गुरुवार, २५ जुलै, २०२४

1300. नात्यांच्या गाठी

“अरे येड्या, तुझी पिशवी पडली बघ” सिग्नल सुरु झाल्यावर वेगाने जाणाऱ्या स्कुटरला उद्देशून ती बोलली. तो जो कुणी होता, तो भुर्र्कन निघून ही गेला. ती गरीब होती पण चोर नव्हती. हरवणं काय असतं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. हरवलेली पिशवी शोधायला कुणी येईल या अपेक्षेने अंधार होईपर्यंत वाट पाहत राहिली ती. पण कुणी आलं नाही. तिनं पिशवी उघडून पाहिली. मोरपिशी रंगाची साडी. तिचा आवडता रंग. खुलली क्षणभर. कुणास ठाऊक घेतली असेल बहिणीसाठी. रक्षाबंधन आलं ना जवळ. तिनं त्या साडीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कळायला लागलं तेंव्हापासून रस्त्यावर वाढलेली. अनाथ की पळवून आणलेली, नेमकं ठाऊक नाही. सिग्नलला कधी गजरे, कधी कचऱ्याच्या पिशव्या विकायची. कधी फुलं तर कधी आणखी काही. पण यात तिचं मन कधी रमलं नाही. त्यांच्यात असून सुद्धा ती त्यांच्यातली नव्हती. ती नीट-नेटकी स्वच्छ रहायची. कुणाच्या अध्यात न मध्यात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेतली श्वापदं तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं. रुपानं देखणी नव्हती पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते. तिचं नशीब बलवत्तर होतं. तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतरजण. तिचा चण्डिकेचा अवतार पहिला होता त्यांनी. 
"मी काय बी विकीन पण भीक मागणार नाही." तिनं बजावलं होतं मावशीबाईला.
तिच्या हातातली नवी कोरी पिशवी पाहून पोरं जवळ आली. “आक्का, दाखिव ना काय आणलंस?”
“काही नाही जा तिकडं..” तिनं हुसकावून लावलं त्यांना. मायेनं हात फिरवला त्यावर आणि आपल्या हृदयाशी धरली. किती पवित्र नातं भावा-बहिणीचं.
'आपण कोण? इथे कशा आलो? आई-बाप, भाऊ-बहीण? कुणीच नाही का आपलं?' खूप प्रश्न पडले तिला. तिला वाटलं, अंगाला लावून बघावी का साडी. कशी असते नवी कोरी साडी? कशा दिसू आपण? पण तिचं मन धजेना 'बिचाऱ्या भावानं आणली असेल. खिशातली दमडी खर्चून आणली असेल. नाही-नाही, आपला हक्क नाही यावर. दोन दिवसांवर रक्षाबंधन होतं. यावेळी तिनं राख्या आणल्या विकायला. हातातली पिशवी दिसेल अशी ठेवून ती नेहमीप्रमाणे सिग्नलला उभी राहिली. तिचे डोळे शोधत होते त्याला. पण ओळखणार कशी? तिने त्याला पाहिलंच नव्हतं. तिच्या मनाला उगाच रुखरुख लागून राहिली. तिचं मन आज राख्या विकण्यात नव्हतंच मुळी. अंधार पडायला लागला. निराश झाली ती.
तेवढ्यात एक स्कुटर जवळ येऊन थांबली. “ही पिशवी?” 
“तुमची हाय का? मला हिथं गावली”
“हो काल कुठे पडली कळलंच नाही असू दे”
“पण काय हाये त्यात आणि रंग कोणता सांग मगच दीन मी, लै चोर हैत इथं” 
“माझ्या आक्काला मोरपिशी रंग आवडतो, म्हणून त्याच रंगाची साडी मी घेतो” 
तिला आनंद झाला. “बरं झालं भेटलाव तुम्ही, घ्या आक्कांना द्या, माझा बी नमस्कार सांगा त्यास्नी” 
“माझी आक्का काय सांगू तिच्या लहानपणीच हरवली. आई सांगते, तिला आवडायचा हा रंग.  तुमच्या वयाची असती आज ती. मी तर जन्मलो ही नव्हतो. कुठं असेल, कशी असेल नाही माहित. समज आल्यापासून मी तिची आठवण म्हणून या रंगाची साडी घेतो आणि देतो अनाथाश्रमात.” 
तिला खूप वाईट वाटलं. आपल्यासारखाच हा पण अभागी “भाऊ, ही घ्या साडीची पिशवी आणि या राख्या पण” 
त्याचे डोळे चमकले “आक्का,  यंदा ही साडी तुला,  नेसून येशील उद्या इथं? सिग्नल चालू झाला, येतो मी, ये याच वेळेला.” 
'आक्का म्हणाला तो मला' मायेची अशी हाक पहिल्यांदा ऐकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं मोरपिशी साडी पोटाशी धरली  जणु सगळी माया त्यात सामावली.  या विखारी दुनियेत सिग्नलला विकणाऱ्या गरिबाकडे कुणी बहीण म्हणून पाहिलं, याचं तिला अप्रूप वाटलं. तिचा गळा दाटून आला. ती छान स्वप्न पहात झोपी गेली. सकाळ झाली दिवस कधी सरेल असं तिला झालं. संध्याकाळी नवी कोरी साडी नेसून तिनं तुटक्या आरशात पाहिलं. आज ती गोजिरवाणी दिसत होती. सुंदरशी राखी तिनं बॉक्स मधून वेगळी ठेवली. बाकी काही नव्हतंच तिच्याकडे. तिच्या मनात शंका आली 'येईल का तो? घरातले हसतील. वेड्यात काढतील त्या खुळ्याला'. मनात मात्र त्याच्या भेटीची हुरहूर लागली. किती दिवसांनी असा एखादा आनंदाचा क्षण येतो. ती वाट पहात राहिली.
स्कुटरवरून तो आला. आज तो एकटा नव्हता. कुणी बाई होती बरोबर. त्यानं हाक मारली, 
”आक्का, मी आलोय ये, अगं किती सुंदर दिसतोय हा रंग तुझ्या अंगावर” 
“ये, नको घाबरू. हे बघ, ही माझी आई आणि ही आक्का तुला बोललो होतो ना मी” 
“आक्का, बांध गं राखी ” तो म्हणाला.
तिनं आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्यानं मानेनंच होकार भरला आणि हात पुढे केला. तिनं राखी काढली आणि हातात बांधली त्याच्या. आयुष्यात, भेटलेला पहिला भाऊ. तिला खूप आनंद झाला आणि गहिवरून आलं. नकळत, 'आव्वाम्मा' म्हणून हुंदका दाटून आला. आईनं तिच्याकडे नवलानं पाहिलं, तिला मिठाई भरवली आणि जवळ घेतलं. तिचा हात हातात घेतला आणि एकदम ओरडली.
 “हिच्या हाताला गाठ आहे,  पाठीवर पण हाये ना गाठ? हो ना आणि सोनू मला 'आव्वाम्मा'च म्हणायची. ही नक्की तुझी आक्काच आहे. पोरी तुला कृष्ण आवडतो ना”. तिनं आपल्या झोळीतून प्लास्टिकचा कृष्ण दाखवला आणि भर रस्त्याच्या कडेला भान विसरून आईनं तिला जवळ घेतलं आणि तिचे पापे घ्यायला सुरुवात केली.       
“आई, खरं सांगते का गं आक्का, माझी आक्का” 
“जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती. तुझ्या बापाला वाटलं कॅन्सर असेल तर एवढा खर्च पोरीवर कोण करेल? म्हणून सोडून आला कुठं? मला बोलला, हरवली ती.” 
“मरता-मरता गुन्हा कबूल केला त्यानं. माझी बाई ती  सोनू कुठं होती तू. खूप शोधलं, हरवलीस तेंव्हा लहान होतीस गं तू कशी ओळखणार, चल घरी".
"पोरा, आता नाही तिला इथं राहू द्यायचं. नाहीतर मी राहीन तिच्याबरोबर. माझी बाय ती. अशी सिग्नलवर.” आईचं हृदय पिळवटून निघालं.
“आक्का माझी आक्का चल घरी. जन्माच्या गाठी अशा पक्क्या असतात. या गाठीवरून तू भेटलीस. आक्का चल घरी.”
    ती गांगरून गेली. आज अनपेक्षितपणे तिचं नशीब उजळून निघालं होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि आई दोघं ही भेटली. तिने कमरेला बांधलेली मोठी सुरी तिथेच फेकून दिली. आज तिचा कृष्ण आणि रक्षणकर्ता भाऊ  दोघेही तिच्यासोबत होते.

-सपना जकातदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...