गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1863. सहजीवन

 विनायकरावांनी आपल्या सुकन्येचं नाव अतिशय लाडानं ‘पारिजात’ ठेवलं होतं. ‘पारिजात' तसं जरा ऑड नाव आहे, ‘प्राजक्ता’ कसं सहज वाटतं, तसं हे नाही.
विनायकराव म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम ऐकून घेणारा गृहस्थ. बायको आणि कन्येपलीकडे जग नाही. सरळसोट धोपट मार्गानं चालणारं गुळगुळीत आयुष्य आणि त्याला विशेष काही ट्विस्ट्स नाहीत.
बायको मीनल, मनमिळाऊ आणि सुंदर. कन्येनं आईचं रूप घेतलेलं. ‘मला व्यवहार ज्ञान कमी आहे’ या सबबीखाली विनायकरावांनी सर्व सत्ता बायकोकडे दिलेली. तेही बरंच झाल म्हणायला हरकत नाही. सरळ साधा माणूस नाही तर येता जाता फसला असता. 
पारिजात पण जवळपास आईवर गेलेली. नाव पारिजात असले तरी अंगात प्रचंड धुसमुसळेपणा होता. हुशार असलेली ही कन्या आज परदेशी शिकायला निघाली होती आणि विनायकरावांचं पार कोकरू झालं होतं. 
ऑस्ट्रेलियासारखा देश, तिथली संस्कृती , राहणीमान, खर्च… सगळं कसं त्यांची छाती दडपून टाकत होतं. पोरीनं बापाकडून एकही पैसा न घेता एज्यूकेशन लोन काढलं होतं आणि माझं लोन मीच फेडणार हेही ठणकावून सांगितलं होतं. फटक्यात स्पष्ट बोलून जायचं, हा एक दुर्गुण सोडला तर पारिजातमध्ये एकही अवगुण शोधून सापडला नसता. 
विमानतळावर पोरीला निरोप देतांना विनायकरावांचे डोळे भरून आले होते. तीन जीवांनी मिळून उभ्या केलेल्या विश्वातला एक जीव काही दिवसांसाठी का होईना पण दूर चालला होता. त्यांचा चष्मा आपल्या हातानं काढून पारीजातनं त्यांचे डोळे पुसले. 
“अहो शिकायला चाललेय… लग्न करुन नेहमीसाठी जात नाही आहे बाबा!”
क्षणात विनायकरावांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. 
“मी घरजावईच आणणार आहे, मग कशी जाशील?” 
पारिजातला पण आता भरून आलं होतं. आईच्या गळ्यात पडून तिनं निरोप घेतला आणि मागं बघत बघत चेक इन करायला ती निघाली… तेव्हढ्यात विनायकरावांचा आवाज ऐकला आणि ती परत आली
“परत येशील न बाळा? तुझ्याशिवाय आमचं कुण्णी नाही, हे विसरू नकोस!” 
“बाबा, दोन वर्षे अभ्यासाची आणि एक वर्ष लोन फेडायला… तीन वर्षे फक्त!” 
“लोन फेडेन की मी! एक वर्ष कमी होईल बघ…”
“बाबा, माझं ओझं मला कधीतरी उचलायाला लागणारच की नाही!”
“सुखी रहा, यशस्वी हो!”
आता मात्र पारिजात झपझप पावलं टाकून निघाली. कधी नव्हे ते मीनलताईंच्या डोळ्यात देखील पाणी आलं.  

पारिजात गेली आणि या दोघांना आता घर खायला उठलं होतं. पण माणूस हा असा प्राणी आहे, ज्याला प्रत्येक गोष्टीची सवय होते. कुणाला वेळ जास्त लागतो तर कुणाला कमी. पारिजातच्या आईला वेळ कमी लागला आणि विनायारावांना जास्त. ही तीन वर्षे हातोहात निघून जाणार होती याची सगळ्यांनाच खात्री होती. आणि या बदलत्या काळात फोन, इमेल्स, स्काईप या सगळ्या गोष्टीनी अंतरं बरीच कमी झालीत. बघता बघता तीन वर्षं निघून गेली आणि दिलेला शब्द पाळत पारिजात घरी परतली देखील ! तिला घ्यायला विनायकराव विमानतळावर गेले होते. यावेळी मात्र उलटंच झालं. बापाच्या कुशीत शिरून पारिजातच जास्त रडली होती. पारिजातमध्ये आता खूप बदल झाला होता. फटक्यात बोलणं कमी झालं होतं. स्टाईलीश झाली होती. इंग्रजी बेफाट झालं होतं आणि मुख्य म्हणजे पैसे कमवायला किती घाम गाळावा लागतो, हे तिच्या लक्षात आलं होतं.
आता पारीजातनं लग्न करावं, असा घोषा तिच्या आईनं लावला तर विनायकराव मात्र ‘लहानच आहे अजून, थांब थोडं…’ असं म्हणत आपला मुद्दा रेटत होते. अखेर वरसंशोधन करायचं हे फायनल झालं. पारिजातसारख्या मुलीसाठी मुलांची लाईन लागली आणि शेवटी अमोलला पारिजातनं पसंती दिली.
सीए होता, दिसायला छान होता, स्वभाव लाघवी होता, व्यवसायात यश होतं, दोन खोल्यांचा का होईना, फ्लॅट होता. दोघं सीसीडीला भेटले. विचार जुळून आले आणि मग विनायकरावांनी लग्नाचा बार उडवला. 
पाठवणीच्या वेळी विनायकराव उगाच वेळ काढत होते. आहेर घ्यायचा नाही, द्यायचा नाही असे ठरलेलं असतांना देखील मामाचा, काकाचा, मावशीचा ‘आहेर झाला की नाही’, ‘सगळे जेवलात ना रे…?’ असे प्रश्न विचारत होते. 
शेवटी पारीजातच्या आईनं समजावलं… “अहो, तिला जायला पाहिजे आता!”
लेकीला पाठवतांना विनायकराव एखाद्या लहान मुलासारखे रडले होते. आम्हा सर्वांना देखील अश्रू आवरता आले नाहीत. अमोलला, “माझं काळीज तुला काढून देतोय…” असं सांगतांना त्यांना काय वाटलं असेल, याची कल्पना एखाद्या मुलीचा बापच करू शकतो. 
एक दिवस आपल्या मुलीला दुसऱ्या घरी पाठवायचंय, हे मुलीचा जन्म होतो तेव्हाच बापाला माहीत असतं. कळते हो पण वळत नाही ! कोथरूड कॅम्प फारसं अंतर नाही पण आता विनायकरावांचं घर ‘बाबांचं घर’ होणार होतं.  पारिजातला अमोलनं प्राजक्तासारखं सांभाळलं आणि सहा महिन्यातच विनायकरावांची चिंता दूर झाली. मला पण कामानिमित्य सहा महिने युरोपात जावं लागलं. आता रोजची भेट बंद झाली होती. ‘चलता का कॅम्पला चहा घ्यायला?’ हा कानावर येणार प्रश्न येईनासा झाला होता.
मी माझं काम संपवून सहा महिन्यांनी परतलो. रात्री योग्य दिसणार नाही म्हणून विनायकरावांची बेल वाजवली नाही. सकाळीच सात वाजता तयार होऊन खाली येऊन बागेत बसलो. आता विनायकराव नेहमीप्रमाणं येतील आणि म्हणतील ‘चलता का कॅम्पला चहा घ्यायला…’ हा प्रश्न विचारतील. आज मी ‘हो’ म्हणणार होतो. पारिजातला मला देखील भेटायचं होतं. 
विनायकराव सकाळी आले. पण चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह नव्हता. उत्साह सोडा, विनायकराव बरेच रोडावले देखील होते. मीच मग त्यांना विचारलं, “चलता का कॅम्पात चहा प्यायला?”
माझा प्रश्न ऐकल्यावर विनायकराव मटकन खाली बसले, त्यांना भोवळ आली. मला कळेच ना, काय झालंय ते! मी आणि अजून दोघांनी त्यांना उचलून लिफ्टमध्ये घातलं. त्यांच्या घरी आणलं आणि सोफ्यावर निजवलं. पारिजातच्या आईनं पटकन पाणी आणून त्यांच्या चेहऱ्यावर टाकलं. विनायकराव शुद्धीवर आले. एक एक पाऊल टाकत ते बेडरूममध्ये निघून गेले. धाड्कन दार आपटल्याचा आवाज आला. मी सगळी कहाणी सांगितली आणि माझं काही चुकलं का, हे विचारलं.  त्यावर पारिजातच्या आईनं मला स्वयंपाकघरात यायला सांगितलं. त्यांनी गॅसवर चहा टाकला. रोज सकाळ संध्याकाळ पूजा ज्या घरात व्हायची त्याच घरातल्या मंदिरावर आता धुळीचं साम्राज्य होतं. शेकडो वर्षे जुन्या इमारतीत जशी कोळ्याची जाळी असतात, तशी जाळी होती. आता माझ्या डोक्याचा स्फोट होणार होता. मी ताडकन उठलो आणि प्रश्न विचारला…
“झालंय तरी काय?”
चहाचा घोट घश्याखाली ढकलत पारिजातची आई सांगायला लागली.
कंपनीच्या कामानिमित्य पारिजात साईट बघायला गेली होती. कुठंतरी पायाखाली एक छोटासा दगड आला, म्हणून तिचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरून ती कोसळली आणि खाली वाळूच्या ढिगार्‍यावर पडली. वाळू असल्यामुळं जीव गेला नाही पण पडतांना एक बार आडवा आला आणि तिचा उजवा हात कोपरापासून कायमचा तुटला. सध्या ती कॅम्पातच होती. ‘उद्या सकाळी विनायकरावांना घेऊन जा सोबत.’ असं त्यांनी मला सांगितलं.
दिवस माझा संपता संपेना. इतक्या हुशार आणि लाघवी पोरीसोबत असं का व्हावं, याचं उत्तर मला मिळत नव्हतं. अमोल पारिजातशी कसा वागत असेल, या प्रश्नानं देखील माझ्या डोक्याचा भुगा पडला. अखेर तो लांब दिवस संपला आणि आम्ही पारिजातकडे जायला निघालो. टॅक्सीत विनायकराव एकही शब्द बोलले नाहीत. एखाद्या यंत्राप्रमाणं त्यांनी घराची बेल वाजवली. अमोलनंच दार उघडलं. बनियन आणि हाफ चड्डीत अमोल उभा होता. 
अत्यंत मोकळं आणि दिलखुलास हास्य देत त्यानं आमचं स्वागत केलं. “पटकन चहा टाकतो आणि नाश्ता पण…” असं म्हणत तो किचनकडे धावला. पारिजात नुकतीच पूजेला बसली होती. मानेनंच तिनं ‘आलेच हां…’ असा मला इशारा केला. मी पण हातानं खूण करत ‘सावकाश…’ असं तिला सांगितलं.
पाचच मिनिटात अमोल चहा घेऊन आला. बेफाट चव होती चहाला. मस्त गप्पा रंगल्या. दुःखाचा कोणताही पापुद्रा त्याच्या वागण्यात नव्हता. चहा घेऊन झाल्यावर तो लगेच परत किचनमध्ये पळाला.
बटाटा काचरी आणि गरमागरम फुलके असा नाश्त्याचा बेत होता. पारिजात तो पर्यंत पूजा आटपून आली होती. माझ्या हातावर प्रसाद ठेवत तिनं मला नमस्कार केला. माझ्या डोळ्यातून खळकन पाणी ओघळलं. माझ्या साठीला पोहोचलेल्या डोळ्यांना आपल्या हातानं पुसत ती विनायाकरावांकडे वळली. त्यांनाही नमस्कार करत तिनं प्रसाद दिला.
इतका वेळ शब्द न बोलणारे विनायकराव ताड्कन उठले आणि प्रसाद गॅलरीतून बाहेर भिरकावून दिला ! आता पारिजात नावाची आई विनायक नावाच्या लेकराला सांभाळत होती.
तितक्यात ‘नाश्ता तयार आहे…!’ अशी वर्दी आली आणि आम्ही नाश्ता करायला आत गेलो. एखाद्या सुग्रणीला लाजवेल असे गोल फुलके अमोलनं बनवले होते. भाजी देखील बेफाट झाली होती. नाश्ता झाल्यावर पारिजात तयार व्हायला आत गेली. विनायकराव ‘मी खाली थांबतो’ म्हणून निघून गेले. अमोल तयार होऊन आला होता. मी अक्षरश: त्याचे पाय धरले. ज्या देशात काही चिल्लर पैशासाठी लोक पोरींना जाळतात, त्याच देशात हा ‘पुरुषोत्तम’ मी याची देही याची डोळा बघत होतो. अमोलनं मला वरच्यावरच उचलून घेतलं. आम्ही गॅलरीत आलो. 
“काका, हेच माझ्यासोबत झालं असतं, तर पारिजात देखील अशीच वागली असती. अहो आता तिचा एक हात गेला, म्हणून मी माझा एक हात घराला देतोय, इतकंच न! त्यात लोक मला देवता वगैरे का समजताहेत हे मला कळतच नाही. माझं हे वागणं नॉर्मल नाही का?”
“येस माय सन, अगदी नॉर्मल आहे!”
डोळ्याच्या कोपर्‍यातून मला बाहेर आलेली पारिजात दिसत होती. गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम पाळत तिच्या डोळ्यातून पाणी धो धो वाहत होतं. आता ती पण गॅलरीत आली होती. 
“काका, मी लग्नात कोणातही आहेर घेतला नाही पण आज तुझ्याकडे मागतेय.”
“बोल बेटा…”
“माझ्या बाबाला परत नॉर्मल करशील ना रे? हाच माझ्या लग्नाचा आहेर आहे तुझ्याकडून.” 
माझ्या डोळ्यात परत खळ्कन पाणी आलं.
“पारिजात, एक बाप आपल्या पोरीला जीवापाड जपतो. प्रेम करतो, हट्ट पुरवतो, कधी रागावतो तर कधी रुसून बसतो. हे सगळं करतो ते तिच्यासाठीच! अरे, तुला साधी चापट मारली म्हणून घरात ढेर झालेला हा आमचा शेर तुझ्या आईवर धावून गेला होता. इथं तर नियतीनं त्याच्या हृदयावर घण घातलेत. त्यालाही वेळ दे. त्याचे घाव खोल आहेत. इतक्या सहजासहजी नाही भरून येणार. पण माझ्याकडून मी संपूर्ण प्रयत्न नकीच करेन!” 
“मला काळजी वाटते रे पण!” 
“त्याची काळजी तू आता माझ्यावर सोपव आणि स्वतःकडे लक्ष दे!”
आम्ही निघालो. आता या गोष्टीला जवळपास चार वर्षं झालीत. विनायकराव फारसे नॉर्मल झालेले नाहीत. मी पण माझ्या अनेक गोष्टीत गुंतत गेलोय. सुना आल्या, नातू आला. नोकरी सोडली असली, तरी कामं भरपूर येतात अजूनही. जगभर भ्रमंती होते. नेहमीप्रमाणं माझा दौरा संपवून मी विमानतळावर अडनिड्या वेळी उतरलो होतो. रात्री दोन वाजता घरी पोहोचलो, तर अवघी अपार्टमेंट दिवाळी साजरी करत होती. 
आज विनायकराव स्वहस्ते जिलब्या बनवून सगळ्यांना पोट फुटेस्तो खायला घालत होते. माझ्या तोंडात देखील त्यांनी जिलबी कोंबली. मी त्यांना घट्ट मिठी मारून काही क्षण उभा राहिलो. माझ्या परमेश्वरानं विनायकाला त्याच्या घरात ‘रेणुका’ जन्माला घालून माणसात परत आणलं होतं…!!

- हर्षद शामकांत बर्वे, पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...