दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱया ‘गवळणीं’ची प्रथा हळूहळू लोप पावत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱया या गवळणी आता इतिहासजमा होत आहेत. आता दारात गायीगुरे नसल्याने शेण मिळत नाही, आणि नव्या पिढीतील स्त्रिया शेणात हात घालायला तयार होत नाहीत. यांमुळे मराठी लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होत आहे. दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. प्रत्येकजण हा सण आपापल्या ऐपतीप्रमाणे मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषि संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱया होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळय़ा प्रांतात दिवाळी निरनिराळय़ा पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचंच दर्शन प्रकर्षाने होते. महाराष्ट्रातही दिवाळीच्या आगळय़ा प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱया गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गायीगुरे असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशी दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवित. लहान मुलीही त्यांना मदत करीत. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठय़ा कल्पकतेने या गवळणी बनवित. छोटे शेणगोळे बनवून त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाटनगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाई. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असे. पाचव्या दिवशी पांडव केले जात. अंगणाचा कोपरा शेणाने सारवण्यात येई. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविण्यात येई. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दाखविले जाई. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचे तवे दाखवून भाकऱया करीत असलेले दाखविले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई.
काही गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवित. एक हात कमरेवरील घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरील घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत. काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात. काही गवळणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गायीगुरे हिंडविताना दाखविल्या जायच्या. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱया गवळणी असत. डोंगर चढणाऱया, जेवण वाढणाऱया, ताक घुसळणाऱया अशा नानाप्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात. गवळणींना सजविण्यासाठी पाना-फुलांचा वापर केला जाई. कापसाच्या फुलांच्या, पानांच्या माळा गवळणींच्या गळय़ात घालत. गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की बाहेरच्या बाजूला दोन बुरूज केले जात. त्यामध्ये चिपाडाची काडी घालून वेस बनविण्यात येत असे. गावाच्या वेशीवर तुतारी वाजविणारा शिंगाडा दाखविण्यात येई. जणू येणाऱया जाणाऱयांचे तो शिंग वाजवून स्वागतच करीत आहे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाई. वेशीजवळच दीपपाळ केली जाई. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात. स्त्रीजीवनातल्या साऱया दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक दर्शन या गवळणींमधून होतं. पाच दिवस रोज वेगवेगळय़ा प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येकजणी आपापल्या कलाकौशल्याच दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवितात. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धांच त्यांच्यात लागलेली दिसते. गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आटपाटनगरात सगळं काही शेणाचंच असे. हे आटपाटनगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी, त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्रामजीवनाचं यथार्थ दर्शन घडत. पाच दिवस ग्रामजीवनातले विविध प्रसंग गवळणींच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. मराठी ग्रामजीवन किती समृध्द आणि स्वावलंबी होतं, याचं प्रत्ययकारी दर्शन ‘गवळणी’ बनविण्याच्या या प्रथेमधून होतं.
पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव करतात. सहावी द्रौपदी करतात. बळीराजा उठविलेला दाखवितात. शेणाचा सुरेख असा डोंगर तयार केला जातो. कुणी चिपाडाच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप करतात. त्यावर आंब्याच्या डहाळय़ा ठेवून मंडपाची शोभा वाढविली जाते. पाच दिवस केलेल्या या गवळणीं जपून ठेवून छपरावर वाळवत घालण्यात येतात. कार्तिक पौर्णिमेला त्या पेटविण्यात येतात. दिवाळींमध्ये ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अत्यंत आवडीचा आणि कलाकौशल्याचा भाग असलेल्या शेणाच्या गवळणीं करण्याची प्रथा आता लोप पावत आहेत. बदलत्या काळानुसार घरात आता गोठे उरले नाहीत. गायीगुरे नाहीत. त्यामुळे शेणही मिळत नाही. त्याहीपेक्षा शेणामध्ये हात घालणाऱया स्त्रिया आता उरल्या नाहीत. नव्या पिढीतील तरूणींना मार्गदर्शन करणाऱया सासूबाई, आजीबाई आता घरात नाहीत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी-आई, सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काही महिला करताना दिसतात. गावोवावी अनेक जुन्या बायका गेली अनेक वर्षे त्या घरासमोर शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटसं आटपाटनगर वसवतात. आजीकडून नातीकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा हे लोक मोठय़ा प्रयत्नाने जपतात. गवळणी तयार करण्याची ही परंपरा दिवसेदिवस लोप पावत आहे. काळाच्या ओघात अशा प्रथा नष्ट होतीलही. मात्र, पुढच्या पिढय़ांसाठी त्याचं ‘डॉक्युमेंटेशन’ करून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा कधी काळी भारतीय महिला शेणात हात घालत होत्या आणि त्यापासून सुंदर गवळणी बनवित होत्या, हे नव्या पिढीला सांगूनही खरे वाटणार नाही.
लेखन - समीर गायकवाड सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा