युरोप टूरला जायला आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे लक्षात आल्यावर सतीशने आपल्या धाकट्या भावाला,अभिजीतला फोन केला.
" अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय. अप्पांना कधी आणू तुझ्याकडे? की तू घेऊन जाशील त्यांना? मला वाटतं आम्ही जायच्या दोन दिवस आधी तू त्यांना घेऊन गेलास तर बरं होईल."
"अरे दादा एक प्राॅब्लेम झालाय. रचनाच्या भावानं आमचं काश्मीर टूरचं बुकींग केलंय. तेही पुढच्या आठवड्याचंच आहे. त्यामुळे साॅरी मी अप्पांना नेऊ शकत नाही. मी तसा तुला एकदोन दिवसांत फोन करणारच होतो."
अभिजीतने असं म्हंटल्यावर संतापाची एक तिडीक सतिशच्या डोक्यातून गेली.
"अरे पण तुला विचारुनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना? त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत. तेव्हा तू हो म्हंटला होतास आणि आता सांगतोय जमणार नाही म्हणून ! तेही मी विचारल्यावर. आता मला सांग मी अप्पांना कुठं ठेवायचं?"
"दादा तुला माहीतेय रचनाचा स्वभाव कसा आहे तो ! तिने एकदा ठरवलं की ब्रम्हदेवसुध्दा तिच्या प्लॅनमध्ये दखल देऊ शकत नाही. तेव्हा प्लिज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहीला आता अप्पांचा प्रश्न, तर तू रेणूला विचार ना!ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खुप मोठं आहे.आणि कधीतरी तिनंही वडिलांना सांभाळलं तर बिघडलं कुठं?"
"अरे पण....." तेवढ्यात फोन कट झाला.
सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहीलं. अभिजीतचं हे नेहमीचंच होतं. लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका. पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही. लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यात तो वेगळा निघाला. दोन वर्षापुर्वी आई कॅन्सरने वारली. पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही. मागील वर्षी अप्पांना हार्ट अटॅक आला. पण एखाद्या परक्या माणसासारखं हाॅस्पिटलमध्ये अप्पांना भेटायला येण्याव्यतिरीक्त त्याने काही केलं नाही. अशा संकटसमयी आपल्या भावाला आपल्या मदतीची गरज आहे ह्याचंही त्यानं भान ठेवलं नाही.
अभिने अप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता. रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती. आई असतांना ती आईशी गोड गोड बोलून भारीभारी साड्या, गिफ्ट्स उकळायची. परिस्थिती उत्तम असतांनाही नवऱ्याला बिझीनेसला पाहीजेत असं सांगून तिनं आईवडिलांकडून दहाबारा लाख नक्कीच घेतले होते. पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नव्हतं. संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही. पण त्याच्या बायकोला, भारतीला हे दिसत होतं. तिची कुरबुर चालू असायची. सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा. आई गेली तसा रेणूचा भाऊ, वडिल, वहीनीतला इंटरेस्ट संपला. वर्षभरात कधी वडिलांची, भाऊ, वहिनीची चौकशी करण्यासाठी ती साधा फोनही करत नव्हती. मात्र राखीपोर्णिमेला आणि भाऊबीजेला भावाकडून ओवाळणी घेण्यासाठी ती सतीशकडे आवर्जून यायची. त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला.
"अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी.अप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे रहायला? अभिही नेमका त्याच वेळी काश्मीरला चाललाय. नाहीतर त्याच्याकडेच अप्पांना ठेवायचा प्लॅन होता "
"माझ्याकडे? अरे दादा माझी नणंद येतेय बाळंतपणासाठी माझ्याकडे. मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की अप्पांकडे?"
"अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे. अप्पा कुठेही सामावून जातील."
"नको बाबा, त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोधत बसू डाॅक्टर ! त्या पेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरावीस दिवसांकरीता एखाद्या वृध्दाश्रमात ठेवून दे. सगळेच प्रश्न मिटतील"
"रेणू अगं आपण तिघं भाऊबहिण असतांना त्यांना वृध्दाश्रमात ठेवणं बरं तरी दिसेल का?"
"मग तूच बघ बाबा काय करायचं ते. आय ॲम हेल्पलेस." तिनेही फोन कट केला. सतीशला खुप संताप आला. परत फोन करुन तिला चांगलं खडसावावं असं त्याला वाटू लागलं. पण ती आता त्याचा फोनच उचलणार नाही हे त्याला तिच्या स्वभावावरुन चांगलं ठाऊक होतं. घरी आल्यावर त्याला भारतीने अप्पांची काय सोय लागली ते विचारलं. सतीशने तिला सकाळी भावाबहिणीशी झालेला संवाद सांगितला. अपेक्षेप्रमाणे ती भडकली.
"आपण काय ठेका घेतलाय का अप्पांना सांभाळायचा? या दोघांची काहीच जबाबदारी नाही का? अप्पा त्यांचेही वडिल आहेत ना?"
तिचंही म्हणणं योग्यच होतं. मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्विकारली होती. अगोदर आईच्या नंतर अप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं. कोणीतरी एक घरी लागायचं. यावेळी अभिजीतने अप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकींग केलं होतं. हनिमून नंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते. सहलीचे सगळे पैसेही भरुन झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता. ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला. सतीशने तिला समजावयाचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सागितलं. 'मला काही सांगू नका. काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं'
अप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले.
"अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय. राहीन मी एकटा. जा तुम्ही सगळे"
"असं कसं म्हणता अप्पा? तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय. तुमचा बी.पी.आणि शुगर नेहमी कमी जास्त होतं असतात. कसं सोडायचं तुम्हाला एकटं?"
सतीश खरं बोलत होता त्यामुळे अप्पा चुप बसले.
टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते. पण मार्ग निघत नव्हता. अप्पांना वृध्दाश्रमात ठेवण्याची कल्पनाच सतीशला सहन होत नव्हती. त्याचं टेन्शन वाढलं होतं. त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहीले. शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करुन भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला. भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसानही होणार होतं. पण त्याला इलाज नव्हता. शेवटी त्याने निर्णय पक्का केला. भारतीला फोन करुन कल्पना दिली. ती तर रडायलाच लागली. पण त्याने समजावण्याच्या फंद्यात न पडता फोन कट केला. मग त्यानं ड्रायव्हरला फोन करुन तयार रहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला. गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली.
"खुप टेन्शनमध्ये दिसताय साहेब. काही प्राॅब्लेम आहे का?"
त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं
" हो रे बाबा. तीन दिवसांनी युरोप टूरला जायचंय. पण अप्पांना कुठं ठेवायचं तेच कळत नाहिये "
मग सतीशने सर्व घटना त्याला सांगितली.ती ऐकल्यावर तो म्हणाला
" अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब? मी माझ्या घरी घेऊन जातो अप्पांना"
"नको नको कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास. अप्पांचं फार बघावं लागतं. त्यांच्या औषधाच्या,खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतात. त्यांची शुगर,बी.पी.वारंवार चेक करावे लागतात "
"अहो त्यात काय एवढं! आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना? त्यांचीही बायपास झालीये हे तुम्हालाही माहीत आहे. शिवाय माझे वडिल अप्पांना चांगलं ओळखतात. दोघांची चांगली दोस्ती होईल बघा. ते काही नाही मी अप्पांना घेऊन जाणार"
एका ड्रायव्हरच्या घरी अप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना. शिवाय अप्पांना तिथं कितपत आवडेल हाही प्रश्न होता. त्यात मोहनचं घरही खुप छोटं होतं आणि घरात माणसं जास्त. अप्पांचा तिथं साधा आराम तरी होईल का याची सतीशला शंका वाटत होती. पण मोहनचा आग्रह पाहून त्याने अप्पांनाच विचारायचंं ठरवलं.
"ठीक आहे. चल गाडी फिरव. आपण अप्पांनाच विचारु.ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही."
मोहन खुश झाला.
घरी येऊन सतीशने अप्पांना विचारलं. अप्पांचाही चेहरा खुलला. ते म्हणाले "मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे. एकटं रहाण्यापेक्षा माणसांनी भरलेल्या घरात रहायला मला नक्की आवडेल."
मोहनने मग लगेच घरी फोन लावला. बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला."सगळे तयार आहेत. आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे "
टूरच्या दिवशी मोहन अप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला. नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं. निरोप घेतांना सतीशला त्याने आश्वासन दिलं
"काळजी करु नका साहेब.तुम्ही अगदी निर्धास्त रहा. अप्पा अगदी सुखरुप रहातील."
टूरमध्ये असतांनाही सतीश सारखा अप्पांना फोन करुन तब्येतीबद्दल विचारत होता .त्यांचं एकच उत्तर असायचं
"काळजी करु नको. मी अगदी मजेत आहे. इथे सगळी मंडळी माझी खुप काळजी घेताहेत. तुम्ही टूर एंजाॅय करा "
सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमाननतळावर गेला. सतीशने अप्पांची चौकशी केली.
"अगदी मजेत आहेत अप्पा. खुप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी" मोहन सांगत होता "रोज सकाळी उठून माॅर्निंग वाॅकला जायचे. मग दिवसभर पत्ते आणि बुध्दीबळ खेळायचे. संध्याकाळी एखाद्या मंदिरात किर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरीकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे. तीन दिवसांपुर्वी अप्पांना थोडा ताप आला होता. शुगरही थोडी वाढली होती. मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता एकदम ओके आहेत"
" अरे वा! आम्हांला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी."
"एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहूणचार राहून गेलाय."
" अरे आता कशाला हवा तो पाहूणचार? इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे?"
"असं काय करता साहेब ! आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहूणचाराशिवाय कसं सोडायचं? आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका. मी काहीही फारसं केलं नाही. अप्पाच व्यवस्थित राहिले."
"बरं बुवा नाही म्हणत" सतीशने माघार घेतली.
दूसऱ्या दिवशी संध्याकाळी अप्पा घरी आले. ते खुप आनंदी दिसत होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पँट, शर्टचं कापड, टाॅवेल,टोपी होतं. ते पाहून सतीश मोहनला म्हणाला.
"अरे याची काय गरज होती मोहन?"
"नाही कशी साहेब? अप्पांना काय तसं पाठवायचं होतं?"
तेवढ्यात भारतीने सतीशला आत बोलावलं. म्हणाली
"अहो त्याचे उपकार ठेवू नका. पाच दहा हजार देऊन टाका त्याला." सतीशलाही ते पटलं. मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीलं मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत म्हणाला
"हे काय साहेब? अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर अप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं."
सतीशला गहिवरुन आलं त्याने मोहनला मिठी मारली.
तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला. टूर कॅन्सल केली की अप्पांना वृध्दाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते. सतीश एकच वाक्य बोलला "मला माझा खरा भाऊ भेटला. त्याने अप्पांना व्यवस्थित सांभाळलं "
©दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करायला हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील क्रमांकावर संपर्क करावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा