मी गावी जात होते, रस्त्यात गाडी बंद पडली, आजूबाजूला कोणीच नाही. ड्रायवर मॅकॅनिक बघायला गेला. मी रस्त्यावर एकटीच होते. साधारण अर्धा तास झाला असेल, एक छोटा मुलगा गाडीकडे येतांना दिसला. तो जवळ आला. 8, 9 वर्षाचा असेल तो. कपडे फाटके होते अंगावर, पायात चप्पल नाही.
मी म्हणाले "कोण बाळा, तू कुठे राहतो?"
तर तो म्हणाला "मावशी मी तिकडे लांब वस्तीवर रहातो."
मी विचारलं "मग इकडे का आला तू" तर त्याने सांगितलं "माझी आज्जी आजारी आहे, तवा कोणी भेटतं का तिला दवाखान्यात न्यायला कोणी गाडी थांबवली तर आज्जीला घेऊन जाता येईल."
मला वाईट वाटलं, मी म्हणाले "थांब तू, माझी गाडी बंद पडली आहे, चालू झाली कि मी येते तुझ्या आज्जीला बघायला. मी पण डाॅक्टर आहे."
त्याला खूप आनंद झाला होता. माझा ड्रायव्हर मॅकनिक घेऊन आला, गाडी दुरुस्त झाली. मी त्या मुला बरोबर वस्तीवर गेले. एका छोट्याशा झोपडीत रहात होते. तीन छोटीशी मुलं होती. त्या मुलाला वडील नाही. आज्जी, त्याची आई आणि ही तीन मुलं.
मी आज्जीला तपासलं, औषध दिलं. "आराम करा, बरं वाटेल" असं सांगितलं. त्या पैसे द्यायला लागल्या. मी पैसे घेतले नाही, उलट मीच त्यांना पैसे दिले. दोन दिवसावर दिवाळी आली होती. त्यांच्या घरात साधे धान्य सुद्धा नव्हते. ते दिवाळी कशी करणार होते? फार वाईट वाटलं.
भरल्या डोळ्यांनी तिथून निघाले. तो मुलगा काय डोळ्यासमोरून जात नव्हता. पुढे एक गाव लागलं. मोठं होत गाव. तिथे कपड्याची दुकानं दिसली. कपडे घेतले त्या मुलांना, त्या दोघींना साड्या घेतल्या. पुन्हा माघारी जाऊन त्यांना दिलं सगळं तेंव्हा मनाला समाधान वाटलं. त्या मुलाने मला पाणी आणून दिलं मी पाणी पिले व त्यांना म्हणाले, "तुम्ही इथे काय काम करता? तुम्हाला शेती आहे का ?" तर त्या म्हणाल्या, "नाही, मोलमजुरी करून घर भागवतो."
मी त्यांना म्हणाले, "तुम्ही माझ्याकडे चला. माझ्या घरात, दवाखान्यात काम करा. मी राहायला एक रूम देते. मुलांना शाळेत घालू. मी करेल खर्च सगळा." त्यांना खूप आनंद झाला. येतो म्हणाल्या. मी बोलून निघाले. थोडं किराणा सामान दिलं. काही फराळ होतं गाडीत ते दिलं आणि निघाले.
दोन दिवस दिवाळीला थांबले व जातांना त्यांना दुसरी गाडी करून घेऊन गेले. दोन दिवस आराम करून काम समजावून सांगितलं. आज्जीची तब्बेत सुधारली होती. आज्जी घरात काम करून मुलं सांभाळायची. ती हॉस्पिटल मध्ये कामाला यायची. तिच्या मुलाला, म्हणजे रोहितला शाळेत घातलं. हळूहळू छान सूरू झालं. ती सांगेन ते काम करायची. कष्टाळू होती खूप. एक दिवस हॉस्पिटल मध्ये मी एकटीच होते अचानक एक डिलेव्हरी पेशंट आलं, मी तपासले तर अर्जंट सिझर करावं लागणार होतं. हाताखाली कोणीच नाही. मला थोडं टेन्शन आलं तर ती, म्हणजे सुनीता म्हणाली, "मॅडम मी मदत करते तुम्हाला."
मी म्हणाले तुला "कसं जमणार गं, तू शिकलेली सुद्धा नाही."
तेंव्हा तिने सांगितलं, "मॅडम मी B.S. C नर्सिंग केलेलं आहे. माझा जॉब होता. मी गायनिक कडेच होते. बरं आपण नंतर बोलू, आधी सिझर करून घेऊ."
मी विचारात पडले व ओटी मध्ये गेले तर सुनिताने सगळी तयारी चोख केली होती. मी ऑपरेशन केलं. बाळ सुखरूप जन्माला आलं. पण मला सुनीताचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
मी तिला बोलावलं व विचारलं "तू शिकलेली हुशार सिस्टर आहेस, मग असं राहणं का पसंत केलं ?"
तेव्हा ती म्हणाली, "मॅडम, मी जिथे नोकरी करत होते तिथेच माझे मिस्टर नोकरी करत होते. आमचं लव मॅरेज झालं होतं. संसार सुखाचा चालू होता. आई वडील येत जात नव्हते. तीन मुलं झाले तरी आले नाही. माझा नवरा एकटाच होता. सासूबाईंनी कष्ट करून मोठं केलं होतं पण नशीब माझं, कोरोना मध्ये नवरा गेला. घरची परस्थिती बिघडली.
मग गावाकडे येऊन राहिलो. घर नाही, शेती नाही. तिथलं घर होतं पण कर्ज खूप होतं म्हणून विकून कर्ज फेडलं. माझी सासूबाई काळजी करायची. मी म्हणाले "मी नोकरी करते. होईल सगळं ठीक. तर त्यांनी ऐकलं नाही. मला घेऊन गेल्या. आज सहावर्षं झाली, मी मोलमजुरी करून खात होते."
मग मी म्हणाले, "तू मला सांगितलं असतस तू नर्स आहे तर तुला नोकरी दिली असती ना. मग मी सांगितलेलं काम का केलंस तू ?"
तर सुनीता म्हणाली, "माझ्या सासूबाई म्हणाल्या होत्या तू पुन्हा नर्स चं काम करणार नाही. कारण माझा नवरा कोरोना मध्ये गेला होता. त्यांना मुलांची काळजी होती म्हणून त्या घाबरत होत्या. आज तुम्हाला मदतीची गरज होती म्हणून मी मदत केली. सासूबाई ला सांगू नका तुम्ही."
मी म्हणाले, "तसं नाही. तू एक हुशार नर्स आहेस. तुला मी नोकरी देते. त्यांना समजून सांगते. तुझ्या मुलांचं भविष्य घडवून छान पायावर उभं कर."
मी सुनीताच्या घरी गेले. त्यांना समजून सांगितलं व सुनीता जॉब करायला लागली. आज तीनही मुलं जॉबला आहेत. स्वतःच्या पायावर उभी आहेत. दिवस तर तिचे निघून गेले. मला ही पुण्य मिळालं तिचा संसार पुन्हा बसवला म्हणून. आनंदी आनंद झाला.
माझी गाडी बंद पडली म्हणून एक कुटुंब सुखी झालं. अविस्मरणीय अशी ती दीपावली ठरली.
©®सौ. वृंदा पंकज गंभीर 'दत्तकन्या'
पुणे, 8799843148
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा