलीचा काय दोष?"
"खरंय. सध्या अरे आम्ही तिच्या लग्नाचं बघतोय. पण निव्वळ अनाथ आहे म्हणून तिचं लग्न होत नाहीये. त्यातून ती सुंदर आणि गुणी असल्यामुळे कुठल्याही ऐऱ्यागैऱ्या मुलाच्या हाती आम्हांला तिला सोपवायचं नाहिये. तुझ्या पाहण्यात एखादा मुलगा असेल तर सांग. पण आम्ही हुंडाबिंडा काही देणार नाही "
"बघतो. मिळाला तर तुला फोन करतो"
"बरं चल आपण जेवायला जाऊ."
दोघं एका डायनिंग हाॅलमध्ये पोहचले. स्मिता तिथे बसलेल्या मुलांना वाढत होती. अभिषेक आणि सुरेश बसून जेवू लागले.
"काय कसं वाटलं जेवण?" सुरेशने विचारलं
"खरोखरच अप्रतिम ! एवढ्या दिडशे मुलांचं जेवण एकटी स्मिता बनवते?"
"बाकीचे तिला मदत करतात पण मुख्य चव तिच्या हातचीच"
तेवढ्यात स्मिता तिथे आली. हसऱ्या चेहऱ्याने भाजी वाढून गेली.
अनाथाश्रमाला एक लाख रुपयाच्या देणगीचा चेक देऊन आणि सगळ्यांचा निरोप घेऊन अभिषेक तिथून निघाला. पण स्मिताचा चेहरा काही त्याच्या मनातून जाईना. आपण थोडंसं थांबलो असतो तर त्या थंड मुलीऐवजी हिच्याशीच लग्न केलं असतं असा विचार त्याच्या मनात तरळून गेला. पण मग त्याच्या लक्षात आलं की इतक्या सुंदर मुलीसाठी एखादा राजबिंडाच मुलगा हवा. आपण तिच्यासाठी योग्य नाही. शिवाय अशा अनाथ मुलीशी त्याच्या आईने आणि भावांनी लग्नसुध्दा करु दिलं नसतं. मात्र मनाला समजावूनही ती काही त्याच्या मनातून गेली नाही. शेवटी एकदाचं त्याचं लग्न झालं. लग्नाचा सर्व खर्च अभिषेकच्या वहिनीने "मुलीचे वडील गरीब आहेत"असं सांगून त्यालाच करायला लावला. लग्नातही त्याची बायको पल्लवी आनंदी चेहऱ्याने वावरत नव्हती. आपण तिला आवडलेलो नाही हे अभिषेकच्या लक्षात आलं होतं. तिचा मुड पाहून त्याने माॅरीशसच्या हनिमूनचा बेत रद्द करुन नैनितालचा ठरवला. रेल्वेने ते निघाले.पल्लवी खिडकीजवळ जाऊन बसली. वारंवार विचारुनही ती रिस्पॉन्स देत नाहिये हे पाहिल्यावर अभिषेकने पुस्तक काढलं आणि ते वाचत बसला. नैनितालच्या हाॅटेलवर पोहचून फ्रेश झाल्यावर ती पलंगावर जाऊन बसली. अभिषेकही तिच्याजवळ जाऊन बसला आणि तिचा हात त्याने हातात घेतला. त्याबरोबर तिने तो झटक्याने सोडवून घेतला
"मला हात लावू नका." ती रागाने फुत्कारली
अभिषेकला धक्काच बसला.
"का? आपण इथे कशाकरता आलोय?"
"मला तुम्ही आवडत नाही"
"काय्य्यsss?अगं मग लग्न का केलंस माझ्याशी."
"आईवडिल आणि तुमच्या त्या वहिनीने जबरदस्ती केल्यामुळे."
"पण ती तर तुझी दुरच्या नात्यातली बहिण आहे ना? ती का बळजबरी करेल तुझ्यावर?"
"बहिण नका म्हणू तिला ! वैरीण आहे ती माझी. अशा नरकात ढकलून दिलं तिने मला !"
"नरक? हा जर नरक आहे तर स्वर्ग कशाला म्हणतात? तुझ्या माहेरच्या त्या दोन रुमच्या घाणेरड्या वस्तीतल्या घाणेरड्या घराला? जर तुला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर एवढा लाखोंचा खर्च आम्हांला कशाला करायला लावला? अगोदरच नाही सांगायचं. कमीतकमी मला फोन तर करायचास ! मी तेव्हाच मोडून टाकलं असतं लग्न" अभिषेक स्वतःवर संयम ठेवत म्हणाला. ती काही बोलली नाही.
"आणि मी तुला का आवडत नाही ते तरी कळू दे" जरावेळाने त्याने विचारलं
"चेहरा बघता ना रोज आरशात? तरी समजलं नाही?" तिनं रागाने विचारलं.
"तू कोणती अप्सरा आहेस गं? तोंडावरची माशी सुद्धा उडत नाही तुझ्या ! माझ्यात तरी बऱ्याच कला आहेत. हे सगळं ऐश्वर्य, ज्याच्याकडे पाहून तुझ्या आईवडिलांनी लग्न लावून दिलं ते मी माझ्या मेहनतीने कमावलंय. वडिलांचा किंवा भावांचा त्यात जराही वाटा नाही. तुझ्यात काय आहे गं? साधी बारावीसुध्दा पास होता नाही आलं तुला."
"माझ्यातले दोष काढू नका. मी एकदा सांगितलं ना तुम्हांला, मला तुम्ही आवडत नाही. बस! मला तुम्ही हात लावायचा नाही. नाही तर मी तमाशा करेन" आणि ती रडू लागली. तिच्या या पवित्र्याने अभिषेक सुन्न झाला. संतापाने त्याचे ओठ थरथरायला लागले. कपाळावरची नस तडतडू लागली. अशा नीच मुलीचं काय करावं हेच त्याला समजेनासं झालं.
"पण मग आता चार दिवस करायचं तरी काय?" मोठ्या मुश्किलीने मनावर ताबा ठेवत त्याने विचारलं
"मी तर फक्त खाणार आणि झोपणार आहे. अशा थंडीत कुठेही फिरायला येणार नाहिये. तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे." त्याने कपाळावर हात मारुन घेतला. काय काय अपेक्षा घेऊन तो आला होता. आजपर्यंतचं त्याचं आयुष्य लोकांकडून होणाऱ्या उपेक्षेतच गेलं होतं. कमीतकमी बायकोने तरी आपल्यावर प्रेम करावं अशी त्याची साधी अपेक्षा होती. ते प्रेम मिळावं म्हणून त्याने त्याच्यापेक्षा कमी शिकलेल्या,अरसिक आणि गरीब घरातल्या मुलीशी लग्न करुन स्वतःच्या मनाशी तडजोडच केली होती आणि ही तडजोड करुनही त्याच्या पदरी पडली होती फक्त उपेक्षा. नैराश्याच्या सागरात तो बुडून गेला. नैनिताल त्याचं आवडतं ठिकाण. तो मागेही एकदा इथे ट्रेकिंगला येऊन गेला होता. नैनी झीलच्या किनाऱ्यावर बायकोचा हात हातात घेऊन बसून रहायचं त्याचं स्वप्नं होतं. आज ते भंगलं होतं. दोन दिवस तो एकटाच नैनितालमध्ये फिरत होता. हिमालयातलं ते सुंदर ठिकाण बघायचं सोडून त्याची बायको दिवसभर रुममध्ये टिव्ही बघत बसायची. जेवणसुध्दा ती रुममध्येच मागवायची. तिच्या या अरसिकपणाला वैतागून तिसऱ्या दिवशी तो तिला म्हणाला.
" तुला जर असा फक्त टिव्हीच बघायचा होता तर इथे आलीच कशाला? आपल्या घरीच बसून टिव्ही बघत बसली असतीस." त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली
"मी तुम्हांला म्हंटलं नव्हतं नैनितालला घेऊन चलायला. तुम्हीच आणलं मला. आता मला जे आवडतं ते मी करतेय. तुम्हांला जे आवडतं ते तुम्ही करा."
"असं ना ! ठिक आहे मग. सामान आवर. आपल्याला इथून निघायचंय. पुरे झाला आपला हनिमून."
ती आवरत असतांना तो मार्केटमध्ये गेला. तिथल्या प्रसिद्ध सुवासिक आणि रंगीबेरंगी मेणबत्त्या त्याने विकत घेतल्या.
एक दिवस आधीच हनिमूनहून परतलेलं पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटलं. तिने सुनेला विचारलं
"का गं तुम्ही उद्या परत येणार होतात,आधीच कसे आलात?"
"तुमच्या मुलालाच विचारा. त्यांचं डोकं फिरलं आणि माझी इच्छा नसतांना मला परत घेऊन आले."
अभिषेकच्या डोक्यात तिडीक गेली.पण त्याने स्वतःला सावरलं.
ती अंघोळीला गेल्यावर अभिषेकने आईला सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून आई त्यालाच म्हणाली
"अरे तुला काय एवढी घाई झाली होती तिला हात लावायची? अरे बाबा काही मुली लाजऱ्याबुजऱ्या असतात. त्यांना नाही सहन होत धसमुसळेपणा. त्यातून ती गरीबाची पोर. अशावेळी आपणच सबुरीने घ्यायचं असतं."
"आई पण मी काहीच धसमुसळेपणा केला नाही..."
"काही सांगू नको मला. तुझं लग्न उशीरा झालं म्हणून तू जास्त चेकाळला असशी आणि हे बघ अभी, तुझं लग्नच होत नव्हतं.आता ते झालं तर टिकवून ठेव."
तो काही बोलायच्या आत आई तिथून गेली.
पल्लवी मोठी हुशार होती. आईसमोर किंवा दुसरं कुणीही समोर असलं की ती अभिषेकशी गोडगोड बोलायची. एकांतात मात्र ती त्याच्याशी तिरस्काराने वागायची, त्याला नाही नाही ते बोलायची. त्याची आई, बहिण, भाऊ वहिनींशी ती आदराने, प्रेमाने बोलायची. त्यांची सरबराई करायची. जमेल तेव्हा ती आडून आडून अभिषेक किती वाईट आहे हे त्यांच्या मनावर बिंबवायची. तिच्या या दुतोंडीपणाने अभिषेक हैराण होऊन गेला होता. आपल्या मनातल्या भावना कुणाला सांगाव्या तेच त्याला कळत नव्हतं. जीवाभावाचं, प्रेमाचं असं कुणीच नव्हतं. मनाची ही कोंडी कशी फोडावी याचा तो दिवसरात्र विचार करायचा. कामावरचं त्याचं लक्ष कमी झालं होतं. लग्नानंतरच्या सात-आठ महिन्यात त्याने शेअरबाजाराकडे ढुंकून पाहिलं नव्हतं. कंपनीतून घरी आलं की त्याची नजर खोलीत ठेवलेल्या वेगवेगळ्या वाद्यांकडे जायची. पण ती वाद्ये वाजवायचीही त्याची इच्छा उरली नव्हती. कुणासाठी वाजवणार होता तो? त्याचं वादन ऐकण्यात कुणालाच इंटरेस्ट नव्हता.
एक दिवस पल्लवी बाजारात गेली असतांना त्याची आई त्याला म्हणाली
"अभि बस कर तुझं प्लॅनिंग ! आता मला नातवाचं तोंड कधी एकदा पहाते असं झालंय."
अभिषेकला एकदम धक्का बसला
"माझं प्लॅनिंग? माझं कसलं आलंय प्लॅनिंग? अगं तुझी सुन मला तिच्या अंगाला हात लावू देत नाही. कशी होणार मुलं?"
"काही काय बरळतोय? ती तर म्हणत होती की तुझं दोन वर्ष मुल होऊ न द्यायचं प्लॅनिंग आहे म्हणून !"
"आई ती खोटं बोलतेय. तुला कसं सांगू ती किती दुटप्पी आहे ते ! तुम्हा सर्वांसमोर ती माझ्याशी प्रेमाने वागते. एकांतात मात्र ती माझा तिरस्कार करते. माझ्याशी तुसडेपणाने वागते. अंगाला हात लावला तर मोठमोठ्याने ओरडेन म्हणते. सांग मी काय करायचं?"
"इतक्या चांगल्या मुलीबद्दल असं बोलतांना तुला लाज नाही वाटत?"आई संतापाने म्हणाली
"ठिक आहे आई. तुला खोटं वाटतं ना? ती आल्यावर समोरासमोरच होऊन जाऊ दे. मलाही आता हे असह्य होत चाललंय. एकदाचा सोक्षमोक्ष लागूनच जाऊ दे"
पल्लवी आली आणि आईसमोरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पल्लवीने त्याच्यावर छळाचे खोटे आरोप लावले. ते ऐकून अभिषेकचा तोल गेला आणि त्याने तिच्या मुस्काटात लगावली. पल्लवी जोरजोरात रडू लागली. मग ती सरळ आपल्या रुममध्ये घुसली. रडतरडतच तिने बँग भरली. अभिषेकच्या आईने तिचे पाय धरले. माहेरी निघून न जाण्याबद्दल तिच्या विनवण्या केल्या. पण सासुचं काहीएक न ऐकता ती निघून गेली. ती गेल्यावर आई अभिषेकलाच खुप बोलली. घडलेल्या प्रकरणाबद्दल तिने त्यालाच दोष दिला. ती गेल्यानंतर अभिषेकचं मन तीनचार दिवस थाऱ्यावर नव्हतं. घडलेल्या घटनांनी त्याला खुप मनःस्ताप झाला होता. पण म्हणतात ना काळ सर्व दुःखांवर औषध असतो. दिवस जातात तशा मनावरच्या जखमा भरायला लागतात. हळूहळू तो ताळ्यावर आला.बा यको घरात नाही याचं त्याला बरंच वाटू लागलं. वाद्य वाजवण्यात, त्याच्या स्टडीरुममधली वेगवेगळी पुस्तकं वाचण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. त्याची बायको माहेरी जाऊन तीन महिने उलटले तरी तिचा किंवा तिच्या आईवडिलांचा एकदाही फोन आला नाही. सुनेला घरी घेऊन ये असं त्याची आई बऱ्याच वेळा त्याला बोलली कारण आजुबाजुचे शेजारी, नातेवाईक तिलाच सुनेबद्दल विचारत. अभिषेकही द्विधा मनस्थितीत सापडायचा. कुठेही एखादा कार्यक्रम असला की त्याला सपत्नीक बोलावलं जायचं. अशावेळी त्यालादेखील बायकोच्या माहेरी जाऊन तिला घेऊन यावं अशी तीव्र इच्छा व्हायची. पण तिथे गेल्यावर तिने अपमानित करुन पाठवलं तर? या भितीने तो चुप बसायचा. चार महिन्यानंतर त्याला वकीलाची नोटीस आली. त्यात घटस्फोटाची मागणी करण्यात आली होती. पुढे त्याने पल्लवीचा कसा मानसिक आणि शारीरिक छळ केला याचा खोटा उल्लेख होता. घटस्फोटाची मागणीमागे दिलेल्या कारणात तो पुरुष नसल्याचाही उल्लेख होता. ती नोटिस वाचून त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याच्या आईने त्याच्या वहिनीला बोलावून घेतलं. लग्न जमवण्यात तीच तर मध्यस्थ होती. आल्यावर तिने ती नोटीस वाचली.
"काय चुकीचं लिहिलंय यात? पल्लवी नेहमी मला फोन करुन हेच सांगायची भाऊजी."
"काही काय बोलताय वहिनी? मी कधी तिचा छळ केला? उलट तीच माझा मानसिक छळ करायची पण तुम्ही मध्यस्थ असल्यामुळे मला कधी बोलता आलं नाही. त्यात बघा तिने मी पुरुष नसल्याचा उल्लेख केलाय. अहो तिने मला हातच लावू दिला नाही तर...." वहिनी जोरात हसली
"अहो भाऊजी प्रत्येकच बायको नवऱ्याला असंच म्हणते पण नवरे ऐकतात कुठे? तुम्हीही तिचं ऐकायचं नव्हतं. तिने नाही म्हंटलं आणि तुम्ही ते ऐकलं याचा अर्थ तुमच्यातच दोष आहे असा होतो."
अभिषेकने तिला हात जोडले आणि म्हणाला.
"सगळेच पुरुष रानटी नसतात वहिनी!काही माझ्यासारखे बायकोच्या भावनांचा विचार करणारे असतात"
"ते जाऊ द्या. तुम्ही ताबडतोब तिच्याकडे जा. तिचा राग काढून, तिच्या हातापाया पडून तिला घरी घेऊन या. या कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या ना तर फार महागात पडेल तुम्हांला."
अभिषेक हो म्हणाला पण सासरी न जाता सरळ वकीलाकडे गेला. सुदैवाने वकील हुशार आणि इमानदार होता. त्याने अभिषेकला योग्य सल्ले दिले. केस कोर्टात उभी राहिली. पल्लवी त्याच्यावरचा एकही आरोप सिद्ध करु शकली नाही. अभिषेकने डाॅक्टरचं सर्टिफिकेटच सादर केल्यामुळे तो पुरुष नसल्याचा तिचा आरोप खोटा ठरला. निकाल लागला. घटस्फोट मंजूर झाला. अभिषेक बायकोला नांदवायला तयार होता. पण त्याच्या बायकोचीच नांदायची इच्छा नसल्याने फार कमी पोटगीवर तिला समाधान मानावं लागलं. घटस्फोट झाल्यावर अभिषेकला एकीकडे हायसं तर वाटत होतं तर एकीकडे आपल्या भावनांशी खेळल्याबद्दल बायकोचा संताप येत होता. आयुष्याची महत्वाची आणि गुलाबी स्वप्नांची दोन वर्ष वाया गेली होती. स्रीजातीवरचा त्याचा राग या प्रकरणामुळे जास्तच वाढला होता. कोर्टाने जरी त्याच्या बाजूने निकाल दिला असला तरी त्याची आई, बहिण,भाऊ, वहिनी आणि या सर्वांनी त्यालाच दोषी ठरवलं. बायकोला ताब्यात ठेवण्यात त्याला अपयश आलं असं त्यांचं म्हणणं होतं. या प्रकरणामुळे त्याची आई त्याला आधार द्यायचा सोडून आपल्या मोठ्या मुलांकडे निघून गेली. अभिषेक परत एकदा एकटा पडला. येणाऱ्या बायकोसाठी हौसेनं बांधलेलं एवढं मोठं घर भकास होऊन गेलं. ऑफिसमधून परतल्यावर त्या घरात थांबण्याची त्याची इच्छा होत नसायची. अशा स्थितीत माणसं व्यसनांमध्ये स्वतःला गुरफटून घेतात. वाईट मार्गाला लागतात. पण अभिषेकने स्वतःला खुप कंट्रोल केलं. व्यसनांऐवजी त्याने स्वतःला संगीतात बुडवून घेतलं. एका म्युझिक ग्रुपमध्ये सहभागी होऊन तो त्यांच्यासोबत जमेल तेव्हा कार्यक्रमासाठी जाऊ लागला.हे एकच क्षेत्र होतं जिथे त्याचं व्यक्तिमत्त्व प्रगतीच्या आड येत नव्हतं. इथे त्याची उपेक्षा करणारं कुणी नव्हतं उलट सगळीकडे त्याच्या वाजवण्याची प्रशंसाच व्हायची.
एक दिवस संध्याकाळी त्याला सुरेशचा फोन आला.
"काय अभिषेक कसं काय चाललंय?"
"ठिक आहे. सध्या मी एकटाच असतो. माझा घटस्फोट झाल्याचं तुला माहित पडलं की नाही?"
" हो रे. खुप वाईट वाटलं. पण तसं होणार याची आम्हांला कल्पना होतीच."
"म्हणजे? आम्हांला म्हणजे कुणाकुुणाला?"अभिषेकने आश्चर्याने विचारलं
"अरे तुझ्या बायकोच्या गावातच माझे मामा रहातात. एका गल्लीतच त्यांची घरं आहेत. तुझ्या लग्नाला मी जेव्हा आलो तेव्हा मामासुध्दा हजर होते. आम्हांला दोघांना एकमेकांना पाहून आश्चर्य वाटलं. मी तुझा मित्र आहे हे पाहून त्यांचा चेहरा पडला. मी चौकस होऊन विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बायकोचं गल्लीतच रहाणाऱ्या एका यु. पी. कडच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण होतं. पण तो नोकरीधंदा काहीच करत नसल्याने शिवाय जातीचाही नसल्याने तिचे आईवडील नकार देत होते. तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे सगळ्या गांवाला हे प्रकरण माहीत पडलं. अजून जास्त बदनामी होऊ नये म्हणून तिच्या आईवडीलांनी तिच्यावर जबरदस्ती करुन तुझ्याशी तिचं लग्न उरकवून टाकलं. जर ती मुलगी प्रियकराला विसरली नाही तर अशी लग्न सहसा यशस्वी होत नाहीत हे माहीत असल्यामुळे आम्हांला ती शंका आली होती. तुझा घटस्फोट झाल्याचं मला मामांनीच सांगितलं. घटस्फोटानंतर तुझी बायको त्या तरुणाबरोबर पळून गेली आहे"
"बापरे ! हे इतकं भयंकर प्रकरण होतं याची मला कल्पनाच नव्हती. माझी वहिनी यात मध्यस्थ होती तिनेही एका शब्दाने मला याबाबत सांगितलं नाही"
"तू तुझ्या वहिनीला याचा जाब जरुर विचार. तुला फसवलं गेलंय अभिषेक" ती कहाणी ऐकून अभिषेक सुन्न होऊन गेला.
"बरं पुढच्या महिन्यात आमच्या अनाथाश्रमात एक कार्यक्रम आहे. त्याची पत्रिका तुला येईलच. पण या कार्यक्रमाला काही आर्थिक मदत करता आली तर बघ."सुरेश म्हणाला
" जरुर करेन सुरेश. तू फार महत्वाची बातमी दिली आहेस मला." अचानक काहीतरी आठवून अभिषेक सुरेशला म्हणाला
"तुझ्या आश्रमात ती स्मिता नावाची मुलगी आहे तिचं लग्न झालं का रे?"
"नाही रे तीच एक मोठी काळजी आहे. मध्यंतरी तिला चारपाच स्थळं सांगून आली होती. पण कुणी अपंग,कुणी अनाथ आणि सर्वांची आर्थिक स्थिती बेताचीच. आम्हाला वेलसेटल्ड मुलगा हवा होता म्हणून आम्ही नकार दिला."
काहीतरी प्रेरणेने अभिषेक त्याला म्हणाला
"तुला राग येणार नसेल तर मी एक सुचवू? मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला. अर्थात तुला आणि तिला मान्य असेल तरच ! मला मान्य आहे मी तिच्या लायकीचा नाहिये. ती इतकी सुंदर आणि मी असा. त्यातून असा घटस्फोटीत. मी सहजच विचारतोय. नाही आवडलं तर बिनधास्त नाही सांग, मला अजिबात वाईट वाटणार नाही."
फोनवर शांतता पसरली. अभिषेकला ती शांतता जीवघेणी वाटू लागली.
"सुरेश ऐकतोयस ना?"न रहावून शेवटी त्यानेच विचारलं
"अभिषेक मला खुप विचार करावा लागेल. स्मिता माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. तिच्या भल्यासाठी मला असा घाईघाईने निर्णय नाही घेता येणार!"
"टेक युअर ओन टाईम सुरेश. मला घाई नाही आणि तिचाही निर्णय घे. तिला नाही आवडलं तर सरळ नाही सांग."
"ओके. कळवतो तुला." का कुणास ठाऊक अभिषेकला एकदम हुरुप वाटू लागला. स्मिता त्याला नकार देणार नाही अशी वेडी आशा त्याला वाटून गेली. नंतर त्याने वहिनीला फोन लावला. आपली फसवणूक का केली याचा जाब विचारला. वहिनीने फसवणूक केल्याचा ठामपणे इन्कार केला.उलट म्हणाली
"अहो भाऊजी. तिचं प्रेम होतं हे आम्हांला माहीत होतं पण ते खरं प्रेम थोडीच होतं. ते तर फक्त आकर्षण होतं. लग्न झाल्यावर तुम्ही प्रेम लावलंत तर ती त्या मुलाला विसरुन जाईल असं आम्हांला वाटलं होतं पण तुम्ही तर तिचा फक्त छळ केला. असं असल्यावर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने देखणा असलेल्या त्या मुलाला ती कशी विसरणार होती?"
"आता ती त्या मुलासोबत पळून गेलीये म्हणे"
"गेली असेल. आता तुम्हांला त्याच्याशी काय करायचंय? झालंय ना तुमच्या मनासारखं? मिळालाय ना तुम्हांला घटस्फोट? मग कशाला तिची चिंता करताय?"
त्याने संतापाने काॅल कट करुन टाकला. बायकांशी त्याचं कधीच जमलं नव्हतं. अगदी आईपासून तो हे अनुभवत आला होता. स्त्रियांचं काळीज ममतेने भरलेलं असतं म्हणे. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आल्या त्यांनी त्याच्यावर प्रेम तर सोडाच, त्याची उपेक्षाच केली होती. पंधरा दिवसांनी सुरेशचा फोन आला. तो नकार देणार हे अभिषेकने गृहितच धरलं होतं. त्याचा नकार ऐकण्यासाठीच त्याने फोन उचलला.
"अभिषेक तुझ्या प्रपोजलवर आम्ही बराच विचार केला. आम्ही तयार आहोत. स्मितासुध्दा तयार आहे. पण आमच्या काही अटी आहेत"
त्याच्या अनपेक्षित होकाराने अभिषेक आनंदून गेला.
"कोणत्या अटी? तुझ्या सगळ्या गोष्टी अटी मला मान्य आहेत"
"अशी घाई करु नकोस. अटी अगोदर ऐकून घे. पहिली अट म्हणजे स्मिताच्या नावावर २५ लाखाची फिक्स्ड डिपाॅझिटची पावती करावी लागेल. दुसरी अट म्हणजे तुझी अर्धी प्राॅपर्टी स्मिताच्या नावावर करावी लागेल.प हिली अट यासाठी की पुढे तुमचं दोघांचं नाही पटलं, घटस्फोट झाला तर कोर्टकचेरी करण्याआधी स्मिताला हा फायदा मिळावा. दुसरी अट याकरीता की पुढे देव न करो तुझं काही बरंवाईट झालंच तर तुझ्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढू नये यासाठी. स्मिता एक अनाथ मुलगी आहे. तिला कुणीही नातेवाईक नाहीत. तिला पुढे तिच्या हक्कासाठी भांडावं लागू नये. यासाठी हा खटाटोप.मंजूर आहेत तुला या अटी?"
अभिषेक थोडा वेळ शांत बसला. स्मिताने पल्लवीसारखा दगा दिला तर? स्मिताच्या आणि सुरेशच्या मनात काय प्लॉन्स आहेत काहीच सांगता येत नव्हतं. पण शेवटी त्याने हा जुगार खेळायचं ठरवलं.
"मी तयार आहे सुरेश " अखेरीस त्याने उत्तर दिलं
"बघ हं ! घाई करु नकोस. आठवडाभराने उत्तर दिलंस तरी चालेल.
" नाही सुरेश,माझा निर्णय झालाय."
"ठिक आहे मग लाग तयारीला. मला तारीख कळव, आम्ही येऊन जाऊ."
एक महिन्याने विवाह नोंदणी कार्यालयात सगळे जमले. अभिषेकने दिलेल्या डिझायनर साडीत आणि मोजक्याच दागिन्यात स्मिता अप्रतिम सुंदर दिसत होती. तिचं सौदर्य पाहून अभिषेकचे भाऊ आणि वहिनी मत्सराने जळून खाक झाले. एका भावाने अभिषेकला हात धरुन एका कोपऱ्यात नेलं.
"अरे अभी, साधारण दिसणाऱ्या बायकोला तू सांभाळू शकला नाहीस. इतक्या सुंदर बायकोला कसं सांभाळशील?त्यात तू दिसायला असा, ती दुसऱ्यासोबत पळून गेली तर?"
"नाही दादा तसं होणार नाही. आईवडिलांचा,नातेवाईकांचा धाक नसतांना तिने कधी वाकडं पाऊल टाकलं नाही. ती संस्कारित मुलगी आहे. तुझ्या मेव्हणीसारखं पळून जाणं तिला शक्यच नाही."
अभिषेकने मारलेला टोमणा त्याच्या भावाच्या चांगलाच वर्मी बसला. नंतर त्याने तोंड उघडलं नाही. सह्या झाल्यावर स्मिता आणि अभिषेकने एकमेकांना हार घातले. अभिषेकने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर स्मिताचे डोळे पाण्याने भरले. अनाथाश्रमातून आलेल्या तिच्या मैत्रिणींच्या गळ्यात पडून ती बराच वेळ रडत राहिली. सुरेशच्याही डोळ्यात पाणी आलं. अभिषेकला मिठी मारुन तो म्हणाला
"मित्रा माझ्या बहिणीला तुझ्या हाती सोपवतोय. सांभाळशील ना तिला व्यवस्थित?"
"निश्चिंत रहा सुरेश. तिला तक्रार करायला मी संधी देणार नाही."
जमलेल्या सगळ्यांना एका हाॅटेलमध्ये जेवण दिल्यावर अभिषेक स्मिताला घरी घेऊन गेला. तो बंगला पाहून ती म्हणाली.
"एवढा सुंदर आणि मोठा बंगला आहे. पण यात फक्त आपण दोघांनी रहायचं?"
"हो. हे पाहुणे उद्यापर्यंत आहेत. सत्यनारायणाची पुजा झाली की ते निघून जातील. बरं चल तुला घर दाखवतो"
एक एक खोली दाखवत तो तिला स्टडीरुममध्ये घेऊन आला. पुस्तकांनी भरलेली कपाटं पाहून ती आश्चर्यचकीत झाली.
"बापरे इतकी पुस्तकं?तुम्ही वाचता?" त्याने मान डोलावली.
"मलाही खुप आवडतात पुस्तकं. पण अभ्यासाव्यतिरिक्त फार नाही वाचता आली."
एका रुममध्ये वेगवेगळी वाद्ये पाहून ती हरखून गेली.
"इतकी सगळी वाद्यं तुम्हांला वाजवता येतात?"
"हो .येतात की"
"मला सुरेशदादा सांगतच होता तुम्ही खुप हुशार आहात म्हणून. ते ऐकूनच मी लग्नाला तयार झाले. मला जरा बासरी वाजवून दाखवाल. फक्त दोनच मिनिटं" त्याने बासरीवर एक धून वाजवून दाखवल्यावर तिने टाळ्या वाजवल्या.
" खुप मस्त. वा ! आपलं चांगलं जमेल असं वाटतंय. मलाही संगीत खुप आवडतं."
" आज तुझं गाणं आणि हार्मोनियम दोघांचा कार्यक्रम करुन टाकू.चालेल."
"आज नको. आल्या आल्या असे रंग दाखवणं योग्य नाही." ती हसत म्हणाली. तोही हसला.
दोन दिवसांनी सत्यनारायण झाल्यावर सगळे पाहुणे निघून गेले.
"तुमचे भाऊ का नाही रहात आपल्याकडे? त्यांचा बंगला मोठा आहे आपल्यापेक्षा?" तिने विचारलं
"नाही. तीन रुमच्या घरात ते नऊ जण रहातात. धाकट्या भावाच्या म्हणजे माझ्या घरात रहाणं त्यांना अपमानास्पद वाटतं. त्यातून मी उपेक्षित माणूस. मी आयुष्यात कधी काही करु शकेन असं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मी असा त्यांच्या शेकडो मैल पुढे आलेला त्यांना रुचलं नाही, म्हणून ते माझ्याकडे रहात नाहीत."
"बापरे नात्यात इतकी गुंतागुंत असते? मला वाटलं सगळी नाती प्रेमळच असतात. मी माझ्यापरीने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करेन. माझ्यासारख्या अनाथ मुलीला प्रत्येक नातं महत्वाचं वाटतं हो!"
"खरंय ! हळूहळू सगळं तुला कळेलच. बरं उद्या तयारी कर. परवा आपल्याला माॅरीशसला जायचंय" अभिषेक हसत म्हणाला
" माॅरीशस?" तिने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. "म्हणजे विमानाने जायचं ना?"
"हो" त्याने असं म्हणताच तिने त्याला मिठी मारली आणि रडू लागली
"अगं रडतेस का? विमान प्रवास आवडत नाही का तुला?"
"अभि मी अजून साधी रेल्वेसुध्दा पाहिली नाहिये. मी आमचा नगर जिल्हासुध्दा पाहिला नाहिये आणि तुम्ही मला सरळ परदेशात घेऊन जाताय. आनंदाने वेड लागेल असं मला वाटतंय."
"इतक्यातच वेड नको लावून घेऊ. अजून तर भरपुर बघायचंय आपल्याला ! ही तर सुरुवात आहे." तो हसत म्हणाला. माॅरीशसला उतरल्यावर स्मिताला काय पाहू आणि काय नाही असं होऊन गेलं. तिला प्रत्येकच गोष्ट सुंदर दिसत होती. अभिषेक मनात हसत होता पण नैनितालसारख्या सुंदर ठिकाणी रुममध्ये फक्त टिव्ही बघत बसलेल्या पल्लवीपेक्षा निसर्गसौदर्याचा आस्वाद घेणारी स्मिता त्याला खुप आवडून गेली. रात्री रिसोर्टच्या रुममध्ये आल्यावर अभिषेकने तिला विचारलं
"स्मिता मी तुला हात लावलेला चालेल ना?"
तिने खट्याळपणे त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली
"अहो असं काय विचारता? मी बायको आहे तुमची. मला हात लावण्याचा तुम्हांला पुर्ण अधिकार आहे. हा पहा मीच तुम्हांला हात लावते" असं म्हणून तिने त्याचा हात हातात घेतला. मग त्याने तिला त्याच्या दुखःद हनिमूनची कहाणी सांगितली.
"मला सुरेशदादाने तुमच्या पहिल्या बायकोबद्दल संगळं सांगितलंय. तुमच्या नशिबाबद्दल तेव्हाही खुप वाईट वाटलं होतं. नवराबायकोच्या सुंदर नात्याचा तिला अर्थच समजला नाही असं म्हणावं लागेल."
"माझ्यावर प्रेम करशील ना स्मिता? मी असाच उपेक्षित आहे गं लहानपणापासून. माझ्यावर कुणी प्रेमच केलं नाही."
ती गंभीर झाली. मग एक निश्वास टाकून म्हणाली.
"माझी कहाणी सांगू? जन्मल्याबरोबर माझ्या आईने मला रस्त्यावर फेकून दिलं. काय दोष होता माझा? जसं समजायला लागलं तसं सगळ्यांना विचारायचे कोण आहेत माझे आईवडील? कुठे आहेत ते? का त्यांनी मला रस्त्यावर टाकून दिलं? कोणत्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. बाहेर आईवडील, मुलं यांचं कुटुंब पाहिलं की जीव जळायचा. आईवडीलांना बिलगलेली मुलं, मुलांसोबत खेळणारे आईवडील पाहिले की आपली केवढी भयंकर उपेक्षा केली गेलीये याची जाणीव व्हायची. भावाबहिणींचे सण आले की अनाथाश्रमातल्या मुली, मुलांना भाऊ समजून ओवाळायच्या पण सख्ख्या भावाबहिणींची सर त्याला नव्हती. पुस्तकं वाचायचे त्यात आजीआजोबा, मामामावश्यांच्या छानछान गोष्टी असायच्या. वाटायचं देवाने आपल्याला या नात्यांपासून दुर ठेवून आपली एवढी घोर उपेक्षा का केली असेल? अठरा वर्षाची झाल्यावर सुरेशदादाने मला त्याच्या मावशीकडे मला ठेवलं कारण ही सगळी नाती बघण्याची, अनुभवण्यासाठी मला एका कुटुंबात जायचं होतं. पण या लोकांनी मला एका कामवालीपेक्षा जास्त दर्जा दिला नाही. घरातली सगळी कामं मी करायचे पण कधी आपुलकीची वागणूक दिली नाही. कारण त्यांच्या लेखी मी एक बेवारस मुलगी होते. घरात आसरा देऊन त्यांनी माझ्यावर उपकारच केले होते. तिथल्या पुरुषांनी कधी माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं नाही हेच काय ते माझं चांगलं नशीब. मला नोकरी करण्याची इच्छा होती. ग्रॅज्युएशन झाल्यावर मला एकदोनदा तसे चान्सेसही आले पण सुरेशदादाने जाऊ दिलं नाही. माझ्यासारख्या अनाथ मुलींचा लोक गैरफायदा घेतात असं त्याचं म्हणणं होतं. तुमच्यावर तुमच्या आईवडिलांनी, बहिणभावांनी प्रेम केलं नाही पण रक्ताने ते तुमचेच होते. तुम्ही त्यांच्यावर रुसू शकत होतात. प्रेम नसेल पण कर्तव्य म्हणून का होईना त्यांनी ही नाती निभावली. मी कुणावर रुसायचं?"
बोलताबोलता तिचा कंठ दाटून आला. डोळे पाण्याने भरले. ते पाहून अभिषेक पटकन पुढे आला. त्याने तिला जवळ घेतलं
"मला वाटत होतं मीच एक उपेक्षित आहे पण तू तर माझ्याहीपेक्षा जास्त उपेक्षित निघालीस." त्याने तसं म्हणताच तिच्या भावनांचा बांध फुटला. त्याच्या खांद्यावर डोक ठेवून ती हमसून हमसून रडू लागली. भावनांचा आवेग कमी झाल्यावर त्याने विचारलं
"पण तू माझ्याशी लग्न करायला कशी तयार झालीस? मी हा असा...?"
"तुम्ही अनाथाश्रमात आलात. सगळ्या अनाथ मुलामुलींशी जिव्हाळ्याने गप्पा मारल्या. सुरेशदादाने न मागताही तुम्ही देणगी दिलीत. यावरुनच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मनाने सुंदर आहात. तुमच्या कर्तुत्वाची,अष्टपैलूत्वाची सुरेशदादा नेहमीच तारीफ करायचा. तुम्ही माझ्याशी लग्नाचं प्रपोजल दिलं ते मात्र सुरेशदादाला आवडलं नाही. मला त्याने ते सांगितलंही. पण मी तुमची कहाणी ऐकली. तुमच्यावर अन्यायच झालाय हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी तयार झाले. सुरेशदादा मला वारंवार विचार करायला सांगत होता तितका माझा निर्णय ठाम होत गेला."
दोन उपेक्षित जीव बराच वेळ बोलत होते. एकमेकांची दुःखं सांगत होते. सांगताना गहीवरत होते. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. अभिषेक,स्मिताच्या लग्नाला आता एक वर्ष झालं होतं. एक दिवस सुरेश आपल्या ऑफिसमध्ये बसून काही कामकाज करत होता. अचानक त्याची नजर कॅलेंडरवरच्या तारखेवर गेली. होय. एक वर्षापुर्वी आजच्याच दिवशी स्मिता आणि अभिषेकचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याने मोबाईल उचलला तोच अभिषेकचाच फोन आला
"हॅपी ॲनिव्हर्सरी अभिषेक" सुरेश घाईघाईने बोलला
"अरे त्या शुभेच्छा नंतर दे.अगोदर बातमी ऐक.तू मामा झालास."
"काय सांगतोस काय? कधी? "सुरेश आनंदाने ओरडला
"आज सकाळीच. मुलगी झाली.अगदी स्मितासारखीच गोड आणि सुंदर आहे रे."
"तुझ्या पहिल्या बायकोला कळवलं की नाही? तुझ्यावर कसले घाणेरडे आरोप केले होते तिने."
"तिला कसं कळवणार? ती या जगातच नाहिये. आत्महत्या केली तिने"
"काय सांगतोस काय? ती तर पळून गेली होती ना तिच्या प्रियकरासोबत? मागे मामा वारले तेव्हा मी तिच्या गावी गेलो होतो. त्यावेळी ती मेरठमध्ये होती "
"ती पळून गेली खरी पण तिचा प्रियकर तिला त्याच्या घरी घेऊन गेलाच नाही. कधी आग्रा ,कधी मथुरा अशा ठिकाणी तो तिला हाॅटेलवर ठेवायचा. तिला जेव्हा कळलं की ती त्याच्यापासून प्रेग्नंट आहे तेव्हा तिने हट्ट करुन त्याच्या घरी जायला लावलं. तिथे गेल्यावर तिला कळलं की त्याचं अगोदरच लग्न झालेलं असून त्याला दोन मुलं आहेत. ते पाहून तिला धक्का बसला. त्यातून त्याचे आईवडिल तिला ठेवून घ्यायला तयार होईनात. त्यांच्या हातापाया पडून ती कशीबशी राहिली. एक दिवस तिचा प्रियकर दिल्लीला काम शोधायला जातो असं म्हणून निघून गेला. दोनच दिवसात त्याच्या आईवडीलांनी हिला घराबाहेर काढलं. हिचा मोबाईलही हिसकावून घेतला. ही पोलिस स्टेशनमध्ये गेली तर त्याच्या भावांनी तिथे येऊन तिला मारहाण केली आणि तिला उचलून सरळ मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत टाकून दिलं. मुंबईला रेल्वे पोलिसांनी तिला घरी आणून सोडलं. तेव्हापासून ती वेड्यासारखं वागायची. तिच्यावरुन तिच्या वहिनीने एकदा जोरदार भांडण केलं. शेवटी एक दिवस घरात कुणी नसतांना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.आमच्या वहिनीनेच हे आम्हांला सांगितलं"
"अरेरे फार वाईट झालं. पण बघ तिने तुझी उपेक्षा केली तर नशिबाने तिची अशी उपेक्षा केली की तिला मरण पत्करण्याव्यतिरीक्त मार्गच शिल्लक राहिला नाही"
"जाऊ दे. शेवटी नशिबाचे भोग दुसरं काय?"
"नशिबाचे कसले हे तर स्वकर्माचे भोग आहेत. एवढा चांगला नवरा सोडून ज्याचा कसला ठावठिकाणा नाही अशा पोरामागे फिरण्याची दूर्बुध्दी तिला व्हावी याला काय म्हणावं? बरं जाऊ दे. मिठाई कधी खाऊ घालणारेस
"अरे मिठाई तर घेच शिवाय मुलीच्या बारशाला मी ग्रँड पार्टी देणार आहे. तेव्हा तुला मामा म्हणून हजर रहायचंय."
सुरेशचे डोळे पाणावले. गहिवरल्या स्वरात तो म्हणाला
" अभिषेक मेनी मेनी थँक्स. तू माझ्या अनाथ बहिणीला तिला हवं असलेलं घर मिळवून दिलं."
"वेड्या मीच तुझे आणि तुझ्या बहिणीचे आभार मानायला हवेत. तुला महितेय तिने काय केलंय? गेल्या वर्षभरात तिने मला भरभरुन सुख आणि आनंद दिलाय. तिनेच आम्हां तिन्ही भावडांना एकत्र आणलंय. आज माझ्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्रच रहातो. माझ्या सर्व नातेवाईकांना तिने आपल्या प्रेमळ आणि नम्र स्वभावाने जिंकून घेतलंय.आईची ती लाडकी सुन आहे आणि माझ्या पुतण्यांची लाडकी काकू."
" बरोबर.नात्यांचं महत्व एका अनाथ मुलीलाच कळणार. "
"सगळ्यात महत्वाचा बदल तिने माझ्यात घडवलाय. माझ्यात जो दिसण्याबद्दलचा, उंचीबद्दलचा न्युनगंड होता तो तिने घालवलाय. आत्मविश्वासाने मला भारुन टाकलंय तिने. आजपर्यंत मी स्त्रियांचा तिरस्कारच केला .स्मिता माझ्या जीवनात आली आणि स्त्रीसारखं सुंदर, प्रेमळ, आयुष्य आरपार बदलून टाकणारं या जगात दुसरं काही नाही असं मला वाटू लागलंय.आय ॲम एक्स्ट्रीमली हॅपी सुरेश"
"थँक्स अभिषेक.आय ॲम प्राउड ऑफ यू"
सुरेशने समाधानाने फोन खाली ठेवला.डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू त्याने थांबवले नाहीत.
©️ दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा " या पुस्तकातील आहे. कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबा.क्रमांकावर संपर्क साधावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा