मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

687. मागे वळून पाहू नकोस...

 संध्याकाळची वेळ होती. जिमी व्हॅलेंटाईन आपल्या कोठडीत निवांत पहुडला होता. एक शिपाई आला नि त्याच्या कोठडीचं कुलूप काढून त्याला वॉर्डनच्या कचेरीत घेऊन गेला. 
“ये जिमी, तुझं अभिनंदन” वॉर्डन त्याचं स्वागत करीत म्हणाला. 
“अभिनंदन कशाबद्दल?”
”तुरुंगातल्या तुझ्या चांगल्या वर्तनाचा विचार करून आम्ही जी शिफारस केली होती, त्यामुळे गव्हर्नरनी तुझी उर्वरित शिक्षा माफ केली आहे. उद्या सकाळी नाश्त्यानंतर तुला सोडून दिलं जाईल.”
“आभारी आहे.”
”जिमी व्हॅलेंटाईन, तू मनानं अतिशय चांगला आहेस. तुरुंगात तुझं वर्तन उत्तम होतं. इथं आम्ही तुला पादत्राणं बनवण्याचं प्रशिक्षण दिलंय. शिवाय शिक्षेच्या काळात तू इथं जे काम केलंस, त्याचं मानधन म्हणून तुला एकशे दहा डॉलर्स मिळणार आहेत. त्यातून उद्यापासून तू नवं आयुष्य जगायला आरंभ करू शकतोस. घरफोड्या करणं सोडून तू शांतपणे जगायला लाग.”
”मी घरफोडी कधीच केली नाही.” 
“मग कोर्टानं तुला इथं पाठवलं ते निव्वळ गैरसमजातून की काय? जिमी माझं ऐक. प्लीज. इथून बाहेर गेल्यावर साधं जीवन जगायला सुरुवात कर.”
जिमी व्हॅलेंटाईन काहीच बोलला नाही. एक सुस्कारा सोडून वॉर्डननं त्याला परत कोठडीत धाडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी जिमी व्हॅलेंटाईन तुरुंगातून सुटला. निघताना त्याने तुरुंगातला ब्रेकफास्ट नाकारला. बाहेर पडताना त्याच्या अंगावर मळके कपडे होते. पण खिशात ११० डॉलर्सची ऊब होती. सकाळी सकाळी पायवाटेवरून जाताना दुतर्फा झाडीतून येणार्याग मंद वायू लहरींकडं, पक्ष्यांच्या सुरेल कूजनाकडं रानफुलांच्या सौंदर्याकडं वगैरेकडं दुर्लक्ष करीत जिमी व्हॅलेंटाईननं एक चांगलं उपाहार गृह गाठलं. दर्जेदार ब्रेकफास्ट घेतला. मग एका तयार कपड्यांच्या दुकानातून दोन उत्तम पोशाख खरेदी करून त्यातला एक पोशाख तिथंच परिधान केला.  अंगावरचा जुना मळका पोशाख फेकून दिला. दुकानातून बाहेर पडताना रस्त्यावर उभ्या भिकार्यालच्या हॅटमध्ये दिलदारपणे एक नाणं टाकलं. 
मग तो माईकच्या हॉटेलमध्ये गेला. माईक आणि जिमी हे बालमित्र होते. माईकनं त्याचं मनापासून स्वागत केलं. टेबलाच्या खणातून त्याला खोलीची किल्ली काढून दिली. ती घेऊन जिमी व्हॅलेंटाईन वरच्या मजल्यावर गेला. जिमीची खोली जशीच्या तशीच ठेवलेली होती. माईकनं तिची देखभाल व्यवस्थित केली होती. जिमी व्हॅलेंटाईननं आपला पलंग बाजूला सरकावला. पलंगाच्या खालच्या बाजूला भिंतीत छुपं कपाट होतं. ते उघडलं. त्यातून आपली सूटकेस बाहेर काढली. चॉकलेटी रंगाची, जुनी चामडी सूटकेस. जिमी व्हॅलेंटाईननं आपली कारकीर्द याच सूटकेसनिशी सुरु केली होती. बाकी सार्याा गोष्टी बदलत गेल्या. पण ही सूटकेस (बहुधा लकी ठरली म्हणून) बदलली नाही.  
सुटकेस उघडून जिमी व्हॅलेंटाईननं ती प्रेमपूर्वक न्याहाळली. आत एक छोटं ड्रील मशीन, छोटी पक्कड, काही स्क्र्यू ड्रायव्हर्स, मास्टर किल्ल्यांचा जुडगा, वेगवेगळ्या आकारांच्या तारा, असा सारा हत्यारांचा सरंजाम होता. 
थोडा वेळ आराम करून छान कपडे करून आपली सूटकेस घेऊन जिमी व्हॅलेंटाईन बाहेर पडला. काऊंटरवर बसलेल्या माईककडे पाहून डोळे मिचकावीत तो म्हणाला, “‘माईक, आजपासून माझं नाव राल्फ स्पेन्सर, शॉर्ट स्नॅप या पादत्राणे बनवणार्याब कंपनीचा मी एक पार्टनर आहे.”
”गुड लक! तुझ्या नव्या आयुष्यासाठी तुला माझ्या शुभेच्छा आहेत.”
* * * 
जिमी व्हॅलेंटाईन - कैदी नंबर ९७ - तुरुंगातून सुटल्यापासून ठीक दुसर्याा दिवशी रिचमंड शहरातल्या एका छोट्या बॅंकेचं सेफ फुटलं. त्याच्या पुढच्या आठवड्यात एका सावकाराच्या घरातली तिजोरी फोडली गेली. चोरानं तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटर किंवा स्फोटके न वापरता केवळ कुलुपाजवळ एक लहानसं छिद्र पाडून तारेनं ते उघडलं होतं. तिजोरीचं हे कुलूप अतिशय अद्ययावत असून ते लोगानस्पोर्ट या प्रख्यात कंपनीनं बनवलं होतं नि त्याच्या पेटंटसाठी त्यांनी अर्ज देखील केला होता. पण या चोरीची बातमी प्रसिध्द झाल्यावर कंपनीनं पेटंटचा अर्ज मागे घेतला. 
हळू हळू या आणि अशा बातम्या येतच राहिल्या. त्यातल्या एका मोठ्या चोरीचा पंचनामा करताना पोलीस डिटेक्टिव्ह बेन प्राईसनं उत्स्फूर्त उदगार काढले, “कोणीही जोडीदार न घेता, आवाज न करता, आधुनिक हत्यारं किंवा स्फोटकं न वापरता आणि मागं कोणताही पुरावा न ठेवता इतकं सफाईदार काम - जिमी व्हॅलेंटाईनशिवाय दुसरं कुणी हे काम करूच शकत नाही.”
बेन प्राईसला जिमी व्हॅलेंटाईनविषयी इतकी खात्री होती. पण चोरी झाल्यावर मागं कसलाही पुरावा रहात नव्हता हीच महत्त्वाची अडचण होती. जिमी व्हॅलेंटाईन सापडत नव्हता. माईकच्या हॉटेलवर पोलिसांची सतत पाळत होती. पण गेले कित्येक दिवस जिमी व्हॅलेंटाईन तिथे आला नव्हता. बेन प्राईसला जिमी व्हॅलेंटाईनच्या सर्व सवयी – दर्जेदार खाण्याची आवड, उत्तम वस्त्रांचा षौक, इ. - ठाऊक होत्या. त्यामुळं एक ना एक दिवस जिमी व्हॅलेंटाईन आपल्या जाळ्यात सापडेल याची त्याला खात्री होती.  
असेच काही दिवस गेले. 
* * *
एका भल्या सकाळी ट्रेनमधून एल्मोर स्टेशनवर राल्फ स्पेन्सर नावाचा रुबाबदार तरुण आपली चॉकलेटी सूटकेस घेऊन उतरला. स्टेशनबाहेर पडल्यावर समोर दिसलेल्या प्लॅंटर्स या उंची हॉटेलात जाण्यासाठी रस्ता ओलांडत असतानाच एक मजेदार अपघात झाला.
जिमी व्हॅलेंटाईन उर्फ राल्फ स्पेन्सरच्या समोरून एक देखणी तरुणी चालत गेली. ती प्लॅंटर्स हॉटेलशेजारच्याच बॅंकेत शिरली. जाता जाता तिनं नकळत जिमी व्हॅलेंटाईनच्या छातीत मदनबाण मारला होता. 
जिमी व्हॅलेंटाईननं बॅंकेचं नाव वाचलं.
एल्मोर बॅंक
प्लॅंटर्स हॉटेलच्या दारात बूट पॉलीश करणार्या  मुलाला एक नाणं देत जिमी व्हॅलेंटाईननं त्या सुंदरीचं नाव विचारलं. तिचं नाव होतं अॅनाबेल अॅडम्स. एल्मोर बॅंकेच्या अध्यक्षांची ती धाकटी कन्या होती. जिमी व्हॅलेंटाईननं त्या मुलाला आणखीन काही नाणी देत एल्मोर गावाचीही बरीच माहिती विचारून घेतली. इथली बाजारपेठ, जमिनींच्या, घरांच्या किमती, इतर वातावरण, वगैरे. एकूण काय, स्वारी अॅनाबेलसह एल्मोर गावाच्याच प्रेमात पडली. 
कामज्वराच्या अग्नीत जिमी व्हॅलेंटाईन जळाला. त्याच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राल्फ स्पेन्सर अवतरला नि त्यानं प्लॅंटर्समध्ये प्रवेश केला. त्याचा महागडा पोशाख पाहून रिसेप्शनिस्ट धावत आला. त्याच्या हातात आपली सूटकेस देत राल्फ स्पेन्सरनं त्याला आपलं नाव सांगितलं. प्लॅंटर्समधल्या सर्वात आलिशान खोलीचं महिन्याभराचं भाडं विचारलं. लगेच दिलं देखील. नोकराची वाट न बघता रिसेप्शनिस्ट स्वतःच त्याची सूटकेस उचलून खोलीपर्यंत आला. त्याला राल्फ स्पेन्सरनं दोन कामं सांगितली. 
शेजारच्या एल्मोर बॅंकेत खातं उघडायचं आहे आणि शहरात पादत्राणांचं नवीन दुकान खरेदी करायचं आहे. रिसेप्शनिस्टनं दोन्ही जबाबदार्याा हसत स्वीकारल्या. 
यानंतरच्या वर्षभरात तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. रिचमंडमधल्या घरफोड्या अचानक थांबल्या. एल्मोर शहरामध्ये ‘शॉर्ट स्नॅप शू मार्ट’ (प्रोपा. राल्फ स्पेन्सर) हे उच्चभ्रू वस्तीत नुकतंच सुरू झालेलं दुकान झपाट्याने भरभराटीला आलं आणि नंबर एकचं दुकान म्हणून नावलौकिकाला प्राप्त झालं. एल्मोरमधल्या सन्माननीय व्हीआयपी खातेदारांच्या पंक्तीत राल्फ स्पेन्सर हे नाव अग्रभागी झळकू लागलं. राल्फ आणि अॅनाबेला यांचा परिचय अर्थातच दृढ होत जाऊन त्याला प्रेमाचे गुलाबी अंकुर फुटले. प्रेमाच्या नि लग्नाच्या आणाभाका झाल्या. आता विवाहाचा दिन फार दूर राहिला नव्हता. 
त्याच सुमारास एल्मोर बॅंकेची नवी शाखा सुरु होणार होती. तिच्या उद्घाटनाला शेरीफ, पोलीसप्रमुख आणि आसपासच्या शहरांमधले अनेक मान्यवर येणार होते. त्याच प्रसंगी राल्फ स्पेन्सर आणि अॅनाबेलाच्या विवाहाची घोषणा केली जाणार होती. याच्या आधी आठ दिवस राल्फ स्पेन्सरनं माईकला पत्र लिहून या सोहळ्याचं आमंत्रण दिलं. त्यात त्यानं सार्या् गोष्टी लिहिल्या होत्या, शेवटी म्हटलं होतं, “मित्रा, मी आता गुन्हेगारी पूर्ण सोडून दिली आहे. सुदैवानं माझं दुकान छान चाललंय. शिवाय मला अनाबेलासारखी परी मिळतेय. तिच्या बरोबर मला शांत जीवन जगायचंय. तू आमच्या कार्यक्रमाला अवश्य ये. तुला त्या वेळी मी एक भेटवस्तू देणार आहे. ती म्हणजे माझी सूटकेस. त्यातली हत्यारं कशी लाखमोलाची आहेत हे तुला ठाऊक आहे. पण आता मला त्याचा उपयोग नाही. मी ते सगळं आता सोडलंय. तू त्याचा योग्य तो वापर कर.”
* * *
उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राल्फ स्पेन्सरनं नवा कोरा सूट परिधान केला होता. कार्यक्रम संपल्यावर वाग्दत्त वधू-वर आणि निवडक आप्त अॅडम्सच्या घरी जाणार होते. एंगेजमेंटच्या वेळी अॅनाबेलाला देण्यासाठी महागडी हिऱ्यांची अंगठी आणि नेकलेस राल्फ स्पेन्सरनं कालच खरेदी करून खिशात ठेवलेले. सारे निमंत्रित वेळेवर आले. मान्यवर व्हीआयपी मंडळी, अॅनाबेलाचे नातेवाईक, त्यातच होती अॅनाबेलाची थोरली बहीण शीला आणि तिची दोन गोंडस मुलं मे आणि ऑगस्ट. दारात उभा राहून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करता करता राल्फ स्पेन्सर एकदम दचकला. पाहुण्यांमध्ये बेन प्राईस देखील आहे हे त्याला आधी ठाऊक नव्हतं. त्याच्याशी हस्तांदोलन करताना बेन प्राईसनं त्याचा हात किंचित अधिक दाबला नि त्याच्याकडं रोखून पाहिलं असं त्याला वाटलं. त्या गार हवेत देखील कॉलरखालची मान घामानं भिजली नि हृदयाचे ठोके जलद झाले. 
शिवाय आधी आग्रहाचं पत्र लिहूनही या कार्यक्रमाला आपला मित्र माईक आला नाही, याचंही राल्फला वाईट वाटलं होतं. पण नंतर बेन प्राईस काही बोलला नाही. कार्यक्रम सुरु झाला. काही मान्यवरांनी बॅंकेच्या गौरवपर भाषणं केली. श्रीयुत अॅडम्स यांनी सर्वांना फिरून आपली बॅंक दाखवली. सर्वात शेवटी ते तळघरात बॅंकेच्या सेफपाशी आले. 
बॅंकेनं हे सेफ एका प्रख्यात कंपनीला खास ऑर्डर देऊन बनवून घेतलं होतं. सायंकाळी बॅंक बंद होताना त्यात कॅश ठेवून एक खटका दाबला की ते बंद होईल. त्याला ऑटोमॅटिक टाईम लॉक होतं. पण किल्ली नव्हती. उद्या सकाळी बॅंक उघडल्यावर बरोबर नऊ वाजताच त्याचा खटका ओढला की ते उघडेल. आधी नाही की नंतर नाही. काही केलं तरी उघडणार नाही. सेफ अतिशय मजबूत होतं. गॅस कटर किंवा स्फोटकांना देखील दाद न देणारं. खातेदारांची कॅश इथे शंभर टक्के सुरक्षित होती. 
 सर्वांनी श्रीयुत अॅडम्सचं कौतुक आणि अभिनंदन केलं.  कॉफीपानासाठी सगळे वरच्या हॉलमध्ये आले. कॉफी घेत असताना एकाएकी तळघरातून मेची – शीलाच्या मुलीची – किंचाळी ऐकू आली. दचकून लोक खाली धावले. 
मेनं खाली एक उद्योग करून ठेवलेला होता. तिचा धाकटा भाऊ ऑगस्ट गंमत म्हणून सेफमध्ये गेला नि तिनं दार लावून घेतलं होतं. हे ऐकून शीला धाडकन चक्कर येऊन कोसळली. श्रीयुत अॅडम्स सेफच्या हॅंडलवर झेपावले. पण आता सेफ लॉक झालं होतं ते उद्या सकाळी नऊ वाजल्याखेरीज उघडणार नाही. कंपनीचा मेकॅनिक तर दूर न्यू यॉर्कमध्ये असतो. त्याला बोलावणं देखील अशक्य. आतल्या मर्यादित हवेत ऑगस्ट फार तर तासभर जिवंत राहू शकेल. क्षणात तिथे शोककळा पसरली. स्त्रियांनी नि लहान मुलांनी तर रडायलाच आरंभ केला. 
आणि - त्याच वेळी बेन प्राईसनं राल्फ स्पेन्सरकडं साभिप्राय कटाक्ष टाकला. राल्फ स्पेन्सरनं नजरेनंच नकार दिला. तो आधीच भीतीनं घामाघूम झालेला होता. पण अॅनाबेला स्फुंदत आली नि त्याला बिलगली. तिच्या स्पर्शानं त्याला विनंती केली की धीर दिला, त्यालाच ठाऊक. तो तिला जवळ घेत सर्वांच्या अंगावर ओरडला, “कृपया सगळे जण बाहेर थांबा.”
सगळे क्षणात वर गेले. अनाबेला देखील. आता तिथे फक्त फक्त बेन प्राईस आणि राल्फ स्पेन्सर राहिले. आणि खाली कार्पेटवर कोसळलेली बेशुध्द शीला...  राल्फनं खाली वाकून शीलाच्या केसातली हेअर पिन काढली. दातात पकडली. सेफच्या हॅंडलवर हातानं दाब देत त्याला कान लावला. हॅंडल उलटसुलट फिरवण्याचा प्रयत्न केला. 
ट्रायल बॅलन्सवर एक धावती नजर टाकली तरी अनुभवी अकौंटटला जशा त्यातल्या अनियमित नोंदी लक्षात येतात, त्याचप्रमाणे राल्फ स्पेन्सरला निमिषार्धात हॅंडलच्या सूक्ष्म आवाजातून आतल्या लिव्हर्सची रचना जाणवली. माईकला देण्यासाठी आणलेली सूटकेस त्याने त्याच खोलीत ठेवली होती. त्यातून ड्रील मशीन काढून त्याने हॅंडलच्या खाली एक लहान छिद्र पाडलं नि तोंडातली हेअरपिन त्यात घालून हलकेच एका दिशेला फिरवली. मग हॅंडल अगदी हलक्या हाताने ओढलं तर सेफ बिलकुल आवाज न करता, प्रतिकार न करता उघडलं. आतून कोसळलेल्या ऑगस्टला उचलून त्याने बेनच्या हातात दिलं नि म्हणाला, “मिस्टर  बेन प्राईस, मला वाटतं की आता माझा पूर्ण पराभव झाला आहे. जिमी व्हॅलेंटाईनला रंगे हाथ पकडण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. ही माझी सूटकेस जप्त करा नि मला अटक करा. मी तयार आहे.” 
बेन प्राईस यावर मंद हसले नि म्हणाले, “मला माफ कर तरुणा, तू काय बोलतोयस ते मला कळालं नाही. तुझं नाव जिमी व्हॅलेंटाईन नाही, राल्फ स्पेन्सर  आहे. तुझा लवकरच अॅनाबेला बरोबर विवाह होणार आहे. वर जा नि सर्वांना सांग की बेन प्राईस नि आपल्या पोलिसी हत्यारांचा वापर करून हे सेफ उघडलं आहे. समजलं?” 
होकारार्थी मान हलवीत राल्फ स्पेन्सर वर निघाला. बेन प्राईसनी त्याला अडवलं आणि म्हणाले, “या कार्यक्रमाआधी तू माईकला पत्र पाठवलं होतंस. ते पत्र आमच्या ताब्यात आलेलं होतं. कारण आम्ही काही आठवड्यांपूर्वीच माईकला अटक केली होती. नि मी त्याच्या हॉटेलात तळ ठोकून होतो. मी इथं आलो तो केवळ तुझी सूटकेस जप्त करायला. आता तू माईकला लिहिलं होतंस त्यानुसार सभ्य जीवन जगायला सुरुवात कर. तुला माझ्या शुभेच्छा आहेत.” 
त्यांचे आभार मानून राल्फ वर जायला निघाला. बेन प्राईसनी पुन्हा त्याला हाक दिली, “जिमी -” 
”काय?”
”इथून पुढं तुला कुणीही जिमी नावानं हाक मारली तरी मागं वळून पाहू नकोस.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...