देवाला दिवा लावून त्याच्याकडे एकटक बघत रेवा बसली होती. त्याला केलेले दागदागिने अगदी मस्त चमकत होते. भरजरी वस्त्र देखील त्याला शोभून दिसत होतं. लग्नानंतर आपण प्रत्यक्ष बालाजीदर्शन घेतल्यावर म्हणालो होतो, “अगदी असंच प्रसन्न रूप असावं ना आपल्या देवघरात...!”
आणि तेव्हा सासूबाई म्हणाल्या होत्या, “अग मूर्ती अगदी अशीच आहे आपली ! घरची फक्त ह्याच्यासारखी रत्नजडित नाही बाई. साधी वस्त्र आहेत. जशी आमची परिस्थिती होती, तसं आम्ही मनापासून केलं. आता देव आले तुमच्या राज्यात तुम्ही ठरवा कसं ठेवायचं ते.”
आपण हसून म्हणालो होतो, “देव नाही आलेत आई आमच्या राज्यात; आम्ही आलोय त्यांच्या राज्यात आणि आपण काय ठरवणार त्यांना कसं ठेवायचं? त्यांनी दिलं त्यातलं त्यांनाही द्यायचं, ही जाणीव ठेवली की झालं. सगळं छान घडत जातं !”
आपलं उत्तर ऐकून नवरोबा अगदी खुश झाले होते आणि देवही खुश झाले बहुधा.
सासूबाई म्हणायच्या, “सुनेच्या पायगुणानं लक्ष्मी आली ग बाई.”
खरंच आपल्या पायगुणांन आली का लक्ष्मी? तसं असतं तर आजीला आपण घराच्या मागं टोपल्यात सापडलोच नसतो ना ! तिला नेहमीसारखा त्रास देणारा प्रश्न आताही पडला आणि परत आजीची आठवण येऊन ती लगबगीनं उठली. आजीला आवडत्या गायिकांचा कार्यक्रम आज ठरवायचा होता. गेल्या दहा वर्षांपासून आजी हे गाणं खूप मन लावून ऐकायची. आजीची पंच्याहत्तरी जोरात होणार होती. आजीच्या पोरी, पोरं, नातवंड आजीला सोन्याचे, हिऱ्याचे दागिने घेण्याच्या गप्पा मारत होते. महागातली पैठणी आजीसाठी बुक झाली होती. आपण दोन वेळा तयारी करण्यासाठी जाऊन आलो. तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी खवचटपणे विचारलं देखील होतं.
“काय घेणार आजीला…? तू तर बाई हिऱ्याचा हार जरी केलास तरी तुझ्यासारख्या अनाथाकडून आजीचं ऋण फिटणार नाही ! आजीनं सांभाळल म्हणून हे दिवस आलेत तुला.”
ही गोष्ट काही खोटी नव्हती. पण ती सतत ऐकवली जात असल्यानं रेवाला त्रास व्हायचा. खरं तर आजीनं तसं ऐकताच सगळ्यांना बोलून दाखवलं होतं.
“प्रत्येक जीव त्याचं आयुष्य घेऊन येतो. आपण निमित्त आहोत. मी नसतं उचललं टोपल्यातून हिला, तर आणखीन कुणी उचललं असतं ! आणि मीच हिला घडवलं असं नाही. तिच्याकडूनही मी खूप काही शिकले. तिला घडवताना मी देखील घडलेच ना !”
आजीच्या उत्तरावर सगळे गप्प बसले पण नातेवाईकच ते. एवढ्या सहज ऐकतील कसे? बारीक चिमटे काढतच होते. आपण मात्र आजीला युनिक गिफ्ट द्यायचं ठरवलंय ना, तेच करायचं, म्हणत रेवा बाहेर पडली. मधुराताईंना भेटून तिनं गाण्याची मागणी आणि वेळ कळवली. ताईंची फी तशी भरपूर होती पण त्या ‘फी’चा होणारा उपयोग रेवाला आवडला होता. कार्यक्रमाच्या मिळणाऱ्या पैश्यातला अर्धा हिस्सा अनाथाश्रमाला जात होता.
रेवानं विचारलं हिम्मत करून “मधुराताई तुम्ही का हे अनाथआश्रमाला देता?”
मधुराताई हसत म्हणाली, “कारण मी स्वतः ‘अनाथ’ म्हणून जगले. पण मलाही एका सद्गृहस्थानं मोठं केलं, माझ्यातला गळा ओळखून मला त्या क्षेत्रात उभं केलं. आज माझ्या गाण्याचं श्रेय त्यांना आहे. मी त्यांना काही देऊ इच्छित असले तरी त्यांना ते नको असतं. ते म्हणतात, ‘तू तुझं आयुष्य लिहून आणलं होतंस. देवानं आम्हाला फक्त निमित्त केलंय !’ मग मला वाटलं, अशा कितीतरी आयुष्यांना निमित्त होण्याची गरज आहे, म्हणून हे मानधन तिकडे जातं.”
रेवाच्या डोळ्यात हे सारं ऐकताना अश्रू होते. ते तिला पुसावे वाटलं नाही. ‘या नक्की’ म्हणत ती निघाली. आजी वाढदिवसाला अगदी बालाजीच्या रूपासारखी दिसत होती. कुणी भरजरी पैठणी, कुणी हिऱ्याच्या कुड्या, सोन्याची साखळी असं सगळं आजीला घातलं होतं. पण ‘काहीतरी मिसिंग आहे’ हे रेवाला जाणवत होतं. थोड्याच वेळात मधुराताई आल्या आणि त्यांनी आजीसाठी खास गाणं सादर केलं.
‘आयुष्याच्या या वळणावर
आनंदी ठेवा आपुले मन.
त्याची इच्छा असे म्हणून,
जगून घ्यावे एक एक क्षण.
आजीच्या डोळ्याला धारा लागल्या. आजपर्यंत ऐकायचो ती गायिका प्रत्यक्ष आपल्या समोर हे गाणं आपल्याला ऐकवतेय ! तिचा चेहरा एकदम उजळला. आता ती खरंच बालाजीच्या मुर्तीसारखी तेजाने उजळलेली होती कारण हे गाणं ऐकणं, जगणं ती प्रत्यक्ष करत होती आणि त्या सगळ्या कृतीला अहंकाराचा वारा लागू न देता ती म्हणत होती. ‘आपण फक्त निमित्त…!’
आता मधुराताई तल्लीन होऊन गात होत्या. त्यांच्या डोळ्यापुढं कदाचित ते अनाथ चेहरे आणि त्यांना मोठं करणारे सद्गृहस्थ येत असतील. कारण कडव्याची आर्तता काळजात जात होती. मैफिलीतला अंतरा रेवाच्या मनात उमटत होता.
‘कुणी कुणाला करत नाही मोठे,
जगण्याचा हक्क जीवाचा असतो.
घडत जाते आयुष्य ज्याचे त्याचे.
आपण मात्र निमित्त असतो.
आपण मात्र निमित्त असतो !’
- स्वप्ना मुळे (मायी) छ.संभाजीनगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा