सोमवार, २२ जुलै, २०२४

1295. फूले वेचिता

     गोपाळराव निवृत्त झाले. त्यांच्या एकुलत्या एक मुलाने आईवडलांना स्वत:कडे शहरात आणले. एका सोसायटीत त्याचा दोन बेडरूमचा फ्लॅट होता. गावातल्या ऐसपैस घराची सवय असल्यामुळे गोपाळरावांचे दम कोंडल्यासारखे होवू लागले. सतत फिरायची सवय, लोकांना भेटायची बोलायची सवय, अन इथे सगळ्यांची दारे बंद. त्यांचे मन काही केल्या रमेना.   रोज पहाटे साडेचार पाचलाच ते उठत असत. स्नान पुजा आटोपूनही सहाच वाजलेले असायचे. एवढ्या लवकर पेपरही येत नसे. बायको उठली की चहा करून द्यायची. सातला पेपर आल्यावर कानाकोपरा वाचून झाल्यावर कोडे सोडवत बसायचे. तरी वेळ जाता जात नव्हता. हळूहळू ते खाली जायला लागले. सोसायटीच्या जवळच एक मंदीर होते. रोज सकाळ संध्याकाळ तिथे भजन चालायचे. संध्याकाळी जाऊन मंदीरात बसू लागले. तिथेच जॉगींग पार्कवर फिरायला जाणारा निवृत्त लोकांचा ग्रुप भेटला. गोपाळराव खुश झाले.  मोकळा श्वास घ्यायला या लोकांसोबत फिरायचे त्यांनी निश्चित केले. घरून अनेक सुचना देण्यात आल्या. रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी मुलाने एक काठी आणून दिली. धोतरात काठी अडकेल म्हणून बळजबरीने ट्रॅक पँट घालायला लावली. टीशर्ट अन ट्रॅक पँट घातलेल्या नवर्‍याला पाहून बायको पदर तोंडाला लावून हसली आणि ‘छान दिसताय’ असा हातानेच अभिप्राय दिला. मॉडर्न आजोबा पाहुन नातवंडे नाचू लागली. रोज पहाटे सहाला गोपाळराव या अवतारात बाहेर पडू लागले. लवकरच ते त्या ग्रुपचे हिरो झाले. विनोदी किस्से सांगण्यात त्यांचा हातखंडा असल्यामुळे वेगळा हास्य क्लब लावायची कुणाला गरज वाटली नाही. पार्कवर फिरण्यापेक्षा बसून किस्से ऐकण्यातच सर्वांना मजा येऊ लागली होती. सर्व मंडळी पोट दुखेपर्यंत हसायची.
     ‘आमच्या गावात आमचे एक जनावराचे डॉक्टर मित्र होते. त्यांच्या घरी दहाबारा कुत्रे होते. घरी कुणी आलं की काही करत नाही नुसता वास घेतो म्हणायचे, पण आलेल्या माणसाची गाळण उडायची.  एकदा आमच्या एका मित्राच्या पायाला कुत्र्याने वचकन धरले. जोर जोरात बोंब मारू लागला तरी डॉक्टर महाशय शांतपणे हसतच म्हणत होते, काही होत नाही त्याला इंजेक्शन दिले आहे, तुम्हालाही देतो. त्यांच्याकडूनच सोळा इंजेक्शन घेतल्यावर त्या मित्राने डॉक्टरकडेच काय त्या गल्लीतही परत पाय ठेवला नाही. बायको असे का करू लागलात पिसाळल्यासारखे म्हणेल या भीतीने त्यांनी तिला रागवायचेही कायमचे सोडून दिले. वाईटातून चांगले म्हणजे त्याची बायको खुश झाली.’ किस्सा साधाच, पण सांगायची हातोटी अशी होती की सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली. दुसर्‍या दिवशी दुसरा किस्सा. ‘आमच्या एका मित्राला लघुशंकेची घाई लागली म्हणून गडबडीत तो रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. समोरच्या झुडपाआडून एक बाई तुझा मुडदा बसू दे म्हणत उठली. याला धरताही येईना सोडताही येईना. मागे वळावं तर रस्त्यावर लोकं, पुढं बघावं तर बाई. त्याने झपकन चेन लावली. ओली पँट घेऊनच घराकडं पळत सुटला.’ अशा किश्श्यांनी लोकांच्या डोळ्यासमोर चित्र उभे रहायचे अन वॉकींग क्लबचे हास्य क्लबात रूपांतर व्हायचे.
 असेच दिवस मजेत जात होते. गोपाळरावला आता करमू लागले. शहरातल्या रस्त्यावर फिरायची हिम्मतही वाढली. घरी पुजेसाठी मुलाने फुलाचा वरवा लावला होता.  फ्रिजमध्ये ठेवलेली फुले दुसर्‍या दिवशी देवाला वाहीली जात. हे काही त्यांना बरोबर वाटेना. त्यांनी ठरवले की रोज ताजी फुलेच वापरायची. वॉकींग क्लबला जायच्या आधी ते अंधारातच लवकर बाहेर पडू लागले. जातायेता त्यांनी अनेक कंपाऊंडमध्ये फुलांची झाडे पाहिली होती. ती घ्यायला काय हरकत आहे, म्हणून एक पिशवी हातात घेऊन जावू लागले. ताज्या फुलांचे हार देवाला घातल्यामुळे त्यांना प्रसन्न वाटू लागले.  फुले मिळवण्यासाठी त्यांनी फिरायचा विस्तार वाढवला. कुणाच्याही कंपाऊंडमधल्या झाडांच्या फांद्या काठीने वाकवून मनसोक्त फुले तोडू लागले. वेगवेगळ्या रंगांची फुले रोज घरात येवू लागली. मुलगा सून म्हणाले ‘लोकं झाडे जोपासतात, तुम्ही आयते तोडून आणता. त्यांना काय वाटेल? ही चोरीच झाली ना?’ ते हसतच म्हणायचे ‘एवढी फुले येतात, ती लोकं आतली घेतात मी बाहेरची, त्यात काय. झाडे निसर्गाने दिले वरदान आहे. त्यावर कुणाची कसली मालकी अन ते तोडले तर कसली चोरी!’
     देवघर प्रसन्न दिसत असल्यामुळे सर्व धकून जात होते. एक दिवस ते असेच बाहेर पडले. त्या दिवशी फुले कुठेच दिसेनात! बरेच दूर जावे लागले. एका झाडाची फांदी त्यांनी काठीने वाकवली. ती खूपच चिवट होती. फुल तोडायच्या नादात काठी निसटली आणि फांदीच्या झटक्याने कंपाऊंडच्या आत जावून पडली. फुल तर मिळालेच नाही उलट काठी गेली. त्यांनी गेट तपासले. त्याला कुलूप लावलेले होते. एवढ्या पहाटे आवाज देणे किंवा बेल मारणे बरे दिसले नसते. गुपचूप रिकामी झोळी घेऊन घरी गेले. त्यांची फजीती ऐकून घरीच हास्य क्लब तयार झाले. त्याच दिवशी मुलाने दुसरी काठी आणून दिली. सकाळी वॉकींग क्लबमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला. सर्वजण खूप हसले. ‘आयती फुले तोडता काय, घ्या, देवानेच तुम्हाला शिक्षा दिली’ एकजण हसत म्हणाले. ‘अहो, देव एक दार बंद करतो तेव्हा दुसरा उघडतो’ नवी काठी दाखवत गोपाळराव म्हणाले अन परत हशा पसरला.
       नवी काठी घेऊन नव्या दमाने गोपाळरावांचा नव्याने दिनक्रम सुरू झाला. कधी फुले मिळायची कधी नाही, पण त्यांनी पिच्छा सोडला नाही. एक दिवस ते त्याच घरासमोरून जात होते ज्या घरात त्यांची काठी पडली होती. अंधार असूनही त्यांना झाडावर काहीतरी लटकवले असल्याचे दिसले. जवळ जावून पाहिले तर त्यांचीच जुनी काठी झाडाच्या फांदीला लटकवलेली होती. इकडे तिकडे पाहून त्यांनी हातातल्या काठीने ती फांदी वाकवली. खुळखुळ आवाज झाला अन त्याचवेळी दार उघडून एक बाई बाहेर आली. 
 ‘काही समजते का नाही? आम्ही एवढे झाडांचे संगोपन करतो अन तुम्ही निर्दयपणे फांदी वाकवून फुले ओरबाडता. फांद्या तुटतात तरी तुम्हाला काही वाटत नाही. मुद्दाम मी घुंगरू लावून काठी अडकवून ठेवली होती. आज या गोष्टीचा मला सोक्षमोक्षच करायचा होता.’  तिचा तोंडपट्टा चालू झाला. गोपाळराव ओशाळून गेले. ‘अहो बाहेर आलेल्या फांदीची फुले तोडतो आणि ती देवासाठीच नेतो’ गडबडून ते म्हणाले. ‘हो, आम्ही पाणी घालतो, खत घालतो, अन तुम्ही आयती फळे खा’ ती तावातावाने म्हणाली. बराच वेळ वादविवाद चालला. हा आवाज ऐकून शेजारीपाजारी बाहेर आले. तेही दुषणे देवू लागली.
‘मुलीच्या मंगळागौरीला आमची झाडे असूनही आम्हाला फुले मिळाली नाहीत.’ एक बाई म्हणाली.
‘हो ना. देवांना वहायलाही फुले मिळत नाहीत. रोज पहाटे उठून पहारा देत बसायची वेळा आली आहे.’ दुसरी तिटकार्‍याने बोलली.
‘मग काय तर ! यांना फुले पाहिजेत तर स्वत:च्या घरात झाडे लावावीत ना, दुसर्‍यांचे कशाला नुकसान करतात हे?’
अशा संवादांचा भडीमार सुरू झाला. गोपाळराव पहिल्यांदाच हडबडून गेले. तेवढ्यात त्या बाईचा नवरा बाहेर आला आणि सारवासारव करत म्हणाला ‘वयस्कर गृहस्थ आहेत, कशाला एवढे बोलताय?’ त्यांच्या सारवासारवीमुळे वातावरण निवळले आणि गोपाळराव हळूच सटकले.
तिथून सरळ घरी आले. त्यांच्या हातात दोन दोन काठ्या पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. हसत हसत त्यांनी घडलेला किस्सा सांगितला. मुलाने डोक्याला हात मारून घेतला. सून म्हणाली ‘लोक हसतील आता.’ गोपाळराव लगेच म्हणाले ‘कुणी हसणार नाही. मी ठरवले आहे गावातले घर विकायचे आणि इथे आपले स्वतंत्र घर बांधायचे.’ सर्वांना खूप आनंद झाला. काही महिन्यातच गावातले घर चांगल्या किमतीत विकले गेले. त्या पैशात त्यांनी एक प्लॉट घेतला. फ्लॅट विकून मिळालेल्या पैशात टुमदार घर बांधले. कंपाऊंडच्या आत भरपूर फुलांची झाडे लावली. आता फुलांसाठी कुठे बाहेर हिंडायची गरज नव्हती.  खूप आनंदात दिवस जात होते. एक दिवस आंगणात झाडलोट करायला गेलेली सून आत पळात आली. तिच्या हातात एक काठी होती. जोरजोराने हसत ती म्हणाली ‘बाबा, तुमच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कुणाची तरी काठी आपल्या अंगणात पडली....’ अन संपूर्ण घर त्या हास्यात सामील झाले. 
 दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर उठून गोपाळरावांनी ती काठी आणि फुलांनी भरलेली एक टोपली गेटला अडकवली. एका चिठ्ठीवर ‘या टोपलीतली फुले घेत जा, म्हणजे काठी गमवावी लागणार नाही’ असा मजकूर लिहून ती टोपलीत टाकली. उजाडल्यावर बाहेर जाऊन पाहिले. काठी जागेवर नव्हती. टोपलीतली फुलेही तशीच होती. त्यात असलेल्या चिठ्ठीच्या मागे काही लिहिले होते. उत्सुकतेने त्यांनी वाचली. त्यावर लिहिले होते ‘काठी गेली तरी बेहत्तर पण जी मजा फुले तोडण्यात आहे ती आयत्या फुलात नाही. त्यामुळे तसदी घेऊ नका !’ 
गोपाळरावांनी कपाळावर हात मारून घेतला आणि हा किस्सा वॉकींग क्लबमध्ये सांगितला. त्याबरोबर ‘चला, तुम्हालाही कुणी वस्ताद भेटला’ म्हणत आख्ख्या मैदानावर हास्याचे फवारे उडाले. 

कोयनानगर ग्रुपवर आलेली पोस्ट लेखकाचे नाव माहित नाही लेखक अनामिक सर्व हक्क मूळ लेखकाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...