बुधवार, १७ जुलै, २०२४

1269. बंड

      कालच आमच्या लग्नाची मॅरेज ॲनवर्सरी मोठ्या थाटात पार पडली.रात्री उशीरा झोपल्यामुळे थोडा उशीराच उठलो.पण आज घरात सकाळचं नेहमीच वातावरण नव्हतं.म्हणजे आईचा रेडिओ बंद होता.देवघरातून बाबांच्या आरतीचा किंवा घंटीचा आवाज येत नव्हता. इतकच काय किचन मधून वाफाळलेल्या चहाचा वासही येत नव्हता.सगळं घर भयानं शांततेत निशब्द झालं होतं.घरात काहीतरी वेगळंच घडल होत एव्हडं नक्की. दबकतच मी हॉल मध्ये आलो तर आई,बाबा आणि ताई मिळेल ती जागा पकडून चिंताक्रांत अवस्थेत डोक धरून बसली होती.
शेवटी असह्य झालेल्या शांततेचा भेद करत मीच विचारलं.
"इतना सन्नाटा क्यो है भाई...?"
तस ताईन दाटलेला हुंदका गिळत सांगितल..
"दादा,पहाटे पासून वहीनी नॉट रिचेबल आहे रे "
"इतकच होय,अग,आज सोमवार ना? मग गेली असेल राम मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात काहीतरी मागायला." इकडे तिकडे पहात परिस्थितीच गांभीर्य कमी करण्याच्या उद्देशान मी बोललो.
"तस असतं तर चांगलच झालं असतं. पण गावातल्या कुठल्याच देवळात ती मिळाली नाही."
बाबानी तिच्या नॉट रिचेबल असण्यावर शिक्कामोर्तब केलं. आता मात्र कमाल झाली होती.काल दिवसभर आमच्या मॅरेज ॲनवर्सरीच्या सोहळ्यात आनंदात मिरवणारी माझी बायको अचानक कशी काय गायब होवू शकते. सगळचं अनाकलनीय आणि बुध्दीच्या पलिकडचं होतं. आता मीही हॉल मधली मिळेल ती जागा पकडून डोक धरून बसलो.
इतक्यात मोबाईलची रिंग वाजली तसा मी मोबाईल पटकन कानाला लावला
 "हॅलो, मी तुमच्या बायकोचा मोठा मामा मिरतहून बोलतोय.काही काळजी करू नका तुमची मंडळी इकडे सुरक्षित आहे. पण आपल्या घरात जे काही चाललय हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि आपणाकडून ही अपेक्षा नव्हती म्हणूनच मी तुमच्या मंडळीना म्हणजे माझ्या भाचीला मुद्दामहून इकडे आणले आहे. असो थोडा अवधी लागेल पण वाटाघाटीं नंतर यातून नक्कीच मार्ग निघेल."
नक्की काय चाललय काहीच समजत नव्हत.असेच दोन दिवस गेले आणि बाबाही घरातून गायब झाले. आमच्या घराला कुणाची नजर लागली होती समजत नव्हत. मी घरात विमनस्क अवस्थेत पुन्हा डोक धरून बसलो तोच बाबांच पुनरागमन झालं.
"तुम्ही आणि कुठ गायब झाला होता? थोडं रागानच बाबांना विचारलं. यावर बाबांकडून जे काही समजल ते अस. म्हणजे ते आपल्या सुनेला समजावण्यासाठी तिच्या मिरतच्या मामाकडे गेले होते परंतु बाबांनी मिरतच्या दिशेने प्रस्थान केलेल आहे याची कुणकुण लागताच आमच्या सौ. न तिचा दुसरा मामा जो गुहागरला रहात होता तिथे स्थलांतर केल्यामुळे सरळ मार्गान जाणाऱ्या बाबांचा मध्यस्थीचा हा प्रामाणिक प्रयत्न निष्फळ ठरला होता. खरं तर तिला आपल्या घरा विषयी,इतकचं काय आपल्या नवर्‍या विषयी काहीचं कसं काय वाटतं नव्हतं याचच मला मोठ कोड पडलं. खूप राग आला तिचा. रागातच तिला फोन केला अर्थात तो स्विच ऑफ असल्यामुळे मला काहीच करता आलं नाही. मग मी तिच्या गुहागरच्या मामाला फोन करून इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट निर्वाणीच सांगून टाकल.
" हे पहा,सर्व प्रथम गेल्या दोन वर्षाहून अधिक काळासाठी सुखा समाधानात नांदत असणाऱ्या आपल्याच घरा विरूध्द अशा प्रकारे केलेल्या बंडाची माझ्या बायकोला सविस्तर कारण मीमांसा द्यावी लागेल. तसेच येत्या ४८ तासात ती स्वगृही आली नाही तर तिचे परतीचा सर्व मार्ग बंद करण्यात येतील शिवाय तिच्यासाठी या घरचे दरवाजे कायमचेच बंद राहतील आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आमची राहणार नाही याची गंभीर दखल घेण्यात यावी"
माझ्या या कायदेशीर पवित्र्याचा योग्य तो परिणाम झाला होता आणि दुसर्‍याच दिवशी तिची सही असणारे खालील डॉक्युमेंट ईमेल व्दारे पोस्ट करणात आले.
आपण दिलेल्या संधी बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सदर बंड का पुकारण्यात आले आहे याची कारणे पुढील प्रमाणे देत आहे.
1) परवा झालेल्या आपल्या मॅरेज ॲनवर्सरीच्या निमित्तानं मला साडी खरेदी करण्यासाठी आपण पैसे दिले पण ते माझ्या मागणी पेक्षा खूपच कमी होते. माझ्यासाठी असणाऱ्या फंड पुरवठ्यात आपणाकडून नेहमीच कपात केली जाते हे आता स्पष्ट झाले आहे.
२) घरातील वातावरण चांगले ठेवायला हवं या आग्रहापोटी आपला कल नेहमीच आईच्या बाजूने असतो आणि आपण प्रत्येक गोष्टीत बाबांचा सल्ला घेता. त्यामुळे आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या मला कोणताही निर्णय घेण्याच स्वातंत्र्य रहात नाही.
३) एकंदरीत मला आपल्या घरी दुय्यम स्थान असल्या मुळे माझं उर्वरित आयुष्य मला नाथ असूनही अनाथा सारखं कंठावं लागेल याची खात्री पटलेली आहे. सबब, मी घेतलेला निर्णय अयोग्य आहे अस मला वाटत नाही.
शेवटी एकच.
समझनेवालो को इशारा काफी है. 
     रात्रभर मी तिची पोस्ट पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. विचार करून करून डोक्याचा अगदी भुगा झाला होता आणि अचानक थंड वार्‍याच्या एका मोठ्या झोता सरशी समोरची खिडकी खाडकन उघडली गेली आणि मी झोपेतून जागा झालो. सहजच घड्याळात पाहिलं तर पहाटेचे सहा वाजले होते आणि शेजारीच आमची सौ. साखर झोपेत गालातल्या गालात हसत होती.
बापरे !  म्हणजे हे स्वप्न होत तर. स्वतःला चिमटा काढत माझी मीच खात्री करून घेतली. पण दीर्घ सुस्कारा टाकत डोक्यावर चादर ओढताना पुन्हा एक शंका आली. पहाटेची स्वप्न खरी होतात अस  म्हणतात.
खरचं,  खरं असत का हे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...