बुधवार, २ एप्रिल, २०२५

1827. मुलांची नांवं कशी ठेवावीत ?

कायप्पावर प्राप्त मूळ हिंदी पोस्टचं प्रकाश भागवत कृत स्वैर मराठी रूपांतरण -
मुलांची नावे ठेवण्याबद्दल समाजातल्या एका फार मोठ्या वर्गाला काय झालंय ते कळत नाही. असं वाटतं की जणू काही समाज पथभ्रष्ट व दिग्भ्रमित झालेला असावा. 
एका सद्गृहस्थानं आपल्या मुलांचा परिचय करून दिला आणि त्यानं सांगितलं की त्याच्या नातीचं नाव 'अवीरा' ठेवलंय, अगदीच हटके आहे.
अविरा चा अर्थ काय असं विचारल्यावर ते म्हणाले की याचा अर्थ बहादूर, ब्रेव्ह, कॉन्फिडेंशियल असा होतो. 
त्यांचं ते उत्तर ऐकून मला तर चक्करच आली. मी त्यावर कांहीच प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा ते मला म्हणाले, "तुम्हाला कसं वाटलं हे नांव? कृपया सांगा."  
म्हणून मग मी सांगितलं की बांधवा, अवीरा तर भयंकरच अशोभनीय नाव आहे, नको ठेवायला.
त्यांना सांगितलं की अवीरा म्हणजे.
१. ज्या स्त्रीला पुत्र आणि पति नाही. म्हणजेच पुत्र आणि पतीविहिन (स्त्री) 
2. स्वतंत्र असणारी (स्त्री), ती अवीरा. अशा स्त्रीबद्दल शास्त्रात म्हटलेलं आहे की.
 "नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः  सा अवीरा" 
त्यांनी मुलीच्या नावाचा अर्थ ऐकला तर बिचारे खजील झाले,  म्हणाले, "महोदय, काय करावे! आता तर शाळेतही हेच नाव आहे, जन्माच्या दाखल्यावरही हेच नाव आहे. आता काय करू शकतो?
आजकाल लोक काहीतरी 'हटके' करावं असा विचार करून काहीही अनर्गल करू लागले आहेत, जसं ...
-- मुलगी असेल तर मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा पासून तो अल्मायरा पर्यंत.. 
-- मुलगा असेल तर वियान, कियान, गियान, केयांश, रेयांश इत्यादि...
बरं या शब्दांचा अर्थ विचारला तर ? 
दे गूगल ...  दे याहू ...
आणि मग उत्तर मिळेल "It means ray of light" "It means God's  favorite",  "It means bla bla bla.."
हटके नाव ठेवण्याच्या या युगामध्ये एका सद्गृहस्थानं आपल्या मुलीचं नाव ठेवलं, "श्लेष्मा".
स्वाभाविकच हे नाव ऐकून मला तर धक्काच बसला होता. 
त्या धक्क्यातून बाहेर पडून मनात असा विचार केला की होऊ शकतं की एकतर मी चुकीचं नांव ऐकलं असेल किंवा या सद्गृहस्थाला या शब्दाचा अर्थच माहित नसू शकेल. म्हणून त्यांना पुन्हा विचारलं, "अच्छा? श्लेष्मा! याचा अर्थ काय होतो?"
तर त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं की "श्लेष्मा" चा अर्थ असतो "जिच्यावर आईची कृपा असते." मी माझं डोकं गच्च पकडून दहा मिनिटं मौन धारण केलं ! 
माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्या गृहस्थाला यात आपली कांहीतरी गफलत झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी मला विचारलं, "काय झालं? मी काही चुकीचं बोललो का?"
मी त्याला म्हटलं, "ताबडतोब त्या पोरीचं नाव बदला. कारण श्लेष्मा चा अर्थ शेंबूड असा होतो." त्यानंतर व्हायचं तेच झालं
हीच अवस्था आहे समाजातल्या एका फार मोठ्या वर्गाची. 
फॅशनच्या या युगात फॅन्सी, फाटलेले आणि अर्धनग्न कपडे नेसता नेसता अर्थहीन, अनर्थकारक, बेढंगी शब्दसमुच्चयांचा वापर समाज आपल्या कुलदीपकांच्या नामकरणासाठी करू लागला आहे.
अशास्त्रीय नाव केवळ ऐकायलाच विचित्र वाटतं असं नव्हे तर ते संबंधित बालकांच्या व्यक्तित्वावरही आपला प्रभाव पाडून त्याच्या व्यक्तित्वाचीही ऐशीतैशी करून टाकते. हा प्रभाव तात्कालिक म्हणता येईल परंतु भाषेची अशुद्धता, भाषेचा संकर आणि तिचं दारिद्र्य यावर पडणारा प्रभाव कायमस्वरूपी असतो.
आपल्या समाजात परंपरागत रूपानं नाव ठेवण्याचा अधिकार, आजी-आजोबा, आत्या किंवा गुरूंचा होता किंवा अजूनही कांही ठिकाणी आहे. हे काम त्यांच्यावरच सोडून देणं हितकारक असतं. 
तुम्ही जेव्हा आजी आजोबा व्हाल किंवा जर असाल तेव्हा हे कर्तव्य योग्य प्रकारे निभवून नेण्यासाठी तुमचं तुमच्या मातृभाषेवर किती प्रभुत्व आहे किंवा त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्ही काय काय करीत आहात यावर नक्कीच विचार करा.
अन्यथा भावी पिढ्यांमध्ये तुमच्या परिवारात देखील एखादी "श्लेष्मा" होऊ शकेल, कुणी अवीरा होऊ  शकेल.
शास्त्रांत लिहून ठेवलेलं आहे की व्यक्तिचं जसं नांव असतं, समाजात त्याच प्रकारे त्याचा सन्मान आणि त्याचं यश, किर्ती वाढविण्यात ते महत्वपूर्ण कारक होत असतं. जसं...
 नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। 
 नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत:  प्रशस्तं खलु नामकर्म। 
--{संदर्भ-वीरमित्रोदय- संस्कार प्रकाश}
 स्मृतिसंग्रहात सांगितलेलं आहे की व्यवहार, सिद्धि, आयु आणि ओज यांच्या वृद्धीसाठी श्रेष्ठ नांव असावं.
 आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । 
 नामकर्मफलं त्वेतत्  समुद्दिष्टं मनीषिभि:। 
-- नांव कसं असावं,
नांवाची संरचना कशी असावी या विषयी ग्रह्यसूत्रे तसंच स्मृती यांत विस्तृत रुपानं प्रकाश टाकला गेला आहे. पारस्करगृह्यसूत्र  १/७/२३ मध्ये म्हटलंय -
 द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। 
 दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।  अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम् ।। 
याचा अर्थ हा की.
बालकाचं नांव दोन किंवा चार अक्षरांनी युक्त असावं, पहिलं अक्षर घोष वर्ण युक्त वर्गाचं तिसरा, चौथा, पांचवा वर्ण, 
मध्य अंतस्थ वर्ण, य र ल व इत्यादि आणि नांवाचा अंतिम वर्ण दीर्घ आणि कृदन्त असावा तद्धितान्त नसावा
तसंच..
कन्येचं नांव विषमवर्णी तीन वा पांच अक्षर युक्त, दीर्घ आकारांत एवं तद्धितान्त असावं, जसं श्रीदेवी वगैरे.
 धर्मसिंधुमधे चार प्रकारची नांवं सांगीतली गेली आहेत. ..
१ देवनाम
२ मासनाम 
३ नक्षत्रनाम 
४ व्यावहारिक नाम 
त्यात असंही जोर देऊन म्हटल्या गेलंय की पत्रिकेतलं नांव हे रोजच्या व्यवहारातलं बोलतं नांव नसावं. जे नक्षत्र नांव असतं ते गुप्त ठेवायला पाहिजे कारण
जर कुणी आपल्यावर अभिचार  कर्म मारण, मोहन, वशीकरण इत्यादि वाईट हेतूंनी प्रेरित होऊन कार्य करायचं ठरवीत असेल तर त्यासाठी नक्षत्राच्या नावाची, म्हणजे जन्माच्या वेळच्या नक्षत्रानुसार नांवाची  आवश्यकता असते, व्यावहारिक नांवावर तंत्राचा परिणाम नाही होत. म्हणून जन्मपत्रिकेतील जन्म नांव गुप्तच ठेवायला हवं असतं.
शास्त्रांमध्ये असेही म्हटले गेले आहे की मुलाचं नाव मंगल सूचक, आनंद सूचक, 
बल रक्षा आणि शासन क्षमतेचं सूचक ,ऐश्वर्य सूचक, पुष्टि युक्त  अथवा सेवा इत्यादि गुणांनी युक्त असावं.
शास्त्रीय नांवांची आपल्या सनातन धर्मात बरीच उपयोगिता असते. माणसाचं जसं नांव असतं  तसेच गुण त्याच्या अंगी विद्यमान असतात वा ते विकसित होण्याची की संभावना प्रबळ असते. 
मुलांचं नाव घेऊन हाक मारल्यानं त्यांच्या मनावर त्या नांवाचा फार मोठा परिणाम पडतो आणि बहुधा त्यालाच अनुरूप अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडून घडू लागतं.
म्हणूनच नावात जर उदात्त भावना असेल तर मुलांमध्येही यश व भाग्य यांचा उदय होणं संभव आहे.
आपल्या धर्मात अधिकांश लोक आपल्या मुलामुलींची नावं देवाच्या नांवावरून ठेवणं शुभ समजतात जेणेकरून याच बहाण्यानं आपल्या तोंडून भगवंताचं नामही आपसूकच घेतलं जावं. तेवढंच नामस्मरणही होतं.
 भायं कुभायं अनख आलसहूं। 
 नाम जपत मंगल दिसि दसहूं॥ 
दुर्दैव हे आहे की आज पाश्चात्य सभ्यतेचं अंधानुकरण केलं जात असल्यानं नामकरण संस्काराचं मूळ रूप प्रायः समाप्त होऊ लागलंय. एकत्र कुटुंबात राहण्याची प्रथा आता जवळपास लुप्त होत आलेली आहे,  अन्यथा मला आठवतं की घराघरांमध्ये मुलांचं नाव ठेवण्याचा एक धार्मिक विधी होत असे ज्यात घरातले आजी, आजोबा, आत्या किंवा त्यांच्या गैरहजेरीत घरातील अन्य कुणी वरिष्ठ, मुलाला मांडीवर घेऊन, श्रीगणेशाचं स्मरण करीत, देवघरातली छोटी घंटी वाजवीत, मुलाच्या कानापाशी आपलं तोंड घेऊन त्याच्यासाठी निर्धारित केलेलं नाव त्याला ऐकवित असत जेणेकरून आपल्या स्वतःच्या नावाचा पहिला श्रोता, खुद्द ते मुलच राहील. (हा S.O.P. थोड्याफार फरकानं जवळपास सर्वच समाजात चालत असे.)
आता घरांमध्ये मोठ्या माणसांची उपस्थिती वा हस्तक्षेप नसल्यासारखाच झालाय आणि जर कुठे असलाच तरी त्यांनी सुचवलेलं नांव किंवा त्यांचं हे कोण ऐकणार? 
तरीही जर नव्या पिढीत कुणी तुमचं ऐकणार असे  तर त्याला हे नक्की सांगा की नांव तेच ठेवणं योग्य जे सकारात्मक आणि अर्थपूर्ण असेल, उल्हासमय असेल, ज्याचा सहज उच्चार करता येईल आणि जे सहज लिहिता येऊ शकेल, ज्यात ईश्वर आणि निसर्गातले विभिन्न सुंदर भाव समाविष्ट असतील वा जे त्या भावांचं प्रतिनिधित्व करणारं इत्यादि इत्यादी असेल ..
यातच भलाई आहे, यातच कल्याण आहे.

पोस्ट वाचल्याबद्दल आभार. जय श्री राम 🚩💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...