बुधवार, ३ जुलै, २०२४

1244. तू वेडा कुंभार !

     तो ओल्या मातीत हात घालून बसला होता. ज्या प्रकाराचा घट बनवायचा मनात होतं तो काही प्रत्यक्षात उतरत नव्हता. बारा आऱ्याचं चाक फिरत होतं. तो घटाला आकार देत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर नारायणाच्या मनातला घट साकार झाला. त्यावर त्यानं “धैर्य” हा शब्द लिहला व तो झोपायला गेला. त्याच्या बंद डोळ्यापुढे आण्णा कुंभाराच्या घरी वाढलेला लहान नारायण आला. आण्णा बरोबर घट, मडकी, कुंड्या, पणत्या बनवणारा ! आण्णा फिरत्या चाकावरच्या मातीच्या गोळ्याला कसा सुबक आकार देतो हे एकटक बघणारा ! 
आण्णा नेहमी म्हणे,  ”पोरा,ओल्या मातीला जसा आकार द्यावा नव्हं. तस्सा आकार लहान पोरा बाळास्नी पन द्यावा बघ.” नारायणाला आण्णाचं हे काहीबाही बोलणं समजत नसे. मडकं तयार झाल्यावर आण्णानं विचारलं, “नारायना, नाव सांग या मडक्याचं.” नारायण म्हणाला “दया”. आण्णानं तो शब्द मडक्यावर लिहला. मडक्याच्या जन्मानंतर त्याचं बारसं करणारा आण्णा येडा आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं.
नारायणाला मात्र बापाचा अभिमान होता. एकदा त्यानं मडक्यावर “स्वार्थ” लिही म्हटलं तर आण्णा भडकला. 
“अरं, चांगलं शब्द दे म्हटलं तर असला शब्द देतोस व्हय? सवार्थ हाय तुज्या मनात? चांगलं दे की रं नाव.” नारायण हसून म्हणाला, “हां..घे..”कृतज्ञ”.  आण्णाला तो शब्द लिहता येईना म्हणून नारायणानचं तो कोरून कोरून लिहला. आण्णा खूष झाला.  सावळ्या विठू समोर नतमस्तक होऊन पुढच्या कामास लागला. दहावीत नारायण ९१% मार्क मिळवून उत्तीर्ण झाला.आण्णाची छाती अभिमानाने भरून आली. गावात पेढे वाटत सगळ्यांना सांगत होता,” पोराला कलेक्टर करायचाय..लोकं म्हणाले,”अडानी आण्णा..येडा कसा बोलतो बघा! हुशार असला नारायन तरी कलेक्टर होणं कसं जमलं खेड्यातल्या मुलाला?”
नारायणला कुंभार काम मनापासून आवडे.
“आण्णा,आपलं जे काम आहे ते सोडून कलेक्टर का रे व्हायचं?” नारायण विचारीत असे. 
आण्णा म्हणे, “चांगली मडकी बनवायला ! अरं, कलेक्टर हो आणि बनव की हवी तेवडी मडकी. कोन नको म्हणतय? अगदी खरीखुरी मडकी बनव.”
आण्णानं थोडी जमीन होती ती विकली व नारायणाला पुण्यात शिकायला ठेवले. “जमीन विकणे हा वेडेपणा ठरेल आण्णा. कुंभारकामातून पुरेसा पैसा मिळत नाही. जमीन विकू नको.” लोक म्हणाले पण आण्णाच्या मनात नारायणाला त्यानं जो आकार दिला होता तो साकार होण्यासाठी पैसा हवा होता. नारायण खेड्यातून पुण्यात आला. कॅालेजला जाऊ लागला. त्याच्या मुळच्या उत्तम बुध्दीला ज्ञानाचे पैलू पडू लागले. बुध्दी अजून चमकू लागली. सतत मेहनत करून काही वर्षाने नारायण कलेक्टरची परीक्षा पास झाला व लगेच आण्णाला भेटायला गेला. आण्णाचं मडकं आज पूर्ण झालं होतं. नारायणाच्या सत्कार समारंभाला आण्णानं एक मडकं नारायणाच्या हाती दिलं.. त्यावर लिहलं होतं. “जिद्द!”नारायणाच्या डोळ्यातलं पाणी मडक्यावर पडताना बघून आण्णा पण गहिवरला,” कलेक्टर झालास पोरा ! जिद्द, धडपड, मेहनत, यश असलं मुलांना शिकीव. नुस्ते सलाम घेत जगू नको !”
नारायण शहराच परत गेला. कामातून वेळ काढून तो गावातील म्युनसिपालटीच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना मडकी बनवायला शिकवत असे. लोकं म्हणत,” एवढा मोठा कलेक्टर ! मडकी बनवायला काय शिकवत बसतो? ग्लोबल जगात मुलांना गणित, सायन्स, जनरल नॅालेज शिकवावं. काय हा वेडेपणा !” मुलं मात्र त्यात रमून जात. मडक्यावर एक चांगला शब्द लिहायला तो मुलांना सांगत असे. हुशार, लिडर, सिनेस्टार, खेळाडू, भक्ती, प्रेम असे अनेक शब्द मडक्यावर लिहले गेले. चोर, लबाडी, क्रूर, नीच असे शब्द लिहणाऱ्यांची त्याने कानउघाडणी केली. मुलं कलेक्टर साहेबावर खूष होती. मडकी बनवताना देखील साहेबांना कामाचे फोन येत. साहेब कसे बोलतात, कसे वागतात याकडे मुलं बघत होती. चांगले मार्क मिळवत होती. साहेबांच्या सानिध्यात राहून त्यातले काहीजण डॅाक्टर, इंजिनीअर, बॅंक ॲाफिसर, शिक्षक बनले होते. मडकी बनवणं सुरूच होतं. 
     नारायण सरांच्या ५० व्या वाढदिवसाला सारे जमले होते. सर्व वयाचे विद्यार्थीही आले होते. नारायणाला एका पत्रकाराने विचारलं, “सर, तुम्ही कलेक्टर म्हणून यशस्वी आहात पण मडकी बनवणं शिकवून हे विद्यार्थी कसे यशस्वी झाले हे सांगा!”
नारायण आण्णाला स्टेजवर घेऊन आला. पाठीत वाकलेला आण्णा संकोचाने तिथे उभा राहिला. नारायण सद्गदित स्वरात म्हणाला, “हा एक वेडा कुंभार बघा. अशिक्षित आहे बाप माझा पण याने मला कलेक्टर बनवलं. मडकं बनवणं ही नवनिर्मिती आहे हे यानं मला शिकवलं. पंचेद्रियांना जागृत करणारी समृध्द नवनिर्मिती ! जीव ओतून, स्वत्व सोडून, विनम्र भावानं चाकाला नमन करावं तेव्हा कुठं सुबक शिल्प बनतं. माती, पाणी, उजेड, वारा.. आभाळचं मग ये आकारा म्हणणारे गदिमा स्वत: एक कुंभारच होते ! शब्दशिल्प घडवणारे !  आण्णा मडक्याला नकारात्मक नावं दिलं तर ओरडायचा. सतत चांगली विशेषणं, चांगले विचार करण्यास त्याने मला भाग पाडले. मी तेच या मुलांना शिकवलं कारण मनी वसे तेच स्वप्नी दिसे. मुलांना फक्त गणित, शास्त्र शिकवणं पुरेसं नसतं. आपल्या आत जन्मलेलं स्वप्न जेव्हा चैतन्याच्या प्रखर ठिणगीत भाजून निघतं तेव्हाच ते प्रत्यक्षात येतं. हेच मला आण्णानं शिकवलं आणि तेच मी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आण्णा डोळ्यातलं पाणी पुसत कलेक्टर साहेबांचं बोलणं ऐकत होता. कुंभार वाड्यातला मुलगा कलेक्टर होण्यासाठी त्यानं सावळ्या विठूला विचारून जे जे केलं होतं ते वेडच होतं. हे मडकं पक्कं भाजताना आण्णानं त्यात सर्वस्वाची आहूती दिली होती. कित्येक रात्री उपाशी राहून पोरगा कलेक्टर होण्याची स्वप्न बघितली होती. लोकांनी येडा, खुळा म्हटलं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आण्णानं थरथरणाऱ्या हातानं स्वत:च्या हातातील पिशवीतून एक डौलदार घट बाहेर काढला. तो घट त्यानं त्याच्या कलेक्टर मुलास भेट दिला. त्या घटावर लहान नारायणाने सांगितलेले बरेच शब्द लिहले होते.
मेहनत, कष्ट, उर्जा, एकी, विजेता, कृतज्ञ, दया, यश...
आण्णा कुंभारानं आपल्या प्रत्येक मडक्यातच जीव ओतला होता पण हे मडकं ही त्याच्या कारकिर्दीतील तोंडात बोट घालावी अशी कलाकृती होती. सावळा विठू ही आपल्या कलाकृती बघत धन्य झाला होता. 

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...