ज्येष्ठ मास संपून नुकतीच आषाढ मासाला सुरुवात झाली होती, आभाळात तप्त सूर्यनारायण , तर कधी गढूळ दाटून आलेलं आभाळ.. असा उन सावलीचा लपंडाव सुरू होता. अशातच आषाढ महिन्यातला हा रविवारचा दिवस होता रस्त्यावर सहसा कोणतीच वर्दळ दिसत नव्हती. सरकारी कामांना रविवारची सुट्टी असल्यामुळे दररोज तालुक्यातल्या कामासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ देखील दिसत नव्हती. तालुक्यातील चावडी देखील ओस पडली होती, चावडीच्या मुख्य दरवाजाच्या समोर थोड्या अंतरावर असलेल्या वडाच्या झाडाला कोणीतरी टेकून बसल होत वाटलं कोणीतरी वाटसरु असावा. पण थोडं निरखून पाहिलं तर लक्षात आलं ही तर लक्ष्मी ! दर आठवड्याला काठीचा आधार घेऊन चालत चालत कोणत्या ना कोणत्या दिवशी हमखास तिथे येऊन बसणारी. पण आज तर रविवारचा दिवस आज का आली असावी ती इथे. लक्ष्मी आपली नजर शून्यात लावून तटस्थ मूर्ती सारखी बसली होती हातामधे जुना मळकटलेला एक कागदाचा घडी घातलेला तुकडा होता. लक्ष्मीच वय असाधारण सत्तरच्या आसपास, सत्तरीच्या वयाच्या आणी तिच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. इतके दिवस चावडीमध्ये येणारी लक्ष्मी इतरांशी मात्र बोललेल मी कधीच पाहिलं नव्हतं कदाचित माणुसकीवरचा तिचा विश्वास उडून गेला की काय असंच एकंदरीत तिच्या वागण्यावरून जाणवायच. ती नेहमीप्रमाणे चावडीत यायची आणि त्या वडाच्या झाडाला टेकून शांत शून्यात नजर लावून बसायची . आजही तसंच होतं. तसं पहायला गेलं तर तिला कोणी वेडीही नाही म्हणणार. अंगावरच्या लुगड्याला चार ठिकाणी चार ठिगळ जोडलेली होती, चप्पल नावाची वस्तू तिच्या पायात कधीच दिसली नाही. डोक्याला तेल लावून मात्र फनीने व्यवस्थित विंचरून त्याचा बुचडा मात्र बांधलेला असायचा, मलाच प्रश्न यायचा कोण राखत असेल लक्ष्मीची निघा कोण घेत असेल काळजी , घरी सगळे असतील की नाही या विचारांमध्ये मी गढून गेलो होतो आणि तितक्यात मला समोरून झपाझप पावले टाकत लक्ष्मी कडे धावत येणारी तिची मुलगी जयवंती दिसली बहुतेक सगळा गाव शोधून ती शेवटी चावडी कडे आली असावी कारण लक्ष्मी जर जास्त वेळ कुठे गेले असेल तर ती एक तर गावातल्या पंचायतीत असायची नसेल तर तालुक्याच्या चावडी जवळ असायची .
आईला सैरभैर होऊन शोधणार्या जयवंतीचा अवतार पार बिघडून गेला होता. विस्कटलेले केस आणि घामाने डबडबलेल्या चेहर्यावर आईला पाहून थोडसं हायसे आलं होतं. धावत येणारी जयवंती आता शिस्तात चालत लक्ष्मी समोर जाऊन गुडघ्यावर बसली लक्ष्मीचे दोन्ही हात जयवंतीने हातात घेतले ... ऊर भरून आलेल्या मायेनं तिने त्या रापलेल्या हातांवर तिचा चेहरा ठेवला. क्षणभर असाच वेळ गेला असेल जयवंतीन मान वर केली आणि लक्ष्मीला म्हणाली "ए आये अगं नको ग आपल्याला त्यो जमीन जुमला, सकाळपासून तुला घारीसारखी शोधतोय ग, जीव घशापतूर आला ह्वता ग. अग तुझ्या शिवाय मला दुसरा हाय कोण .... तू लय विचार करत जाऊ नगस ग मी हाय नव्ह माझ्या कड बघून तरी घरी थांबत जा ...ए आये ..
आईला समजावून सांगणार्या जयंतीच्या सकाळपासून दाटून आलेल्या भावना आता डोळ्यांच्या द्वारे ओसंडून वाहत होत्या जयवंती खूप रडत होती. जयवंतीचा आईवर खूप जीव होता का नसणार आई होती तिची,
हमसून हमसून रडणार्या जयवंतीने आता लक्ष्मीच्या मांडीवर डोकं टेकलं आणि क्षणभर डोळे मिटून पडली. दिवसभर आईला शोधण्याच्या धावपळीमुळे कदाचित तिला थकवा आला होता त्यामुळे आईच्या कुशीत जाताच जयवंतीला क्षणभराची नीज आली असावी. लेकरू कुशीत झोपलेलं आपसूकच त्या माऊलीला कळालं नकळत तिने आपला हात जयवंतीच्या डोक्यावरून फिरवायला सुरवात केली आणि वर आभाळाकड पाहून ती तिच्या विचारात गुंतून गेली कदाचित तिच्या आयुष्याचा ती भूतकाळात आठवत होती .
लक्ष्मीचा भुतकाळ ही तसाच होता बऱ्याच जणांकडून मी तो ऐकला होता.
वयात यायच्या आधीच लक्ष्मीच्या बांन तिच लग्न शेजारच्या गावातल्या सर्जा बरोबर लावून दिल. लग्नाला गडबड करायच कारण म्हणजे परत परत असं चांगलं स्थळ देवाकडे मागून बी मिळणार नाही असं मत लक्ष्मीच्या बाच होत. लग्न झालं आणि बाच्या आंगनात खेळती बागडती लक्ष्मी घरची लक्ष्मी बनून सर्जाच्या घरी आली. सर्जाच्या घरी सर्जा मिळून फक्त दोनच माणसे होती एक म्हणजे सर्जा आणि आजारपणामुळे अंथरुणाला खिळून पडलेली सर्जाची आई. सर्जा लहान असतानाच सर्जा च्या वडिलांना देवाचं बोलावण आलेल. सर्जाच्या मोठ्या बहिणीच गावातच लग्न लावून दिलेल ती कधीमधी घरी यायची एरवी सर्जा आणि त्याची आई एवढेच दोघे घरी आता मात्र या दोघांच्या जोडीला लक्ष्मी आली होती. वय लहान असलं तरी लक्ष्मींन संसाराचे सूत्र जाणून संसार करावयास सुरुवात केली. सर्जाला वडिलोपार्जित म्हणून चार एकर जमीन आणि गावातलं राहतं घर हेच काय ते होतं. सर्जा अंगापिंडान मध्यम खूपच लाजरा आणि एकलकोंडा. सर्जाच शिक्षण तर काही झालं नव्हतं गावात त्याला मित्रही नव्हते. वाटेकर्याला दिलेल्या शेतीतून जे उत्पन्न यायचं त्यावर हे घर चालायचं. सर्जाला शेतीच काय पण दुसरं कोणतंच काम जमायचं नाही. खरंतर बऱ्याच गोष्टी सर्जाला समजायच्या पण नाहीत. गावातला सांगकाम्या आणि ओ नाम्या असाच हा सर्जा. अंगात नेहमी लांब हातोप्याचा ढगळा शर्ट आणि तपकिरी बंडी असा त्याचा पोशाख गावातुन फेरफटका मारायला गेला तरी सर्जा मान खाली घालूनच फिरायचा. सर्जाला कोणी सर्जा म्हणून हाक मारली तर हा ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे करून झपाझप पावले टाकत पुढे जायचा, पण जर कोणी सर्जेराव म्हणून हाक मारली तर मात्र हा सर्जा हाक मारलेल्याच्या कोणत्याही कामासाठी सुसज्ज असायचा मग तो लहान असू दे नाहीतर मोठा. सर्जेरावच्या याच स्वभावाचा गावकऱ्यांनी आणि भावकीने खूप फायदा घेतला आपला कुणीतरी फायदा घेतो हे कळण्याइतपत सर्जा चतुर नव्हता .... लक्ष्मीच्या बाने फक्त चार एकर जमीन आणि गावातलं वाडावजा अशा पद्धतीच घर बघून लक्ष्मीला सर्जा च्या गळ्यात बांधली होती. आणि आता लक्ष्मीला अशा जोडीदाराबरोबर संसार करायचा होता....
दिवस सरतील तसा लक्ष्मी आणि सर्जा या दोघांचा संसार फुलंत चालला होता. एकमेकाला समजून घेत आणि एकमेकांना साथ देत दोघं मिळून जमेल तसं शेतातली काम करू लागले. लक्ष्मी तशी हुशार आणि कोणत्याही कामाला मागे न पडणारी अशी. वर्ष निघून जातील तशी लक्ष्मी आणि सर्जा स्वतःहून शेतीमध्ये लक्ष देऊ लागली काम करू लागली वाटेकरायला शेती देणं त्यांनी बंद केलं. परिस्थिती पूर्वीपेक्षा आता जरा सुधारू लागली. सर्जाची आई मात्र अंथरुणाला खिळून जैसै थे सगळे उपचार करुन पाहिले पण पण काही उपयोग झाला नाही..
दिवस सरत गेले तशी या जोडप्याला नव्या पाहुण्याची चाहूल लागली लक्ष्मीला तिसरा महिना लागला होता दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता.
मुलगा झाला तर जयवंत आणि मुलगी झाली तर जयवंती नाव ठेवायचं अस दोघांनी ठरवलं . सगळीकडे आनंदच आनंद सर्जाच्या स्वभावातही फारसा फरक पडला होता. शेतात जाऊन राबायचं, घरात काय हवं काय नको हे पाहायचं, लक्ष्मी ची काळजी घ्यायची, आईची काळजी घ्यायची, या सर्व जबाबदाऱ्या तो आता पार पाडत होता. पण सर्जाची एक खोड मात्र गेली नाही ती म्हणजे सर्जेराव म्हटलेकी डोळे झाकून सर्जेराव म्हणणाऱ्याच काम करायचं मग ते कोणीही सांगितलेल असो आणि काहीही सांगितलेल असो. दिवस सरत जातील तसे लक्ष्मी आणि सर्जा आनंदात संसार करू लागले.. पण म्हणतात ना अति आनंद झाला की कोणाची न कोणाची नजर लागतेच. या दोघांचाही आनंद सर्जाच्या भावकीला पहावला नाही.... सर्जाला वेड ठरवून चार एकर जमीन आणि घर नावावर करून घ्यायचा भावकीचा बेत हा लक्ष्मीच्या कष्टापुढे मोडकळीस आला होता.. पण काहीही करून त्यांना सर्जाची मिळकत स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती. कारण आता तर त्या मिळकतीला आणखीन एक वारस येनार होता.
एक दिवस सर्जा असाच गावातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता, दुपार टळून गेली होती रानाकडे तितकी लोकांची वर्दळ नव्हती, सर्जा रानाकडे फिरायला गेलाय हे त्या लोकांना समजले त्यांनी ठरवलं आजचा दिवस चांगला. चार-पाच जण एकत्र आले आणि त्यांनी सरळ सर्जाच रान गाठलं. सर्जा आपला आंब्याच्या झाडाच्या बुंध्याला टेकून काहीतरी गुणगुणत बसला होता.. तेवढ्यात या लोकांनी सर्जा वर हल्ला चढवला.. एक जण ओरडला अरं या जमिनी पायी तुझ्या बाला वर घालवलं तू यड म्हणून तुला सोडलं तर तू तर लईच शहाणा झालास की रं. दहा पंधरा मिनिटाची झटापट चालली आणी सर्जा शांत झाला. घात झाला.
घात करणारी निघून गेली गावात दंगा झाला लक्ष्मीला जवा समजलं तवा ती मटकन खाली बसली.. रडली नाही... काही बोलली नाही... तिला काही समजत नव्हतं... काही कळत नव्हत. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं.... सर्जाचा घात करणाऱ्यांनीच पुढे होऊन सर्जाला अग्नी दिला. संपलं.
लक्ष्मी काही बोलत नव्हती कोणाबरोबर सुद्धा बोलत नव्हती. शून्यात एकटक नजर लावुन बसायची आयाबाया येऊन तिला बोलतं करायला बघायच्या पण काही उपयोग झाला नाही. दिस गेल तसं लक्ष्मीला प्रसूतीच्या वेणा सुरू झाल्या आणि तिला मुलगी झाली. तोच काय तो आता तिचा आधार होता जयंवंती नावानं ती लेकीला हाक मारायची .
गावान तर पार खूळ समजलं होतं लक्ष्मीला गावातल्या आयाबाया काय खायला देतील ह्यावरच त्यांची गुजराण होत होती. लक्ष्मी वेड्यासारखी अशीच रोज नवऱ्याच्या हक्कासाठी त्याच्या जागेसाठी पंचायत चावडी चे उंबरठे झिजवत होती. पण शहाण्या माणुसकीनं तिला वेड ठरवलं होतं तिच्याकडे कोण लक्ष देणार. अशी लक्ष्मी.
थोड्या वेळाने जयवंती उठली आणि आईला म्हणाली आये चल घरी. निस्तेज आणि शून्य्यातल्या नजरेनं लक्ष्मी उठली आणि जयवंतीचा हात धरून हळू हळू चालू लागली.. आजपण पदरी निराशा घेऊन ती निघाली. पाऊस नव्हता आभाळ मात्र गढूळ झालं होतं... आणि लक्ष्मीच्या डोळ्यातून खळकन तिच्या सुरकुतलेल्या गालावर एका थेंबाचा पाऊस बरसला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा