“...पण म्हणजे आपलं सबंध आयुष्य आपण याच जुन्या वाड्यात घालवायचं? आपल्या मुलांना एक्स्पोजर काय रे पुढे?” समिधाने त्याला अक्षरशः वैतागून विचारलं.
“येस समिधा...आपण याच वाड्यात रहायचं, आयुष्यभर. काय हरकत आहे? आमची शेतीवाडी, एक्झॉटिक भाज्यांचा बिझनेस, स्पेअरपार्ट चं शॉप इतका व्याप कोण सांभाळणार? मीच ना. खेडेगाव आहे मला मान्य आहे. तु पण याच गावात वाढलीस, मोठी झालीस. शिक्षणासाठी पुणं गाठलंस. तेवढ्याने तुला शहराची इतकी सवय झाली? लक्षात ठेव. मी याच ठिकाणी जन्मलो, जगलो वाढलो आणि इथेच मरणार. माझ्या पणजोबांनी बांधलेल्या या भक्कम वाड्यात आमच्या चार पिढ्या वाढल्या. मी इ थे च रहाणार आणि तुही.” सोहमच्या बोलण्यात निर्धार होता. ती काहीच बोलली नाही. त्याचा तापट स्वभाव तिला ठाऊक होता. उगाच शब्दाने शब्द वाढला असता. पण एक मात्र नक्की होतं. तो इथेच रहाणार होता आणि समिधा मात्र या लहानशा खेड्यात रहायला अजिबात तयार नव्हती. तिचं शिक्षण, मोठमोठ्या पदव्या, करिअरची भव्य स्वप्नं यांना लहानपणीच्या प्रेमाखातर कायमची तिलांजली द्यायला ती अजिबात तयार नव्हती.... at any cost....ती मुळातच करिअरिस्टिक नव्या पिढीतली हुशार मुलगी होती. तिला अनुरुप जोडीदार अपेक्षित होता. जो तिच्या करिअरला सपोर्ट करेल. तिचा निर्णय एव्हाना पक्का झाला. तिने घरी येऊन विचार करुन सोहमला फोन करुन स्पष्ट नाही सांगितलं. आपण बोलू आणि इतक्यात आईबाबांना एकदम सांगू नकोस. त्यांना टेन्शन येईल. तो म्हणाला.
“परवा घरात काहीतरी कारण सांगून बाहेर पड. घरी ये. आपण शांतपणे डिस्कस करु. मला विचार करु दे.” तो नंतर फोनवर म्हणाला. ती काही बोलली नाही. त्या रात्री तिला एक विचित्र भास झाला. कोणीतरी आपल्या पाठी उभं आहे असं तिला दोनदा वाटून गेलं. हा भास इतका प्रत्ययकारी होता की ती केवढ्याने तरी दचकली. समिधाच्या आईबाबांचं घर लहानसं होतं. पण स्वतंत्र बंगली होती. भरवस्तीत होती त्यामुळे चोरीमारीची भिती तशी नव्हती. आज नेमके आईबाबा तिच्या बहिणीच्या सासरी चिंचवडला गेले होते. पण तिच्या सोबत त्यांचे दोन तगडे जर्मन शेफर्ड डॉग्ज असल्याने तशी भिती नव्हती. तिने रोअर आणि डायनाला संध्याकाळी लवकरच मोकळं केलं. दोघे आवारात असले की भुरटे चोरच काय दरोडेखोरांची टोळी आली तरी बेहत्तर. अशी परिस्थिती होती. दोघेही भयानक टेरर होते. मुख्य दरवाजा नीट बंद करुन ती मागे वळली आणि पुन्हा दचकली. अक्षरशः मागे एक तरुण स्त्री उभी असल्यासारखं वाटलं तिला. रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि तिला बरं वाटलं. रात्री मुगाची साधी खिचडी आणि ताक जेवून ती थोडावेळ टिव्ही बघत बसली. सोहमचा कॅज्युअल मेसेज होता. त्याला रिप्लाय दिला आणि तिने टिव्हीकडे नजर टाकली आणि प्रचंड दचकली. टिव्हीशेजारच्या सोफ्यावर एक तरुण सुंदर स्त्री बसलेली दिसली आणि तशीच दुसरी एक सुरेख स्त्री हॉल आणि बेडरुमला जोडणाऱ्या दरवाजात उभी होती. भितीने समिधाची गाळण उडाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. जीभ जड झाली. शब्द फुटले नाही तरी मनातल्या मनात तिने मारुतीरायाचा धावा सुरु केला. दोघी शांतपणे हसल्या. त्यातली सोफ्यावर बसलेली म्हणाली “समिधा, काळजी करु नको. मारुतीराया काही करणार नाही. आम्ही तुझ्या हितचिंतक म्हणून आलोय गं. आम्ही काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे”
मग दुसरी बोलू लागली, “अत्यंत महत्प्रयासाने हे देह जेमतेम धारण करता आलेत आम्हाला. आम्ही यापुढे काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक.” आणि तिची भिती अचानक नाहीशी झाली. त्या दोघी बोलू लागल्या. त्यांचं बोलणं संपलं आणि तिला झोपेची पेंगच आली. ती तिथे सोफ्यातच आडवी झाली. बाहेर रोअर आणि डायना काहीवेळ भुंकत होते. सकाळी समिधाला उशीराच जाग आली. रात्रीचा अनुभव भयानक होता. रात्रीच्या त्यांच्या बोलण्यातला शब्द नं शब्द तिच्या मनात नोंदला होता. आईबाबा संध्याकाळी आले, त्यांना अर्थातच काही सांगण्यासारखं नव्हते.
***
दोन दिवसांनी, बाजारात जाऊन येते म्हणून ती घराबाहेर पडली. वाड्यावर गेली. आज सोहम कमालीचा शांत होता. सोहमचे आईबाबा पाच वर्षांपूर्वी एकापाठोपाठ एक गेले. तो वाड्यात एकटा राही. एक हरकाम्या नोकर आणि जेवण, वरकामाला एक बाई येत असे.आज तो नोकर आणि ती बाई दोघांनाही सुट्टी होती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. “समू आपण बोलूच पण आज वाडा दाखवतो तुला” तो म्हणाला. वाडा तसा तिच्या परिचयाचा होता. वाड्यात पुन्हा काय बघायचे? ती म्हणाली. “अगं तसं नाही. वाड्यात बऱ्याच जागा तुला अपरिचित आहेत. कम ऑन. मी पण बरेच दिवस तिथे गेलो नाही. तुझ्या निमित्ताने आज बघता येईल.” तिने नको म्हणून नंतर होकार दिला. आधी वरच्या मजल्यावरच्या काही खोल्या, जुने दागिने, आजोबांची लायब्ररी बघून मग ते दोघे खाली आले. सोहमने खास बनवलेला लेमनग्रास टी घेतला.
“ये अशी इथे....” सोहम म्हणाला. “एक नवीन अमेझिंग खोली दाखवतो तुला...ये... कम ऑन” आता ती सावध झाली. तो पुढे आणि ती मागे. ओसरी, देवघर ओलांडून ते वाड्याच्या मागच्या भागात आले. निरव शांतता होती, हा भाग तिला अपरिचित होता. शांतपणे चालत चालत एका अरुंद पॅसेजमधून दोघे पुढे चालत होते. जुन्या पध्दतीचा एक फिकट पिवळा बल्ब फक्त शांतपणे तिथे सुरु होता. त्या पॅसेजमधे जणूकाही काळ थांबला आहे की काय असं वाटत होतं. पॅसेजच्या टोकाशी एक अत्यंत जुनाट कसलीशी पाच साडेपाच फुटाची उभी मूर्ती होती. पॅसेज तिथे संपत होता.
“समू, आता गंमत बघ हं. मूर्ती उजवीकडून डावीकडे फिरव पाहू.” सोहमच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. समिधाने धाडस एकवटून ती मूर्ती फिरवली आणि तिच्या डावीकडची भिंत सरकली आणि आतल्या काळोखाची एक लाटच जणू बाहेर आली. समिधाला काही समजायच्या आत सोहमने तिच्या दोन्ही खांद्यांवर पकड घट्ट केली आणि तिला त्या तळघराच्या दिशेने ढकललं. समिधा जणूकाही तयारच होती. तिने प्राणपणाने प्रतिकार केला आणि बेसावध सोहमच्या लक्षात यायच्या आतच त्याची तिच्या खांद्यावरची पकड आपोआप ढिली झाली आणि एखाद्या अज्ञात चुंबकाने जणूकाही खेचुन आत घ्यावं तसा तो तळघरात खेचला गेला. एखाद्या हिंस्र प्राण्याच्या जबड्यात सापडावं तसा तो भेसूरपणे किंचाळला. त्याचा आवाज अस्फुट होत गेला आणि दरवाजा धाडकन बंद झाला. मूर्ती पूर्ववत झाली. जणूकाही इतकं मोठं भयनाट्य घडलंच नाही असं वाटलं. समिधा तिथेच पाय थिजल्यासारखी उभी राहिली.
***
“...समिधा आता शांतपणे नीट ऐकून घे. सोहमचे सबंध कुटुंब एक अत्यंत मनोविकृती असणारं कुटुंब आहे. मी नर्मदा. सोहमचे आजोबा म्हणजे विश्वासराव. अत्यंत खतरनाक मनुष्य. याच वाड्यात माझ्यावर बळजबरी केली आणि मी लग्नाचा आग्रह धरल्यावर. मला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका तळघरात नेऊन जिवंत कोंडलं. ते तळघर भयानक आहे. तिथे हवा यायला जायला फटही नाही. विहिरीसारखं खोल आहे. मी अन्नपाणी आणि हवेशिवाय तडफडत जीव सोडला त्यात.”
“मी रेवती. सोहमच्या वडिलांना म्हणजे कृष्णरावांना मी पसंत होते. मी गावातलीच. माझं प्रेम एका दुसर्या व्यक्तीवर होतं. म्हणून मी नकार दिला. मलाही गोड गोड बोलून वाडा दाखवायच्या निमित्ताने मागिलदारी आणून तळघरात ढकलून मारलं. मीही अशीच तडफडून जीव दिला. तर समिधा. आम्ही यांना पुरते ओळखून आहोत. सोहमच्या मनातही तेच सुरु आहे. तुझा खंबीर नकार तो पचवू शकत नाही. त्यामुळे तु इतर कोणाचीही होता कामा नये यासाठी तो लवकरच हा इतिहास पुन्हा घडवणार आहे. तु तो म्हणेल त्याला होकार दे. तळघरापर्यंत ये. पुढे आम्ही आहोतच. ही विकृती सोहमबरोबरच कायमची संपेल.”
“एक विचारु?” समिधा म्हणाली “पण आजोबा आणि वडिलांनी केलेले हे गुन्हे, त्या तळघरात केलेले खून पुढच्या पिढीला कसे समजतात?”
“आजोबांनी बापाला आणि बापाने मुलाला पत्रातून शेवटी हे सांगितले आहे. एखाद्या आनुवंशिकतेसारखी ही विकृतीही आहे.”
समिधा हे ऐकून हादरुन गेली. खरं म्हणजे ती पुनश्च वाड्यात गेलीही नसती पण सोहमची विकृती त्याच्यासोबत संपणे गरजेचे होते आणि रेवती, नर्मदा यांना आता मुक्तीही मिळणे गरजेचे होते. तिला अचानक गुंगी आली आणि ती सोफ्यातच कलंडली.
***
वाडा आता खऱ्या अर्थाने शांत होता. रेवती आणि नर्मदा यांच्या धुसर आकृत्या वाड्याबाहेर पडताना दिसल्या. समिधा शांतपणे घरी आली. ती वाड्यातून बाहेर पडताना कोणालाही दिसणार नव्हतीच. अनेक रहस्य पोटात दडवून आजही तो वाडा तसाच शांतपणे उभा असतो. कधीकधी अमावस्येच्या रात्री वाड्याच्या मागीलदारी कोणीतरी नुसत्या येरझारा घालत आहे असा अनेकांना भास होतो.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा