जिस शहर मे लालच बसता है
उस शहर के ठग कभी भूखे नही मरते !
ज्या शहरात (म्हणजे माणसांच्या मनात) मोह, लालूच वास्तव्य करते त्याच माणसाच्या जीवावर सायबर भामटे पोट भरून मस्त जगत असतात. हे मी नेहमी सांगत आलोय. विविध घटनेतून हेच सत्य सिद्ध होत आहे. आणि विशेष म्हणजे अशा सापळ्यात अशिक्षित लोकांचे आडकण्याचे प्रमाण (माझ्याकडे आलेल्या केसेस मध्ये तरी) फक्त एक टक्का आहे आणि आयटी सेक्टर, उच्चशिक्षित अशा लोकांचे प्रमाण ९९% आहे. खरे दुर्दैव हे आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. ज्या सागर कारंडे या हास्य अभिनेत्याची ट्रॅप मध्ये अडकवून फसवणूक करण्यात आलीय. सागर कारंडे यांची सुमारे 62 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे हा सापळा ?
तर फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेने व्हॉट्सअॅपवरून सागर कारंडेशी संपर्क साधला. तिने इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट ‘लाइक’ करण्याचे काम देऊ केले आणि प्रत्येक लाइकसाठी 150 रुपये मिळतील, असे सांगितले. दिवसाला साधारण Rs 6,000 कमावता येतील, असेही लालूच दाखवत तिने नमूद केले. सुरुवातीला सागरने हे काम स्वीकारले आणि त्यांना यातून 10 वेळा Rs 11,000 इतकी रक्कम मिळाल्यामुळे त्यांचा या योजनेवर विश्वास बसला. त्यानंतर भामट्यांनी सांगितले की, काम सुरू ठेवण्यासाठी आणि वाढीव नफा मिळवण्यासाठी आता तुम्ही अपर ग्रेड मध्ये आला आहात, त्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र अजून थोडी वाढीव गुंतवणूक करावी लागेल आणि त्यावर वाढीव 30% कमिशन मिळेल.
सागरने सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. या मोबदल्याचे पैसे एका ‘वॉलेट’मध्ये जमा होत असल्याचे दाखवण्यात आले. (म्हणजे आभासी जगातील तिजोरीत) हे पाहून त्यावर विश्वास बसल्याने त्यानंतर त्यांनी 27 लाख रुपये गुंतवले. मात्र, वॉलेटमधील पैसे काढता येत नव्हते. कारण ऐशी टक्केच टास्क तुम्ही पूर्ण केला असून पैसे पूर्ण मिळण्यासाठी टास्क पण शंभर टक्के पूर्ण करावा लागेल. असे सांगण्यात आले. त्यामुळे ना घर का घाटका अशी अवस्था सागरची झाली. मागे फिरलो तर सगळेच पैसे जाणार मग पुढं गेलो तर किमान मिळतील तरी या मोहात पडला आणि तिथेच फसला. कारण यानंतर त्या भामट्यानी सागरकडून आणखी Rs 19 लाख आणि त्यावर 30% कर म्हणजेच एकूण Rs 61.83 लाख घेतले गेले. मात्र, तो कर चुकीच्या खात्यात गेला असल्याचे सांगून पुन्हा पैसे भरण्यास सांगण्यात आले. आणि अशा रीतीने सुमारे बासष्ट लाखाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सागरने पोलिसांकडे धाव घेतली !
डॉ. डीडी क्लास : सुरुवातीलाच मी म्हटलं तर आभासी जगात ज्या क्षणी तुम्ही आर्थिक मोहात पडता त्याचवेळी तुमचा फसवणुकीचा मोक्ष ठरलेला असतो,. हे सायबर भामटे "आवळा देऊन कोहळा काढण्यात" तरबेज असतात. त्यामुळे सुरुवातीला मिळणाऱ्या रिटर्न्स च्या मोहात पडून लोक अजून अजून पैसे गुंतवत जातात आणि फसतात. सागरने जे केले ते एका प्रकारे अनैतिक देखील आहे. कारण अशा प्रकारे पैसे घेऊन लाईक देणे हेच नैतिक नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. विविध हॉटेल्स बद्दल लाईक द्या, कॉमेंट द्या, रिव्यू लिहा आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं म्हणत इतरही जाळी लावली जातात. त्यात तरुणाई अडकते आहे. तिथेही असेच सुरुवातीला थोडेफार पैसे दिले जातात आणि मग एकदम मोठी रक्कम काढून घेतली जाते. मुळात ज्या हॉटेलला तुम्ही कधी गेला नाही त्यावर बसल्या जागी घरी बसून रिव्यू देणे हेच अनैतिक आहे कारण ते वाचून एखादा माणूस त्या हॉटेलात गेला आणि रिव्यू प्रमाणे तिथं सोयी नसल्या तर त्याची फसवणूक होणार ज्याला शंभर दीडशे रुपयांच्या लालसेसाठी तरुण खोटे रिव्यू देणार आणि एखाद्याला अडचणीत आणणार ! हेच चूक आहे.
बसल्या जागी पैसे कमवण्याची हि वृत्ती घातक आहे. जी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही !
तेव्हा मंडळी. मोह सोडा, आणि प्रामाणिकपणे कष्ट करून सम्रुद्ध व्हा ! त्यासाठी शुभेच्छा आहेतच !
©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि
HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा