आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भगवंतवत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही. अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदुर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थ यात्रेला जावे. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही. याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहतो. विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतातपण अशी व्यक्ति जेंव्हा मनापासून आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते माहित नाही कुणाच्या पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगा व देवाची भक्ती करत रहा. कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली असा भाव ठेवा. सोबत काही घेऊन आलो नाही, जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा.
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले. अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हातारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले. कदाचित आपण पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले. जे काही होईल ते बघितले जाईल. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कोणाला दुःख दिले नाही किंवा पाप केले नाही. परमेश्वर माझ्याबरोबर नक्कीच असेल हा विश्वास तिच्या मनात होता आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.
बोध
एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे पापी माणसे नक्कीच जगू शकतात. परंतु पुण्यवान माणसाने साथ सोडली तर ते सर्व भस्मसातही होऊ शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा