शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

678. शाळा सुटता, पुस्तक मिटता, दिवाळीची सुट्टी लागता...

 प्रिय रसिक वाचकांनो, 
           आपण सर्वांना दीपावलीच्या आनंददायी पर्वाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा.
           आपल्यापैकी आई, बाबा, आजी, आजोबा अन इतर सर्वाना प्रेमळ प्रणिपात, नमन आणखीन खूप खूप शुभेच्छा, मात्र अजून एक नम्र निवेदन, तुमच्या घरातल्या छोट्या मंडळींना साष्टांग नमस्कार, विचारा असे का? शेवटपर्यंत माझे म्हणणे ऐकल्यावर तुम्हाला ना हे आपोआपच कळेल.
           शाळकरी मुलांची कुठलीही सुट्टी, म्हणजे पालक किंवा तत्सम मंडळींचा बहुदा घातवार असेल असा अलिखित नियम असावा! अन त्यात एक महत्वाची सुट्टी म्हणजे दिवाळी व्हेकेशन! आजकाल ‘नेमेचि येतो पावसाळा’ असे नसून ‘केव्हाही येतो पावसाळा’ असे अनुभव येत असतात! त्याचप्रमाणे आपल्या देशात इतक्या सुट्ट्या का दिल्या जातात हा प्रश्न अत्यंत वाजवी आणि समयोचित आहे! कारण आपल्या देशाची ‘सुट्ट्यांचा देश’ म्हणून ख्याती आहे. प्रिन्सिपॉल आणि शिक्षक तर अशा सुट्ट्या देण्यास सदैव तत्पर असतातच आणि त्यातच कधी कधी धक्के तंत्र वापरीत अनपेक्षितपणे कोरोनाचा पर्मनन्ट वरदहस्त लाभल्यागत ऑनलाईन वर्गांचे आयोजन करीत असतात. पण मंडळी, आता प्रिन्सिपॉल आणि शिक्षक यांचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल की नाही? त्यांना देखील ब्रेक हवा, त्यांना पण घरची आणि अवांतर कामे असू शकतात, हे लक्षात घ्याल की नाही! ती मंडळी या निमित्याने त्यांच्या मुलाबाळांच्या सुट्टीचे व्यवस्थापन करणार की नाही! म्हणून एरवी शाळेत धुमाकूळ घालणाऱ्या मुलांच्या समस्त घराला सुट्टीच्या काळात  मुलांचा ब्रेथलेस परफॉर्मन्स बघणे हे कंपलसरी असते. शाळेत नियोजनबद्ध गोष्टींसाठी नियत अवधी असतो, मात्र शाळा नसेल तर हे नियोजन नसणार हे ओघाने आलेच, मग आपल्या घरात असे सुसंवाद घडत असतीलच. 
पहिले बालक, "ए ममा, उद्या सकाळी उठवू नकोस प्लीज़, मी उठेन तेव्हा उठेन, म्हणजेच कदाचित दुपार होईल, अगदी नरकचतुर्दशी का असेना!"
दुसरे बालक, "मम्मी, आज ऑफिसला जाऊ नकोस. घरीच मस्त वेळ घालवू, म्हणजे तू मस्त काही बाही कुकिंग कर अन मी खाईन. मित्रांनो यात चकल्या, शेव, चिवडा, कडबोळी, झालच तर गेला बाजार आपल्या वेळी फक्त दिवाळीत मिळणाऱ्या लाडू, अनारसे, शंकरपाळी, चिरोटे सारख्या ट्रॅडिशनल किंवा पुरातन डिशेसचा समावेश संपूर्णपणे वर्ज बरे का!  
एक चिरंजीव बच्चू, "मॉम, आज जरा घर नीट आवरून ठेव, अन मस्त स्नॅक्स, कोल्ड-ड्रिंकचे प्रिपरेशन कर, अर्थात पिझ्झा, बर्गर अन पास्ता! माझे फ्रेंड्स येणार आहेत अन आम्ही एन्जॉय करणार आहोत"
एक चिरंजीवी बालिका "ममा, आत्ता कुठे सुट्टी लागली, अभ्यास करून कंटाळा आलाय, मी आधीच सांगते, मी जरा रिलॅक्स होणार आहे. म्हणजे दिवाळीच्या आधीची साफसफाई, पंखे पुसणे, जाळी काढणे इत्यादी कामाच्या यादीत मला इन्क्लूड नको करू हां!
एक अत्यंत दयाळू लेकरू बघा काय म्हणतय, "आई ग! आज तू दमली असशील ना दिवाळीची साफसफाई अन फराळाचे करून! आता ना तुला किचनपासून सुट्टी! कित्ती करतेस ग आमच्यासाठी, आज तू आराम कर बरं!” आईला वाटतंय ‘आज ही पोरं माझ्यासाठी स्वयंपाक करणार!’ पण कसले काय, पोरांची तयारी झाली पण. कशाची म्हणताय? मेनू पण ठरलाय! अहो, बाहेर महागड्या हॉटेलमध्ये मेक्सिकन अन थाई फूड हादडायला तयार झालीत की पोरं . पोरांचे डॅड आहेतच कार ड्राइव्ह करायला अन बिल पेमेंट करायला! डॉक्टर मीना श्रीवास्तव 
           मी आता या क्षणी फ्लॅश बॅक मोड मध्ये गेले मंडळी! नवरात्रीचे पावन पवित्र नऊ दिवस अन थोडे थोडके नाही तर एक महिना मोजून भुलाबाईच्या गाण्याचे दिवस! सांगता असायची कोजागिरी पौर्णिमेला! त्या एक महिन्यात आमचे डिनर बाहेरच असायचे, भुलाबाईची गाणी म्हणतांना दमछाक होऊन नये म्हणून घरोघरीच्या आया फार सजग असायच्या. पोटभरीचा मेन्यू रिपीट व्हायचाच नाही. आम्ही पण अधाशासारखे वर्षभराची बेगमी करत या काळातील चांगलेचुंगले फराळ कम जेवण हादडायचो!
        प्रत्येक घरात आईला मात्र लय काम पडायचं. आम्ही शहरात राहायचो, त्यामुळे गावाकडील पद्धतीप्रमाणे सर्वांनी एका घरी जमून काम करणे शक्य नव्हते. चाकरमान्यांना दिवाळीच्या सुट्या मोजक्याच मिळायच्या! मात्र त्यातल्यात्यात फराळाचे आधी करून ठेवलेले जिन्नस, पितळी, तांब्याची अन थोडकी चांदीची भांडी स्वच्छ करणे, घरातील तमाम कोपरे अन प्रत्यक्ष घर स्वच्छ करणे, पूजेचे साहित्य, उटणी, एक ना दोन. जमतील तितके फटाके, घरी केलेला आकाशदिवा आणि मातीच्या पणत्या (त्यांना ओला चुना लावायचा दंडक होता, त्याने पणतीच्या आत तेल झिरपत नसे). मंडळी, बजेटप्रमाणे नवीन कपड्यांची खरेदी व्हायची! आजच्या पिढीच्या हातात पैसे असतात म्हणून मनात येईल त्या दिवशी दिवाळी! सांगा बरे आपण दिवाळीत चकली, शेव, चिवडा, करंज्या, अनारसे इत्यादी खाण्याकरता आसुसले असतो का? आपण कापड, दागदागिने, वाहन इत्यादी खरेदीकरिता पाडव्याची प्रतीक्षा करतो का? त्याचे अप्रूपच राहिले नाही, कारण आत्ता आपण ‘बारोमास खरेदीच्या मोड’ मध्येच असतो. गावात अशी परिस्थिती नसावी अशी मी आशा करते. पण गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे, तेव्हा कोण जाणे कदाचित तिथेही हे खरेदीचे लोण पसरले असावे. मग आपण आता काय करावे म्हणजे मुलांना या दिवाळीच्या सुट्ट्यांचा खरा आनंद लुटता येईल? मी जे सुचवते आहे ते अर्थातच माझे विचार आहेत! बघा पटताहेत कां!                
          सर्वप्रथम दिवाळीचा सण घरीच साजरा करणे. मित्रांनो, सर्वांना आनंद देणारा हा एकमेव सर्वसमावेशक सण आहे. वसुबारस गाय वासरू यांचा, धनत्रयोदशी धन्वंतरी पूजेचा, नरक चतुर्दशी संपूर्ण स्वच्छतेचा, श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध केला! मुख्य सण दिवाळीचा, वैभव अन समृद्धी प्रदान करणाऱ्या विष्णुपत्नी लक्ष्मीमातेचे मनोभावे पूजन करण्याचा! तसेच अमावास्येच्या काळ्याभोर रात्रीला उजळणाऱ्या मातीच्या पणत्यांचा. या इवल्या पणत्यांचा मान इतका मोठा की, या दिवशी त्यांची पूजा केली जाते. लाख मोलाची विजेची रोषणाई यांच्या पुढे फिक्की पडते. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असा पावन दिवस! वर्षातून एकदा पाताळातून पृथ्वीवर येणाऱ्या दानवीर बलीपूजनाचा अन गोवर्धन पूजेचा, श्रीकृष्णाला छप्पनभोग नैवेद्य दाखवायचा. या सोबतच पतिपत्नीच्या नात्याचा सन्मान करण्याचा म्हणजेच पतीने पत्नीला या दिवशी भेटवस्तू देणे अत्यावश्यकच! यमद्वितीया (भाऊबीज) म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असा हा सण! मंडळी, आधीच्या काळात पांडव पंचमी, कार्तिक एकादशी, द्वादशीला तुळशी विवाह अन कार्तिक पौर्णिमा इथवर दिवाळी असायची! या शिवाय या दीपपर्वाच्या आनंदात सहभागी होणारे सगेसोयरे आणि मैत्रमंडळी यांनी या सर्वंकष सणाचे परीघ पूर्ण व्हायचे. जर वडीलधाऱ्या मंडळींनी युवा आणि बालक (कधी तर पालक सुद्धा) यांना सुट्टीचे निमित्य साधून दिवाळीचे हे भव्य रूप समजावून सांगितले तर प्रत्येक दिवशी केलेली पूजा हा निव्वळ उपचार राहणार नाही. घरी मुलांनी आणि मुलींनी हौसेने साफसफाई (जाळी काढणे आणि पंखे स्वच्छ करणे हे मुख्य काम), फराळ करण्यात मदत करणे, आकाशदीप स्वतः बनवणे, मातीच्या पणत्या रंगांनी सजवणे, फुलांचे हार गुंफणे, पूजेची भांडी स्वच्छ करणे, आपली आलमारी किंवा आपली स्वतंत्र खोली असल्यास ती आवरणे, हे सर्व उपक्रम हाती घ्यावेत. बघा मुलांनो, तुमची आई किती खुश होईल ते! या साफसफाईच्या निमित्त्याने नको असलेले कपडे, स्टेशनरी, वह्या, पुस्तके शक्यतोवर गरिबांना देता येतील. दिवाळीचा फराळ जर अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात दिला आणि तिथे एखादा दिवस साजरा केला तर सोन्याहून पिवळे! मुले आपल्या पॉकेटमनीचे पैसे इथे दान देऊ शकतात! बघा यावर विचार करून मैत्रांनो. डॉक्टर मीना श्रीवास्तव 
             मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या दिवाळीची एक खास गोष्ट, किल्ला बनवणे. यात कल्पनाशक्तीचा वापर करून उपलब्ध सामग्रीत सुंदर किल्ले बनवण्याची मजा कांही औरच! चुरस निर्माण करायची असेल तर सोसायटीत स्पर्धा आयोजित करता येईल. मात्र प्रत्येक किल्ल्याला कुठले ना कुठले बक्षीस द्यावेच. एक सुचवते, किमान दिवाळीच्या दिवसांत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याचे महत्त्व पटले की, मुले साग्रसंगीत अभ्यंगस्नान करण्यास नक्कीच तयार होतील. कदाचित त्यांना पहाटे उठण्याची सवय देखील लागेल! तसेही आजकाल विशेष थंडी पडतच नाही, कुठे आणि कां गेली हे आपल्यालाच ठाऊक असणे गरजेचे नाही का?
           आता एक गंभीर वॉर्निंग! फटाक्याच्या जीवघेण्या खेळाची! आगीच्या दुर्घटना घडणे, हात, पाय किंवा डोळे यांना इजा, कधी शरीर भाजणे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि पैसे खर्च होणे एक ना दोन किती म्हणून वर्णावे! आता तर दुर्दैव असे की उठसूट फटाक्यांच्या माळा जपणे आणि त्यात नवी चिंताजनक भर लेझर किरणांची! फटाकेच खरेदी न करणे हा उपाय जरा कडक, त्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होईल भर सणासुदीला! हे सर्व प्रदूषण रोखायचे असेल तर, कार POOLING सारखे फटाक्यांचे सुद्धा POOLING करता येईल. प्रत्येक कुटुंबाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नियोजित समितीला पैसे देऊन, मग त्या लोकांनी फक्त नयनसुख देणारे, ध्वनी विरहित फटाके नियोजित स्थानी आणि नियोजित वेळी लावले तर सोसायटीतील मंडळी हे खूप एन्जॉय करतील. वाटल्यास नियोजित दिवशी सोसायटीत सामूहिक दिवाळी पहाट (मात्र स्थानिक कलाकार हवेत) आणि दिवाळी फराळ आयोजित केले तर मजा येईल. तसेही मोठ्या शहरात नातेवाईकांपेक्षा आपले सख्खे शेजारीच आपल्याकरता मौल्यवान सोबती असतात.
            मंडळी दिवाळीतल्या कांही गोष्टी मला खटकतात, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करतांना महागडे गिफ्ट देणे, दिवाळीच्या रात्री लाखोंचा जुगार खेळणे, बाहेर पार्ट्या करणे, असे मोठ्यांनी केले तर मुलांना दिवाळीचे विकृत रूपच दिसेल! त्यापेक्षा मुलांनी घरी बनवलेल्या भेटवस्तू अन भेटपत्रे किती साजिरी अन गोजिरी दिसतील नाही का? मैत्रांनो, हे माझे विचार बुरसटलेले वाटतात का? थंड डोक्याने विचार करून मगच ठरवा. आता साग्रसंगीत दिवाळी साजरी झाल्यावर सुट्टीच्या इतर दिवसांचे प्लॅनिंग करावे! कामे करून दमला असाल तर ब्रेक हा हवाच. हिवाळाच तर खरा सिझन आहे पर्यटनाचा! मात्र त्यातून मॉल, संस्कारशिबिरे, हिवाळी शिबिरे वगळून, निसर्गरम्य प्रदूषणरहित खेडी, गडकोट, वनराई इत्यादींचा प्रवास केल्यास दिलो दिमाग फ्रेश व्हायला नक्कीच मदत होईल.
            तुम्हा सर्वांना फिरफिरुनि दिवाळीच्या मंगल पर्वाच्या खूप शुभेच्छा! आपण दिवाळीच्या आनंदाची लयलूट करा, आपला आनंद द्विगुणित होईल. तुमच्या हातातील पणतीने एखाद्या अंधाऱ्या घरात पणती पेटतेय का बघा बरं!                          
धन्यवाद! 
डॉ. मीना श्रीवास्तव
मोबाईल नंबर-९९२०१६७२११
दिनांक-१० नोव्हेंबर २०२३
प्रतिक्रिया अग्रेषित करावयाची असल्यास, कृपया त्यात माझे नांव आणि मोबाईल नंबर असू द्यावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...