सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

710. इतकेच मला जाताना...आणि डॉटर्स फ्रॉम कॅलिफोर्निया सिंड्रोम

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
     कविवर्य सुरेश भटांची ही गझल अवघ्या दोन ओळीत जीवनाचं सार सांगून जाते. जीवन आणि मृत्यूच्या आट्यापाट्यांचा खेळ एक डॉक्टर आयुष्यभर खेळत राहतो. या खेळातील काही क्षण आनंदाचे तर काही फार क्लेशदायक असतात त्याबद्दल थोडं व्यक्त व्हावं वाटलं म्हणून हा मेसेजप्रपंच.  एकदा एक 85 वर्षाचे गृहस्थ माझ्याकडे ऍडमिट झाले. त्यांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मेंदूत मोठा रक्तस्राव झाला होता. परिस्थिती खूप गंभीर होती. जर त्यांचा जीव वाचवायचा असेल तर त्यांच्या मेंदूचे लवकर ऑपरेशन करणे गरजेचे होते. त्यांच्याबरोबर एक छोटीशी खाजगी नोकरी करणारा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आता वैद्यकीय शास्त्राप्रमाणे त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. जर शस्त्रक्रिया केली नाही तर त्यांचा थोड्याच दिवसात मृत्यू होण्याची शक्यता जवळजवळ 100% होती. पण जर त्यांना वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया केली तर बरेच दिवस किंवा आठवडे ते हॉस्पिटलमध्ये राहतील. त्यातही वाचण्याची शक्यता साधारणता 40 ते 50 टक्के .तो एकुलता एक मुलगा आपली खाजगी नोकरी सोडून हॉस्पिटलमध्ये किती दिवस थांबणार? आणि जीव वाचल्यानंतर सुद्धा ते पुढे कायम बेडवर पडून राहतील. हालचाल करणार नाहीत. त्यामुळे इतर अनेक अडचणी उद्भवतील. पाठीला आणि पार्श्वभागावर जखमा होणे, लघवीमध्ये इन्फेक्शन होणे, फुफ्फुसात इन्फेक्शन होणे आणि इतर अनेक अडचणी. रुग्णाचे जगणे नरकापेक्षा वाईट होते. शिवाय महिनो महिने या रुग्णाची सेवा कोण करणार ? त्याचे मलमूत्र सर्वच साफ करावे लागते. त्याला स्वच्छ करणे, आंघोळ घालणे, नळीतून खाऊ घालणे,सर्व जखमा साफ करणे, आपली नोकरी सोडून हॉस्पिटलमध्ये थांबणे, त्यांना औषधे आणणे . आणि एवढे सर्व करूनही तो रुग्ण बोलणार नाही. चालणार नाही. थोडक्यात quantity of life म्हणजे आयुष्यातले दिवस वाढतील पण quality of life शून्य. 
       त्या मुलाला सर्व समजावून सांगितले आणि शेवटी हेही सांगितले की निर्णय तुमचा आहे. जर तुम्ही आग्रह केला. डॉ तुम्ही शस्त्रक्रिया कराच तर आम्ही करू. परंतु आपली सद्सदविवेक बुद्धी काय सांगते ? आमचा प्रामाणिक सल्ला असा आहे की काहीही करू नये. आणि मग तीन-चार दिवसांनी उगवली त्या बाबांची मुलगी.डॉटर फ्रॉम कॅलिफोर्निया ( किंवा आपल्या भाषेत बाहेरगावी दिलेली मुलगी ) तिचे मागील काही वर्षांपासून वडिलांशी वडिलोपार्जित संपत्ती वरून वाद सुरू होते आणि त्यामुळे ती वडिलांशी बोलत नव्हती. आता अचानक ती आली आणि तिने आमच्याशी भांडण सुरू केले.तुम्ही माणुसकी शून्य डॉक्टर आहात. तुम्ही माझ्या वडिलांची काळजी घेतली नाही. तुम्ही त्यांची शस्त्रक्रिया करायला पाहिजे होती. ते बेडवर पडून राहिले तरी चाललं असतं परंतु ते जगले असते..वगैरे वगैरे. आम्ही तिला हेही सांगितलं की या सर्व गोष्टी आम्ही तुमच्या भावाशी बोललो आहोत. तर तिचं म्हणणं असं होतं की माझ्या भावाला काही समजत नाही आणि तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. 
       वरील घटनेमध्ये आजोबांवर उपचार करून त्यांचे आयुष्य उगाचच लांबवण्यात अर्थ नव्हता, असा माझा सल्ला होता. हे वाढीव आयुष्य त्या रुग्णासाठी अत्यंत वेदनादायी असते. त्याचे प्रचंड हाल होतात. वैद्यकीय परिभाषेत तो रुग्ण Vegetative State मध्ये राहतो. म्हणजेच एखाद्या भाजीपाल्यासारखा तो पडलेला असतो. हालचाल करत नाही, त्याला काही समजत नाही आणि तो कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही. Central line, Foley's catheter, Ryles tube, Endotracheal tube, या वेगळ्या वेगळ्या नळ्या त्याच्या शरीरात ठेवून त्याला मृत्यूशयेवर ताटकळत ठेवणे, परत परत CPR करणे ( म्हणजे छातीवर आणि हृदयावर दाब देऊन ते चालू करण्याचा प्रयत्न करणे ) हा मला त्या रुग्णाचा विनाकारण छळ वाटतो. आयसीयू मध्ये सर्व सुविधा असल्या तरी या सर्व सुविधा प्रत्येक वेळी वापरल्याच पाहिजे असं नाही आणि त्या केव्हा वापरू नये आणि केव्हा वापरावे याचं तारतम्य डॉक्टरांना असतं, पण बऱ्याच वेळा या नातेवाईकांना ते नसतं.
         सन १९९१ साली जर्नल ऑफ द अमेरिकन जेरियाट्रिक सोसायटीमध्ये काही Gerontologist (वृद्धांची काळजी घेणारे डॉक्टर ) नी Decision making in the incompetent elderly: 'The Daughter from California syndrome' नावाचा एक लेख लिहिला होता. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अक्षम रुग्णाच्या अवघड नातेवाईकांना हाताळण्याच्या काही सूचना त्यात देण्यात आल्या होत्या. त्यावेळी ‘डॉटर फ्रॉम कॅलिफोर्निया’ या संज्ञेचा सर्वप्रथम वापर झाला. जे जवळचे नातेवाईक रुग्णापासून विशेषतः वृद्ध व्यक्तीपासून खूप दुरावलेले आहेत, त्यांनी त्या व्यक्तीकडे खूप दुर्लक्ष केलेले आहे , त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडलेले आहे. ते अचानक ऐनवेळी उगवतात आणि डॉक्टर आपल्या रुग्णाकडे दुर्लक्ष करत आहेत असे आकांड तांडव करतात. मनात अपराधीपणाची आणि नकारात्मक टोचणी असल्यामुळे आपल्याला रुग्णाची खूप काळजी असण्याचा देखावा निर्माण करण्यासाठी ते हा आरडाओरडा करतात,जो रुग्णाच्या अजिबात हिताचा नसतो. विशेषत: मृत्यूशयेवर रुग्ण असताना वैद्यकीय यंत्रणेवर दबाव आणून रुग्णावर अकारण जास्तीचे उपचार करायला लावून त्याचे आयुष्य लांबवण्यास सांगतात. हेच असतात डॉटर फ्रॉम कॅलिफोर्निया. 
     साधारणपणे लोकांचा असा समज असतो की डॉक्टर या व्यक्तीने वैद्यकशास्त्राचे ज्ञान वापरुन आजाराचे योग्य निदान करावे आणि औषधोपचार व अन्य मार्गानी तो आजार पूर्ण बरा करावा एवढेच एका डॉक्टरचे काम असते. परंतु वास्तवात नुसत्या एखाद्या यंत्रासारखे किंवा रोबोट प्रमाणे उपचार सांगून चालत नाहीत. तो उपाय सुचवताना रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक स्थिती, रुग्णाची आणि नातेवाईकांची मनस्थिती, उपचारानंतर रुग्णाची आणि नातेवाईकांची सामाजिकता, आणि उपचारानंतर तो रुग्ण किती सक्षम आयुष्य जगेल या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. एक संवेदनशील डॉक्टर या बाबींचा विचार करून निर्णय घेत असल्यामुळे डॉक्टरांना फक्त वैद्यक शास्त्रच नाही तर आर्थिक, मानसिक, सामाजिक अशा अनेक पातळ्यांवर काम करावे लागते जे अत्यंत आव्हानात्मक असते. पुढील वेगळ्या घटनेमधून ते तुमच्या लक्षात येईल. मात्र त्याच वयाच्या दुसऱ्या आजोबांच्या केस मध्ये याच्या अगदी उलट निर्णय घेतला होता. ती घटना तुम्हाला सांगतो.
    मध्यंतरी एक आजोबा माझ्याकडे ऍडमिट होते वय वर्ष 80. काही दिवसांपूर्वी ते किडनीच्या एका गंभीर आजारांनी नासिक येथे ऍडमिट होते. त्यानंतर घरी आल्यावर ते पडले आणि मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यांना भरती केल्यानंतर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे सांगितले. वय आणि किडनीचा आजार बघता त्यातील धोकाही त्यांना समजावून सांगितला . परंतु जर तुम्ही या धोक्याची तयारी ठेवली नाहीतर त्यांची शस्त्रक्रिया होणार नाही आणि त्यांना आयुष्यभर पलंगावर पडून राहावे लागेल. त्यामुळे त्यांचे आयुष्य अत्यंत दुःखप्रद आणि क्लेशदायक होईल, शिवाय यात त्या आजींची प्रचंड फरफट होईल आणि हाल होतील. या वयात त्या स्वतःच बघतील की 24 तास आजोबांची काळजी घेतील? त्यांचं मलमूत्र काढणे, स्वच्छता ठेवणे यामध्ये आजींची प्रचंड दमछाक होईल. हे सर्व त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले.
       आता इथे उगवला त्यांचा परदेशात राहणारा मुलगा, म्हणजेच Son of California. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आतापर्यंत आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले होते. पण आता त्याला अचानक त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटू लागली  ती पण परदेशात राहून. तो एकदाही इकडे आला नाही आणि मला फोनवरून खूप सूचना देऊ लागला . जर शस्त्रक्रिया करणे धोक्याचे असेल तर आम्हाला तो धोका अजिबात पत्करायचा नाही . त्यांना भारीतल्या भारी किडनीच्या डॉक्टरांना दाखवा. त्यांना भारीतली भारी ट्रीटमेंट द्या. पैशाची चिंता करू नका.( आजोबा जनरल वॉर्ड मध्येच ऍडमिट होते) किडनीचा आजार पूर्ण बरा झाल्याशिवाय आणि धोका शून्य टक्के झाल्याशिवाय शस्त्रक्रिया करू नका.जमल्यास त्यांना मुंबईच्या एकदम भारी डॉक्टरांकडे दाखवा . मी शांतपणे सांगितलं तुम्ही त्यांना मुंबईला घेऊन जा. त्यावेळेस आजी मला म्हणाल्या हा तिथे राहून आम्हाला काय अक्कल शिकवेल? मुंबईला आजोबांबरोबर कोण जाईल? तिथल्या हॉस्पिटलमध्ये जाणं, त्यांच्यासाठी धावपळ करणे, औषधे आणणे , पैसे भरणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी या कोण करणार? त्याला अमेरिकेत राहून सांगायला काय जातं फुकटचं. आणि ते शस्त्रक्रियेला तयार झाले. पुन्हा एक नातेवाईक उगवले आणि पुन्हा तेच ..जीवाचा धोका असेल तर घ्यायचा काय? मी त्यांना म्हणालो तुमचे बरोबर आहे. तुम्ही हा धोका घेऊ नका. त्यापेक्षा कपड्यांमध्ये संडास.. लघवी करीत आजोबा दहा वर्षे बेड मध्ये पडतील आणि आणि बेडसोअर्स होतील तो धोका तुम्ही घेऊ शकता. असे सांगितल्यावर हे दोघी daughters from California शांत झाले आणि त्यांनी मला शस्त्रक्रिया करा असे सांगितले. आजोबांची व्यवस्थित शस्त्रक्रिया होऊन आजोबा चांगल्या रीतीने घरी गेले. पेशंट वरील उपचार हे जरी शास्त्र असले तरी त्याचा वापर पेशंटची स्थिती, त्याच्याभोवतीची परिस्थिती यांचा सांगोपांग विचार करुन करावा लागतो, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. रुग्णाच्या आयुष्यात असे अचानक कधीतरी प्रकट होऊन त्यांच्याविषयी बेगडी प्रेमाचा देखावा उभा करण्याऐवजी आपल्या प्रियजनांच्या सहवासात रहा .त्यांची वेळेवर योग्य काळजी घ्या. वेळेवर उपचार करा. त्यांना नियमित भेटा. त्यांना खूप आलिशान सुविधा नकोत. त्यांना फक्त हवाय तुमचा थोडासा सहवास. अन्यथा तुम्ही पण Daughter from California Syndrome या आजाराला बळी पडू शकतात. ही माणसे हॉस्पिटलचे संपूर्ण वातावरण अत्यंत नकारात्मक करून टाकतात. शिवाय यांच्या नातेवाईकांचा एक गट तुम्ही आमच्या रुग्णावर विनाकारण उपचार करत आहात असाही आरोप करतच असतो.
      मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. त्यास आपण टाळू शकत नाही .मात्र रुग्णाच्या जीवनरुपी अंगणात मृत्यूने शांततेने, सभ्यतेने पावले टाकावीत की धाकटपटशा करत, तांडव करून दाखल व्हावे ? याचा निर्णय मात्र आपण निश्चितच घेऊ शकतो. अन्यथा
                 मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो... 
                 मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते...

डॉ. संजय संघवी कंसल्टिंग फिजिशियन, धुळे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...