कोणी ओरडणार नाही ना ?असा विचार करत दबकतच ती मोगऱ्याच्या झुडुपाजवळ येऊन पटपट फुलं तोडून ओढणीत घ्यायला लागली,.. तिची अगदी आवडती फुलं होती हि,.. पलीकडच्या अपार्टमेंट मध्ये आत्याकडे राहायला आल्यापासुन गॅलरीतून तिचं ह्या झुडपावर लक्ष होतं,..खरंतर आता डोक्यात माळलं तर रागवतील आत्या मामा ह्या भीतीने तिने ते ओढणीतच बांधले,..हॉलमधल्या कृष्णाला हार करू म्हणजे घरभर दरवळ राहिल आणि आपल्याला त्या सुगंधाची सोबत...ती फुलं तोडतच होती आणि तिला हाक आली," अग आतून येऊन घे बघ भरपूर कळ्या आहेत आतून,.."
ती एकदम गडबडली चोरी करताना पकडल्या गेलो आपण,..पण हि तर ऑफर आहे,..तिने गेटमधून डोकावलं तर छोट्याश्या आजी झाडांना पाणी देत होत्या,..तिला बघून गोड हसल्या,..."हे बघ आतमधुन पण मोगरा तेवढाच बहरला आहे,..घे ना.."
ती हसु कि नको आणि घुसू कि नको या विचारातच होती की आजी परत म्हणाल्या " ये ग मी मुद्दाम हे रोप बाहेरून लावलंय,.. तुझ्या वयात असताना मलाही मोगरा आवडायचा पण दोन कळ्या कोणी तोडू द्यायचं नाही वसकन अंगावर यायच्या बायका तेंव्हा ठरवलं नवऱ्याच्या घरी जर जागा असेल तर असे रोप लावायचे कि सगळ्यांना फुलं मिळावे,...पण तुला सांगू आजकाल अशी चोरी करायला कोणी येत नाही,... विकतच्या आणि घरपोच फुलपुड्या घेतात ती बिनवासाची फुलं एकदाची देवावर टाकतात,...झाले मोकळे...मी ह्या सोसायटीत पन्नास वर्षे झाले राहते कोणी येत नाही फुलं तोडायला,..अर्थात त्याची कारणही वेगळी आहेत तू नवीनच दिसतेस ये बैस इथे,...मृण्मयीने भोवताली नजर टाकली छोट्याश्या जागेत फार सुंदर बाग सजवली होती आजींनी,..आणि हिरव्यागार गवतावर टांगलेल्या झोपाळ्यावर बसायला त्यांनी तिला खुणावलं ती दबकत गेली आणि जरा अवघडून बसली,..तश्या त्या आजीने ,"रमा चहा कर माझी नवीन मैत्रीण अली आहे असं खिडकीतून आत डोकावून सांगितलं ..आणि वळत म्हणाल्या,"काय नाव तुझं आणि इकडे कुठे आलीस?"आजी मी मृणमयी पलीकडच्या अपार्टमेंट मध्यें लिमये आहेत ना त्यांच्याकडे आले त्या आत्या आहेत माझ्या त्यांचं गुढग्याचं ऑपरेशन झालं त्यांना महिनाभर मदत म्हणून आले,....
हो का छान,.. काही शिक्षण सुरू आहे का,..?नोकरी??त्या विचारसारशी कोणीतरी आपली ओळख विचारून खपली काढल्यासारखं तिला वाटलं,..पण हल्ली ती काही लपवत नव्हती,..ती स्पष्ट म्हणाली,"आजी मी विधवा आहे,..लग्नापूर्वी बलात्कार झाला म्हणुन आई वडिलांनी नीट चौकशी न करता लग्न उरकलं तर तो आजारी होता वर्षभरात सगळं आटोपलं,..
आता जड झाले माहेरी मग कोणाचे असे अडचणीचे दिवस काढायचे असले कि मी ठरलेली आहे,..कोणाच बाळंतपण, कोणाच लग्न असलं की मी सगळ्यांसाठी हक्काची कामवाली आहे,...सगळं बोलून मृण्मयी रडायला लागली,..खुप दिवसांनी असं कोणीतरी तिला विचारत होतं तिच्या जगण्याविषयी,...आजीने तिच्या पाठीवरून हात फिरवला,...तिला रडू दिलं,.. आजी म्हणाली,"घटना घडतात पण आपलेच लोक आपल्याला दोषी समजून वागवतात त्याच जास्त दुःख असतं,... माझ्याही मुलीने पळून जाऊन लग्न केलं,... तो दुसऱ्या जातीचा,...शेवटी ह्या गाठी वरच बांधलेल्या होत्या तिच्या जाण्याने माझ्या आईपणावर खुप तोशेरे ओढल्या गेले,....मला तेंव्हा समाजाचा आणि आपल्याच लोकांचा खुप त्रास झाला,...पण स्वतःला समजावत राहिले,...हि वेळ निघून जाईल हळूहळू सगळं शांत होईल,..तसंच झालं पण काळाने लेक जावाई अपघातात गेले आता तिचा लेक माझ्याच कडे आहे,...पण आता समाज त्याला स्वीकारत नाही अजून लग्न नाही होत,...आजोबा बेडरिडन आहेत,.. मी ह्या बागेत मन रमवते,... ह्या झाडांना जगण्याचं ध्येय बनवलं,..त्यांनी फळं, फुलं दिले कि आनंद मानायचा,.. पण आज मला खुप आनंद झाला हं माझ्या मोगऱ्याला चोरण्यासाठी कोणीतरी आलं,..दोघींचा चहा झाला आणि इथे आहे तो पर्यंत रोज फुलं घ्यायला येण्याचं एकमेकींना प्रॉमिस पण झालं,...मृणमयी तिथून निघाली आपल्या आवडत्या कळ्या तिने कोणी बघत तर नाही असं करत रबरात खोचल्या आणि ती वेणी नाकाशी धरत तिने भरभरून गंध घेतला आज खुप दिवसांनी कुणीतरी आपुलकीने चौकशी केली आणि मोगऱ्याची फुलही भरभरून मिळाली ती अगदी खुश होती,...घराजवळ येताच तिने वेणीतली फुलं काढून टाकली,..कृष्णाला सुंदर हार करून घातला,..घरभर त्याचा सुगंध पसरला होता,...
फुलं आणायला जाणं आता रोजचंच झालं होतं,..आजीशी मनमोकळं करून तिला छान वाटायचं,..लहान वयात आलेल्या ह्या प्रसंगांनी तशी ती खचलीच होती,..फारसं शिक्षण हातात नव्हतं पण हातात कौशल्य होतं,.. सुरेख रांगोळ्या काढायची ती,..पण हल्ली काहीच केलं नव्हतं फक्त दुसऱ्यांचे अडले नडले दिवस काढून देणारी ती एक विधवा होती तिला मन,भावना आहेत ह्याचा कोणीही विचार करत नव्हतं,..आजीने हेच हेरलं,..तिलाच तिची आवड विचारून आजीने अटच टाकली रोज एखादी रांगोळी माझ्या अंगणात काढायची रंग,रांगोळी मी देईल चांगली मोठी काढायची अंगणात,..तरच मोगऱ्याला हात लावायचा,..
रोज अंगण छान छान रांगोळ्यांनी सजायला लागलं,..आजीचा नातू ऑफिसतुन येईपर्यंत अंगण सजलेल असायचं,..तो रोज त्याचे फोटो काढून आपल्या फेसबुकवर टाकायचा,.. त्याला अनेकजण कमेंटमध्ये विचारायला लागले कुणाच्या ह्या रांगोळ्या??,..खरंतर त्यानेही आजीला विचारलंच नव्हतं ह्या सुंदर रांगोळ्या कोण काढतं???आज तो म्हणालाच," आजी अग ह्या रांगोळ्या कोण काढतं अंगणात,??"..आजी म्हणाली,"स्वतःच्या आयुष्याचे रंग हरवलेली माझी एक मैत्रीण,..जी लहान आहे रे खुप पण आयुष्यांच्या अनुभवाने खुप मोठी आहे,..तिलाच तिची ओळख करून देण्यासाठी हा सगळा घाट आहे रे म्हणत आजीने तिची सगळी कथा सांगितली,..रांगोळीतुन आणि आजीच्या सांगण्यातून त्याच मन नकळत वेडावलं तिला बघण्यासाठी त्याने ठरवलं उद्या सुट्टी घेऊन बघायचंच तिला,..वरच्या खोलीच्या खिडकीत तो बसून राहिला,..ती आपल्या लांब वेणीचा झुबका सावरत भरभर रंग भरून आयुष्याला आटोक्यात आणणाऱ्या रेषा आखत होती,..त्याने ठरवलं आजीला सांगुन विचारायचं हिला,.."आपल्या आयुष्यात रंग भरायला येशील का,..?"
ती जाताना टोपलीभर मोगरा घेऊन गेली जाताना तो बघतच होता तिला,..दोन फुलं वेणीत खोचून त्याचा मनभरून गंध घेत ती गेली,.. तिच्या घरापर्यंत अल्लड मुलीसारखी उड्या मारत तो गंध घेत आणि घर येताच सावरली अगदी प्रौढत्व पांघरून शिरली घरात,.. त्यालाच ते बघून वाईट वाटलं,..तो खाली आला आजीशी त्याने विषय काढला,..त्यावर आजी म्हणाली,"अरे बलात्कार आणि विधवापन अशी दोन्ही पदं घेऊन जगणारी ती अशी कशी स्वीकारायची?"नातवाने आजीच्या हातावर हात ठेवला,.."आजी सगळी आयुष्य सरळ रेषेतली नसतात ग,..तू माझ्या आईमुळे बरंच काही सोसलं,..आईचं आयुष्य वेगळंच होतं,.. कारण नसताना जातीपातीत अडकून मला सगळयांनी वाळीत टाकलं आहे,..तू खम्बीर होऊन साथ दिली म्हणून नाहीतर माझं काय झालं असतं,..?तसं आता त्या मुलीच आयुष्य आहे तू विचारून तर बघ,..?
आजीच्या डोळ्यात पाणी आलं,..तरुण मुलगी गेल्यावर ह्या नातवाने नव्याने जगणं शिकवलं होतं आजीला,..समाज कसाही वागला तरी आपला आनंद हरवू द्यायचा नाही आजी,...नातेवाईकांनी नाही विचारलं तरी आपल्या हिमतीवर लोकं जोडले होते त्याने,..."माणसं जमवणं आणि माणसं जगवणं".. हे तर ध्येय होतं त्याच म्हणून तर ह्या लहान वयातही त्याने अनाथालय काही मित्रांना घेऊन सुरू केलं होतं..खरंच हिची साथ चांगली मिळेल तिचंही आयुष्य छान होईल आजीला विचार पटला,.. आजीने ठरवलं विचारू तिला,..
दुसऱ्या दिवशी आजीने नातवाचं मत तिला सांगितलं,...तशी ती काही क्षण शांतच होती,..मग म्हणाली,"आजी मला वाटत नाही मला कोणी स्वीकारेल कारण मला माझ्याच नातेवाईकांनी बोलून बोलून शब्दांनी इतकं मारलं आहे कि मी आंनदी, छान जगण्याची आशा सोडली आहे,...आणि मला नाही वाटत मला घरून होकार देतील,..माझी इच्छा आहे कोणी साथ दिली तर नवीन आयुष्य जगण्याची पण शेवटी आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपण नाही घेऊ शकत ना,..आजी म्हणाल्या,"बघ विचारून पण थोडी खम्बीर पण हो शेवटी हे सगळे नसतात ग आपल दुःख वाटून घ्यायला,..तिला आज मनातुन आनंद देखील वाटत होता,..माझं एवढं सगळं माहीत असून माझ्या कलेवर प्रेम करणारा जोडीदार मला भेटेल,..पण घरी,..?तिने येताच आत्याला सांगितलं,..आत्या म्हणाली,"आम्ही कोण सांगणार,..आणि माझ्या घरी राहून हि ग काय थेरं तुझी??वेणीत फुलं कशी काय खोचली,..?विधवेने कशाला लावावं फुल ? म्हणत मला एक छान गजरा कर अस सांगत सत्तर वर्षाची आत्या लंगडत लंगडत गॅलरीत गेली,..मृणमयीने पटकन वेणीतली फुलं काढून फेकली तिला अगदी जोरजोरात रडावं वाटत होतं,.. तुम्हाला सत्तरीत ही गजऱ्याचा मोह मग मी तर फक्त पंचविशीत मला नको का आयुष्यातले सुगंधी क्षण,..?तिने निर्धाराने डोळे पुसले आणि वडिलांना फोन केला,.."मी लग्नाचा निर्णय घेतलाय एवढंच बोलली,..त्यांनंतर फक्त शिव्या,श्राप तिला ऐकू येत होते,..शेवटचं वाक्य होतं" तू आम्हाला मेलीस मग,.."तिने फोन ठेवला..तसंही ती सगळ्यांसाठी मेल्यासारखीच होती,..तिने आपली बॅग भरली,..आत्या मामाला नमस्कार करून निघाली,..
मी मोगऱ्याची फुलं घेऊ का? माझं ना लग्न ठरलं आहे ह्या मोगऱ्याच्या साक्षीने गेट मधुन असं तिने आजीला विचारलं आणि आजी आनंदून गेली तिने चटकन औक्षणाचं ताट आणून तिला आत घेतलं,..दोन दिवसात घरात लग्नसोहळा अटपला...नातेवाईक सोडून जुळलेली माणसं आनंदाने शुभेच्छा देऊन गेली,..ती आता रोज मोहक रांगोळ्या काढते पण एकटी नाही तीस एक अनाथ मुलांना घेऊन,..आणि आजी तर माझ्या मोगऱ्याला हक्काची मालकीण आली आनंदाने सुगंध घेणारी म्हणत रोज ताजे गजरे बनवून देते तिला.
"दुःखाच्या आयुष्यात मोगरा तितक्याच ताकदीने दरवळतो म्हणून तर आयुष्य सुगंधी होतात असं म्हणत आजीचा नातू गालात हसतो..."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा