मंगळवार, ९ जुलै, २०२४

1259. निरभ्र

"आई, अग किती वेळ लावतेस? मला निघायला उशीर होतोय समजत नाही तुला? एक साधी वस्तू तर आतून आणायचीय. त्यासाठी एवढा वेळ लागतो तुला?" कौस्तुभ  आईवर चिडून बोलला. 
आतून कौस्तूभची राहिलेली बॅग घेऊन धावतच आई आली.   "हो हो आणली रे. त्यावर फाईल होती रे त्यामुळे  झटकन दिसली नाही मला." आई अजिजीच्या स्वरात बोलली. 
बॅग घेऊन कौस्तुभ  वेगाने बाहेर पडला. त्याचे मन हल्ली थार्यावर नव्हतेच. आईवर आपण हल्ली जरा जास्तच चिडतो का? अनावश्यक वेळी  आईवर राग काढतोय का? पण आई  तर किती शांत असते ! मी कितीही चिडलो, संतापलो तरीही ती साधा निषेधाचा शब्दही काढत नाही.  नेहमीसारखीच माझ्याशी मायेने वागते.  गाडीच्या व्हिलवर सराईतपणे त्याचा हात चालला होता. पण मधून मधून तो खूप टेन्शनमध्ये यायचा. मध्ये एका गाडीवर आदळणार होता. थोडक्यात वाचला.  त्याच्या डोक्यात उलट सुलट विचार थैमान घालत होते.
      आपली आई !आई म्हणजे एक कोडच नाही का? आई ! आई हा विषय माझ्यासाठी एक गुंता झालाय. गुंता माझे डोके वेढून राहिलेला. आई ! हा एकच विषयाचा भुंगा  माझे डोके आणि ह्रदय एकाचवेळी  पोखरतोय. काय करू?  करावा का याचा एकदाच काय तो शेवट? काय होईल ते होईल. पण ही घुसमट नको आता. एकदाच याचा शेवट करायचाच. आईला याचा जाब विचारायचाच. जिला मी लहानपणापासून  देवतेसमान मानत आलो ती. ती आईही एक स्त्री असावी? एक मादी असावी ? छी , छी. !  तिचा हा बुरखा फाडलाच पाहिजे.  पप्पानाही हे सत्य समजलेच पाहिजे. जिला आपण खूप मोठी मानली ती आपलीच आई बदफैली, विश्वासघातकी निघावी? यापेक्षा  दुसरे दुःख ते कोणते? ही घुसमट मी कोणाला सांगूही शकत नाही.  नाही. पण मी आता असा घुसमटत नाही  राहाणार. सरळच तिला विचारणार. ऑफिसच्या गेटवर येताच कौस्तुभची विचार शृंखला तुटली.  कौस्तुभ अलिकडे एका विचित्र अशा विषयात अडकला होता. त्यामुळे  खर तर त्याच्या कामावरही परिणाम होत होता. आपल्याच नशिबाला असा दैवदुर्विलास का यावा? अत्यंत प्रिय असलेली आपली आईच आपल्या मनातून उतरावी? पण आईने आपल काय वाईट केलय म्हणून  आपण तिच्याविषयी असा विचार करतो? आईविषयी असा आत्यंतिक टोकाचा विचार करताना त्याला त्रास होत होता. कारण लहानपणापासून  तो आपल्या आईला पाहात आलाय. आईवेडाच मुलगा होता तो. आई संसारात किती विरघळून गेलीय. आईने आपल्याला मोठा करताना किती खस्ता काढल्यात हे सगळे  तो जाणून होता. काळीज तुकडा होता तो तिचा. किती जपलय तिने लहानपणापासून.  कौस्तुभला असेच विचार सतावत राहायचे. आई पप्पानाही किती जपतेय ! त्यांच्या गोळया आठवणीने देण, त्याना मालीश करण, त्यांचे पथ्य सांभाळण, पप्पांचे बीपी शुगर वरचेवर स्वतःच चेक करण. जरा काही झाल तरी पप्पाना डाॅक्टरकडे नेण. कुठे म्हणजे  कुठेही ती कर्तव्यात तर चुकत नाही.  मी उगाचच चिडलो तरी ती चिडत नाही.  पप्पाना जरा काही झाल तरी तिचा जीव कासावीस होतो. 
     आई ! आई कीचनमध्ये असते तेव्हा  ती अन्नपूर्णा  असते. माझ्या मुलीला खेळवते तेव्हा ती वात्सल्यमूर्ती असते. पप्पांची  सेवा करताना ती सेवेची मूर्ती असते. आईची ही असंख्य असंख्य रूपे कौस्तुभ लहानपणापासून  बघत आलेला होता. परमेश्वराची दुसरी मूर्ती म्हणजे कौस्तुभसाठी आईच होती. लगबगीने आटपून धावत पळत ऑफिसला जाताना त्याने आईला पाहिलय लहानपणापासूनच. तिने शांतपणे बसून नाष्टा केलाय अस त्यान कधीच बघितल नव्हत. उभ्या उभ्या एका हातानी काम करता करता एका हातानी चहात पोळीचा तुकडा बुडवून तोंडात टाकणारी व पळत पळत बससाठी जाणारी आपली आई आठवली तरी त्याला वाईट वाटायचे. कौस्तूम मनाशी कितीही ठरवतो की आईला स्पष्टच विचारायचे. पण त्याच्या समोर वावरणारी आणि लहानपणापासून त्याने बघितलेली आई आठवली की त्याला धीरच होत नसे. ओठापर्यंत आलेले शब्द आपोआपच आत गिळले जात  आईबद्दलचा सगळा राग, मनातली सगळी  खदखद त्याला आईवर चिडायला लावायची. त्याची द्विधा मनःस्थिती  आता त्याला सहन होत नव्हती.  
तो मनाशी ठरवतोही आज स्वरा नसताना कोणीही नसताना आईला सरळच विचारायचे." 
" आई, कोण आहे हा माणूस बेंजामिन  फर्नांडीस? " 
" आई, तू अस का वागतेस? "
"आई ,तू पप्पांशी अशी प्रतारणा का करतेस ? "
"आई, तू अस का वागलीस ? "
"आई, खर सांग, तू इथे पप्पांशी चांगले  वागतेस. त्यांची काळजी घेतेस. आणि मग मी मोबाईलमध्ये बघितल ते काय? तुझ कोणत रूप सत्य मानायच? मला समोर दिसतय ते रूप खर मानू की मी मोबाईलमध्ये चॅटींगमध्ये पाहिल ते रूप खर मानू? निश्चय करूनही तो आईला विचारू शकत नव्हता.  आईला कस विचारायच ? खडसावून की प्रेमाने? याचाही विचार पक्का  होत नव्हता.  उलट सुलट विचार नुसते घोंगावत असायचे. एकेकदा त्याला वाटायच, हा हा मुखवटा पांघरलेली ही बाई आहे. ही दिसते तशी नाही. हिला मी आई म्हणतोय?  एकेकदा वाटायच, अरे काय वेडाबिडा झालाएस काय? कोणाविषयी असा वाकडा तिकडा विचार तू करतोस? तुझ्या आईविषयी? अरे मूर्खा, तू काय आईला ओळखत नाहीस? ती आई आहे आई. ती तुझ्या वर्गातल्या गरीब विद्यार्थ्यांवरही माया करणारी.  तुझ्या वर्गातल्या मित्राना तिने केलेली मदत आठव जरा.  भंगारवाला, रद्दीवाला कोणालाही मायेने उचलून देणारी. गुरा वासरांवर प्राण्यांवर, पशू पक्षांवरही माया करणारी ती माऊली आहे रे. ते काय ओळखत नाहीस काय तुझ्या आईला? त्या माऊलीबद्दल तू भलतेसलते विचार करतोस? पण तिचे खरे स्वरूपही समजलेच पाहिजे ना. पप्पाना तरी अंधारात का ठेवावे? नको नको पप्पाना म्हातारपणात हा धक्का सहन नाही होणार. माझी बायको माझ्यावर किती प्रेम करतेय या भ्रमातच आनंदात जगूदे त्याना. उलट सुलट विचारांच्या हिंदोळयात तो ऑफिसमध्ये पोचला.     
 *****
       कौस्तुभ ऑफिसमध्ये काम करत बसला होता. सगळेच  आपापल्या कामात दंग होते. थोडा वेळ लागला कामाला तर तो हाताखालच्या लोकाना चांगलीच फायरींग करणार होता. सर्वानाच आज कामाला लावले होतै. तो समोरचा फाईलींचा ढीग चाळत बसला होता. मेसेजचा परिचित आवज. त्याने हातातली फाईल खाली ठेवली. आज शुभ्राचा हाफ डे असतो. हा तिचाच मेसेज असणार असे म्हणून त्याने ह्वाट्स अॅप उघडल. शुभ्राच होती हसत हसत डिपीतली शुभ्रा विचिरत होती. " काय म्हणतोस ? बोल ना"  कौस्तुभच्या चेहर्यावर नकळत हसू फुलल. 
"काय म्हणतेस? मधेच मेसेज कसा काय केलास? "
" अरे काय तू? तुला मेसेज करण्यासाठी मला काही खास कारण असावे लागते काय?"
" नाही ग डार्लिंग,  मी खूप बीझी आहे. कामाचा ढीग आहे समोर"
" हो. तू कधी बिझी नसतोस? बोल ना थोड तरी. आठवण आली आणि मेसेज केला."
" ते ना शुभ्रा अशी आहेस. आता अस वाटतय, अस वाटतय, असा धावत याव, तुला घट्ट मिठीत धराव आणि तुझ कीस घ्याव"
" मग कोणी अडवलय तुला? ये ना.  माझी तर फुल परवानगी आहे. मीही याचीच वाट बघतेय राजा. तुला समजत कस नाही? " 
अशा चॅटींगमध्ये खूप वेळ गेला. अर्ध्या तासानंतर त्याच्या लक्षात आले की आपण खूप वेळ बोललोय. हा वेळ आपल्याला नंतर भरून काढावा लागेल. आज तर कामाचे लोड खूप आहे आणि मी हा वेळ असा घालवलाय. हा पण ठीक आहे.  मेंदू थोडा रिफ्रेश होतो. त्याचसाठी शुभ्राच्या चॅटींगचे टाॅनिक मधून मधून आपण घेत असतो.   शुभ्रा आपली क्लासमेट. काॅलेजमध्ये असताना आपल्याला आवडलेली. आता ती तिच्या संसारात आणि मी माझ्या संसारात रमलो आहोत. सगळ ठीक चाललय. पण मध्येच जुन्या मैत्रिणीची मस्करी केली, थोड बोलल की बर वाटत. मी केलेल्या मस्करीला शुभ्राकडूनही तेवढाच प्रतिसाद मिळतो. परत एकदा जुन्या आठवणीत रमतो. कधीतरी एकांतात तिच कीस घेतो जवळ घेतो तिला. पण यापलिकडे नाही आम्ही जात कधी. रोजच्या या रूक्ष जीवनात तेवढाच थोडा चेंज. नाहीतर आता आहे काय जीवनात? कंपनीतील जबाबदारीचा भुंगा सतत मेंदू कुरतडवित असतो. वाटत आपली सारी बौद्धिक शक्ती कोणीतरी पिळून काढून घेतेय. मानसिक दृष्ट्या खूप थकवा जाणवतो. अशावेळी  शुभ्रा हे टाॅनिक असत आपल. घरात तर स्वरा असतेच. स्वरा खूप हुशार आहे.सुंदरही आहे. पण आता स्वराशी होणारे संवाद हे रोमॅन्टिक असण्यापेक्षा  ते अधिक व्यावहारिक  असतात. स्वरा माझी पत्नी मला प्रिय आहेच. पण शुभ्रा ही माझी रिफ्रेशमेंट आहे. स्वराबरोबर अशी मस्करी थट्टा नाही करता येत. त्यामुळे शुभ्राशी बोलण्यात एक वेगळाच  फील येतो. 
****
       संध्याकाळी  कौस्तुभ आणि स्वरा एकदमच आली ऑफिसमधून. ती दोघ चेंज करून येताहेत तोच आईने टेबलावर गरम गरम कटलैट व चहा ठेवला होता. कौस्तुभ  विस्फारित डोळ्यानी पहातच राहिला. या बाईला रागावताही येत नाही. एरवी त्याने आईची काहीतरी मस्करी केली असती. काहीतरी थट्टेने बोलला असता. "क्या जवाब नही हमारे माॅ के हाथका खानेका." अस काहीतरी नाटकी आविर्भावात हातवारे करून बोलला असता. आईच्या पाठीवर थाप मारली असती. आईला हाताला धरून जवळ बसवून घेतल असत. पण आज त्याचा मूड नव्हताच. आईने प्रेमाने वाढलेले कटलेटची चव त्याला समजत नव्हती. त्याच्या मनातली कडवट चवच जिभेवरही येत होती.  गंभीरपणे सगळे  चालू होते. आई आग्रहाने वाढत होती. 
"कुकी घे नारे थोड " ती लाडाने त्याला कधीतरी 'कुकी'  म्हणायची. पण कौस्तुभने प्लैट मागे घेतली. "नकोय आई मला" एवढच कोरड बोलून चहा पिऊन तो गंभीरपणे आपल्या रूमकडै गेला. " स्वरा, अग घे ना थोड गरम आहे बघ."  
"नको आई, आज ऑफिसमध्येही खाण झालय. तुम्ही  घेतलत का? " 
"हा घेते. त्यानाही देते. आधी तुम्हाला गरम दिल. घेतो आम्ही  दोघ. " 
आज कौस्तभच मन थार्यावर नव्हतच. आईविषयीचा राग, अपमान, शंका मनात मधूनच उसळी घेत होत्या. त्याला वाटल." आईला लागट प्रश्न  विचारावा, आई, आज कोणी आल होत का? नाष्टा तयार केलास तर फर्नांडीस वगैरे कोणी? " पण मनातले शब्द ओठावर येत नव्हते. आईकडै बघितले की ते आपोआपच विरून जात.
****
     आई बाथरूममध्ये गेलीय आणि कोणी बघत नाही  याची त्याने खात्री करून घेतली. त्याने आईच्या मोबाईलचे लाॅक उघडले. व्हाॅट्स अॅप उत्कंठेने उघडले. बेंजामिन फर्नांडीस डिपीतून हसत होता. रूबाबदार व्यक्तिमत्व. डोळेच मोठे बोलके. बुद्धीचे तैज चेहर्यावर. हा हा रूबाबदार माणूस. पप्पांपेक्षा अधिक प्रभावशाली व्यक्तिमत्व. पण आईचा आणि याचा काय संबंध? तो असेल हुशार, असेल श्रीमंत, असेल देखणा, पण आमचा काय संबंध या माणसाशी? शोधून काढावा का याला? गळयाला धरावा का या माणसाच्या? आईला विचारण्यापेक्षा  याच माणसाला धरला पाहिजे.  धमकीच द्यायची माझ्या आईला परत मेसैज करायचा नाही म्हणून.  आईने या या माणसाला 'राजा ' म्हणाव? या या तिर्हाईत माणसाला माझ्या आईने आपला गाल पुढे करावा? ओठ टेकवण्यासाठी?  त्याच्या मस्तकाची शीर ताड ताड उडू लागली.संतापाने डोळे लाल झाले. पण काय अकलेचे तारे तोडलेत ते बघूया तरी. असे मनात म्हणत त्याने वाचायला सुरुवात केली.  खूप मोठी होती पोस्ट 
    "सुलेखा, उद्या यावेळी मी फ्लाईटमध्ये असेन. उद्या मी यू. एसला कायमचा जाण्यासाठी निघतोय. इच्छा असूनही जाण्यापूर्वी  आपली भेट होऊ शकली  नाही.  परत कधी आलोच इंडियात तर नक्कीच  भेटेन तुला. तुझे आभार कसे मानावेत समजत नाही.  माझी अॅनी ख्रिस्तप्रिय झाली. मी एकटा पडलो. खूप अस्वस्थ  होतो. मुले असली तरी ती आपापल्या संसारात. मी इंडियात आलो या दोन वर्षाच्या कालात तू मला जी साथ दिलीस त्यामुळे  मी बराचसा सावरलो. सुले, खर सांगू, तू माझ पहिल प्रेम. पहिल प्रेम कधी विसरता येत नाही.  आपल्या प्रेमात धर्माच्या मजबूत भिंती उभ्या होत्या. आपण कधीच मोकळे बोललो नाही.  भेटलो नाही.  पण तू आयूष्यभर मनात होतीस वावरत. तुझा हसरा चेहरा, तुझे तेजस्वी  डोळे  मी कधीच विसरू शकणार नव्हतो. दोन वर्षांपूर्वी  मी इंडियात आलो. आपल्या बॅचचा ग्रूप तयार होता होता तुझा शोध लागला. मला खूप आनंद झाला. मग एक कल्पना केली मी. की प्रत्यक्ष जीवनात कधीही घडले नाही किंवा घडणारही नाही.  असे आपले पहिले प्रेम जर आभासी दुनियेत आपण थोडा वेळ जगलो तर काय होईल? ही कल्पना मी तुला बोलून दाखवली. तूही मला साथ दिलीस. आता आपल्यात होती ती निखळ मैत्री. पण मी माझे पहिले प्रेम जगण्यासाठी तुझ्याशी स्पर्श केला. जवळ घेतले.  तुझ्याकडून स्वतःला राजा म्हणवून घेतले. कल्पनेतच तुला मिठीत घेतले. हे सगळे  आभासी दुनियेतले असले तरीही क्षणभराच्या आभासातूनही मी माझा पहिला अंकूर जपतोय याचे क्षणभर का होईना समाधान मिळाले. तू तुझा नवरा आणि मुलगा व मुलाचा संसार यात इतकी रूतली आहेस त्यामुळे तू आन॔दी आहेस. तू नवर्यावर जे प्रैम करतेस ते बघून बर वाटल. नवर्याच्या ट्रिटमेंटसाठी कधी काहीही मदत लागली तरी सांग.  तुझा मुलगा एकदाच बघितल त्याला. खूप छान आहे. तो मातृभक्त आहे हे ऐकून तर खूपच आनंद झाला.
 बेस्ट लक. बाय..." 
       कौस्तुभने बेंजामिन अंकलचा मेसेज परत परत वाचला. त्याचे डोळे  खाड्कन उघडले. डिपीतून बेंजामिन अंकल हसत होते. आपल्याला शुभेच्छा देताहेत असा त्याला भास झाला. त्याने मोबाईल  बंध करून सावकाश खाली ठेवला. म्हणजे बेंजामिन फर्नाःडीस हा माणूस ज्याचा आपण आजपर्यंत फक्त रागच करत होतो तो आईचा क्लासमेट होता तर ! खरच ग्रेट ! या मिणसाने आपल्या प्रेयसीला स्पर्शही केलेला नाही. पण कल्पनेतून त्याने तो आनंद घेतलाय. आपण शुभ्राला मेसेज करतो. तिचे कीस घेतो. थोडा वेळची करमणूक म्हणून.  स्वरासारखी सुंदर  पत्नी जवळ असताना, तिच्याकडून आपली शारीरिक  भूक भागत असतानाही शुभ्राशी मी जे वागतो त्याचा अर्थ काय मग? त्यात कुठे पाप आहे असे मला कधी वाटतही नाही.  त्यात कुठे वासना आहे, कुठे फसवणूक आहे असे आपण मानतच नाही.  ते आपण अगदी लाईटली घेतो. मनावर आलेल्या ताणातून थोडा रिलॅक्स ! एवढाच अर्थ असतो त्याला आपल्या दृष्टीने.  शुभ्राचाही संसार आहे. मुले आहेत. तिचाही देखणा हुशार नवरा आहे. पण आपले संबंध पाप आहे असे ना तिला वाटत ना मला वाटत. जुन्या संबंधाना, जुन्या अतृप्त इच्छाना थोडा उजाळा  एवढाच अर्थ असतो त्याला दोघांच्याही बाजुनी. हे आमचे संबंध जीवनाच्या खोल प्रवाहात उतरत नसतात. मनावरचा एक वरवरचा पापुद्राच असतात ते. क्षणभंगूरच असतात ते. तेवढे चॅटिंग  संपले की ते संबंधही संपतात. खरा असतो तो आपला संसार. यात कुठे काही पाप आहे, हे चुकीचे आहे असे वाटलेच नाही.  
       आणि.....आणि आईसाठी आपण वेगळाच तराजू वापरला. पाप पुण्याचा हिशोब करत बसलो. आईला बेंजामिन नावाच्या कोणा माणसाचे मेसेज येतात. आईही त्याला प्रतिसाद देतेय हे माझ्या लक्षात आले आणि माझी दृष्टी बदलली. मी इतके दिवस डोक्यात राख घालून घेतली. आईवर केवढा राग काढत राहिलो. पण आईने साधा निषेधही शब्दातूनही कधी केला नाही. त्या माऊलीवर आपण भलते सलते आरोप केले. तिने आपल्यासाठी केलेला त्यागही विसरलो आपण. इतके बेईमान कसे काय झालो आपण ! सगळयानी काहीही केल तरी चालत. आपण कसेही वागलो तरी चालत. स्वरा आपल्या मित्राला मेसेज करते हे मला माहीत आहे तेही मी स्विकारतो. पण....पण मग आईविषयीच मी एवढा कठोर न्यायधीश का बनावे? तिला सतत आरोपीच्याच पिंजर्यात मी का बसवले असेन? कौस्तुभला स्वतःच्याच मनाची उकल होत नव्हती. आता त्याच्या मनात उलट दिशेचे विचारांचे वारे वाहात होते.
       आई ! आई माझी आई, पप्पांची पत्नी. ती आपापली कर्तव्ये जबावतेय. पण तिने आमच्याशीच बांधून घेऊन स्वतःचे अस्तित्वच पुसून टाकावे अशी अपेक्षा  मी का बरे ठेवली? ती एक व्यक्ती आहे. ती स्वतंत्र आहे. आणि महत्वाचे म्हणजे  ती एक माणूस आहे. असेल तिच्या पूर्वायुष्यात कोणी तिला आवडलेली व्यक्ती. तक आमच्याशी बांधलेली असतानाही थोडा वेळ तिने तिच्या पुर्वायुष्यातील भावनाना साद दिली असेल. थोड्या वेळासाठी ती आपले पूर्वायुष्यातील निसटून गेलेले क्षण जगली असेल. थोड्या वेळासाठी तिने अपूर्ण  इच्छाना न्याय देण्याचा प्रश्नच केला असेल म्हणून  मी ऐवढा का त्रागा करावा? एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून  तिलाही मनाप्रमाणे जगण्याचा तिचा हक्क  मी का हिरावून घेऊ पहावा? आणि मी मात्र व्यक्तिस्वातंत्र्याच्या  विचाराखाली कसेही वागावे? असे कसे वागलो आपण आपल्याच आईबरोबर? सगळी विवेक बुद्धी कुठे गहाण टाकली होती आपण? कौस्तुभ नुसताच विचार करत होता. 
***
    रात्री सर्वाना आईने वाढल. छोटीला अगोदरच भरवून घेतल होत. कौस्तुभ, स्वरा व शंतनू आपापल्या जागेवर बसले. स्वराही वाढायला मदत करत होती. छोटीची भूणभूण चालू होती तिलाही स्वरा सांभाळत होती. 
"अस काय आई तू नाही बसत जेवायला? " कौस्तुभने  आईला विचारले. 
" नाही रे, तुम्ही  जेवा. मी नंतर जेवेन. संध्याकाळी  काही खाण झाल ना की भूक नाही लागत " 
" हा, असू दे. भूक नाही तर थोडच जेव. आज माझ्या बाजुला बस. आई, तुला आठवत का ग? मी सहावी सातवीत असतानाही तूच भरव म्हणून  हट्ट करायचा ते? "  आपल्या शेजारी कौस्तुभने आईसाठी ताट घेतले व तो स्वतःच वाढू लागला."
 "हो रे बाबा सगळे  आठवतेय. ते कसे विसरेन? मग आता विचार काय आहे? आजही भरवण्याचा हट्ट  करणार आहेस की काय? तुला भरवणारी आता ही आहे तिला सांग."
 सगळयांच्याच हास्याचे फवारे घरिच्या भिंतींवरही उडत राहिले. अशाच थट्टा मस्करीत जेवण चालू होते.  आईविषयीचे सगळे  गैरसमज , सगळा राग, शंका यांचा निचरा झाला होता. मनावरचे सगळे  मळभ दूर झाले होते. कौस्तुभच्या मनाचे आकाश आता निरभ्र बनले होते. खूप दिवसानी  चांगल्या, खेळकर मूडमध्ये आलेल्या आपल्या मुलाकडे आई कौतुकाने पहात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...