बुधवार, ३१ जुलै, २०२४

1305. घरं मोठीं...पण मनं छोटी

      साधारपणे पंधरा एक वर्षापूर्वी ची ही गोष्ट असावी .सर्व सामान्य माणूस आपल्या स्वप्नांतल घरटं बांधतो. तसाच इमला आम्ही पण बांधलं होता. चार पाच ऐसपैस खोल्याचं घरं काय मी बांधल? पण आता नेपोलियन बोनपार्ट नंतर आपणच असावे या अविर्भावात येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांना मी माझी ही बंगली कथा ऐकवीत असे. मग अगदीच शहरातल्या जवळ मी प्लॉट कसा मिळवला? बांधकाम करतांना किती याता यात मी केल्या? वगैरे ,वास्तविकता येणाऱ्या पाहुण्यांना आता हा तुमचा नवीन पत्ता, या पलीकडे फारसं औत्सुक्य नसायचं पण उग आपलं माझं  समाधान करण्या करता आता सम्राट सिकंदरानंतर तुम्हीच ! असा बनाव ते  मला भासवीत. परंतु पु. ल. च साहित्य वाचतांना ' माझे शत्रू पक्ष'  ही कथा वाचली ( घर नावीन बांधणारे ,आणि नुकत्याच लांबच्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आलेले लोकं ,त्यांना शत्रू सारखेच  भासतात ) अन मग मी माझे बंगली पुराण थांबवले. माझ्या घरात एक मोठी गॅलरी मी बांधून घेतली होती. धुणे भांडे धुण्यासाठी ( मला  नाही...)  आणि कपडे वाळवण्याची अद्यावत सोय मी करून घेतली होती. 
एक दिवस सकाळी नित्या प्रमाणे अंघोळी साठी जात असतांना, मी आपला गॅलरीत कपडे घेण्यासाठी आलो. अन बघतो तर काय?  दोन ,तीन गवताच्या काड्या मला गॅलरीत पडलेल्या दिसल्या. चिमण्यांनी किंवा वाऱ्याने उडून आल्या असाव्या या शंकेने मी त्या लगेचच फेकून दिल्या. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. मग माझ्या लक्षात आले की ,हे काम चिमण्यांच दिसतंय. माझा हा रोज चा कार्यक्रम चालू होता पण चिमण्या ही काही कमी नव्हत्या मला न जुमानता जिद्दीनं  त्यांनी सात आठ दिवसांत माझ्या नव्या घरात आपलं  नवं बिऱ्हाड दोरीच्या  हूक वर  थाटल होत. मला जरा रागच आला. हे काय माझ्या एवढया राजेशाही बंगल्यात असले काटक्यांचे घरटे.  पण मुलांच्या विरोधामुळे थोडे  मी दुर्लक्ष केले. 
     पुढें त्या चिमणा चिमणीना पिल्लं झाली. सकाळ संध्याकाळ त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. आम्हां कुटुंबियांना मोठी मजा वाटू लागली. पुढं कुठंतरी मी लाकडी खास चिमण्यांसाठी बनवलेली घरटी मी टांगलेली पहिली. माझ्यातल्या  कर्णानातलं दातृत्व जागं झालं. अन मी तसं एक घरटं विकत घेऊन घरी आलो आणि आल्लदपणे चिमण्यांच्या त्या  डालक्याजवळ ठेऊन दिलं. दुसऱ्या च दिवसांपासून चिमण्या त्या घरट्यात कधी जातात याची वाट  पाहू लागलो. एक ना दोन दिवस  आठ दिवस झाले तरी चिमण्या आणि पिल्लं त्यात काही जाईना. अन एक दिवशी अचानक चिमणी आणि पिल्लं  त्यांचं घरटं सोडून उडून गेली. मी मात्र थोडा खिन्न झालो, विचार करू लागलो कि मी एवढं छान घरटं त्यांच्यासाठी आणून लावलं ,पण त्याचा स्वीकार त्यांनी केला नाही. किती स्वाभिमानी ? पक्ष्यांसारखे पक्षी पण मला मोठा धडा शिकवून गेली यदाकदाचित ,ते मला म्हणत असतील
"बाबा रे महिना पंधरा दिवसांपूर्वी तूच आम्हाला उसकावून लावत होता. अन आता शे ,दीडशे रुपयांचं घरटं आमच्या साठी टांगल, आम्ही पक्षी जरी असलो तरी कुणाच्या दयेचं बक्षीस आम्ही घेत नाही. आम्हाला ही स्वाभिमान आहे. तुझ्या ह्या लाकडी कृत्रिम घरट्याला तुझ्या अहंकाराचा, दयेच्या भिकेचा वास त्याला चिकटलाय. सांग त्यात आमची लहान लहान पिल्लं आम्ही कशी वाढवायची? आता पुढं तू असंही म्हणशील कि पण तुम्ही हे  गवताचं घरटं शेवटी माझ्याच जागेत बांधलं ना ! 
पण 
"अरे तू   काय ! ते   दोन पाच लाख रुपये मोजून इथली  जागा काय ती घेतली. पण तुझ्या आधी इथल्या माळ रानात आमचं वास्तव्य होतं. इथल्या डेरेदार झाडांवर आमच्या पिढ्यानपिढ्या वाढल्या. बागडल्या. इथल्या मातीतला वास आमच्या श्वासाश्वासात भिनलाय ,तू सांग आता आम्ही कुठं जायचं ? बरं तुझ्या त्या लाकडी  घरट्याचं म्हणशील तर बाबा , तुम्ही माणसं तुमच्या लेकरां बाळां करता पै पैका कमवता. पुढच्या सात पिढया बसून खातील एवढी मर मर करता. आमचं तसं नसतं  बाबा. आम्ही आमच्या पिल्लांना वाढवतो ते फक्त त्यांच्या पंखात ताकद येईपर्यंत. एकदा की ते उडु लागले. त्यांना आम्ही सोडतो,अवकाशात भरारी घेण्याकरता. त्यांची  लढाई त्यांनाच लढण्याकरता. तेव्हा तुझं ते घरटं तुलाच लख लाभ बाबा ! " 
मी पुन्हा पुन्हा त्या उजाड घरट्या कडे पाहत मनात म्हणालो  पक्ष्यांसारखे पक्षी पण जीवन जगण्याचं मोठं तत्वज्ञान  ते मला शिकवून गेले. खरंच केवळ घरं मोठी असून चालत नाही तर  त्यात  राहणाऱ्यांची मनं ही मोठी असावी लागतात.

सुमंत खराडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...