"दीदी, दीदी ssss , येते मी. स्वयंपाक झालाय. पियु साठी पराठा करून ठेवलाय. आली शाळेतून की खाऊन घेईल ती. सांगितलं आहे तिला सकाळीच. तुम्हाला काही हवं आहे का? गोळ्या ठेवल्या आहेत ट्रे मध्ये. गरम पाणी आहे थर्मास मध्ये....निघू मी ? दार ओढून घेते हं."
"अगं थांब मालती, उद्या गुरुवार आहे ना गं? साबुदाणा भिजत घाल. उद्या उपवास असतो साहेबांचा. जरा जास्तच भिजव. पियु पण आवडीने खाते खिचडी आणि एक सिक्रेट सांगू का तुला? खिचडीत शेंगदाण्याचे कूट जास्त घाल, आवडते सगळ्यांना आणि हो. खिचडी पूर्ण परतत आली की तूप घाल थोडं, मस्त खमंग होते बघ" रेवा. जेमतेम सात दिवस झाले होते तिची surgery होऊन, अजून दोन महिने पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती डॉक्टरांनी. आदी आणि पियु ला आवडेल ते पदार्थ करणे, लहान मुलांबरोबर मजा मस्ती करणे, खळखळून हसणे, घर स्वच्छ ठेवणे, गाणी ऐकणे, लिहिणे... कायम energetic आणि हसत...अशीच काहीशी रेवा. पण ह्या surgery नंतर खूप अशक्तपणा आला होता तिला. औषधांमुळे सारखी झोप यायची, आणि हात पाय अगदी गळून गेल्यासारखे झाले होते, नाहीतर तिला असं पडून राहायला अजिबात आवडायचं नाही. स्वतःशी गप्पा मारणं हा तिचा एक आवडता छंद.
"बरं झालं बाई ही मालती तयार झाली स्वयंपाक घर सांभाळायला नाहीतर आदी आणि पियु ला नसतं करता आलं manage... दोन महिने म्हणजे काही छोटा काळ नाही ना. एक एक दिवस शिक्षा वाटतोय पडून पडून" रेवा स्वतः बरोबरच बोलत होती. दिवस पुढे पुढे जात होते, औषधांमुळे रेवाच्या सगळ्या वेळा बदलल्या होत्या. दिवसभर खूप झोप यायची तिला अगदी एखादी गुंगी असल्यासारखं.
" मम्मा sssss, आले मी स्कुल मधून" पियु नी रेवा ला गालावर मस्त पप्पी दिली. रेवा नी डोळे किलबिले करून पियु कडे पाहिले आणि म्हणाली " हात पाय धुवून घे पिल्लू, मालती नि खायला बनवून ठेवले असेल बघ. खाऊन घे. दूध पी आणि मग जा खेळायला"
" रेवा, ठीक वाटतंय का आता? किती उतरलाय गं चेहरा तुझा.." डोक्यावरून हात फिरवत आदी म्हणाला.
"तू पण खाऊन घे रे काही." थकलेल्या चेहऱ्यावर बळजबरीच हसू आणून रेवा म्हणाली. आता हे रोजचेच झाले होते. तारखेचे आकडे पुढे पुढे सरकत होते. आता तर आदी आणि पियु कधी घरी आले. कधी बाहेर गेले हे ही कळायचे नाही रेवाला. आता शाळेतून आल्यावर पियु सुद्धा नाही यायची तिच्याजवळ आणि बऱ्याच वेळा रेवा झोपेतच असायची त्यावेळी.
"मालती कॅलेंडर मधला महिना बदल. आज एक तारीख. पगार ठेवलाय टेबलवर. जाताना घेऊन जा आणि हो खिचडी छान झाली होती काल." आदी जाता जाता बोलला. रेवाला दाराच्या आवाजाने जाग आली. पडल्या पडल्या खोलीतून जेवढं घर दिसेल तेवढं ती क्षीण नजरेने पाहत होती.
"मालती ने छान संभाळलेय घर. स्वयंपाकाची काळजी नाही राहिली आता अजिबात आणि आपण तर तिला खिचडीत तूप वगैरे असले आपले सगळे सिक्रेट्स पण शिकवले. पियु ला काय आवडते, आदी ला काय आवडते सगळंच सांगितलं. आता आपली काय गरज घरी? आता तर पियु पण share नाही करत शाळेतल्या गोष्टी. आदी पण नाही बोलत विशेष.". रेवा स्वतःशीच बोलत होती.
"जिवंतपणी आपली गरज संपणे आणि ते आपल्याला जाणवणे. बापरे, किती भयानक आहे हे." बराच वेळ ती विचार करत होती, मग कधी तिला झोप लागली तिला कळलंच नाही.नवीन महिना सुरू होऊन दोन दिवस झाले होते. रेवाच्या खोलीतलं कॅलेंडर मात्र मागचाच महिना दाखवतं होतं. जगातल्या सर्वांचे दिवस पुढे जात होते. रेवाला मात्र तिचं आयुष्य कुठेतरी तिच्या खोलीतल्या कॅलेंडर सारखे थांबले आहे असे वाटत होतं आणि ह्या विचाराने ती खूप अस्वस्थ झाली होती. नवीन महिना सुरू झाला होता आणि तीन दिवसांनी रेवाचा वाढदिवस. रेवा नि पक्के ठरवले की आता अजून नाही जगायचं, असेही झोपेच्या गोळ्या घेतंच आहोत आपण. वाढदिवस झाला की त्या रात्री जरा जास्त गोळ्या घ्यायच्या आणि कायमचे डोळे बंद करून टाकायचे, पक्के ठरले. दोन दिवसात अजून काही काही राहिलेल्या गोष्टी तिनी मालती ला सांगितल्या आणि आता उद्याची वाट बघत बसली ती.
दुसऱ्या दिवशी पियु नेहेमीप्रमाणे शाळेत गेली. आदी ऑफिस ला निघून गेला. मालती नि कामं आवरली आणि ती पण निघून गेली. रेवा थोडी हिम्मत करून हॉल मध्ये येऊन बसली आणि जुने फोटोज बघत बसली आराम खुर्ची वर. जुन्या आठवणींमध्ये रमून कधी डोळा लागला तिचा कळलेच नाही.
" रेवा, काय यार तू पण. लवकर बरी हो ना? नाही पाहवत यार तुला असं पडून राहिलेलं. हास ना एकदा खळखळून"
" Love youuuuu रेवा, एकदा बघ ना माझ्याकडे, निघालोय रे मी ऑफिससाठी."
"कसली सुंदर दिसतेस गोडू तू, आराम कर आणि लवकर पहिल्यासारखी हो यार "
"मालतीनी बनवली खिचडी, तू सांगितलंस ना तिला. पण तुझ्या हाताची चव नाही रे येणार त्यात. तरीपण मी आणि पियु नि खाल्ली हं ती. काही तक्रार न करता आणि तू सांगितलंस त्याप्रमाणे थोडंस कौतुक पण केलं मालतीचं. पण नाही मजा आली यार खाताना."
असे एका नंतर एक voice मेसेजेस. रेवा खाडकन जागी झाली. एक एक मेसेज ऐकत होती. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं तिच्या... तेवढ्यात..
"मम्मा मिठीत घे ना गं मला, तुला माहितीये ना शाळेतून आल्यावर मला आधी हवं असतं हे."
"मम्मा लवकर हो ना बरी, तुझा हसरा चेहरा बघून कित्ती दिवस झाले."
"मम्मा आज ना मला त्या सोना चा खूप राग आला..माहितीये तुला. "
"मम्मा पप्पाला आणि मला नाही गं करमत तुझ्याशिवाय. नाही जगू शकत आम्ही. खुप अधुरे आहोत आम्ही तुझ्या शिवाय. तू झोपलेली असते ना म्हणून मी असं रोज तुझ्याशी voice मेसेज रेकॉर्ड करून बोलते आणि आज कळलं की पप्पा पण असंच करतो आहे, म्हणून आज ठरवले की तुझ्या birthday ला हेच गिफ्ट द्यायचं तुला."
तिने मागे वळून बघितलं तर आदि आणि पियू तिथेच उभे होते. आता मात्र रेवा चे अश्रू थांबता थांबेना.
तिघांनी घट्ट मिठी मारली... .....
"मालतीssss, माझ्या खोलीतल्या कॅलेंडर चा महिना बदल गं"
"आदी, जरा धर मला. गाणी लावून दे ना मला. हॉलमध्ये बसते मी जरा आणि ऐक ना, संध्याकाळी टेरेस वर नेशील मला? "
- शिल्प
(सौ. शिल्पा सिन्हा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा