मंगळवार, ९ जुलै, २०२४

1261. सावळी विठाई

 "काय ग काय झालं इतकं उदास बसायला?"
"काही नाही ग हा सावळा पांडुरंग फार कृपाळू आहे ग अलगद येतो जगण्यात मदत करून जातो आणि परत नामानिराळा होतो. कधी निसर्गात,कधी माणसात कुठल्याही रुपात येतो आणि आपण बसतो त्याला शोधत  आपणच बंदिस्त करून टाकलेल्या देवळात. नाही का आजी?"
"हो बरोबर आहे तुझं पण आज एकादशी म्हणुन सुचलंय का तुला हे?"
"नाही ग आजी. तू तिकडे अमेरिकेत होतीस पण तुला माहीत आहे का? माझ्या दुसऱ्या लेकराच्या डिलेव्हरीच्या वेळी तू आणि आई दादाकडे त्याच्या बायकोची डिलिव्हरी करायला गेल्या होत्या. इकडे माझ्या सासुबाई आणि कामवाली मिळून जमलं आमचं सगळं पण जशी माझी रजा संपत आली तसं खुप टेन्शन आलं मला आणि सासूबाईंना. त्या म्हणाल्या, "माझ्या संधीवाताने मला बाळाला घेता येत नाही आणि एवढं लहान लेकरू पाळणाघरात नको वाटतं ग पाठवायला. ती थोडी मोठी झाल्यावर मी सांभाळू शकते पण आताचा प्रश्न कसा सुटेल? आठच दिवस तुझी रजा संपेल मग काय होईल? त्यांना तर रडूच यायचं. ह्या विठ्ठल मुर्तीपूढे रोज गाऱ्हाणं सांगायच्या. अशीच आषाढी होऊन गेली होती आणि एक दिवस  एकदम पांडुरंगासारखीच काळी सावळी बाई दारात ऊभी.
"मी विचारलं काय काम? तर म्हणाली. बाळ सांभाळायला बाई तुमच्याकडेच पाहिजे ना. मी समोरच्या वॉचमन कडे आले होते. वारीवरून चालले होते गावाला काल मुक्कामी आले तर त्यांनी सांगितलं तसंही गावी कोणी नाही माझं. एकटीच मी नवरा गेला लेकरू नाही. तुमची अडचण असेल तर देईन एखाद दोन वर्ष.फक्त वारीच्या सुट्ट्या द्या मला."
"आजी मी आणि सासुबाईंनी ठेवलं बाईला कामावर .सासुबाई म्हणाल्या, "वारी करते म्हणजे विठुच्या बघण्यातली आहे आणि आपली गरज आहे ठेवूनच घेऊ."
आपल्याच घरी राहात होत्या त्या. बाळाला नाहू माखु घालणं. घरात मदत सगळं छान करायच्या. सासुबाई आणि त्यांची छान गट्टी जमली रोज ह्या विठ्ठलासमोर हरिपाठ म्हणणं विठूमूर्तीला सुंदर तुळशीमाळ करणं. बाळाला सांभाळणं त्या इतक्या छान रमल्या होत्या ग कि त्या कोणी परक्या आहेत असं वाटतच नव्हतं. बाळही खुश असायचं त्यांच्या जवळ. त्यांना आम्ही नेहमी म्हणायचो,
"तुम्ही नसत्या आल्या तर कसं झालं असत हो आमचं?"
त्यावर त्या हसून म्हणत, "अहो,उलट तुमच्या मुळे मला, नात्यांची ऊब मिळाली आहे. मला मोठं लेकरू तोंडभरून आजी म्हणत. साहेब तुम्ही मला लेकरासारखे आणि तुमच्या सासुबाई तर मला बहिणी सारख्या. तिकडे गावाकडे एकटं जगण्यापेक्षा मला घर मिळालं माणसांचं आणि तुम्हाला माझी मदत झाली. त्यामुळे फिट्टम फाट झाली म्हणजे ह्या सावळ्यानेच केली. वारीला गेल्यावर त्याला म्हंटलच होतं.एकटीचं जगणं नको, हा देह चंदनासारखा झिजू दे कोणाच्या तरी उपयोगी पडू दे मला. तरच येईल मी वारीला."
 सगळे अवघड प्रश्न त्या आल्यामुळे सोपे झाले. पण त्यांची एक अट कायम होती वारीची सुट्टी. एरवी मी कधी सुट्टी नाही मागणार पण 20 दिवस वारीचे मला विठुसाठी द्या बरं मॅडम असं सांगूनच त्या तयार झाल्या होत्या ना. आजी त्यांनी तब्बल 4 वर्ष सांभाळल ग माझ्या चिमणीला. तुला आठवत माझ्या सासुबाई वारल्या तेंव्हा त्यांनीच सावरलं आम्हाला. होत्या परक्याच पण आपल्या माणसांपेक्षा सोबत केली ग त्यांनी. पण एक दिवस पडण्याचं निमित्त झालं मग गेल्या गावाकडे.आता नका थांबवू म्हंटल्या.
मनात नसताना त्यांना सोडलं. पण वारी वरून जाताना एक दिवस तरी येतच होत्या गेल्या दोन वर्षात. माझी मुलगी तर आजही त्यांना विठु आजीच म्हणते. अगदी बोबडी बोलत होती तेंव्हा त्यांनाच म्हणायची. ह्या मूर्तीकडे बोट दाखवत.
"आजी तुम्ही ह्या बप्पासारख्याच काळ्या काळ्या का आहात?" एकदा मी ओरडून तिला रागावले. असं बोलू नाही म्हणून तर त्या म्हणाल्या,
"लेकराला काय कळतं मॅडम? आणि बरोबर आहे तिचा प्रश्न. मग तिला म्हणायच्या मला त्यानेच पाठवलंय तुला सांभाळायला. मी त्याचीच मुलगी म्हणून तर काळी आहे."
आजीने सगळं ऐकलं, "मग यंदा ह्या कोरोनामुळे नसतील गेल्या वारीला मग नाही यायच्या ना?
ती म्हणाली, "आजी अग वारी होणार नाही हे कळल्याच्या आठ दिवसांतच त्या वारल्या ग मला आजच त्या वॉचमनच्या बाईने सांगितलं. म्हणून तर आज ह्या विठु कडे बघून सारखं रडू येतंय ग."
आजीला हिच्या उदासपणाच कारण आता नीट कळलं. आजी म्हणाली, "तू जरी पैठणचे एकनाथ महाराज नसलीस तरी श्रीखंडया मात्र तुझ्या घरी येऊन तुला संकट काळात मदत करून गेला बरं. ह्यातच देवाचे आभार मान. आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात हे मनुष्यरूपी पांडुरंग भेटतच असतात. ते ओळखायचे आणि त्यांच्या ऋणात रहायचं.
     तिला समोरच्या पांडुरंगात मुलीची काळी विठा आजीच दिसत होती आणि म्हणत होती. "दिली तुझी नाजूक वेळ धकवून आता तू लढ." तिचे डोळे परत विठा आजीच्या आठवणीने भरून आले. त्यात समोरची मूर्तीही धुसर झाली तरी विठा आजीने शिकवलेल्या तुळशीमाळेतून प्रसन्न हसताना दिसत होती.

©स्वप्ना मूळे - मायी,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...