मित्र प्रेम आणि घट्ट मैत्री म्हणजे काय ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाबा आणि काळे काका. पन्नास वर्षांहून अधिक काळ एकमेकांपासून दूर राहून देखील त्या दोघांचं एकमेकांवर असलेले प्रेम आणि विश्वास किंचितही कमी झाला नव्हता. त्यांच्यातील मैत्रीच्या रेशीमगाठी काळे काकांनी मर्मबंधातली ठेव असल्यागत मनांच्या कोपऱ्यात छानपैकी जपून ठेवल्या होत्या.
हे सगळं कदाचित तसंच गुलदस्त्यात राहिले असते आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेले असते. पण तसं घडायचं नव्हतं ही नियतीची इच्छा होती आणि त्याची सुरुवात एका विचित्र गोष्टीने आमच्या घरापासून सुरू झाली साधारण सहा महिन्यांपूर्वी. त्याचं असं झालं.
बाबा नुकतेच हृदयविकाराच्या आजारपणातून बरे होऊन हाॅस्पिटलमधून घरी परतले होते. घरातील वातावरण प्रसन्न आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्नशील असताना एक दिवस रविवारी सकाळी बाबा उठले तेच रडत रडतच. सगळ्यात आधी आईने त्यांना बघितले आणि तिने आम्हाला उठवलं. आमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याही स्थितीत मी बाबांना बोलकं करायचा प्रयत्न केला.
बाबा शांतपणे म्हणाले काही नाही रे पन्नास वर्षांपूर्वी तो काळे बोलला होता ते आज खरं ठरलं. त्याच्या आठवणीने जीव कासावीस होऊन मी आज रडलो रे. मला भेटायचे आहे त्याला लौकरात लौकर.
बाबा बोलले खरे पण हा काळे नावाचा माणूस कोण आहे आणि त्याला कुठे शोधायचे कुठे हा प्रश्न होता आमच्या समोर. शेवटी बाबांनी थोडी माहिती दिली. हा काळे बाबांचा काॅलेजचा घनिष्ठ मित्र. दोघांचे स्वभाव परस्पर विरोधी तरीही त्याची जगावेगळी मैत्री कुतुहलाचा विषय होती त्याकाळी संबंध काॅलेजमध्ये. त्याकाळी काळेकाका परळला केईएम हाॅस्पिटल जवळ रहायचे. त्यांच्या मुलगा त्याच हाॅस्पिटलमध्ये डॉ होता असं बाबांच्या काॅलेजच्या बॅचच्या काही वर्षांपूर्वी झालेल्या रियुनियनमध्ये बाबांनी ओझरतं ऐकल्याचे बाबांना आठवत होते. थोडक्यात सुतावरून स्वर्ग गाठायचा होता आम्हाला ह्या काळेकाकांना शोधण्यासाठी. पण मी हार मानली नाही. केईएममध्ये सुरू झालेल्या चौकशीचा प्रवास तब्बल पाच महिन्यांनी संपला काळेकाकांच्या मुलाचा शोध लागून. सतत क्लिनिक आणि मुंबई मधील मोठमोठ्या हाॅस्पिटलमध्ये ऑपरेशन करणारा काळेकाकांच्या मुलाला मी जेमतेम पंधरा मिनिटे भेटू शकलो. घाईघाईत मी का आलो आहे हे मी त्यांना सांगितले आणि त्यांच्या कडून काळेकाकांचा कोकणातील वास्तव्याचा पत्ता मिळवला. त्या क्षणी मोक्याची लढाई जिंकल्याचा आनंद मला झाला आणि लगेचच पुढच्या आठवड्यात मी कोकण दौरा केला आणि खऱ्या मित्रप्रेमाचा दुर्मिळ अवतार मी याची देही याची डोळा बघितला. आजच्या कलियुगात अशी निर्व्याज मैत्री शोधून देखील सापडणार नाही.
🚗🌳🌴🥭🍊🍌.
काळे काकांचा बंगला शोधायला मला जास्त वेळ नाही लागला. मी तिथे बाहेरच्या गेट जवळ गाडी लावली आणि अचानक आतून एक कुत्रा आला आणि जोरजोरात भुंकायला लागला.
कोण आलंय गेट पाशी? तिथे ठेवलेल्या वाॅकीटाॅकी वरुन बोला जरा.
आतून एक आवाज आला.
मी वाॅकीटाॅकी वरून माझी ओळख सांगितली. पलिकडून आवाज आला तु श्याम्याचा मुलगा की काय?
होय आजोबा
कसा आहे रे तो. बरा आहे ना. थांब जरा मी आलो दार उघडायला. आज माझा मदतनीस जरा बाहेर पडलाय सकाळीच.
आणि अखेर काठी टेकत सावकाश पावलं टाकत काळे काका गेट जवळ येऊन पोहोचले. त्यांनी कुत्राला शांत करून दूर पिटाळले.
ये बाळा आत.
काका सोबत मी बंगल्यात शिरलो. मला बसायला सांगून काका आतल्या खोलीत गेले आणि थोड्याच वेळात हातात दोन ग्लास घेऊन माझ्या पुढ्यातील टेबलावर ठेवले.
दमून आला असशील ना तु. घे हे पन्हं. तुला जरा हुशारी वाटेल.
काळे काकांनी लगेचच मुद्द्यालाच हात घातला. मला शोधत शोधत तु इथपर्यंत पोहोचलास कसा? श्याम्या कसा आहे.
मी गेल्या पाच महिन्यांत जे जे घडलं ते सगळं काकांना सांगितले आणि माझ्या सोबत मुंबईला यायची विनंती केली. काकांना गहिवरून आलं ते सगळं ऐकून.
थांब जरा मी आलो. असं म्हणून काका आत जाऊन एक छोटीशी बॅग घेऊन आले. माझ्या समोर ती उघडून मला म्हणाले आमच्या मैत्रीच्या कित्येक आठवणींचे साक्षीदार म्हणून मी जपून ठेवल्या आहेत ह्या गोष्टी. एकत्र केलेला लोकल प्रवासाची, बघितलेले सिनेमांची तिकिटे , हाॅटेलमध्ये खाल्लेलं बन मस्का, आम्लेट पावची बिलं, काॅलेजमध्ये केलेली पोस्टर्स, निवडणूकांची बॅनर, मुद्दाम स्टुडिओत जाऊन काढलेले फोटो, तेव्हाच्या आमच्या वह्या, श्याम्याने मोठ्या विश्वासाने माझ्या जवळ जपून ठेवायला दिलेली त्याच्या फसलेल्या प्रेमाच्या कालखंडातील प्रेमपत्रं.
अलिबाबाची गुहा काकांनी माझ्या समोर उघडी केली होती. इतकं सगळं जपून ठेवलेलं असताना काकांचं आणि बाबांच्यात शत्रृत्व कशाने आलं ते काकांनी डोळ्यांत पाणी आणून सांगितले तेव्हा मी त्यांच्या आगळ्यावेगळ्या मैत्रीला कडकडीत सलाम केला. बाबांच्या जिद्दी आणि हट्टी स्वभावापुढे काळे काकांनी शरणागती पत्करली खरी पण जाता जाता बाबांना एक गोष्ट ते सुनावून गेले की एक दिवस माझ्यासाठी रडशील तू. इतकं सगळं होऊनही काळेकाकांच्या मनांत बाबांविषयी किंचितही किल्मीष नव्हतं. उलट बाबांच्या हृदयविकाराच्या आजाराचे समजल्यावर त्यांच्या डोळ्यांत काळजीचे दाटून आलेले ढग बरंच काही सांगून गेले.
माझा मदतनीस येईल तासाभरात. तोवर मी आवरून घेतो . कोपऱ्यावरच्या हाॅटेलचा हा नंबर आहे. तिथून तुझ्या आवडीचे काहीही मागव आपल्याला ब्रेकफास्ट साठी. मी रोज तिथूनच मागवतो. माझं नाव सांग म्हणजे ते देतील सगळं इथे पाठवून.
काकांनी सगळं आवरलं. अस्सल मराठमोळ्या पदार्थांनी आमचा पोटभर ब्रेकफास्ट झाला. थोड्यावेळाने काकांचा मदतनीस परत आला. काकांनी त्याला सगळ्या सुचना दिल्या आणि पुढच्या तासाभरात आम्ही मुंबईला यायला निघालो. संबंध प्रवासात काका आणि बाबांच्या घट्ट मैत्रीचे कितीतरी किस्से काकांनी आठवून आठवून मला सांगितले.
🚗.
आम्ही घरी पोहोचलो आणि गेले पांच महिने सुरू असलेल्या माझ्या अथक परिश्रमाच्या नाटकाचा अखेरचा प्रवेश सुरु होणार होता.
बाबांच्या खोलीचं दार काळे काकांनी सावकाशपणे उघडलं आणि समोरच्या बेडवर शांतपणे बसलेल्या बाबांना बघून ते जागीच थबकले. इतक्या वर्षांनी आज दोन तुल्यबळ एकमेकांसमोर आले होते.
"शाम्या " काकांनी आर्त स्वरात बाबांना हाक मारली आणि काठी टेकत टेकत बाबांच्या बेड पाशी ते पोहोचलो. समोरच्या भिंतीला हातातील काठी टेकवून त्यांनी बाबांना मिठी मारली. पुढचा प्रसंग बघून घरातील आम्हा सगळ्यांची अवस्था काय झाली ते वेगळं सांगायची गरज नव्हती.
लेका अरे पन्नास वर्षांपूर्वी तु आपल्या शेवटच्या भेटीत जे बोलला होतास ते शेवटी नियतीने मला खरं करायला लावलं. तुझ्या आठवणीने कासावीस होऊन एक दिवस मी सकाळी रडत रडतच उठलो. तेव्हा नुकताच मी मोठ्या आजारपणातून सुखरूप घरी आलो होतो. त्यामुळे माझ्या डोळ्यांतील पाणी बघून घरचे सगळे घाबरले. पण माझ्या उदयने तेव्हाच मला वचन दिले होते की कितीही वेळ लागला तरी आपली भेट तो घडवून आणणार होता आणि ते वचन त्याने आज पूर्ण केले.
थोड्यावेळाने बाबा आणि काळेकाका शांत झाले आणि काॅलेजच्या आठवणींमध्ये हरवून गेले.
मला त्या दोघांचाही तितकाच अभिमान वाटतो कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले तरीही दोघांच्याही मनांत एकमेकांविषयी बिलकुल कटूता नव्हती उलट त्या काळात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा उल्लेख दोघांनीही अभिमानाने केला.
आजच्या कलियुगात खरंच असे जिवलग मित्र अभावानेच आढळतात असं आई जेवताना मला म्हणाली आणि ते मला मनोमन पटलं देखील.
© सतीश बर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा