गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

1850. मथुकाकी

 मथुकाकी जोशींना तुम्ही ओळखता का?
त्याच त्या… ठेंगण्या, गोर्‍या, सरळ नाकाच्या, घार्‍या डोळ्याच्या मथुकाकी जोशी. अर्थात तुम्ही कुणी त्यांना ओळखत असाल याची शक्यता कमीच आहे म्हणा, कारण मथुकाकींना जाऊनच दहा बारा वर्ष झालीत.
संगमनेरजवळच्या एका खेड्यातून अगदी लहानपणी लग्न होऊन त्या नाशिकात आल्या. त्यांचे वडील जवळपासच्या खेड्यांत भिक्षुकी करणारे, पूर्वीच्या प्रथेप्रमाणं गरीब बिचारे वगैरे ब्राह्मण होते आणि गरिबाला ईश्वर, संततीच्या रूपात अफाट संपत्ती देतो या नियमाला अनुसरून त्यांच्या कुटुंबानं सर्वात मोठी मथु आणि पाठोपाठ आणखी सहा मुली जन्माला घातल्या.
शेवटी, मुलाचं तोंड बघण्याची इच्छा मनांत बाळगूनच त्या माऊलीनं अखेरचा श्वास घेतला आणि उरावरील एक ओझं कमी होईल, या पवित्र उद्देशानं मथुकाकींच्या तीर्थरूपांनी त्यांना चौदाव्या वर्षी बोहोल्यावर चढवलं.
मी हे ऐंशी वर्षापूर्वीचं बोलतोय. अत्यंत लहान खेड्यातल्या भिक्षुक बापाची मुलगी नाशिकसारख्या गोदावरी तटावरील तीर्थस्थळी पडली आणि तिचं सात्विक, धार्मिक, रूढीवाद वगैरे गुण उत्तरोत्तर फुलत गेले.
लिहिण्या-वाचण्यापलीकडे शिक्षणाचा गंध नाही, आधुनिक जगाशी काही संबंध नाही आणि घराबाहेर पडण्याची परवानगी नाही, अश्या निपुत्रिक स्त्रीनं लहानपणी शिकलेले श्लोक, ऋचा, आर्या, अभंग आणि त्यातून मिळणारी शिकवण यालाच प्रमाण मानून दीड खोल्यांच्या भिंतीआड वर्षानुवर्ष संसार केला.
राहत्या घरापासून काळाराम मंदिराचा दोन किलोमीटर रस्ता मथुकाकीनी न चुकता रोज तुडवला आणि नवऱ्यानंतर उर्वरित आयुष्य जगायला किडूक मिडूक घेऊन आमच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या पुतण्याकडे येण्याचा निर्णय घेतला.
नारायण जोशी आज नाशिकचं एक बडं प्रस्थ आहे आणि त्यांची काकी म्हणून मथुकाकी साऱ्या गावच्या काकी झाल्या.
आम्हा मध्यमवर्गीयांची एक खास पद्धत असते… पेट्रोल परवडत नाही म्हणून आम्ही आठवडाभर दुचाकीनं कामावर जातो आणि पोर्चमधल्या कारला वाईट वाटू नये म्हणून रविवारी संध्याकाळी कुटुंबियांसोबत कारनं उगाचच पाच सात किलोमीटर फिरून येतो.
तर, त्या रविवारी गंमतच झाली… कारला मी स्वच्छ आंघोळ घातली, चकचकीत पुसलं, अगदी चाकं सुद्धा एका बोटाला कापड लावून स्वच्छ केली आणि तयार होऊन, कार फाटकाबाहेर काढून हीची वाट बघत उभा होतो.
एवढ्यात रस्तेवरच्या एका कुत्र्यानं कारशी लगट केली आणि माझ्या डोळ्यासमोर चाकावर तंगडी वर केली. एक तर सतत आवाज देऊनही बायको घरातून बाहेर निघत नव्हती आणि आता या कुत्र्यानं वाया घालवलेली माझी मेहनत… 
डोस्कंच फिरलं माझं. खाली पडलेला दगड उचलून मी कुत्र्याच्या दिशेनं भिरकावला. ‘क्यँव क्यँव’ करत कुत्रं पळून गेलं आणि अवचित माझ्यासमोर मथुकाकी येऊन उभ्या राहिल्या.
“दत्ताच्या एकवीस गुरुंपैकी एक गुरु आहे सर तो… त्याला मारू नये!” आपुलकीनं त्यांनी सूचना केली. मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांना नमस्कार केला. त्यांचं प्रवचन ऐकायची मनाची तयारी केली…
“काळभैरवाचं वाहन आहे तो! अहो, धर्मराजाला शेवटापर्यंत साथ दिली ती फक्त एका कुत्र्यानं. तो जवळ नकोसा वाटत असेल तर त्याच्यासमोर एक पोळी आणि वाटीभर दूध ठेवून त्याला मनोभावे नमस्कार की झालं. खाऊन पिऊन, खाली मान घालून निघून जातंय ते!” 
अथांग श्रध्देनं त्या बोलत होत्या आणि मी मान डोलावत होतो. ‘भावना पोहोचल्या, पुढील खेपेस असं वागायचा प्रयत्न करेन.’ असा त्या मान डोलावण्याचा अर्थ होता. 
नेमकं आताच बायको बाहेर आली, “काय मथुकाकी, कश्या आहांत?” म्हणत तिनं संवादाला तोंड फोडलं. मथुकाकींनी तिला मग भरपूर ज्ञानामृत पाजलं आणि अंधार झाल्यामुळं आम्ही पायीच जावून भाजी घेऊन आलो.
हळूहळू कळलं, मथुकाकींची ही श्रद्धा कुत्र्यापुरती मर्यादित नाही. रात्रंदिवस रवंथ करणारे आणि कुणाच्याही भाजीवर बिनदिक्कत डल्ला मारणारे चौका-चौकातले वळूसुद्धा रोज मथुकाकींची वाट बघत उभे असत आणि मथुकाकी समोर असताना टोपल्यात तोंड घालणाऱ्या वळूला मारायची परवानगी मंडईतील भाजीवाल्यांना नसे.
“अरे बाबा, मुका जीव आहे तो! तोंडाने मागेल काय? प्रत्यक्ष नंदीच आहे ना? तुम्ही शंकराच्या पिंडीला खाली वाकून नमस्कार करता आणि त्याच्या वाहनावर काठी उगारता? तुला रामराम घालून तुझ्या सायकलला कुणी तोडफोड केली तर चालेल का तुला?”
मथुकाकींचे एकापाठोपाठ एक प्रश्न यायचे आणि आधीच भाजीचं नुकसान झाल्यानं वैतागलेला भाजीवाला, ‘ही बाई इथून सरकली की या वळूची पाठ सडकून काढायची’ असं मनात ठरवून गप्प बसत असे.
मथुकाकींची प्राणीसेवा सकाळपासून सुरू व्हायची. आदल्या रात्रीच्या उरलेल्या दोन चार पोळ्या घेऊन त्या घराबाहेर पडायच्या. एका पोळीला बारीक कुस्करून, मुंग्यांची वारूळं शोधून तो चुरा त्यांना दिला, की मग गल्लीतल्या कुत्र्यांचा नंबर लागत असे.
रात्रभर भुंकून थकल्यानं नुकतंच झोपलेल्या कुत्र्यांना जागं करत हातातल्या पोळीचा तुकडा प्रत्येकाला देऊन झाल्यावर मग भटक्या गायींचा शोध सुरू व्हायचा… हे सर्व आटपलं की मगच मथुकाकी हात झटकत घरी जाऊन पहिला चहा घेत.
मथुकाकींच्या मेंदूतल्या संकल्पना निदान त्यांच्यापुरत्या तरी निर्विवाद होत्या. विज्ञानाचे शोध, अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे त्यांच्याकरता नव्हतंच मुळी. मध्यंतरी एका चतुर्थीला त्या आमच्याकडे बसून चंद्रोदयाची वाट बघत होत्या…
“दोन जिने चढून गच्चीवर जाता येत नाही आजकाल. नातूही मोठा झालाय, त्यालाही सारखं ‘चंद्रोदय बघून ये’ म्हणता येत नाही पुर्वीसारखं. तुमच्या गॅलरीतून कसा समोर दिसतो चंद्र.” त्या हिला सांगत होत्या आणि आम्ही चकीत होत होतो.
चंद्रोदयाची वेळ सांगणारी कितीतरी आयुधं आजकाल उपलब्ध आहेत. माझ्या बोलण्यानं त्यांच्या मानसिकतेत काहीही बदल होणार नाही, हे ठाऊक असूनही मी तोंड उघडलं…
“मथुकाकी, तुम्ही आपलं कालनिर्णयवर लिहिलेली चंद्रोदयाची वेळ बघून सोडा की उपास! त्यावर लिहिलेल्या वेळेवर होणारच चंद्रोदय.”
हा बिनडोक प्राध्यापक काहीतरी वेड्यासारखं बोलतोय अश्या समजुतीनं मथुकाकी हसल्या. मलाच समजावत म्हणाल्या,
“अहो सर, हे कॅलेंडर लिहिणाऱ्या बाबाला त्याच्या स्वत:च्या अस्ताची वेळ ठाऊक नाही आणि तो सूर्य-चंद्राच्या उदय-अस्ताची वेळ ठरवतोय? पूर्वी पंचांगवाल्यांनी प्रयत्न केला होता, चंद्राची गती ठरवायचा… तर रागावून चंद्रोदय झालाच नाही एका चतुर्थीला! शेवटी मीच बसले सहस्त्रावर्तनाला… म्हटलं, प्राण गेला तरी हरकत नाही पण मानवाच्या या ग्रहणातून चंद्राला सोडवायलाच हवं.
“दोन आवर्तनं झाली आणि नारायणचा मुलगा गच्चीवरून ‘आजी, चांदोबाची कोर दिसली मला…’ सांगत धावत आला. ऐकलं आणि रडूच कोसळलं हो मला! गणपतीला पेलाभर दुधाचा अभिषेक केला, मगच उपास सोडला साऱ्या भाविकांनी.”
आपल्या आजीच्या पोटात अन्न जावं या उदात्त विचारानं खोटं बोलणाऱ्या मथुताईंच्या नातवाचं कौतुक करावं की खरोखर चंद्र दिसतोय की नाही याची शहानिशा न करता नातवाच्या सांगण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणाऱ्या या आजीला दाद द्यावी, हेच मला कळेना.
या म्हातारीला आता कसं समजावू, हा विचार करतच मी मथुकाकींच्या मेंदूतली जळमटं काढायचा शेवटला प्रयत्न केला…
“अहो, तुमच्या त्याचा चंद्रावर खूप पूर्वीच जाऊन आलाय माणूस. दगड आणि माती याशिवाय काहीही दिसलं नाही तिथं!”
माझं वाक्य पूर्ण झालं नाही आणि मथुताईंच्या अंगावर शहारा आला. स्वत:च्याच गालावर त्यांनी चापट्या मारून घेतल्या. शक्य असतं तर त्यांनी ‘तौबा तौबा’ म्हटलं असतं. हे काय आक्रीत ऐकतोय आपण? असा त्यांचा एकूण आविर्भाव होता. कापऱ्या आवाजांत त्या म्हणाल्या,
“हे पण म्हणाले होते पूर्वी कधीतरी… ऐकून मला वाड्यातल्या विहिरीवर जाऊन आंघोळ करून ओलेत्यानं पाच वेळा रामरक्षा म्हणावी लागली होती. अहो, प्रत्यक्ष महादेवानं ज्याला माथ्यावर बसवलंय, त्या चंद्राला कुणी मानव पाय लावेल, त्या क्षणाला प्रलय आल्याशिवाय राहील का? तुम्ही शिकली सवरलेली माणसं, तुम्ही तरी असं अभद्र काही बोलू नये!”
त्या पट्कन उठल्या, गॅलरीत जाऊन बसल्या. त्यांनी डोळ्याला पदर लावलेलं मी आडून बघितलं.
नव्वदीलाही तरतरीत असलेल्या मथुकाकी एका रात्री शांत झोपल्या; त्या सकाळी उठल्याच नाहीत. कुणाला मागून मिळणार नाही असं मरण त्यांना लाभलं.
त्यांना जाऊन आता दहा बारा वर्ष लोटलीत… पण मी चुकून कधी सकाळी घराबाहेर फिरायला निघालो, तर आजही वारुळातल्या मुंग्या, गल्लीतली कुत्री, भटक्या गायी आणि चौकातले वळू त्यांची वाट पहात असतील, असं मला उगाचच वाटत रहातं.

— प्रा. डॉ श्रीकांत तारे
    9309731353

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...