दुपारी एक वाजताच्या सुमारास युसुफ चाचाने ठाण्याहून खोपोलीला जाणारी फास्ट लोकल पकडली होती. चालत्या टीएमटी बस मधून उतरून धावत पळत येऊन त्यांनी प्लॅटफॉर्म वर सुरू झालेल्या लोकल मध्ये प्रवेश केला होता. सुट्टीचा दिवस असल्याने लोकलला फारशी गर्दी नव्हती. युसुफ चाचाने वयाची साठी ओलांडली होती. डोळ्यांत सुरमा आणि डोक्यावर जाळीदार पांढरी गोल टोपी. तोंड आणि सगळे दात पान खाऊन रंगलेले. त्यांच्या कपड्यातून अत्तराचा सुगंध दरवळत होता. सव्वा सहा ते साडेसहा फूट उंची आणि धिप्पाड शरीर असलेले चाचा उन्हाच्या कडाक्यामुळे ते घामाने भिजले होते. चेहऱ्यावरून आणि कोरलेल्या टोकदार दाढीतून घाम ओघळत होता. त्यांच्या दाढीला पण पान खाऊन रंगलेल्या ओठांच्या सारखा तांबूस रंग आला होता. त्यांनी टोपी काढल्यावर केसांना आणि दाढीला लावलेला हेअर डायचा रंग सारखाच असल्याचे दिसत होते. लोकल ने वेग घेतला आणि जसजसे ठाणे मागे पडू लागले तसतसे लोकल मध्ये आणखीन गरमी जाणवू लागली, मुंब्र्याचा काळा कातळ असलेला डोंगर जसा काही सूर्याची आग उष्ण झळांच्या रुपात परावर्तित करून अंगाची लाही लाही करत होता. गाडीत एक अंध जोडपे शिरडी वाले साई बाबा आये हैं तेरे दर पे सावली गाऊन पैसे गोळा करत होते. गाणं गात गात हातातील काठी आपटत आणि हातातील चिल्लर वाजवत डब्याच्या या टोकाकडून त्या टोकाकडे जात होते. ते जोडपं कोणाकडे पैसे मागत नव्हते, ज्याचा तो उठून त्यांच्या हातात एक दोन रुपयांचे नाणे टाकत होता. दरवाजाच्या पॅसेज मध्ये उभ्या असलेल्या युसुफ चाचाने पण दोन रुपयांचं नाणं त्यांचा हातात टेकवले. कळवा स्टेशन मागे गेले होते आणि लोकल बोगद्यात प्रवेश करणार इतक्यात युसुफ चाचाच्या छातीत कळ आली. त्यांनी छातीवर हात ठेवला आणि ते मटकन खाली बसले. त्यांना बोलता येईना. काही प्रवाशांची त्यांच्यावर नजर पडली. कोणीतरी ओरडले ,अरे चाचा क्या हुआ? आरे त्याला अटॅक आला वाटतं. पाणी द्या रे कोणाकडे असेल तर. इकडे आतमध्ये सीटवर आणा त्याला. चाचाचे वजन सव्वाशे किलोच्या आसपास असल्याने चार पाच जणांनी त्यांना सीटवर कसेबसे आणले आणि झोपवले.
फास्ट लोकल असल्याने गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले होते आणि दिवा स्टेशनच्या वळणावरून पुढे जात होती. कोणीतरी ओरडले आरे चेन खिचो दिवा स्टेशन मे गाडी रोको. बुढे को अँब्युलन्स मे डाल के भेजो नहीं तो मर जायेगा गाडी मे. त्यावर कोणीतरी बोलले अरे इथे दिवा स्टेशन मध्ये अँब्युलन्स मिळेल नाही मिळणार, इथे जवळ चांगल हॉस्पिटल असेल की नाही त्यापेक्षा डोंबिवलीला जाऊ दे. तोपर्यंत त्याच्या खिशातील मोबाईल बघा, घरचा नंबर डायल करून बघा. एकजण बोलला मोबाइलला लॉक असला मग काय करणार. त्यावर आधीचा बोलला आरे ट्राय तर कर कदाचित लॉक नसेल पण. मी डोंबिवलीच्या रेल्वे पोलिसांना कॉल करतो माझ्याकडे एका पोलिसाचा नंबर आहे तो गाडी पोचायच्या आत अँब्युलन्स आणि स्त्रेचर हमाल ची वगैरे व्यवस्था करू शकेल पुढील पाच सहा मिनिटात. डब्यात सुरू असलेला गोंधळ आणि सगळ्यांचे बोलणं गाणं गाणाऱ्या अंध जोडप्याच्या कानावर जात होते. माधवच्या खांद्यावर हात ठेवून मागे मागे फिरणारी राधा त्याला म्हणाली, अहो जा तुम्ही बघा प्रयत्न करून. माधव युसुफ चाचाला झोपवले होते त्या दिशेकडे चाचपडत जाऊ लागला. तिथं प्रवाशांतील बघ्यांची गर्दी जमा झाली होती. एक दोन जण तर मोबाईल मधुन व्हिडिओ पण रेकॉर्ड करत होते. माधव एकाच्या अंगावर धडपडला, तो प्रवासी माधव वर खेकसला आरे इकडे एकाचा जीव जातो आहे ,तू आंधळा आहेस तरी तिकडे कशाला जातो आहे.
माधव त्याला म्हणाला दादा मला जाऊ दे तिकडे मी प्रयत्न करून बघतो. माधव चे बोलणं ऐकून सगळे प्रवासी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. माधव मोठ्याने म्हणाला म्हाताऱ्याला अटॅक आला असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देऊन वाचवता येईल. प्लीज मला प्रयत्न करू द्या. डब्यातील सगळेजण त्याच्याकडे अविश्वासाने बघत होते, एकजण म्हणाला आरे त्याला कोण देणार कृत्रिम श्वासोच्छवास. माधव म्हणाला मी देतो, मला त्याच्याजवळ जाऊ द्या. प्रवाशांनी त्याला युसुफ चाचा जवळ जाऊ दिले.
माधव ने त्याला सीटवरून खाली लोकलच्या फ्लोअर वर झोपवायला सांगितले. लोकलने धाड धाड करत दिवा स्टेशन क्रॉस केले होते. तीन चार मिनिटे गेली होती डोंबिवली येईपर्यंत आणखीन पाच सहा मिनिटे जाणार होती. युसूफ चाच्याच्या शरीराची हालचाल बंद झाली होती. माधव खाली झोपवलेल्या युसुफ चाचाच्या पोटावरून दोन्ही बाजूला गुडघे टेकून बसला. त्याने दोन्ही हात एकावर एक ठेवून युसुफ चाचा च्या छातीच्या मध्यभागी ठेवले. एक दोन तीन चार करत त्याने दोन्ही हातांवर जोर देऊन युसुफ चाचाच्या छातीवर दाबायला सुरुवात केली. तीस वेळा एका मागोमाग एक चेस्ट कंप्रेशन देऊन झाल्यावर माधव ने युसुफ चाचा चे नाक एका हाताने दाबले आणि त्याच्या ओठांवर स्वतः चे ओठ टेकवून युसुफ चाचा च्या तोंडात जोराने हवा फुंकली. पुन्हा एकदा त्याने तीस वेळा छातीवर जोर देऊन आणि लगेच तोंडाद्वारे हवा फुंकली डब्यातील सगळे प्रवासी अवाक होऊन समोर चाललेला प्रकार बघत होते. तिकडे राधा देवाकडे प्रार्थना करत होती, देवा वाचव रे त्या बिचाऱ्याला. निदान दवाखान्यात तरी वेळेवर पोहचू दे. युसूफ चाचाच्या खिशातून एक प्रवाशाने फोन काढला होता, स्मार्ट फोन नव्हता साधाच होता. फोन खिशातून बाहेर काढून चालु करणार इतक्यात युसुफ चाचाच्या फोनवर अली कॉलिंग म्हणून आले. त्या प्रवाशाने फोन उचलला, पलीकडून आवाज आला, अब्बु कहा हैं आप? प्रवाशाने विचारले कौन बोल रहा हैं? ये चाचा आप के कौन लगते हैं? पलीकडून आवाज आला मैं उनका पोता हुं, हमारे अब्बू कहा हैं? प्रवाशाने त्याला सांगितले की हम डोंबिवली स्टेशन मे उन्हे अस्पताल के लिये भेजेंगे,तुम उधर डोंबिवली मे रेल्वे पोलिस स्टेशन मे पहुंच जाओ. वो लोग बतायेंगे कौन से अस्पताल मे लेके गये हैं. माधव ने दोन वेळा सी पी आर पद्धतीने युसुफ चाचा ला कृत्रिम श्वासोच्छवास दिला होता. पुन्हा त्याने तिसऱ्यांदा छाती दाबून तोंडाद्वारे युसुफ चाचाला कृत्रिम श्वासोच्छवास दिला. तिसऱ्या वेळेला माधवला काहीतरी जाणवले, तो जोरात ओरडला कोणीतरी चाचा च्या पायाचे तळवे चोळा जोराने. युसूफ ने पुन्हा एकदा कृत्रिम श्वासोच्छवास दिला, लोकल डोंबिवली स्टेशन जवळ आली होती तिचा वेग कमी होऊ लागला होता गाडी प्लॅटफॉर्म वर आली तशी डब्यातील प्रवशांनी चेन खेचली. चेन खेचल्या बरोबर लोकल च्या मोटारमन ने एका पाठोपाठ तीन वेळा सलग हॉर्न वाजवणे सुरू केले. लोकल पूर्ण थांबली हॉर्न वाजत होता, माधव ने दिलेल्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या प्रयत्नाला यश आले होते. युसूफ चाचाचे हृदय धडधडू लागले होते.
इकडे डोंबिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर स्ट्रेचर घेऊन हमाल उभे होते. स्टेशनच्या आवारात अँब्युलन्स उभी होती, पोलिस आणि स्टेशन मास्टर सुद्धा डब्या जवळ येऊन थांबले होते. युसूफ चाचाला डब्यातून बाहेर काढून स्ट्रेचर वर ठेवले होते, चाचा ने डोळे किल कीले केले होते. मैं कहा हुं असे भाव चेहऱ्यावर दिसत होते. लोकल सुरू झाली. डब्यातील लोकं माधव कडे बघत होते, राधा त्याच्या जवळ येऊन खांद्यावर हात टाकून त्याच्या खांद्याला कौतुकाने दाबत होती. डोळस लोकांना जे जमले नसते ते एका दृष्टिहिनाने करून दाखवले होते. माधवला डब्यातील लोकांच्या कौतुकाने भरलेल्या नजरा दिसत नव्हत्या पण त्याचा चेहरा समधानाने भरलेला होता. राधाच्या खांद्यावरील स्पर्शातून त्याने जे केले होते त्याची पोच त्याला मिळत होती. एका प्रवाशाने माधवला विचारले, भाऊ तुम्ही हे कसे काय करू शकलात. त्यावर माधव म्हणाला, दादा आम्ही अंध लोकं आम्हाला कुठे वेळेवर डॉक्टर आणि दवाखाने मिळणार. काही सामाजिक संस्था आम्हाला अटॅक आल्यावर काय करायचे? जीव कसा वाचवायचा? कृत्रिम श्वासोच्छवास कसा द्यायचा याचे प्रशिक्षण देत असतात. आपल्यासह त्याचा इतरांना उपयोग होऊ शकतो याचा आज प्रत्यय आला. खरं आहे दादा तुम्ही आज एकदम देवाचं रूप घेऊन वाचवले त्या म्हाताऱ्याला, कदाचित हॉस्पिटल मध्ये नेऊन त्याचा मृत्यू झाला असेच डॉक्टर ला सांगायची वेळ आली असती. कल्याण स्टेशनला राधा आणि माधव त्या डब्यातून उतरून पुढल्या डब्यात चढले आणि शिरडी वाले साई बाबा गाणं गाऊ लागले.
देव माणसा माणसांत असायला लागतो आणि माणसातल्या देवात जातीपातीचा, धर्माचा, गरिबी, श्रीमंतीचा भेदभाव नसतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
180724
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा