बुधवार, २४ जुलै, २०२४

1299. निर्णय

 "आई-बाबा, आता तुम्ही दोघेच नागपूरला राहू नका बरं. माझा एवढा मोठा फ्लॅट आहे. मुद्दाम मोठा घेतला आपल्या सर्वांना एकत्र राहता यावे म्हणुन." मुलाचा पुण्याहून फोन सुरू होता.
"अरे नाही अरे,आम्हाला नाही करमत  पुण्यात. आम्ही इथेच बरे आहोत. सगळं आयुष्य नागपुरातच गेलं आमच. मित्र मंडळी, नातेवाईक सगळेच तर इथे आहेत. शिवाय तुम्ही दोघेही नोकरीवाले. सतत बाहेर राहणार, कसं करमेल आम्हाला?" नेहमी प्रमाणेच जयंतरावांचा मुलाशी संवाद सुरू होता.
"अहो बाबा, आजकाल आईची तब्येत बरी नसते. थकलीय ती. तुम्हालापण शुगर आहे. आम्हाला काळजी वाटते हो. कोणाला काही झालं तर ऑफिस, मुलाच्या शाळा, परिक्षा सोडून कसं जमेल आम्हाला यायला?"
"हे बघ, काही होत नाही आम्हाला आणि तुझा बाप सक्षम आहे काळजी घ्यायला. तू आमची काळजी करू नको. तुम्ही आपला संसार नीट संभाळा काळजी घ्या !"
"बाबा, तुम्ही फार हट्टी आहात." मुलाने रागानेच फोन ठेवला.  हा संवाद शांताबाई ऐकत होत्या. त्या चिडल्याच
"अहो खरंच किती हट्ट करता तुम्ही पण? बिचारा किती काळजीने बोलावतोय आपल्याला. काय आहे आता आपलं नागपुरात? मी ही थकले आता आणि मित्र व नातेवाईकांचं काय? त्यांनाही त्यांचे व्याप आहेतच न? शेवटी मुलालाच आपलं करावं लागणार आहे न?"
 "हे बघ मला जमणार नाही, तुला जायचे असेल तर जाऊ शकतेस. हवं तर मी पोचवून देतो तुला."
 "नेहमीचंच आहे तुमच !" शांताबाईंनी फणकार्याने मान उडवली.
जयंतरावांचं तसं बरोबर होत. सगळं आयुष्य त्यांचं नागपुरात गेलं नोकरीत मोठ्रया अधिकारी पदावर काम केलं होतं. हाताखाली अनेक माणसं त्याच्या दिमतीला असायचे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे थाटातच आयुष्य गेलं त्यांचं. आता सेवानिवृती नंतर मनासारखं जगायचं होत त्यांना मुलाच्या संसारात परस्वाधीन होऊन रहायची त्यांची ईच्छाच नव्हती. आपलं वय वाढतंय हे त्यांना मान्यच नव्हतं पण जेव्हा त्यांची नजर शांताबाईंकडे गेली तेव्हा लक्षात आलं खरंच किती थकली आहे ही? त्यांना वाईट वाटले ऊगाच बोललो तिला. आपल्रयाला सोडून तर ती नक्कीच जाणार नव्हती. किती कष्ट करत असते घरासाठी. कधी कटकट नाही, भांडण नाही, कुरकुर नाही, सगळं हसत मुखाने करत असते. आपण तर तिचा विचारच करत नाही. लाॅकडाऊनमुळे बरेच दिवसात नातवंडांची भेट नाही. त्यामुळे शाताबाई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. जयंतरावही जरा नातवंडाच्या आठवणीने गलबललेच. मग ते शांताबाईंना म्हणाले 
"आपण असं करायचं का?आता उन्हाळा आहे पुढे. तुला उष्णतेचा त्रास होतो तर उन्हाळ्यापुरते दोन महिने  जाउया का पुण्याला? तुलाही बरं वाटेल, जरा चेंज होईल."
      शांताबाईंनी मान हलवली. जयंत रावानी लगेच मुलाला कळवून टाकलं. जाण्यापूर्वी  सगळी कामं करून घ्यायची होती. घराचे टॅक्स,पाण्याचे बिल, ईलेक्ट्रिक बिल, सगळ्यांची देणी आटपून,मार्च महिना असल्यामुळे  income tax चे पेपर्स द्यायचे होते. डॉक्टरांकडे जाऊन दोघांचेही पूर्ण चेकप करायचे होते. जयंतरावांना जरा टेन्शनच आले. आजकाल त्यांना आपण आपल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे आठवेनासेच झाले होते. दिवसभर चश्मा शोधा औषध शोधा असंच होत होतंं. हळू हळू एक एक काम हातावेगळं करावं असं त्यांनी ठरवलं. दुसरे दिवशी सकाळीच बॅंकेत जाऊन सगळी कामं आटोपून घ्या‌वी म्हणून दहा  वाजताच ते बॅंकेत गेले. बॅंकेत बरीच गर्दी होती पासबुक अपडेट करायचं होतं. बराच वेळ रांगेत ऊभे होते. पाय दुखायला लागले, शुगरच्या गोळीची वेळ पण झाली होती एवढा वेळ लागेल असा वाटलंच नव्हतं. घरून निघताना काही खाल्लं नव्हतं, भूक लागली होती जीव घाबरायला लागला. शेजारच्या माणसाने त्यांना खुर्चीवर बसवलं. प्यायला पाणी दिलं,कौटरवरचा माणूस काऊंटर बंद करून चहा प्यायला निघून गेला. अर्ध्या तासाने कसेबसे पासबुक त्यांना मिळाले. आता हवे होते interest certificate. त्याशिवाय त्यांचे ‌ income. tax चे काम होणार नव्हते. खरं तर त्यांना लवकर घरी जावंसं वाटत होता पण तेवढ्यासाठी उद्या यावं लागलं असतं. सर्टिफिकेट साठी बारा नंबर काऊंटर जावं लागलं पण तिथे कोणीच नव्हते. मग कोणीतरी सांगितलं सोळा नंबरवर विचारा मग तिथे गेल्यावर कळलं तिथला कर्मचारी सुट्टीवर गेला आहे. आता आठ दिवसांनी या तुम्ही. खूप संताप आला त्यांना पण चिडून क‌ाहिच उपयोग नव्हता.
"अरे, काका तुम्ही इकडे कुठे?" अचानक मुलाचा मित्र भेटला
जयंतरावांनी त्याला सगळी हकीकत सांगितली."अहो काका आजकाल बॅंकेत लवकर कामं होतच नाहीत. आता सगळी कामं ऑनलाईन  केली जातात. तुम्ही सगळे पैशाचे व्यवहार ऑनलाईन  का नाही करत?
"अरे मला काहीच कळत नाही त्यातलं. खात्यातले पैसे कोणी काढून घेतील अशी भिती पण वाटते. कोणी कितीही शिकवलं तरी मला हे मोबाईल प्रकरण डोक्यात शिरत नाही बाबा. कष्टाचे पैसे आहेत माझे एक चूक महागात पडू शकते."
     स्वत:ला परिपूर्ण हुशार समजणारे, व्यवहारकुशल, स्वाभिमानी आणि कर्तबगार जयंतराव आज कुठेतरी कमी पडले होते. कमजोर झाले होते ते विचार करू लागले. खरंच किती काळ बदलला आहे ! आपण कितीही हुशार असतो तरी हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे जमत नाही आपल्याला. वयानुसार गाडी चाल‌वणे, दवाखाना, बिलं भरणे, प्राॅपर्टीची कामं जमतील आपल्याला? अनेक प्रश्न समोर उभे राहिले. त्यांना शांताबाईचे म्हणणे पटले. परिस्थितीचा स्विकार करायला हवा. फाजिल आत्मविश्वास काहीच कामाचा नाही. सगळे ईगो बाजूला सारून मुलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे असा साक्षात्कार झाला. शांत आयुष्य हवे असेल तर सगळ्या जबाबदार्या मुलावर विश्वास ठेवून त्याच्यावर सोपवून द्याव्या. मुलगा आग्रहाने बोलावतो तर त्याचा आधार घ्यावा, आपला आधार त्याला द्यावा. आपली संपत्तीही पूढे त्याचीच आहे.जेवढं आयुष्य आहे तेवढा आता शांतपणे घालवावे, नातवंडाना  मोठे होताना बघणं हाही सुखद अनुभव आहे. ह्या सगळ्याची त्यांना पहिल्यांदाच जाणीव झाली.
"चला काका, तुम्हाला घरी सोडतो." मुलाच्या मित्राच्या आवाजाने ते एकदम भानावर आले. घरी आल्याबरोबर पहिला फोन पूण्याला गेला. 
"हे बघ  राजा, तुझ्या घराजवळ अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आमच्यासाठी फ्लॅट बघ. वाईट वाटून घेवू नको आपण सोबतच असू. तू आमच नक्कीच करशील रे पण जो पर्यंत आम्ही ठीक आहोत  तो पर्यंत तुही तुझं आयूष्य तुझ्या मनासारखं जग,अडीअडचणींना आहोतच आपण एकमेकांना."
शांताबाई आश्चर्यचकित होउन नवर्याकडे बघतच राहिल्या 

~वासंती देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...