बुधवार, ३१ जुलै, २०२४

1312. लेगसी

 विक्रांतने दारावरची कडीच वाजवली उपड्या हाताने, बेल वाजवणं न जमल्याने. चार पिशव्या होत्या त्याच्याकडे, दोन्ही हातांतून प्रत्येकी दोन अशा. दरवाजा उघडला गेला आतला. विनायकराव जाळीच्या दरवाजातून डोकावले. तोंडभरुन हसले ते, आणि बाहेरचा दरवाजाही उघडला त्यांनी. चारही पिशव्या सोफ्यावर ठेऊन. त्यांच्याच शेजारी विक्रांतने, आपल्या अंगाचं पोतंही टाकलं धाड्डकन.
"दमला असशील रे. थांब पाणी आणतो".
"बाबा गार पाणी.".
"हे घे. बरं आज तू कसा बुवा आलास? हे आठवड्याचे जिन्नस भरुन ठेवायचं काम तर विशाखाचं. कुठेयत सुनबाई?".
"विशाखा जरा...आय मीन... आज जरा...".
"ठिकेय रे... नाही जमत एखाद वेळी... ती ही कामावरुन येते... साहजिकच दमते रे ती ही... पुन्हा घरचं करणं... तुम्हा तिघांच्या तीन तर्‍हा सांभाळणं... आणि वर माझंही इथे काही अडत नाहीये ना, हे आठवड्यातून दोनदा चक्कर मारुन बघणं... फारच करते हो विशाखा... नाही का?".
"अं... हो ना... पण आता यापुढे...".
"बरं मी फक्कड चहा टाकलाय... म्हंटलं होतं विशाखा आल्यावर तिच्या बरोबरच पिऊया... आता तू आलायस तिच्या जागी... तर आपण दोघं पिऊ... विशाखाला फार आवडतो माझ्या हातचा चहा... बस हं जरा... TV लाव हवा असल्यास".
"बाबा... हात - पाय धुऊन घेतो हा जरा... विशाखाने सांगितलंय आजोबा, आजी आणि आई च्या फोटोंना... आठवणीने हार घालायला... सोमवारी घातलेले... एव्हाना सुकले असतील म्हणाली... हो हे काय... सुकायलाच आलेत... मी आणलेत नवे... घालून घेतो".
"हा चहा घे आधी... कमालच आहे पोरीची... सगळं लक्षात असतं... कसा झालाय चहा?... फर्मास जमलाय ना?... विशाखाला खूप आवडतो... तुझ्या आईलाही प्रचंड आवडायचा... संध्याकाळच्या शाळेतून ती आली की म्हणायची, मुलांपुढे ओरडून ओरडून पार गेलेला घसा... तुमच्या हातचा चहा प्यायलाकीच परततो माझ्याकडे... हा हा हा... अगदी सुर्रsss करत प्यायची ती चहा मग, बशीत ओतून".
"म्हणूनच ती आईची चहाची उष्टी बशी, तुम्ही आजही जपून ठेवलीयेत.. न धूता... बाबा आईची सतत आठवण येत असते ना तुम्हाला?... म्हणून सांगतोय चला ना बाबा आमच्याकडे... सगळे एकत्र राहू... आजोबांबरोबर रहायला मिळतंय म्हणून, मुलं ही खुश होतील".
"ए मुला... हे सोडून काहीही बोल रे... मी इथून काही हलणार नाही... अरे इथल्या प्रत्येक कोपर्‍यात तुझ्या आईचा गंध भरुन राहिलाय रे... असंच असतं आणि... तुझे आजोबा तरी कुठे आले होते रत्नागिरी सोडून इथे, तुझी आजी गेल्यावर?... आपल्या वाड्यातच राहिलेकी ते ही, अगदी जाईपर्यंत... मी ही इथेच घेणार शेवटचा श्वास, तुझ्या आईने तिच्या हाताने लावलेल्या, आवरलेल्या ह्या घरात... अरे आणि शेवटी एकत्र जगण्यापेक्षा, एकमेकांसाठी जगणं महत्वाचं नाही का?".
"बाबा... अहो आईला जाऊन आता तीन वर्ष होतील... म्हणजे गेली तीन वर्ष तुम्ही एकटे रहाताय... आधी आई होती, भले शेवटची दोन वर्ष अंथरुणावरच खिळून होती ती... पण तेव्हाही एकहाती तिचं सगळं तुम्हीच केलत अगदी हट्टाने... ना मला काही करु दिलत, ना विशाखाला... अगदी तिला आंघोळ घालण्यापासून, तिचं अंथरुण साफ करेपर्यंत सगळं... एखाद्या बाळासारखं... ते ही अतिशय मनापासून, प्रसन्नपणे... किती स्वच्छ ठेवायचात आईला, अगदी टापटीप... उदबत्ती दाखवायचात तुम्ही देव्हार्‍यातील देवांना, पण ती ठेवायचात मात्र आईच्या खोलीत... हिचं करणं हे देवाचं करण्यासारखंच आहे माझ्यासाठी, असं म्हणायचात".
"तुला माहितीये ना, तुझ्या आजोबांनीही पाच वर्ष केलं तुझ्या आजीचं सगळं... अगदी मनापासून... विना तक्रार... मी आणि ही तर तुला घेऊन, रत्नांग्रीस निघालोही होतो... तेव्हा तुझे आजोबा म्हणाले होते की, माझ्याकडून माझा हक्क हिरावू नका... हिने उभं आयुष्य वेचलंय ह्या घरासाठी, आता हिच्या उरलेल्या आयुष्यातील ह्या काही वर्षांचा सडा... मी प्राजक्तासारखा वेचून माझ्या ओंजळीत भरुन घेणार आहे... पानगळीसारखा तो झाडून, रस्त्याच्या कडेला सारणार नाहीये... मग मी आणि ही नाही गेलो तिथे... दोन महिन्यांकाठी एक चक्कर टाकत असू... चारेक दिवस राहून परतत असू... पण तेव्हाही तुझ्या आजीचं काहीही करण्यास, सक्त मनाई होती आम्हाला".
"आणि आजोबांचं तेच धोरण तुम्ही इथेही राबवलंत... आम्हाला काहीही करु न देत आईचं".
"अरे... वारसा हक्क काय फक्त पैसा - अडका, दाग - दागिने, जमिन - जुमल्यावरच सांगायचा असतो का?... तर नाही... तो सांगायचा असतो आपल्या वाडवडिलांच्या एकमेकांप्रती असलेल्या प्रेमावर, आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून घडलेल्या वर्तनावरही... आणि खरंतर ह्यावरुनच माणूस, श्रीमंत की गरीब हे ठरत असतं... नुसतं सधन असणं काय कामाचं रे?".
"बाबा... ते चांदीचं ताट - वाटी, ज्यातून तुम्ही आईला भरवायचात ते...".
"आहे की... छान जपून ठेवलंय लाॅकरमध्ये... तुला सांगतो ते ताट - वाटी खरं तर तुझ्या आजोबांनी विकत घेतलेलं तुझ्या आजीसाठी, तिच्या डोहाळजेवणावेळी... म्हणजे माझ्याहूनही दोनेक महिन्यांनी, म्हातारंच आहे बरं ते ताट... आईची हालचाल जेव्हा पारच बंद झाली, त्याच ताटातून नाना तिला भरवायचे... तब्बल पाचाहून अधिक वर्ष नानांनी, जेऊ खाऊ घातलंय आईला त्या ताटातून... जेव्हा ही आजारी पडली आणि हिचं चालणं - फिरणं बंद झालं, मी तेच चांदीचं ताट - वाटी बाहेर काढलं... मग मी सुद्धा तुझ्या आईला, त्याच ताटातून जेऊ घालत असे... नानांकडून मिळालेला हा वारसाही, मी अगदी मनापासून जपला... दोन वर्षांहून अधिक काळ".
"बाबा... तुम्हाला खरंतर सांगायचं होतं मला की... की... आता यापुढे मीच येत जाईन तुमच्याकडे... कारण विशाखाला आता शक्य नाही होणार... तिला तिच्या बँकेने सिंगापोरला जाण्याची आॅफर दिलीये, बढतीवर... बँकेची AVP म्हणून... आणि तिच्या करिअरसाठी ह्याचा, तिला खूपच फायदा होणार आहे... मी खरतंर तिला बोललो की, काहीच गरज नाहीये प्रमोशन घ्यायची... आपलं व्यवस्थित मॅनेज होतंय... पण तिला असं वाटतंय की, ही संधी हातची सोडू नये... सो... पण इट्स आॅलराईट... मी आहे ना बाबा... तुम्ही अजिबात काळजी करु नका... तुम्हाला इथेच रहायचंय ना?... रहा तुम्ही... मी दर दोन दिवसांनी चक्कर मारेन... तुम्ही खचू वगैरे नका पण".
विनायकराव काहीच न बोलता शांतपणे जागेवरुन उठले... आणि खिडकीशी जाऊन उभे राहिले. विक्रांतही मग जाऊन त्यांच्या पाठी उभा राहिला... शांतपणेच. तेवढ्यातच वरुन गेलेल्या विमानाच्या आवाजाच्या रोखाने, खिडकीबाहेर पाहिलं विनायकरावांनी. एक विमान दूर दूर जात दिसेनासं झालं.
"काय झालं विक्रांत?... बाबांना का सांगतोयस खचू वगैरे नका... का खचतील बरं बाबा?".
"अरे बाळा तू कधी आलीस?... आम्ही बाप - लेक बोलण्यात एवढे गुंतलेलो की, कळलंच नाही उघड्या राहिलेल्या दारातून... तू कधी आत येऊन पाठी उभी राहिलीस ते... सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन बरं का... खूप मोठी हो... यशस्वी हो... आणि आम्हा कोणाचीही काळजी करु नकोस अजिबात... काय रे विक्रांत?... हो ना?".
"अं... हो... म्हणजे... होच... पण... पण तू कशी इथे आलीस?... तुला उशिर होणारेय म्हणालेलीस तू, सकाळी आॅफिसला जातांना... त्या सिंगापोरला जायच्या सगळ्या फार्मॅलिटीज, तुला आजच पुर्ण करायच्या होत्या ना?".
"अॅक्चुअली येस... पण मग मला वाटलं की, तिथल्या त्या जिंजर घातलेल्या चाऊमीन नी मंचाव सुपला... बाबांच्या आलं घालून केलेल्या चहाची, थोडीच चव असणारेय... सो आय डिसायडेड टू ड्राॅप द प्लॅन, अँड आय रिफ्युज्ड द प्रमोशन अॅज वेल".
"काय?.. खरंच?... बाबा... अहो ही काय बोलतेय बघा".
"बाळा... अगं का करतेयस असं?".
"बाबा... आजोबांनी आजींना सांभाळलं... तुम्ही आईंना सांभाळलंत... मग आता जर विक्रांतने मला सांभाळलं, तरच हा वारसा जपला जाणार खर्‍याअर्थी असं आहे का?... एका सुनेनी तिच्या सासर्‍यांची काळजी घेतली, अगदी मनापासून... देन दॅट विल नाॅट बी कन्सिडर्ड अॅज अ लेगसी... इज दॅट सो?".
"तसं काही नाही गं... पण... अरे विक्रांत तू तरी निदान...".
"बाबा... विशाखा करेक्ट बोलतीये... ते चांदीचं ताट - वाटी फक्त सिम्बाॅलिक आहे, आजोबांकडून चालत आलेल्या ह्या वारशाचं प्रतिक... शेवटी कोणीतरी कोणाचीतरी मनापासून काळजी घेणं, हिच तर खरी 'लेगसी' आहे बाबा... नाही का?".
विनायकरावांनी विक्रांत - विशाखाकडे बघत, हात जोडले. विक्रांत जवळ गेला बाबांच्या, आणि त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं त्याने...तर विशाखाने विक्रांतच्या जवळ जात, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आपलं. एकत्र जगण्यापेक्षा, एकमेकांसाठी जगणं महत्वाचं... हे बाबांचं म्हणणं, आज खर्‍या अर्थाने पटलं होतं विक्रांतला. आज खर्‍या अर्थाने विक्रांत - विशाखा 'श्रीमंत' झाले होते, फक्त 'सधन' होऊन जगण्याचा मार्ग स्वखुशीने टाळत.

---सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...