शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

680. जीवन गाणे

"आदित्य.., ए आदित्य, आदित्या..."
"काय आहे गं" laptop वरून लक्ष न हटवता आदित्य बोलला.
नेहा स्वतः बनवलेला एक नवा पदार्थ खूप आनंदात घेऊन आली होती आदित्यला प्रेमाने भरवण्यासाठी. पण आदित्यच नीट लक्षच नव्हतं. नेहा हिरमुसली.
       आदित्य नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत असलेला एक software engineer होता. आदित्य नेहा ला वेळच देऊ शकत नव्हता. घरी सुद्धा तो ऑफिसची कामं करत बसलेला असायचा. नेहाशी त्याचं एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण अजूनही ते दोघे जणू एकमेकांना अपरिचितच होते आणि औपचारिक बोलायचे. आदित्य दिवसभर स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त असायचा.
      त्या दिवशी नेहाला अशीच अचानक चक्कर आली. त्याने तिला घाईघाईत डॉक्टर कडे नेलं. आदित्यची मावशीच डॉक्टर होती. रिपोर्ट आले तेव्हा त्याला समजलं की नेहाला कॅन्सर आहे. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
      मावशी ने त्याला धीर दिला आणि नेहाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सांगितल्या, आणि ही गोष्ट तिला समजू देऊ नकोस हे बजावून सांगितले. नेहाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असं त्याने ठरवलं.
     आदित्य ने नेहा ला तीने घरात जास्त काम केल्यामुळे चक्कर आली असं सांगितलं. तसंही मध्ये दोन चार दिवस त्यांची कामवाली बाई आली नव्हती. तिच्या इच्छा जाणून घेण्याचा हेतू ने म्हणाला, "म्याडम, गेली चार दिवस आपण आपल्या घरी एवढी काम केली कि आपण आजारी पडलात, तर आता बोला कि मी आपली काय सेवा करू?.... काय हवं आहे तुला माझ्या कडून ?"
"मला काहीच नको... आपल्याच घरासाठी तर आपण करतो ना.."
"... बक्षीस म्हणून... भरपूर काम केल्याचं..."
"हे काय... काहीतरीच.."
"बोल ना गं, माझ्यासाठी, मला बरं वाटेल, मी तुला तुझ्या आवडीचं काही दिलं तर..."
'मला जे हवं आहे ते तर तुम्ही मला कधीच देत नाही..', नेहा हळूच पुटपुटली तरी आदित्य ला ऐकू गेलंच.
"मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन, अगदी सर्व, बोल तर तू..." 
    आज आदित्य पहिल्यांदा नेहाशी एवढं मनापासून बोलत होता, नाहीतर एरवी ती बोलायची आणि तो हो किवा नाही मध्येच उत्तर द्यायचा. नेहाला हे फारच मस्त वाटलं. तिने त्याचा वेळ मागीतला. तिला फक्त हवं होतं त्याच्या सोबत एकत्र वेळ घालवणं. आदित्यला वाटलं होतं हीची एखादा दागिना वगैरे घ्यायची इच्छाअसेल. पण खरचं एक वर्ष होऊन ही त्याने तिला ओळखलं नव्हतं. त्याला कधी कळलंच नाही कि नेहा ला दागिन्यांचा सोस नाही, फक्त हवं आहे त्याचं प्रेम. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता डॉक्टरकडे जायचं होतं. नेहासाठी त्याने खास सुट्टी काढली होती. डॉक्टरकडे जाण्याआधी आदित्य तिला चौपाटी वर घेऊन गेला. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघे हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर फिरत होते. नेहा खूप खुश झाली. दोघे एकत्रच फिरत होते. फक्त दोघेच. त्यात त्यांच्या मध्ये तिसऱ्याचं कामच न्हवतं. नेहा तर आकाशातच जाऊन पोहोचली. सकाळ ची शुद्ध हवा होती, पक्षी नुकतेच उठून किलबिल करत होते, पायाखाली मऊशार वाळू आणि पायांना होणारा लाटांचा स्पर्श. आज तो पहिल्यांदा नेहा ला एवढं जवळून आणि खूश असलेलं बघत होता. आज  त्याने तिचा अवखळपणा पाहिला, तिच्या गालावर पडणारी खळी, तिचा तो बालीशपणा, आणि लग्नानंतर पहिल्यांदाच जणू तो बायकोच्या (Love At First Sight) प्रेमात पडला होता. 
      संध्याकाळी सुद्धा तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला व रात्री कॅन्डल लाईट डीनरसाठी. आणि जेव्हा त्याने नेहाला सांगितलं कि त्याने दोघांसाठी महाबळेश्वरची तिकीट बुक केली आहेत, तेव्हा तर नेहा नाचायची बाकी राहिली होती. त्याने ते आठवडाभराचे दिवस फक्त नेहा साठी राखून ठेवले होते आणि त्याने या काळात ऑफिसचं कुठलंच काम केलं नाही. फक्त ती आणि तो. आणि हे सुद्धा तो फार मनापासून करत होता. तो हि प्रेमातच पडला होता जणू तिच्या. तो पूर्ण आठवडाभर दोघं एकमेकांसाठी जगले. पण त्याला आत्ता कुठे  त्याचे प्रेम गवसले होते आणि येथे तर तिच्या निरोपाची वेळ जवळ आली होती. फार कठीण होते हे सर्व त्याच्या साठी. दिवसभर तिच्यासोबत आनंदी राहून मनातून तो फार तुटत होता. अपराधीपणाची भावना त्याला बोचत होती.   महाबळेश्वरवरून आल्यावर नेहा स्वयंपाक घरात काही तरी करत होती. आदित्य बाहेर नेहा चा विचार करत बसला होता, आणि अचानक काही तरी पडण्याचा आवाज आला. आदित्य ने स्वयंपाक घरात धाव घेतली. नेहा खाली पडली होती. तिच्या डोकातून रक्त येत होतं. ती बेशुद्ध झाली होती. आदित्य ने तिला डॉक्टरकडे नेलं.   आदित्य इस्पितळाच्या बाहेर बाकड्यावर बसून अश्रू ढळत होता. त्याची मावशी त्याच्या जवळ आली. प्रेमाने त्याचा डोक्यावरून तिने हात फिरवला. 
      आदित्य ढसाढसा रडू लागला. त्याने मावशी जवळ आपले दु:ख व्यक्त केले आणि कबुल केले कि, आधी नेहा ची इच्छा असूनही त्याने तिला कधी वेळ दिला नाही आणि आता त्याला तो द्यायचा आहे तर नेहा कडे वेळ राहिला नाही. आदित्य आतून पार तुटून गेला होता, विखूरला होता. नेहा समोर खुश दिसण्याचा त्याचा मुखवटा मावशी जवळ गळून पडला होता. 
      आदित्यचे दु:ख पाहून मावशी फार कष्टी झाली आणि म्हणाली,
"मला कल्पना होती तुमच्यातील आधी असलेल्या नात्याची. आता तू जेवढा दुःखी आहेस तशीच नेहा पण दुःखी होती. तू तिला वेळ देऊ शकत नव्हता.
      आदित्य, आपण जे काही कमावतो ते आपल्या आनंदासाठीच ना? काम करणं हे गरजेचंच आहे, पण म्हणून आपण आपले जगणं हरवून बसून काम करणं कितपत योग्य आहे? यशस्वी बनण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी आपण जीव तोडून जरूर काम करावं, पण म्हणून आपण आपले आनदांचे क्षण मात्र व्यर्थ वाया घालू नये. कामासाठी आपण नसतो तर आपल्यासाठी काम असतं. देवाने हे सुंदर आयुष्य आपल्याला आनंदाने जगण्यासाठी दिलं आहे. आनंदाने जगावे आणि दुसऱ्यांच्या जीवनात पण आनंद द्यावा.... माझा फक्त हाच हेतू होता कि... तुम्ही दोघांनी आनंदाने जगावं.  मला माफ कर आदित्य.... पण मी... खोटं बोलले तुझ्याशी... नेहा ला कॅन्सर नाहीये. तिला पहिल्यांदा नॉर्मल चक्कर आली होती, स्ट्रेस मुळे. तू तिला वेळ देत नाही त्या स्ट्रेस मुळे आणि नंतर हि चक्कर आली ती स्वयंपाक घरात पडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ती टेबल वर आपटली म्हणून तिच्या डोक्यातून रक्त आलं. खरंतर काळजी करण्यासारखं सुद्धा काहीच नाही. ती ठीक आहे."
       हे ऐकून आदित्यला खूप आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला. त्याला मावशीचा मुळीच राग आला नाही. तो खूप आनंदला. कारण हि तसंच होतं. एकतर नेहा त्याला सोडून कुठेच जाणार नव्हती, आणि मावशीवर रागावण्याचा प्रश्नच येत नव्हता. मावशी ने असं केलं नसतं तर आज हि तो आणि नेहा एकमेकांसाठी उपरेच राहिले असते. त्याने मावशींचे खुप खूप आभार मानले.
      मावशी ने त्याला सांगितले, "नात्यामध्ये नेहमी असंच होतं, काही अनपेक्षित घटना घडली कि ते नातं जास्त खुलतं. जोडीदाराला हवी असते फक्त साथ. या धकाधकीच्या जीवनात आपण खूप काही गोष्टी मिस करतो. आपलं प्रेम आपल्या जवळच असतं, पण आपल्याला ते बघण्याची दृष्टी असावी लागते."
     दवाखान्यातून मलमपट्टी करवून आदित्य व नेहा घरी परतले. आता कामातून वेळ काढून तो नेहासाठी देऊ लागला व त्यांच्या जीवनात आनंद बहरला. 

लेखक- अनामिक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...