ही दहा पंधरा वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आहे.
आई गेले पंधरा दिवस हॉस्पिटल मधे ऍडमिट होती. एक दिवस दुपारी एक दीड च्या सुमारास, साधारण सत्तरीच्या असाव्यात, अशा एक बाई आईच्या खोलीचं दार किलकिलं करून हळूच आत आल्या. आजाराची जुजबी चौकशी करून त्यांनी मला थेट प्रश्न केला "जवळ पास च राहता का? "
मी होकारार्थी मान हलवली.
हॉस्पिटलच्या खेपा, घरात वृद्ध वडील , शाळेत जाणारा मुलगा, ही तारेवरची कसरत चालू असताना ह्या बाईंचं माझ्या कडे काय कामं असावं हा विचार मनात आला आणि एक त्रस्त भाव चेहेऱ्यावर नकळत उमटला.
"मग मी तुमचं एक कामं करू शकते "त्या बाईंच्या तोंडचं हे वाक्य ऐकलं मात्र, माझ्या चेहऱ्यावर एक कुतूहलाचा भाव उमटला.
"तुम्हाला घरी जायचंय का जेवायला? आणि काही कामं असेल तर जरूर करून या. मी दोन तास सं बसेन तुमच्या आईजवळ. "
ओळखपाळख नसलेल्या बाईंकडून असा अचानक मदतीचा हात पुढे आल्यावर मी थोडी साशंक होऊन बुचकळ्यात पडले. त्यांनी ते ओळखून त्यांची कहाणी मला सांगायला सुरवात केली. गेल्या वर्षी त्यांचे यजमान याचं हॉस्पिटल मधे दोन महिने ऍडमिट होते. मुलबाळ नसल्यामुळे आणि जबाबदारी अंगावर पडेल या भीतीपोटी जवळचे फारसे फिरकलेच नाहीत हॉस्पिटलमधे. त्याही या हॉस्पिटलच्या जवळच राहातात पण साधं आंघोळ करायला घरी जाणं पण अवघड होऊन बसायचं. कोणीही सोडवायला नसायचं. यजमान वारले. दोन महिन्याच्या सतत च्या हॉस्पिटल मधल्यावावरामुळे drs आणि स्टाफ ओळखीचा झाला होता. त्यान्च्या परवानगीने गेले वर्षभर त्या बाई इथे सगळं आपलं आटोपून एक ते चार रुग्णाच्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी येतात. त्यांची कहाणी ऐकून मी चटकन त्यांचे हात हातात घेतले. आणि माझी मूक कृतज्ञता व्यक्त केली.
समाज कार्य करतोय असा कुठलाही अभिनिवेश नाही, कुठलाही गाजावाजा नाही, आपल्या कुवतीची पूर्ण जाणीव अशा त्या शांत चेहऱ्याच्या बाईंना मी पटकन म्हटलं." असं काही करावं हे तुम्हाला सुचलं हे किती आपलेपणाचं, सहृदयपणाचं आहे हो ! नाहीतर अशा कठीण प्रसंगातून गेल्यावर माणसं कटू होतात. अलिप्त होतात."
किंचित हसून त्यांनी उत्तर दिलं ,
"गरज शोधाची जननी असते ना "तसंच संकट पुढची दिशा दाखवणारा वाट्याडा असतो."
नंतर पुढे 15 दिवस त्या भेटत राहिल्या. याही गोष्टीला आता दहा पंधरा वर्ष झाली. आज शेजारच्या काकूंना , याचं हॉस्पिटलमधे सोनोग्राफी करायला घेऊन आले होते आणि हॆ सगळं आठवलं. मधल्या काळात खंडीभर आजारपणं आली आणि हंडीभर अनुभव गाठीशी आला. थोडी वैद्यकीय पार्श्ववभूमी आहे आणि फावला वेळ हातात उरायला लागला. नकळत परिचित आणि नातलग यांच्यासाठी dr ची अपॉइंटमेंट घेणं, चाचण्या करण्यासाठी घेऊन जाणं, रिपोर्टस आणण, हॉस्पिटल मधे बसायला जाणं असं हातून घडायला लागलं. जमेल आणि झेपेल तेवढच पण करते मात्र आवर्जून. आज वाटलं त्या दिवशी त्या बाईंचा "हात "हातात घेतला तेव्हा नकळत तो मदतीचा "बॅटन "त्यांनी माझ्या हातात दिला वाटतं..!
नीलिमा जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा