आजीची लगबग सुरू होती. दुखऱ्या गुढग्याला आज कुरकुरायची परवानगी नव्हती. लाडका नातू सुट्टी लागली म्हणून ४ दिवसासाठी येणार होता. आंबे उतरवून झाले होते. भाजणी दळून झाली होती. घरचे गाईचे तूप कढवून झाले होते. जांभूळ, करवंदाच्या टोपल्या येऊन पडल्या होत्या. घावन घाटल्याचे बेत मनात बेतले होते. त्याच्या बापाची खोली झाडून पुसून लख्ख तयार ठेवली होती. आता फक्त तो यायची खोटी होती. दुपार ओसरू लागली तरी एसटीचा धुराळा दिसेना. वाट पाहून म्हातारी थकली. पुन्हा घरी आली. देवापुढे हात जोडून बसली. नातवाच्या मोबाईल चा नंबर फिरवून फिरवून पाठ झाला. तिन्हीसांजेला कातरवेळी मात्र मनातून घाबरली. देव ताम्हणातल्या पाण्यात जाऊन बसले. उंबऱ्याबाहेर गडू उपडा पडला. हरीनामाचा जप वाढू लागला. वाट पाहता पाहता थकला देह कोण जाणे कधी तरी पारावर जाऊन वाट पहात बसला. वीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला.
दोन वर्षाच्या नातवाला घेऊन अशीच पारावर लेक व सुनेची वाट पहात बसली होती. तालुक्याच्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी लेकाला पाठवले होते. दोघांना जरा फिरता येईल म्हणून नातू जवळ ठेऊन सूनेला पण धाडले होते. येतांना अघटित घडले. बस दरीत कोसळली. हा पट्टीचा पोहणारा. गावातल्या नद्या अन विहिरींचा तळ याने मुसंड्या मारून गाठलेला. स्वतःचा जीव वाचवून साऱ्याच्या साऱ्या जणांना याने दरीबाहेर खेचून काढले. पण बायकोचा हात धरता आला नाही. एक पाण्याचा लोट त्यालाही बरोबर घेऊन गेला. देवाला पण वरती नड पडली असेल, चांगली माणसे त्यांचा काळ आणि वेळ आल्यावर लगेच आपल्याकडे घेऊन जातो. अशीच पारावर बसली होती वाट पहात त्या दोन निष्प्राण देहांची. साऱ्या जगाने वाहवा केली. वर्तमानपत्रात त्याच्या शूरतेचे रकाने च्या रकाने भरून आले. प्रत्त्येकवेळी सैनिक होऊन युद्धावरच लढायला हवे असे नाही. सुजाण नागरिकत्वाचे कर्तव्य त्याने पार पडले होते. तिच्यातल्या आईची कूस धन्य झाली होती. पण नातवाला पोरके करून गेली होती. सारे दुःख गिळून ती पुन्हा उमेदीने उभी राहिली.
हे पोरगं पण अगदी बापाच्याच वळणावर गेले. कुठे चिखलात रुतलेले चाक काढून दे. तर कुठे कुणाला बैलापासून वाचव तर कुठे साप पकडून त्यांना जंगलात सोडून दे. त्याच्या उचापतींनी हैराण होऊन शहरात शिकायला धाडून दिले तिकडे ही हा साऱ्यांचा 'मसिहा' बनून फिरत होता. काय झाले असेल? वाईट साईट विचारांनी आजीच्या मनाचा कोपरा न कोपरा ढवळून निघाला. कोणीतरी दोघाजणांनी तिचा हात धरून घरी आणून सोडले. गावातल्या चार बायका तिच्या सोबतीला येऊन बसल्या. तिचा धीर आता खचत चालला होता. तेंव्हा या पोराकडे पाहून दुःख पचवले पण आता शरीराची व मनाची ताकद काहीही अघटीत सोसायची नव्हती. पहाटे कधीतरी 'आजी, ए आजी ग' अशी हाक आली. आधी वाटले भासच आहे. पण नाही पोरगं खरचंच तिला हाका मारत दारात उभे होते. आवेगाने ती उठली, नातवाला डोळ्यांच्या निरंजनांनीच ओवाळले आणि आपल्या मायेच्या कुशीत घेतले. त्याला घेऊन स्वैपाक खोलीत आली, गरम गरम भाकरी थापताना तिचा उत्साह सोळाचा झाला. त्याचे डोके मांडीत घेऊन चेपतांना तो सांगत होता, "अगं आजी काय झाले माहितेय? मी येतांना बसच बंद पडली. चालत चालत येत होतो तू वाट पाहत असशील म्हणून तर रस्त्यात एका कारचा अपघात झाला होता. सगळे बघून न बघितल्यासारखे पुढे जात होते. मला राहवेना. मी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. नशिबाने माझा रक्त गट पण जुळला."
पुढचे आजी ला काही ऐकू येत नव्हते. डोळे आणि मन दोन्ही भरून आले होते. पोर बापाच्या ही पुढे चार पावले चालून गेले होते. बापाच्या रक्ताची माणुसकीची ओढ त्याला कोठेही पाठवले तरी थांबवता येणार नव्हती.
©️ लेखिका- मंजू काणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा