पावणे सहाचा गजर झाला आणि हाताने चाचपडत मुकुंद रावांनी घड्याळाच्या डोक्यावर टपली मारून त्याला शांत केलं आणि पांघरूण डोक्यावर घेऊन
"अजून दहा पंधरा मिनिटे पडू. मग उठून चालायला जाऊ " असा विचार करत ते पडून राहिले .पहाटे पहाटे एकदा झोपमोड होऊन मग जी काही झोप लागते त्याला...केवळ स्वर्ग सुखाचीच उपमा देता येईल . पण तेव्हढ्यात मंगलताईंनी त्यांना विचारलंच,
"अहो... फिरायला जायचं नाही का आज ? उठा बरं. "
जातो हो. एक दहा पंधरा मिनिटे पडतो अन मग उठतोच." कुशी वर वळत मुकुंदराव म्हणाले.
थोड्या वेळाने उठून मग आवरून काठी हातात घेऊन बाहेर मॉर्निंग वॉकसाठी निघताना त्यांनी मंगला ताईंना विचारलं,
"अहो तुम्ही येणार नाही आज? "
"नको हो आज येत नाही मी , जरा कणकण वाटतीये सकाळपासून "
मंगलताई अजून अंथरुणातच होत्या.
"अरे देवा. मग क्रोसिन देऊ का एखादी? " काळजीच्या स्वरात मुकुंदरावांनी विचारलं .
"अहो नको. काही तरीच काय ? जरा पडून राहते म्हणजे बरं वाटेल."
असा अखिल भारतीय घरगुती रामबाण इलाज जाहीर केला आणि मंगल ताईंनी अंगावर पांघरूण घेतलं. मुकुंद राव मग एकटेच खाली पार्क मध्ये वॉक साठी बाहेर पडले .अर्थात खाली पार्क मध्ये त्यांचे रोजचे सहकारी मित्र, हास्यक्लबचे सभासद भेटणारच होते. कारण हाच त्यांचा निवृत्ती पश्चातचा दिनक्रम होता तो म्हणजे रोजचे सकाळचे फिरणे, गाणी ऐकणे आणि इतक्या वर्षात ज्याला वेळ देता आला नव्हता तो चित्रकलेचा छंद. साठीच्या घरातल्या मंगल ताई आणि नुकतीच पासष्ठी पार केलेले मुकुंद राव गेली अनेक वर्षे एकमेकाच्या आधाराने राहत होते. पुण्यातील कित्येक वयस्क जोडप्यांप्रमाणे यांचे ही पोटचे गोळे परदेशस्थ होते. मोठा मुलगा परिक्षित गेली अनेक वर्षे लंडनला स्थायिक झाला होता. त्याचे एम एस चे शिक्षण झाले आणि तिथेच त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली मग तिथेच राहणाऱ्या अवंतिकाशी लग्न केलं आणि मग तर तो पूर्ण पणे आई बापास आणि घरास पारखा झाला. ऋग्वेद च्या जन्मानंतर तर त्याची भारत भेट ही दुर्मिळ होऊन बसली. तर धाकटी मुलगी प्रीती भारतातच होती पण दिल्ली सारख्या दूरच्या शहरात आणि सासरी दिलेली मुलगी वरचेवर भेटेल ही अपेक्षा करणं ही दुरापास्तच होतं. तिचा नवरा पंकज एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. त्यामुळे त्याचे व्याप वेगळे.
मग एक दोन दिवसांनी होणारे फोन आणि सध्याच्या काळात अपरिहार्य असणारे व्हॉटसअप हेच ते काय या मावळती कडे झुकलेल्या जोडप्याला त्यांच्या मुलांशी आणि नातवंडांशी जोडून ठेवणारे दुवे होते. व्हिडिओ कॉल वर नातवंडांचे बोबडे बोल आणि बाल लीला त्यांना खूप सुखावून जात पण कुठे तरी त्यांची आठवण आणि केवळ हे दुरून होणारे दर्शन या एकटेपणाला अधिक तीव्र करून डोळ्यात टचकन पाणी ही आणत. मुलं सुस्थितीत होती आणि मुकुंदरावांना चांगली पेंशन ही होती त्यामुळे आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती . पण पैसा कितीही असला तरी काही सुखाचे, आपलेपणाचे क्षण मुला नातवंडांच्या भेटीची गोडी कधी विकत घेतली जाऊ शकत नाही. पार्क मध्ये एक दोन राऊंड झाल्यावर त्यांनी त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि प्रिती ला फोन केला
" हॅलो बाबा ..काय करताय? फिरून आलात का?" प्रिती ने लगेच चौकशी सुरू केली.
"हो बेटा फिरता फिरता च तुला फोन केलाय."
पार्क मधील बाकावर टेकत टेकत मुकुंदराव म्हणाले .
" बरं बरं ! आई कुठाय? " प्रिती ने विचारले
" अग आज ती नाही आली ,जरा बरं नव्हतं वाटत तिला." मुकुंदराव म्हणाले
" काही नाही. जराशी कणकण. विशेष काही नाही." हे ही पुढे जोडून दिले.
" बरं बेटा पुढच्या महिन्यात १५ तारखेला काय आहे ठाऊक आहे ना ?" त्यांनी प्रिती ला विचारलं.
" अं ..हो हो बोला ना बाबा." प्रिती ने अडखळत दिलेल्या प्रतिसादा वरून त्यांनी साफ ओळखले की तिला काहीच आठवलेलं नाहीये. मग तिला फारसं अवघडून न ठेवत त्यांनीच सांगितलं,
"आईचा वाढदिवस आहे एकसष्ठावा." प्रितीने लगेच सावरून उत्तर दिले
"हो हो हो माहिती आहे ना मला बाबा."
" बेटा माझी इच्छा आहे की ही तिची एकसष्ठी आपण सर्वांनी दणक्यात साजरी करावी. तिला एक सरप्राइज देऊ या. बिचारीने आपल्या घरा साठी खूप काही सोसलय. मुलांची शिक्षणं, माझी नोकरी, आपल्या कुटुंबाचे सगळे चढ उतार यात ती एकटी ठाम पणे उभी राहिली ग. आता थकलीये ती. तिला जरा बरं वाटेल आपण सगळे एकत्र येऊन तिची एकसष्ठी साजरी केली तर."
बराच काळ शांततेत गेला. फोन कट तर नाही ना झाला असं वाटून त्यांनी " बेटा ??" असं विचारलं
" हा बाबा... ऐकतीये मी" प्रिती म्हणाली .
"खरंय तुमचं. आपण नक्की करू या बाबा. मी पंकजशी बोलून तुम्हाला परत फोन करते."
" हो बेटा कर फोन पण आई समोर नको. तिला समजता कामा नये, समजलं का? आणि सगळे जण तुम्ही यायचं आहे." मुकुंदराव म्हणाले.
" बाबा...तुम्ही दादा ला सांगितले का? तो काय म्हणाला ?" प्रितीने विचारले
"अगं त्याच्या कडे आता मध्यरात्र झाली असेल." इकडे सकाळचे सात तर लंडन मध्ये किती? हे नेहमीचं पाठ झालेलं वेळेचं गणित मांडत मुकुंदराव उत्तरले.
" साडेचार पाच वाजता करेन त्याला फोन. अच्छा ठेवतो आता हं." असं म्हणून फोन खिशात ठेवून ते लगबगीने घरी आले तर मंगलताई अजुन पडलेल्याच होत्या. धुणी भांडी आणि घरकामासाठी रोहिणी आली होती आणि रोहिणी सोबत तिची पाच वर्षांची मुलगी वैशू .
"काय हो ..अजुन बरं वाटत नाहीये का ? डॉक्टर देवकरांना फोन करू का?" हातातील काठी दाराजवळ ठेवत आणि फोन टेबलावर ठेवत मुकुंदराव मंगलताईंना म्हणाले.
"अहो मला काय धाड भरलीये लगेच डॉक्टरांना बोलवायला? काही नाही झालं. बरं वाटतंय आता." मंगल ताई उठत उठत म्हणाल्या.
मुकुंदराव मग रोहिणीला म्हणाले " रोहिणी आज जरा पोळ्या करून देशील का ? तुझं काम आटोपल्यावर."
"असं का म्हणताय काका ? अहो मी दोघांचा स्वयंपाक करूनच जाणार आहे. मला परकी समजता का तुम्ही?"
"अग तसं नव्हे तुला ही बाकी काम असतात आणि या बाहुलीची शाळा पण असेल ना ?" वैशुचे दोन्ही गाल हळूच ओढत ते म्हणाले.
" काही होत नाही. तुम्ही नका काळजी करू. आत्ता उरकते सगळं. "
अर्थात रोहिणीला हे घर कधीच परक नव्हतं. मुकुंदराव आणि मंगल ताईंनी तिला घरातील सदस्याप्रमाणे आपुलकीची वागणूक गेली अनेक वर्षे दिली होती. सणासुदीला स्वतः सोबतच रोहिणी आणि वैशुची देखील खरेदी आवर्जून व्हायची. त्यामुळे रोहिणी देखील या "काका काकूंची" सेवा मनापासून करीत असे. पाच वाजताच मुकुंदराव दूध आणायच्या बहाण्याने हळूच बाहेर पडले आणि परिक्षीतला फोन केला व एकसष्ठी च्या " सरप्राइज " आयोजनाची कल्पना मांडली
"हे बघ परिक्षीत असं ही ऋग्वेद च्या पहिल्या वाढदिवसा नंतर तुम्ही इकडे पुण्याला आलाच नाहीत. मागच्या वर्षी अवंतिकाचा जॉब बदलला म्हणून तुमचं यायंच रद्द झालं. आता मात्र नक्की यायचं आहे तुम्हा सर्वांना, तसं बुकिंग वगैरे करा तिकिटांचे. अजुन चांगला दीड महिना आहे बरं."
दुसऱ्या बाजूला परिक्षीत काहीसा विचारात पडल्या सारखा वाटला त्यांना
"बाबा...खूप छान आयडिया आहे. मी सुट्टी साठी अर्ज टाकतो. अवंतिका ला पण सांगतो तस आणि तुमच्या अकाउंटला आजच पैसे ट्रान्स्फर करतो. लागतील ना सगळ्या कामांसाठी ?" तो म्हणाला.
"अरे नको नको...पैसे नको पाठवू. तो प्रश्न नाहीये. पैसे आहेत फक्त तुम्ही सगळे तेव्हढ या आणि हो आईला याची अजिबात कल्पना येऊ द्यायची नाही...काय ? समजलं ना?" असा इशारा देत देत त्यांनी पुन्हा एकदा मुलास आग्रह केला.
आज दूध घेऊन घरात येताना एकदम वसंतराव देशपांडेंच्या " सुरत पिया की " ची तान गुणगुणत आलेल्या मुकुंदरावांना पाहून मंगल ताईंनी ओळखले की " स्वारी आज खुशीत आहे " मग जमेल तशी त्यांची एकसष्ठी च्या " खास कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. मंगल ताईंना तसु भर ही सुगावा न लागू देता ही सगळी सव्यापसव्य करणे सोपे नव्हते. मग सगळ्या नाते वाईकांना बोलवायचं का नाही? सकाळच्या हास्य क्लब च्या मंडळींना आमंत्रित करावे का? कार्यक्रमाचे आयोजन सोसायटी च्या हॉल मध्येचं करावं का ? अश्या अनेक प्रश्नांवर गाडी अडू लागली . अर्थात हे सगळं नियोजन त्यांना एकट्यालाच करावं लागतं होतं त्यामुळे सल्ला मसलत कोणाशी करावी हा पण एक प्रश्न होताच. अर्थात अधून मधुन परिक्षीत , प्रिती ला फोन चालूच होते. अखेर सोसायटी च्या हॉल मध्येच कार्यक्रम पार पाडायचा. घरातील मंडळी व निवडक लोकांना बोलवायचं, मंगल ताईंना वाचनाची आवड असल्याने त्यांची ग्रंथतुला करायची आणि ती सगळी पुस्तकं दान करायची असं मुकुंदरावांनी ठरवलं. पण या कामासाठी बरेचदा बाहेर पडावं लागतं होतं म्हणून मग त्यांनी नाईलाजाने मदतनीस म्हणून रोहिणी ला या सरप्राइज नियोजनाची कल्पना देऊन ठेवली होती , मग ती ही काही बारीक सारीक कामात मदत करू लागली त्यांना.
कॅलेंडरचं पान उलटल आणि एकसष्ठीचा समारंभ दोन आठवड्यांवर येऊन ठेपला. मुकुंद रावांनी सोसायटीच्या सेक्रेटरी ला सांगून हॉल बुक करून टाकला. ओळखीच्या एका केटरर ला सांगून मेनू ठरवताना मंगल ताईंचे आवडते " गुलाब जाम " नमूद करायला ते विसरले नव्हते. बाकी आमंत्रण , वगैरे आता मुलं आल्यावर बघू असा विचार करून ते जरा " रिलॅक्स " होते .
प्रिती ला जरा दोन तीन दिवस आधी बोलावून घ्यावं म्हणजे, मंगलताईंसाठी छानशी साडी, एखादी भेटवस्तू घेता येईल असा विचार करून त्यांनी प्रीती ला फोन केला
" अगं बेटा , कुठे आहेस तू ? दोन तीन दिवसात एकही फोन नाही केलास तू ! सगळं ठीक आहे ना ?"
" हो बाबा , ठीक आहे. अहो असच जरा घरातील कामं, अर्जुनची परीक्षा यातच बिझी होते." प्रिती च्या आवाजातून तिचा मूड फारसा फ्रेश नसल्याचे त्यांना जाणवत होते. मग आत्तपर्यंतच्या तयारी बद्दल त्यांनी प्रितीला सांगितले आणि ती सगळी मंडळी कधी येणार ? हे विचारलं
" बाबा ..अहो मी आज संध्याकाळी तुम्हाला फोन करणारच होते. आमचं जरा येणं अवघड आहे म्हणजे जवळ जवळ रद्दच समजा." चाचपडत प्रिती म्हणाली
" का ग बेटा ?? काय झालं ग ? सगळं ठीक आहे ना?" कापऱ्या आवाजात मुकुंदरावांनी विचारले.
"बाबा अहो नेमकं उद्याच प्राची ताई म्हणजे पंकज जी बहीण इथे आमच्याकडे डिलिव्हरी साठी रहायला येतीये. तिचे मिस्टर एअर फोर्समध्ये आहेत.त्यांची पोस्टिंग आसाम मध्ये झालीय आणि तिला नववा लागलाय. पंकज तिला इकडे घेऊन येणार आहे. सो ...आम्हाला पुण्याला यायला जमेल असं वाटत नाही."
मुकुंदराव अचानक खिन्न झाले , काय बोलावे सुचेना .
" बरं बरं काळजी घे बेटा, तुम्ही सगळे आला असता तर बरं वाटलं असतं ग." असं म्हणत त्यांनी संभाषण संपवले. संध्याकाळ नंतर त्यांच्या मनःस्थितीत पाडलेला फरक मंगल ताईंच्या लक्षात आला होता पण त्याचं खर कारण रोहिणी ला ठाऊक होतं कारण मुकुंदराव बाल्कनी मध्ये उभे राहून प्रितीशी बोलत असताना रोहिणी खोली आवरत होती तेव्हा तिच्या कानावर हा बाप लेकीचा संवाद पडला होता. एकसष्ठीचा सोहळा आता चार दिवसांवर आला होता पण अजून परिक्षीत चे यायचे प्रयोजन काही त्यांना समजले नव्हते. परदेशातून यायचं तर खूप आधीच तिकिटे बुक करावी लागतात. पण परिक्षीत कडून त्यांना येण्याचे आश्वासन तर मिळत होते पण निश्चित कार्यक्रम कळत नव्हता त्यामुळे ते हतबल झाले होते. प्रिती चे येणे रद्द झाल्यामुळे ते अर्धे तर खिन्नच झाले होते. अखेर त्यांनी परिक्षीत ला फोन करून थेट विचारलेच अन् त्यांना ज्याची भिती वाटत होती तेच झाले. परीक्षित ने देखील हात वर केले.
"बाबा ..बाबा अहो आम्हीं नक्की येणार होतो. मी सुट्टी देखील टाकली होती. पण नेमकं अवंतिकाचे आई बाबा इकडे लंडनला येत आहेत रहायला. ते पहिल्यांदाच येणार आहेत त्यामुळे सगळच फिसकटलं. त्यांना नका येऊ असं सांगणं ही बरोबर नाही. अवंतिका म्हणतीये की यंदा दिवाळीच्या वेळेस पुण्याला जरा जास्त दिवस जाऊ पण आत्ता नको."
आता मात्र मुकुंदराव पूर्ण पणे कोलमडून गेले. सर्व तयारी कार्यक्रम रद्द होण्याच्या दुःखा पेक्षा इतक्या वर्षांनी पत्नी साठी एक आनंदाचा क्षण निर्माण करण्याची त्यांची आशा भंग पावण्याची रुख रूख अधिक होती.
"पण पारिक्षित अरे तुम्ही सगळे येणार म्हणून केटरिंग वाल्याला सांगितले. जोशींना सांगून सोसायटीचा हॉल सांगितला. पुस्तकांची ऑर्डर दिली. आता काय करायचे या सगळ्यांचे? नशीब नातेवाईक आणि पाहुण्यांना आमंत्रण गेली नव्हती. मला एकट्याला हे सगळं नाही जमणार रे." त्यांच्या आवाजात आता हतबलता आणि खिन्नता एकवटली होती .
"मी समजू शकतो बाबा ,पण मला ही सुचत नाहीये काही. मी तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करू का अकाउंटला ? निदान नुकसान तरी होणार नाही." परिक्षीत मलमपट्टी करण्याच्या सुरात म्हणाला.
" बेटा सगळी नुकसानं पैश्याने नाही रे भरून येत. आनंद साजरा करायला घरातील माणसच हवी असतात. असो
बघू या आता काय करायचं ते. ठेवतो बेटा काळजी घ्या."
इतके दिवस उत्साहानं ज्याची तयारी केली ते मनोरथ असे धुळीस मिळतानाचे दुःख कश्याने भरून काढण्यासारखे नव्हते. त्यांनी अखेर जोशींना फोन करून हॉल नको हे सांगितले केटरिंग वाल्या ला फोन करून ते ही रद्द करण्यास सांगावे म्हणून फोन करणार तेव्हढ्यात रोहिणी चहा चां कप घेऊन त्यांच्या खोलीत आली आणि कप त्यांच्या हातात देता देता म्हणाली " काका तुम्हाला एक विचारू का ? "
"अग बोल ना ..त्या साठी परवानगी कशाला हवी तुला" चहा चा घुटका घेत घेत ते म्हणाले.
"तुम्ही खूप छान छान चित्र काढता. तुम्ही आमच्या चाळीत येणार का रविवारी? " रोहिणी ने जरा घाबरतच विचारले
" मी? कशाला ग ?" आश्चर्य वाटून मुकुंदरावांनी विचारले.
" तसं नाही. पण रविवारी आमच्या चाळीचा वर्धापन दिवस आहे. खूप कार्यक्रम असतात. त्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे. तुम्ही त्यासाठी परीक्षक आणि पाहुणे म्हणून याल का?"
त्यावर एकदम जोरात हसून ते म्हणाले "मी ? अगं मी कसला परीक्षक? मी काही मोठा चित्रकार नाहीये. असच छंद म्हणून काही रेघोट्या काढत बसतो. म्हातारपणाचे उद्योग..."
"पण काका आमच्या चाळीत खूप मुलं आहेत. तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल बघा. या ना काका तुम्ही आणि काकू आम्हा सर्वांना बरं वाटेल." रोहिणी हट्ट कायम ठेवत म्हणाली
"बरं बरं ... येऊ आम्ही .. कधी म्हणालीस ? रविवारी ? "
मग त्यांच्या लक्षात आलं की " अरेच्च्या... रविवारीच हीची एकसष्ठी आहे. पण आता काय असं ही सगळं रद्दच होतंय. जाऊ दे निदान रोहिणी च्या चाळीत जाऊ चित्रकलेच्या स्पर्धेसाठी..." असा विचार करून त्यांनी रोहिणीला यायचं आश्वासन दिले.
रविवारी सकाळीच त्यांनी मंगल ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण या शुभेच्छा देताना त्यांचा नेहमीचा उत्साह लोप पावल्या चे मंगल ताईंनी हेरले होते. कारण विचारणार तेव्हढ्यात " शुभेच्छा देण्यासाठी " प्रिती चा फोन आला. नंतर इतर नातेवाईकांचे फोन. वगैरे गडबड सुरूच राहिली. दहा वाजता मुकुंदराव आणि मंगल ताई रिक्षा करून रोहिणीच्या चाळीत पोहोचले. चाळ जुनी असली तरी आज वर्धापन दिना निमित्त तिच्यात एक वेगळेच चैतन्य निर्माण झालेले दिसत होते. फुलांच्या माळा लावल्या होत्या. सुंदर रांगोळी काढली होती. चौकात मंडप टाकला होता. सनई चे मंगल सुर वातावरणाला अजूनच उत्सवी करीत होते. खूप सारी लहान मुले चित्रकलेचे साहित्य घेऊन उत्साहाने मंडपात जमली होती. काका काकूंना पाहताच रोहिणी तिचा नवरा त्यांना घ्यायला पुढे आले आणि अगत्याने मंडपा पाशी घेऊन गेले. एके बाजूला सत्य नारायणाच्या पूजेची पूर्व तयारी करणारे गुरुजी दिसत होते. एकंदरीत अतिशय मंगलमय वातावरण होते.
"अरे वा...काय जोरदार वर्धापन दिन आहे तुमच्या चाळीचा ! छान वातावरण आहे . एव्हढ्या सगळ्यां चाळकऱ्यांना उत्साहात पाहून बरं वाटतंय " खुश होत मुकुंदराव रोहिणीला म्हणाले.
त्यावर रोहिणी ने हसून तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि काकांना उत्तर दिले " काका या सगळ्या उत्साहाला आणि उत्सवाला अजून एक कारण आहे. ते म्हणजे काकूंचा वाढदिवस...म्हणजेच एकसष्ठी !"
मुकुंदराव आणि मंगलताई दोघांना तसेच आश्चर्य चकित अवस्थेत ठेवत रोहिणी पुढे बोलू लागली
"काका ...आज आमच्या चाळीत आम्ही सगळे चाळकरी मिळून काकूंची एकसष्ठी साजरी करणार आहोत. माफ करा पण जसे तुमच्याकडे करतात ते सगळे होम हवन किंवा शांत हे विधी काही आम्हाला जमले नाही पण आज ही सत्य नारायणाची पूजा तुम्हा दोघांच्या हस्ते झाली तर आम्हाला पण जरा पुण्य मिळेल आणि वाढदिवस म्हटल्यावर यांनी काकूसाठी मस्त केक पण आणलाय." नवऱ्या कडे पाहत हसत हसत रोहिणी म्हणाली.
मुकुंदराव आणि मंगलताई एकमेकाकडे पाहू लागले. आश्चर्य आणि आनंद याचे मिश्रण दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होते
"अग रोहिणी पण या सगळ्याची काय गरज होती? वाढ दिवस वगैरे साजरा करायला मी काय लहान मुलगी आहे का? " थोडंसं भावनावश होते मंगल ताई म्हणाल्या
"काकू अहो मला वैशूला तुम्ही इतके वर्ष आई बापाचे प्रेम दिले, माझी आई माझ्या लहानपणीच गेली. ती असती तर तिचा वाढदिवस आम्ही साजरा केला नसता का? " रोहिणी त्यांचा हात हातात घेत म्हणाली.
" बेटा....आज माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचे कर्तव्य तू पार पाडतीयेस. हा सोहळा, हा उत्सव सगळं करण्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद." डोळ्यावरून नाकावर आलेला चष्मा हातात घेत रुमालाने डोळे पुसत पुसत मुकुंदराव म्हणाले.
"अहो काका...तुम्ही केली काय आणि आम्ही केली काय काकूंची एकसष्ठी तेव्हढ्याच आनंदात साजरी होणार ना?"
आता मात्र मुकुंदराव आणि मंगलताई अव्यक्त झाले होते. मनातल्या भावना केवळ आनंदाश्रु बनून डोळ्यातून ओघळू लागले होते. मुकुंदरावांनी मग केटरींग वाल्याला फोन करून सगळं जेवणाचे नियोजन चाळीतल्या मंडळींसाठी त्यांच्या तर्फे केले. ग्रंथतुले साठी ऑर्डर केलेली पुस्तके चाळीतील सर्व मुलांना वाटली. मग सत्य नारायण पूजा, चित्रकला स्पर्धा, हसत खेळत जेवणं आणि नंतर सर्व बाल गोपाळांसोबत केक कापून काकूंची एकसष्ठी साजरी झाली. अश्या उत्साही वातावरणात आनंदी मंडळींमध्ये अनोखी एकसष्ठी साजरी झाल्याचा आनंद आणि समाधान अजुनही मुकुंदराव आणि मंगल ताईंच्या ओलसर डोळ्यात स्पष्ट दिसत होते.
@सागर जोशी पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा