बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

690. तरुणाईच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात...

 ती : सॉरी. 
मी : का बरं? 
ती : ऐन दिवाळीत मेसेज करतेय. 
मी : इट्स ओके. 
ती : कोरोना काळात मी तुझा एक लेख वाचलेला. 
मी : ओके. 
ती : तेव्हाच मी तुला फेसबुकवर फॉलो केलेलं.  
मी : हो. आठवतंय..  
ती : वेगवेगळ्या टॉपिकवर आपलं बोलणं होतच असतं.  
मी : हो. तुझ्या प्रतिक्रिया वाचत असतो.  
ती : आज मात्र माझाच अनुभव शेअर करण्यासाठी मी बोलायचं ठरवलं.   
मी : विषय?
ती : त्यापुर्वी थोडक्यात माझ्या फॅमिलीचा परिचय देऊ?
मी : नो प्रॉब्लेम.  
ती : तुला तर माहीतच आहे..  
मी : काय?
ती : हेच की, मी मागील वर्षभरापासून पुण्यात जॉब करतेय. 
मी : हो. 
ती : माझी लहान बहीण सेकंड इअरमध्ये शिकतेय. 
मी : ओके. 
ती : मोठी बहीण डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जॉब करते. 
मी : ओके. 
ती : पप्पा २०१३ साली वारले.  
मी : कसे?
ती : हार्ट अटॅकने..
मी : वाईट झालं.  
ती : आई गृहिणी आहे. 
मी : तुम्ही घरात महिलाच सर्वजणी.  
ती : हो. आई कमी शिकलेली असल्याने कुटुंबाची जबाबदारी ताईच्या खांद्यांवर आली.     
मी : तुही कमावते ना आता. 
ती : हो. मात्र फक्त पैसा पुरेसा नसतो. 
मी : करेक्ट.  
ती : दिवाळी असल्याने आम्ही दोघीही पुण्याहून गुरुवारी घरी आलो. 
मी : ताई?
ती : ताई माझ्या आईसोबतच असते.   
मी : ओके. 
ती : परवा आम्ही तिघी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो होतो आणि..   
मी : आणि काय?
ती : अचानक ताई हायपर झाली. 
मी : का?
ती : माझ्या लहान बहिणीला पिरियड्स नियमितपणे येत नाहीत. 
मी : का? 
ती : हार्मोनल इश्यू आहे. 
मी : ओके. 
ती : मागच्या महिन्यातही तिला पाळी आली नव्हती.  
मी : मग?
ती : तिने तेच मला आणि ताईला सांगितलं.  
मी : ओके. 
ती : का कोण जाणे, पण ताईच्या रागाचा पारा अचानक चढला. 
मी : च्यामारी.  
ती : ती अगदी लहान बहिणीच्या दंडाला पकडून तिला दम द्यायला लागलेली. 
मी : बाप रे..  
ती : मीच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कसंबसं तिला शांत केलं.  
मी : गुड. 
ती : मात्र तेवढ्यावर तिचं समाधान झालं नाही.  
मी : काय केलं?
ती : दुसऱ्या दिवशी ती छोटीला डायग्नोस्टिक सेंटरमध्ये घेऊन गेली. 
मी : टेस्टसाठी? 
ती : हो. 
मी : का?
ती : त्याच प्रश्नाचं उत्तर मलाही हवं होतं. 
मी : मिळालं?
ती : हो. रात्री तिचा राग शांत झाल्यावर मी बोलले तिच्याशी. 
मी : काय समजलं?
ती : जे काही समजलं ते अस्वस्थ करणारं होतं.  
मी : नेमकं काय?
ती : माझी बहिणी जिथे जॉब करते, तिथे..   
मी : तिथे काय?
ती : त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मागच्या महिन्यात एक २३ वर्षांची अविवाहित मुलगी आलेली. 
मी : ओके.  
ती : मागील काही महिन्यांपासून पिरियड्स न आल्याने ती..
मी : मग?
ती : मात्र सोनोग्राफीनंतर जे काही समजलं ते.. 
मी : ते काय?
ती : ते खूप धक्कादायक होतं.  
मी : म्हणजे?
ती : ती मुलगी ५ महिन्यांची गरोदर होती. 
मी : बाप रे.. 
ती : विशेष म्हणजे.. 
मी : काय?
ती : त्या मुलीकडे चौकशी केल्यानंतर ताईला कळलं. 
मी : काय?
ती : ज्या मुलाचं ते बाळ आहे.. 
मी : त्याचं काय?
ती : त्याच्याशी हीचा आधीच ब्रेकअप झालाय. 
मी : OMG 
ती : आजकाल झटपट होणारं प्रेम..
मी : आणि झटपट ब्रेकअपही.
ती : सगळं काही इन्स्टंट.
मी : तेच तर..
ती : तरी गर्भलिंग निदान चाचणी संदर्भात शासनाने कडक धोरण स्वीकारल्याने..    
मी : काय?
ती : फॉलोअप घेऊन गरोदर महिलेची संपूर्ण माहिती आता महिनाभराच्या कालावधीत शासनाच्या पोर्टलवर रजिस्टर करावी लागते. 
मी : मग?
ती : म्हणूनच माझी बहीण त्या मुलीला वारंवार कॉल करत होती.   
मी : साहजिकच. 
ती : मात्र त्या मुलीने ताईचा नंबरच एकदिवस ब्लॉक करून टाकला. 
मी : कसं समजलं?
ती : दुसऱ्या नंबरहुन कॉल केल्यानंतर समजलं.  
मी : ओह.. 
ती : अक्षय ही तर झाली पहिली घटना. 
मी : ओके.  
ती : तुला तर ठाऊकच आहे.. 
मी : काय?
ती : कोरोनामुळे बरीच तरुण मुलंही दगावली.  
मी : हो.    
ती : त्यामुळे बऱ्याच महिलांच्या नशिबी ऐन तारुण्यात वैधव्य आलं. 
मी : वास्तव.  
ती : ताईच्या मैत्रिणीच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अशीच एक २६ वर्षांची विधवा महिला येतेय.     
मी : मग?
ती : मागील वर्षभरात ३ वेळा ती गरोदर असल्याचं समजलं.  
मी : पुनर्विवाह?
ती : नाही.  
मी : अरे.. 
ती : याचाच अर्थ..  
मी : ३ वेळा गर्भपात केला?
ती : हो. 
मी : भयंकर आहे. 
ती : तोच तर मुद्दा आहे. 
मी : म्हणजे?
ती : ताईने तिचा अनुभव शेअर केल्यावर आम्हाला समजलं.  
मी : काय?
ती : छोटीच्या काळजीपोटी ताई त्यादिवशी एवढी हायपर त्यामुळेच झाली होती. 
मी : सहमत.  
ती : ताईच्या बोलण्याला दुजोरा देऊन छोटीनेही बोलायला सुरुवात केली.      
मी : कशासंदर्भात?
ती : सेम टॉपिक. 
मी : ओके.  
ती : छोटी सध्या सेकंड इअरमध्ये शिकतेय. 
मी : हो, तू आधी सांगितलं.   
ती : तिच्या रूममेटची इंस्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झालेली. 
मी : ओके. 
ती : ते दोघे जवळपास ४ महिने संपर्कात होते. 
मी : कसे?
ती : चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स.
मी : मग?
ती : ऑगस्ट महिन्यात त्या दोघांनी भेटायचं ठरवलं.
मी : ओके. 
ती : त्यामुळे एकदिवस मेकअप करून छोटीची ती मैत्रीण सकाळीच फ्लॅटबाहेर पडलेली.  
मी : ओके. 
ती : ती जेव्हा रात्री परत आली, तेव्हा छोटीने तिला उशिरा येण्याचं कारण विचारलं.   
मी : कारण?
ती : त्या दोघांमध्ये पहिल्याच भेटीत सेक्स झाला. 
मी : काय?
ती : माझीही अगदी तुझ्यासारखीच अवस्था झालेली. 
मी : अजबच प्रकार आहे. 
ती : विशेष म्हणजे.. 
मी : काय?
ती : छोटीने तिच्याकडे चौकशी केली. 
मी : कशाबद्दल?
ती : प्रिकॉशनबद्दल..   
मी : मग?
ती : तर तिने साफ नकार दिला. 
मी : का?
ती : तिचं म्हणणं होतं की, तिला थ्रिल अनुभवायचं होतं. 
मी : अरे पण गरोदरपण किंवा एखादा आजार..     
ती : ते समजण्याची तिची बौद्धिक क्षमताच नाही.  
मी : खरं आहे. 
ती : आपल्याकडे लैंगिक शिक्षण हा विषय अगदी दुर्लक्षित आहे.  
मी : हो ना. 
ती : आम्ही तिघी बोलत होतो, तेव्हा ताईने 'कंडोम' हा शब्द उच्चारला. 
मी : ओके. 
ती : तर बाजूला उभ्या आईने लगेच दोन्ही कानांवर हात ठेऊन, आम्हाला विषय बदलण्याचा आदेश दिला. 
मी : मग?
ती : मग मात्र पुढे ताईने तासभर आईची लैंगिक शिक्षण विषयाची शिकवणी घेतली.   
मी : धाडस. 
ती : धाडस करावंच लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. 
मी : खरं आहे. 
ती : जे आईने आम्हा तिघींना सांगायला हवं, तेच ताईने आईला तासभर समजावलं.  
मी : जनरेशन गॅप. 
ती : आपला समाज बऱ्याच व्याधींनी ग्रासलेला आहे. 
मी : १००%
ती : मात्र सोशल मीडियामुळे त्या आजारांचा प्रसार आजकाल चौपट वेगाने होतोय.  
मी : तो कसा?
ती : संपर्क सोपा झाल्याने, लगेच कनेक्शन बनतं. 
मी : हो. 
ती : परिस्थिती अशीच राहिली, तर येणाऱ्या काळात कित्येक आयुष्य उद्ध्वस्त होतील.  
मी : ती कशी?
ती : अविवाहित नैराश्यग्रस्त गरदोर मुलींना आत्महत्येचा धोका. 
मी : हो. 
ती : नको असलेल्या गरोदरपणातून जन्माला आलेल्या मुलाची अनाथाश्रमातील अवहेलना.   
मी : हो. 
ती : निष्काळजी शारीरिक संबंधातून लैंगिक आजाराची लागण होण्याचा संभव. 
मी : हो. 
ती : असुरक्षित गर्भपातामुळे मुलींचे होणारे मृत्यू.  
मी : हो. 
ती : हे आणि असे बरेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. 
मी : बरोबर. 
ती : म्हणूनच शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचं समुपदेशन गरजेचं आहे. 
मी : काळाची गरज. 
ती : लैंगिक शिक्षणासाठी कुटुंबालाही पुढाकार घ्यावा लागणार. 
मी : का?
ती : कुटुंबातील तरुण-तरुणींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी. 
मी : तो कसा?   
ती : म्हणजे निरोगी मानसिक, शारीरिक आणि वैचारिक वाढ.   
मी : परफेक्ट. 
ती : अक्षय आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात.. 
मी : काय? 
ती : ज्ञान हे एक शस्त्र आहे. 
मी : हो.  
ती : म्हणुनच ज्ञानाचा सकारात्मक किंवा नकारात्मक वापर सहज शक्य.
मी : सच बात. 
ती : खेदाची बाब म्हणजे, आपल्याकडे सोशल मीडियाचा नकारात्मक वापरच अधिक होतो. 
मी : आधुनिक प्रबोधनाविषयी लोक अजूनही उदासीन.
ती : शिवाय बरेच पालक या संवेदनशील विषयांबाबत अनभिज्ञ आहेत.  
मी : का?
ती : कारण त्यांचं कार्यक्षेत्र आणि माहिती पोहचण्याचे मर्यादित सोर्स.  
मी : इंटरनेट?  
ती : लैंगिक विषयांवर जाणूनबुजून मोकळेपणाने चर्चा होत नाही. 
मी : तीच तर खंत.  
ती : भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश असल्याने, आणखी एक धोका वाढतो.  
मी : कोणता?
ती : आजार प्रसाराचा. 
मी : कसा?
ती : कारण आजार पसरायला लागला, की दाट लोकसंख्यमुळे त्याला आटोक्यात आणणं अशक्य.
मी : बरोबर. 
ती : शिवाय काळ बदलतोय त्याप्रमाणे सामाजिक आजरांचं स्वरूपही बदलतंय. 
मी : हो.  
ती : म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून, अधिकाधिक जनजागृती आणि प्रबोधन अत्यंत आवश्यक. 
मी : करेक्ट.  
ती : त्यासाठीच दिवाळी असूनही मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं.  
मी : बरं केलं. 
ती : जे आपल्या आजूबाजूला घडतंय ते हेतुपुरस्सर दाबलं जातंय. 
मी : का?
ती : घराण्याच्या इभ्रतीच्या भीतीने. 
मी : हो. 
ती : मात्र त्यामुळे अज्ञानाचा आजार फोफावतोय.  
मी : सोशल मीडियामुळे अधिकच वेगाने.  
ती : तरुण मुलगा असो की मुलगी..  
मी : त्यांचं काय?
ती : त्यांना वेळीच भविष्यातील धोक्यांबाबत सावध केलं पाहिजे.  
मी : सहमत.  
ती : नाहीतर.. 
मी : नाहीतर काय?
ती : नाहीतर तरुणाईच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात सगळा समाजच आधुनिक व्याधींनी पोखरला जाईल.  
मी : ज्जे बात!

©️अक्षय भिंगारदिवे,
१५ नोव्हेंबर २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...