"तुला हजारदा म्हंटल होतं, आपला तरणा लेक गेला. मला तोंड पाहायचं नाही त्या विठ्ठलाचं. अगं, माझा लेक बुडताना ओरडत होता. "आबा मला वाचवा..." आणि मी ओरडत होतो ,"पांडुरंगा वाचव रे लेकाला." अगं, त्याला वाचवायला गेलो तर माझा पाय मोडला. मग मला त्याच्या सोबत प्रवाहातही वाहून जाता आलं नाही. मला असं दुःखी करून काय मिळालं होतं तुझ्या पांडुरंगाला? खरंतर मला नव्हताच नाद त्याचा. पण ह्या पाच वर्षात तुझ्या हट्टाने आलो होतो मी. मलाही वेड लागलं होतं त्याचं, पण मागच्या वर्षी तर लेक गेला तरी लंगडत खरडत नेलंच तू मला. म्हणालीस, "एवढे दवाखाने केले पाय बरा होत नाही. वारीला चला. तो बरा करील. नुसती वकिली करती त्या पांडुरंगाची. बरं मला जरा ते माझं सोनेरी काठाच उपरणं दे बरं. त्या पाटलाच्या पोराच्या साकरपुड्याला बोलावलं हाय."
सगळं ऐकून घेतल्यावर सखुबाई चिडून म्हणाली, "माझ्या पांडुरंगाला वाटेल तसे बोल लावता. अहो जगात येण्याची आणि जाण्याची वेळ प्रत्येकाची ठरलेली आहे. तो कशाला त्यात लुडबुड करील. फक्त ज्याची वेळ नाही, त्याला कारण करून वाचवतो तो. तुम्हाला पाडलं त्याने मुद्दाम. नाहीतर गेले असते वाहून. तुमची वेळ नाहीतर मेले तर नसते पण माझ्यापासुन लांब हरवले असते. असा सगळा विचार करून त्याने वाचवलं, मग काय बिघडलं त्याची वारी केली तर आणि वारीवरून आल्यापासुन तर लै पळायली तुमची दोन पायाची गाडी. उग कशाला त्या पांडुरंगाला बोल लावायचं काम नाही सांगून ठिवते." सखुबाईला चिडवत रामराव म्हणालेच,
"तर तर सगळं जग तुझा विठूच चालिवतो आणि असं मृत्यूचं दुःख आलं की त्याला बोलायचं नाही म्हणायचं वेळ ठरलेली ज्याची त्याची. बरं मला वाहून जाऊ दिलं असतं, तर चांगलंच झालं असतं ना. तो नाही का रुक्मिणीला सोडून उभा. बरं ते जाऊ द्या, ते उपरणं दे मला."
" अहो...मला वाटतं एक गाठूडं तसंच पडलंय कोपऱ्यात त्यात असल ते उपरणं. थांबा आणते" म्हणत सखुबाई कोठीच्या वर ठेवलेलं गाठोडं घेऊन आल्या. त्यांनी गाठोडं सोडलं आणि ओसरीवर घमघमाट सुटला अष्टगंधाचा. रामराव म्हणाले,
"वारीत काय अष्टगन्ध घेतलं होतं काय आणि ते गाठूड्यात सांडून ठेवलं वाटतं. आता सगळे कपडे खराब करून ठेवले असतील. अग अशे मोजके कपडे चार लोकात जाताना घालायचे तेही खराब झाले तर कसं?"
एवढं म्हणत ते देखिल गाठोडं उचकायला लागले. एकदोन लुगडे. धोतर बाजूला केले आणि खाली ते उपरणं सापडलं. त्यांनी ते पटकन उचलून खांद्यावर घेतलं त्यालाच तो सुवास येत होता. त्यांनी ते पटकन उघडून झटकून पाहिलं. कुठेही अष्टगन्ध नव्हतं. सखुबाईंनी गाठोड्यातले कपडे झटकले. पण सुवासाचा गडदपणा त्यांना जाणवायला लागला. त्या म्हणाल्या,
"अहो, आपण पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभं आहोत असंच वाटतंय ना. दर्शनाचा प्रसन्न सुवास गाभाऱ्यातला." ते ऐकून आणि काहीसं आठवून रामराव खाली बसून ढसाढसा रडायला लागले.
सखुबाईला काहीच कळेना काय झालंय ते. त्या त्यांच्याजवळ गेल्या, "अहो काय झालं?"
रामराव म्हणाले, "सखु तुझा पांडुरंग येऊन गेला गं माझ्या जवळ. त्या दिवशी दर्शनाला खुप मोठी रांग होती. तू बळच मला नेलं म्हणून माझ्या मनात रागही होता. पोराच्या जाण्याचा राग मनात होता. पायाच्या वेदना खुप होत्या. ह्या सगळ्यानी बंड केलं आणि मी पुरुष दर्शनाच्या रांगेतून परत फिरलो. मनात म्हंटलो पांडुरंगाला तुझं दर्शनच घेत नाही जा. आपल्या धर्मशाळेच्या कोपऱ्यात येऊन पाय चेपत बसलो स्वतःचे. सगळे भाविक रांगेत होते आणि धर्मशाळा शांत होती. एक सावळं पोरगं गंधाची वाटी घेऊन त्या फुलांच्या दुकानापासून मागे लागलं होतं. ते तिथं आलंच आणि बळच मला टिळा लावून माझे पाय चेपू लागलं. मला खरंच छान वाटलं, म्हणून मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. प्रेमाचं भुकेलं होतं गं. मला म्हणालं,
"आजोबा, एक उपरणं द्या अशे पाय बांधून देतो की तासाभरात दुखणं जाईल तुमचं. मी हसुन म्हंटलो त्याला,
"अरे देवाच्या दारी आलो, तरी देव तिकडे कमरेवर हात ठेवून मस्त मजा पहायलाय, अन तू काय माझं दुखणं कमी करशील?
त्यावर ते पोर म्हणालं होतं, " आजोबा जन्म-मृत्यू सोडला तर तो जगतानाची सगळीच संकट सोडवायला येतो. फक्त आपल्याला दिसत नाही. तुम्ही त्याला नका दोष देऊ. अहो, त्याच्याकडे गर्दी किती तो तरी कुठं कुठं ध्यान देईल. द्या ते उपरणं इकडं असं म्हणत त्याने ते घेतलं आणि माझ्या पायावर हळुवार हात फिरवत बांधलं गं आणि जाताना मला टाटा करताना तसंच उपरणं त्याच्या गळ्यात होतं. त्याचा तो स्पर्श सखु वाऱ्याच्या गार झुळकीसारखा होता ग. खरंच परत येताना वारीत काही त्रास झाला नाही मला. अगं, मला सगळे विचारत होते. पायाला काय केलं रामराव लंगडत चालणं बंद झालं तुमचं. मला विठुने येऊन दर्शन दिलं गंं. पण मी ते घेतलं नाही. देवावरचा माझा राग त्याने तर काहीच धरला नाही गं, म्हणत रामराव सखूच्या पदराला धरुन रडू लागले."
सखुबाईंनी ते उपरणं घट्ट छातीशी धरलं. पांडुरंगा तू सोबत आहेस रे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगातही खम्बीर उभं राहायला हेच दाखवलंस तू. ह्यांना उभं केलंस, स्वतः येऊन. बरोबर आहे ते खचत होते मनाने. कारण त्यांची भक्ती कमी होत होती तुझ्यावरच्या रागाने. तू प्रचिती देऊन परत तुझ्या भक्ताला घट्ट बांधून घेतलंस ह्या उपरण्याने. असं म्हणत दोघांनी ते उपरणं देवाजवळच्या खुंटीवर ठेवलं. सुवासाची दरवळ झाली. देव्हाऱ्यातला विठुराया मिश्किल हसत होता. आपण बदलून दिलेलं उपरणं आलं बरं का परत असंच हळूच रखुमाईला सांगत होता.
*वाचकहो, कथा कशी वाटली नक्की कळवा. कथासंग्रह "नाईटआऊट" आणि "टांगा" हव्या असल्यास मेसेज करावा 9822875780
©स्वप्ना मुळे (मायी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा