गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1839. सेकंड ओपिनियन

 व्यंकटेश माडगूळकर यांचं एक पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली आणि तिने दिलासा दिला. गोष्ट अशी की, माडगूळकरांची बहीण एके दिवशी त्यांच्या घरी आली. फार काळजीत होती. ती म्हणाली, तात्या, उद्या सकाळी माझ्या कानाचं ऑपरेशन आहे. मला भीती वाटतेय. तर तू ऑपरेशनच्या वेळी दवाखान्यात ये. मला आधार वाटेल.
काय झाले तुझ्या कानाला? व्यंकटेशांनी विचारले.
गेले पंधरा दिवस ठणकतोय. फडफड आवाज येतो. रात्र-रात्र झोप लागत नाही. म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर नाक, कान घशाचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी कान तपासला आणि म्हणाले, 'ऑपरेशन कराव लागेल' ते ऑपरेशन उद्याच आहे. मला तर धास्ती वाटतेय.
माडगूळकरांनी डॉक्टरांचे नाव विचारलं. लगेच त्यांना फोन केला. तर डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन तर करावंच लागेल. शिवाय मी भूल देणाऱ्या डॉक्टरला पण उद्या सकाळी यायला सांगितलं आहे. माडगूळकर म्हणाले, हे ऑपरेशन आपण पुढे ढकलू, बहिणीची मानसिक स्थिती सध्या ठीक नाही. मग त्यांनी भूल देणाऱ्या तज्ज्ञालादेखील फोन करून तसं सांगितलं. माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतलं औषध कानात टाकलं आणि म्हणाले, तीन दिवसांत कान बरा होईल. काळजी करू नका. विशेष म्हणजे या औषधानं कानाचा ठणका थांबला. फडफड बंद झाली. चांगले ऐकायला येऊ लागलं. 
माडगूळकर या लेखात म्हणतात, कुठल्याही आजाराच्या बाबतीत आणखीन एखाद्या डॉक्टरांचं किंवा वैद्याचं मत घ्यावंच. हे सेकंड ओपिनियन आपल्या समस्या कदाचित सोडवू शकतं. सेकंड ओपिनियन हे तत्त्व माझ्या मनाला खूप पटलं. माझ्या आईच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ सूज आली होती. तिचा हात सरळ होऊ शकत नव्हता. उंच फळीवरचा डबा काढता येत नव्हता की स्वतःच्या हातानं केस विंचरता येत नव्हते. मग आम्ही एका अस्थिरोग तज्ज्ञ सर्जनला आईचा हात दाखवला. त्यानं ती सूज दाबून पाहिली, अवती-भवतीचा हाताचा भाग पाहिला. मला ते डॉक्टर म्हणाले, जिथं सूज आहे तेथील थोडासा भाग कापून तपासणीसाठी मुंबईला पाठवू. तिथून काय रिपोर्ट येईल ते पाहू. पण मला तरी ही लक्षणं कॅन्सरची वाटत आहेत. 
कॅन्सर शब्द ऐकल्याबरोबर मी मनातून हादरलो. डॉक्टरनं हे मला इंग्रजीत सांगितलं. पण हे काहीतरी गंभीर आहे, एवढं आईला कळलंच. घरी आल्यावर एकच हाहाकार झाला. उदासीन कळा पसरली. आईनं तर अन्नपाणी वर्ज्य केलं. मी सहज माझ्या मित्राला ही हकीकत सांगितली तर तो म्हणाला, मी सांगतो त्या डॉक्टरांना दाखव. ते स्वतः सर्जन आहे पण उपचार करतात होमिओपॅथीचे. फार नाव आहे त्यांचं. ते काय म्हणातात पहा. 
रेल्वे लाईन्समध्ये ते डॉक्टर राहत होते. दवाखानाही तिथंच होता. एकदा संध्याकाळी आईला घेऊन गेलो. डॉक्टरांनी आईच्या हाताची सूज पाहिली. लहान-सहान वाटणारे पण महत्त्वाचे प्रश्न विचारले. डॉक्टर म्हणाले, काही चिंता करू नका. मी उपचार करतो. माझी फी वीस रुपये आणि महिन्याच्या औषधाचे पन्नास रुपये. डॉक्टरांनी बाटलीत गोळ्या दिल्या. पथ्यपाणी सांगितले. आई निष्ठेनं, न चुकता औषध घेत होती. आठ-पंधरा दिवसातच ती सूज कमी झाली आणि महिनाभरात तर आई साफ बरी झाली. महिन्यानंतर आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी पाहिलं तर सूज अगदीच कमी झाली होती. तरीही डॉक्टरांनी पुन्हा एका महिन्याची औषध दिली. हात पूर्ण बरा झाला. आईच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. या गोष्टीला आता वीस वर्षं होऊन गेली आहेत.
माझ्या बहिणीच्या पायाला मोठं कुरूप झालं होतं. चालताना ठणका लागत होता. तिनं एका डॉक्टरांना दाखवलं होतं. डॉक्टरांनी जिथे हे टणक कुरूप होतं तिथला त्रिकोणी तुकडा चाकूनं कापून काढला आणि म्हणाले, आता हे मूळच निघून गेलं आहे. पुढे मलम, ड्रेसिंग आणि औषध यात महिना गेला. खर्चही खूप झाला. थोडंसं बरं वाटलं पण दोन-चार महिन्यांनी पुन्हा तिथला भाग टणक झाला. पुन्हा जमिनीवर पाय ठवता येईना. बहीण रडायला लागली. माझ्या डोळ्यापुढे सेकंड ओपिनियन उभं राहिलं. लिमये मेडिकलमध्ये कुरूपावर काही रामबाण औषध आहे, असं समजलं होतं म्हणून तिथं गेलो तर वैद्य बागेवाडीकरांचा मुलगा यशवंत तिथं होता. तो म्हणाला, कुरूप ना! संध्याकाळी घरी या. माझी बहीण उपचार करतेय. 
संध्याकाळी बागेवाडीकरांच्या चिवडेवाले मारुती जवळच्या घरी गेलो. दवाखाना तिथेच होता. एका साध्या ब्लेडने कुरूपावरचा जाड थर तिनं काढला. नंतर एका छोट्या बाटलीतलं तेल तिनं काचेच्या कांडीवर घेतलं आणि म्हणाली, आता हे तेल मी त्या कुरूपावर सोडते, काडी ओढून तिथं थोडा चटका देते. एक मिनिटभर मस्तकापर्यंत कळ येईल. तेवढी सहन करायची. तिनं त्या पद्धतीनं उपचार केले. मग एक साधी बेलाडोनची पट्टी चिटकवली. फक्त वीस रुपये घेतले. कुरूप तर बरं झालंच पण पुन्हा आयुष्यात उद्भवलं नाही. मी त्यांना विचारलं, हे कसलं तेल होतं? त्या म्हणाल्या, घोरपडीचं तेल गुणकारी आहे असं आयुर्वेदात सांगितलंय. या उपचारानेच अनेकांना व्याधीमुक्त केलं आहे. उपाय किती साधा, पण किती गुणकारी होता!
मी आणि माझा भाऊ स्टेशनवर रिझर्वेशनसाठी आलो होतो. अचानक त्याचं पोट दुखायला लागलं. इतकं की तो गडबडा लोळायला लागला. वेदनेनं व्याकूळ झाला. मी त्याला त्याच भागातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणाले की, सर्जिकल केस आहे. शेजारी सर्जनला दाखवा. शेजारी सोलापुरातले नामवंत सर्जन होते. त्यांना दाखवलं, त्यानी तपासलं आणि म्हणाले, ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. अपेंडिक्स बर्स्ट होईल नाही तर… घरी आता तरी आम्ही काही सांगितलं नव्हतं. असे हे होईल. हे कोणाला माहिती? आम्ही डॉक्टरांना म्हणालो, घरी जाऊन येतो. मग ॲडमिट होतो.
ती तुमची जबाबदारी आहे पण अधिक वेळ थांबाल तर काहीही घडू शकते हे लक्षात ठेवा, डॉक्टर म्हणाले. 
मग मीच निर्णय घेतला. घरी आलो. आमचे फॅमिली डॉक्टर मु. ना. वैद्य दवाखान्यात होते. त्यांना दाखवलं. त्यांनी तपासलं. काही प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या दोन गोळ्या दिल्या. आराम वाटेल म्हणून सांगितले. त्या गोष्टीला आज अठरा वर्षे झाली आहेत. भावाचं पोट पुन्हा कधीही दुखलं मही. एक दोन गोळ्यांनी त्याची तात्कालिक पोटदुखी ती थांबलीच पण डॉक्टरांनी जी पथ्यं सांगितली होती ती पाळल्यानं पुन्हा हा विकार कधीच उद्भवला नाही. ऑपरेशनच्या दिव्याला सामोरं जायचा प्रसंग आलाच नाही.
सारांश - आजाराला आपण घाबरतो. सर्वांनाच जीव प्यारा असतो. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला चुकीचा असतो असं नाही. त्यांचं निदानही योग्य असू शकतं. पण आणखीही काही साधी सोपी उपचार पद्धती असू शकते. असे अनुभव मला भरपूर आले आहेत. अनेकांना आले असतील. तर आपल्या आजाराच्या बाबतीत हे सेकंड ओपिनियन फार महत्त्वाचे आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या एका गोष्टीनं केवढी सुलभ आणि निश्चित वाट दाखवली ! निष्णात डॉक्टरांबद्दल आदर आहेच आहे, पण काही सोपे, साधे उपचारही असू शकतात हे आजवरच्या अनुभवानं कळलं आहे.

दत्ता हलसगीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...