बुधवार, ३१ जुलै, २०२४

1313. मालती

    आज मालतीला जाऊन एक महिना झाला होता, पण असा एकही दिवस जात नव्हता की ज्या दिवशी मालतीची आठवण आली नाही. आमच्या भावंडात तीच सगळ्यात मोठी. आम्ही तिला लाडाने मालू म्हणायचो. ती जितक्या लवकर सासरी गेली, तितक्याच लवकर माहेरी परत आली. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस-रात्र हे जरी सारखे असले तरी येणारी माणसं ही मात्र सारखी नसतात,तिला सासरी खूप त्रास झाला. खटल्याच्या घरामध्ये सगळ्या लोकांचं करावं लागायचं. एखाद्या मोलकरीण सारखी ती चार वर्ष राबराब राबली. सकाळी उठल्यापासून तिच्या मागे कामांची रांग लागलेली असे.  एक संपत नाही तर दुसरं तयार. ती नेहमी म्हणायची माणूस कामाने थकत नाही, माणूस थकतो ते विचारांच्या ओझ्याने !!  घरातल्या माणसांची साथ नसेल  तर आपलंच घर आपल्याला   खायला उठत.  मालतीला घरातल्या कोणत्या लोकांपासून त्रास झाला नाही? सासू सासरे, नणंद ,दीर  आणि खुद्द तिचा नवरा. बिचारी कित्येक दिवस परिस्थिती बदलेल, परिस्थिती बदलेल असा विचार करत  दररोज एका नवीन सूर्योदयाची वाट बघत असायची , परंतु एक दिवस मात्र तिच्याच आयुष्याचा सूर्यास्त झाला. बिचारीने सहा महिने कॅन्सरची झुंज देऊन शेवटी प्राण सोडला. तिचे संपूर्ण आयुष्य फक्त लढण्यात गेल.आम्ही लहान असताना ती गरिबीशी लढली. लग्न झाल्यानंतर ती सासरच्या प्रत्येक माणसाशी लढली  आणि मरताना शेवटी कॅन्सरची लढली. आम्हा दोन लहान भावंडांचा सांभाळ करता करता तिचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले, गावाकडच्या घरातील शेतीची कामे,  आई-वडिलांचे थकलेले शरीर,  यातून तिला इच्छा असून सुद्धा शिकता आले नाही.अभ्यासात हुशार असलेली मालती  शेवटी दहावीनंतर तिचे लग्न करावे लागले. लग्नानंतर चार वर्षांनी मालती पुन्हा माहेरी आली होती, यावेळी ती आली ते परत न जाण्यासाठी.
 तिची तब्येत खूपच खराब झाली होती.तिचे आत गेलेले गाल, वजनात लक्षणीय झालेली घट आणि चिंताग्रस्त चेहरा तिला कुठल्यातरी आजाराची लक्षणे सांगत होता, तिला स्वतःलाही ही गोष्ट समजली होती की आपण कुठल्यातरी आजाराने ग्रासलो आहोत. सहा महिन्यापूर्वी तपासणीत तिला ब्लड कॅन्सर असल्यास पुढे आले. जीवन जगण्याची उम्मीद संपलेली मालती हवालदिल झाली होती.  आमच्या भावंडावर आणि आईवर असलेल तिच प्रेम  तिच्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून दिसून येत होत.  काल तिच्या दवाखान्याच्या बिलांची फाईल बघत असताना  मालतीने लिहिलेले एक पत्र मला सापडलं. ते पत्र मलाच लिहलं होतं. नोकरीनिमित्त  बाहेरगावी असल्यामुळे   मी तिला सारखं भेटू शकत नव्हतो, आपल्या भावाची पुन्हा भेट होईल की नाही याची काळजी तिला सारखी असायची. सहा  महिन्यामध्ये फक्त आमची दोनदा भेट झाली होती. तिसरा भेटीची तिला शाश्वती नव्हती.तिने लिहिलेले ते पत्र घेऊन मी वाचायला पलंगावर बसलो. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर सहा महिन्यापूर्वीची मालती दिसायला लागली.  हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूची झुंज देत असलेली मालती  या पत्राच्या रूपाने आज माझ्यासमोर होती. वाचताना तिचा प्रत्येक  शब्द मला तिच्या आवाजात ऐकू येत होता.
प्रिय सतीश,
आपली पुन्हा भेट होईल की नाही हे सांगू शकत नाही. पण मला तुझी, आईची आणि सविताची खूप आठवण येते. माझ्या आयुष्यामध्ये  तुम्ही तिघेही खूप महत्त्वाचे आहात. तुमच्याबरोबर माझे अनेक ऋणानुबंध जुळले होते  पण आज मात्र हे मोकळे करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कोणीही सुटले नाही त्यातून मी तरी कशी सुटणार?  आयुष्यात मी काही कमावलं असेल तर तुझ्यासारखा भाऊ, सविता सारखी बहीण आणि आई. बाकी काय गमावलं म्हणशील तर, मृत्यूच्या  दारात उभ असतांना बाकी शून्यच उरलेली असते त्यामुळे गमवणार तरी काय? आणि या शेवटच्या क्षणाला  संपूर्ण आयुष्यभर आपण किती चांगले क्षण जगलो हेच महत्त्वाचे. माझ्या आयुष्यात हेच चांगले क्षण तुम्ही तिघांनी मला दिले.
त्याच क्षणी माझे डोळे पाणावले . प्रत्यक्षात आपली बहीण मालती आपल्यासमोर उभी आहे की काय असा भास झाला. तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे रूपांतर  जणू तिच्या आवाजात होऊन मी प्रत्येक्ष ऐकतोय असं वाटलं.  मालती आपल्या शेजारी बसून आपल्याला तिचे दुःख सांगते असं काही क्षण मला जाणवलं.  एका कागद वजा  पत्रा शिवाय त्या ठिकाणी मालतीच कोणतही अस्तित्व नव्हत. मी उरलेला मजकूर पुन्हा वाचायला सुरुवात केली.
प्रिय सतीश,
 माझ्या सासरच्या लोकांना दोष देऊ नको. प्रत्येक जण आपले कर्म स्वतःबरोबर घेऊन येत असतो. चांगल्या कर्माची फळे ही चांगलीच मिळतात आणि वाईट करण्याची फळे ही वाईट. त्यांना त्यांच्या कर्माची फळे बरोबर मिळतील. आज मी मृत्यूला सामोरे जात असताना सुद्धा खूप आनंदी आहे. कदाचित हेच माझ्या चांगल्या कर्माचे फळ असेल. सविताला आणि आईला कधीही अंतर देऊ नकोस. ते दोघेही त्यांचा जीव असू पर्यंत तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. उद्या कदाचित तुझे लग्न होईल तुझाही संसार सुरू होईल पण त्या संसाराच्या चक्रात तू सविताला आणि आईला कधीही विसरू नकोस, हीच अपेक्षा. त्या दोघींचे तुझ्यावर किती प्रेम आहे हे फक्त मीच सांगू शकते. परंतु ते सांगायला मी कदाचित ह्या जीवनात नसेलही त्यामुळे या पत्रात लिहून ठेवत आहे.  माझ्याबद्दल जास्त काळजी करू नकोस. माझा प्रवास इथपर्यंतच होता. प्रत्येकाने आपल्या नशिबात आलेले भोग भोगायचे असतात मला याच समाधान मिळतं की मी माझे भोग भोगून पूर्ण केलेत.  आयुष्यात खूप मोठा हो आणि नाव कमव. माझी काळजी करू नको. 
    हे वाचून मला रडू आवरेना.  मी अगदी हुंदके देऊन रडू लागलो.  मालतीची आणि आपली शेवटची भेट होऊ शकली नाही याची खंत मला आयुष्यभर होती.  मालतीने लिहिलेलं हे  पत्र माझ्याजवळ  एक शेवटची आठवण होती.  याच पत्राच्या रूपाने मालती माझ्या सोबत आयुष्यभर राहणार होती, एक मोठी सखी बहिण म्हणून !!!  मी हळूच त्या पत्राची घडी घातली. तिला  कपाळी लावली आणि घरातल्या देव्हाऱ्यात  तिला आदरपूर्वक  ठेवले.
 आईला आणि सविताला बोलावले, त्या लिहिलेल्या पत्राला हात जोडत  मी  दोघींना म्हणालो ", आज पासून आपल्या देव्हाऱ्यात हे देवाचं फुल असणार" !!!!

- प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...