परवा एका मित्राकडे गेलो होतो. तो काहीसा चिंतीत वाटला.
“काय रे? काही टेन्शन आहे का?” मी विचारले.
“अं... नाही रे. खास काही नाही.” त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.
“नाही... नक्कीच काहीतरी आहे. त्याशिवाय तू इतका गप्पं राहणार नाहीस. अर्थात सांगायचे नसेल तर नको सांगू.”
“तसं काही नाही रे...” मला हे सांगतानाही तो काहीतरी विचार करत असणार हे मला जाणवले. पण जोपर्यंत त्याला स्वतःहून काही सांगावेसे वाटत नाही तोपर्यंत आपणही त्याला काही विचारायचे नाही हे मी ठरवले.
“ओह... जाऊ दे... बाकी काय म्हणतोयस?” मीही विषय बदलला.
“बाकी... मजेत... तुला तर माहितीच आहे. आपण कायम ऐश करत असतो.” त्याने उसने हसत म्हटले.
“हेहेहे... माझेच डायलॉग मला दे.” मीही हसत म्हटले. त्यानंतर परत काही वेळ शांततेत गेला. या दरम्यान त्याच्या मनात काहीतरी विचार चालू होता. मी माझा मोबाईल हातात घेतला आणि whatsapp चेक करत बसलो. मी काहीच बोलत नाही हे बघून शेवटी त्यानेच सुरुवात केली.
“मिल्या... तुला का वाटले मी टेन्शनमध्ये आहे म्हणून?”
“भावड्या... तुला अनेक वर्षांपासून ओळखतोय मी. तुझ्या चेहऱ्यावरून लक्षात येते.”
“गधड्या, मग मी काही नाही म्हटल्यावर लगेच गप्पं बसलास? आणि माझा मित्र म्हणवून घेतोस?”
“हेहेहे... क्या करू? ऐसा ही हू मै...” मी हसत म्हटले.
“मला एक सल्ला देशील?”
“माझा सल्ला अनेकांना पटत नाही. मग देऊन उपयोग काय?”
“एखाद्यावेळी उपयोग होईल ही.” त्यानेही माझ्यासारखाच पवित्रा घेतला.
“हो... हेही शक्य आहे.”
“अरे... मध्यंतरी फेसबुकवर माझी एका मुलीशी मैत्री झाली.” त्याने म्हटले आणि थोडा थांबला. त्यावेळी तो माझ्या चेहऱ्याकडे निरखून बघत होता.
“ओके... मग?” मी अगदी सपाट चेहऱ्याने विचारले.
“तिने मध्यंतरी मला प्रपोज केले.”
“बरं...”
“मी तिला सांगितले, माझे लग्न झालेले आहे.”
“छान...”
“तिला त्याबद्दल काहीच इश्यू नाहीये.”
“अरे वा...”
“आमचे चाटिंगही चालू झाले आहे.”
“ओह...”
“आता मला तिला प्रत्यक्ष भेटायचे आहे.”
“मग?”
“पण ती नाही म्हणते.”
“का?”
“ती म्हणते, तिला मला भेटणे शक्य होणार नाही.”
“ओह... मुलींना अनेकदा नाही शक्य होत.”
“अरे पण भेटता येणार नसेल तर काय उपयोग चाटिंग करण्याचा?”
“हं...”
“अबे मी तुला प्रश्न विचारला आहे.”
“कळले रे मला.”
“मग इतका रुक्ष प्रतिसाद?” तो वैतागला.
“भावड्या... तुला माहिती आहे ना?”
“काय?”
“क्या करू... ऐसा ही हू मै |”
“असा बुक्का मारीन ना तुला परत हा डायलॉग मारला तर...” तो आणखीन चिडला.
“ओके... मला सांग. ज्या व्यक्तीशी तू चाटिंग करतोस ती व्यक्ती स्त्रीच्या वेशातील पुरुष तर नाहीये ना?”
“गपे... ती मुलगीच आहे.”
“कशावरून?”
“आम्ही व्हिडीओ चाटिंग केली आहे.”
“ओके...”
“किती दिवस झाले तुमची मैत्री होऊन?”
“पाच सहा महिने.”
“वहिनींना माहिती आहे हे?”
“अजून तरी नाही. आणि मी समजू ही देणार नाही.”
“का?”
“का काय? ती मला कच्चा खाईल.”
“नाही... वहिनी शाकाहारी आहेत. आणि तुला खाल्ले तर लोक त्यांना नरभक्षक म्हणतील.” मी हसत म्हटले आणि त्याने माझ्या पाठीत गुद्दा मारला.
“आई गंऽऽऽ, येड्या, बावळट...” मी काहीसा ओरडलोच.
“हा फक्त ट्रेलर होता. आता मस्करी केली तर पिक्चर दाखवीन.” त्याने माझा हात पिळत म्हटले.
“सॉरी सॉरी...” मी वेदनेने कळवळलो. त्याने माझा हात सोडला.
“सांग आता मी काय करू ते.”
“अबे यात मी काय सांगू शकतो? तुम्ही दोघेही सज्ञान आहात.”
“मिल्या... तू माझ्या जागी असतास तर काय केले असते?”
“ज्या दिवशी तिने मला प्रपोज केले त्याच दिवशी सांगितले असते, ‘बाई गं, तुझ्या भावनांची मी कदर करतो पण मला माझा जीव प्यारा आहे. तू मृगजळ आहेस आणि माझी बायको ज्वालामुखी. तिला समजले त्या धगीनेच मी खरपूस भाजला जाईल, आणि ती मला तिखट मीठ लावून तर माझं भरीत करून खाईल.’”
“अबे यार... त्यावेळी झाली माझी चूक.”
“मग आता भोग.”
“नाही.. मला सांग मी काय करू ते.”
“मृगजळाच्या मागे धावू नकोस.”
“अरे ते मलाही समजते, पण मन लागत नाही कशातच.” तो वैतागून म्हणाला.
“तुला मन महत्वाचे आहे की तुझा जीव?”
“---” त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही.
“भाऊ... एक लक्षात घे. अनेकदा मोहाचे क्षण आपल्या समोर येतात. काही वेळेस आपणही त्यात गुरफटतो. शेवटी आपण माणूस आहोत. आपल्या हातून चुका होणारच. पण त्या सुधारणे ही आपल्याच हाती आहे. जितका तू मनाने कमकुवत बनशील तितका फसवला जाशील. समजा ती मुलगी तुझ्यासाठी लावलेला सापळा नसेल कशावरून? समजा ती कितीही खरी असली, तुमच्या दोघांच्या भावना कितीही चांगल्या असल्या, तरी या नात्याला भविष्य काय? आणि जर भविष्य अंधकारमय असेल तर त्यासाठी वर्तमानाचा चुराडा कशाला करायचा?”
“हं... खरंय...”
“त्यामुळे इतरांच्या भावनांचा आदर करण्यासाठी स्वतःचे आयुष्य उध्वस्त करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि फक्त शाररीक आकर्षण असेल तर ही वहिनींशी केलेली प्रतारणा आहे. थोडक्यात गुनाहगार आप है, आपका पाप है, पाप का बाप है !!!” शेवटचे वाक्य मी काहीसे हसत म्हटले आणि मग त्यालाही हसू आले.
“मिल्या, इतक्या वर्षापासून तुही फेसबुक वापरतो आहेस, तुला नाही का कधी मोह होत?” त्याने मलाच प्रश्न केला.
“हेहेहे... मीही माणूसच आहे ना? मलाही मोह होतोच. पण त्यावेळी मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ घेतो. आपोआपच मोहाची त्रीव्रता कमी होते. आणि माझ्यात एक दुर्गुण आहे, ज्याचा मला फायदा होतो.”
“दुर्गुण? आणि तुझ्यात?”
“हेहेहे... होय... बहुतांशी लोकांना तो दुर्गुणच वाटतो.”
“कोणता ते सांग आणि तो मला कसा समजला नाही?”
“मी फक्त वर्तमानात जगतो. भूतकाळात नाही. आता तुझ्या सोबत आहे. तुझी समस्या, तुझा आनंद, तुझे दुःख यात सहभागी आहे. थोड्या वेळात मी घरी जाईल, त्यावेळी हे सगळे मी इथेच सोडून जाईन. त्यावेळी जो माझ्या सोबत असेल, त्याच्या समस्या, त्याचा आनंद यात सहभागी असेल. यामुळेच अनेकदा मी कोणत्याही गोष्टीकडे त्रयस्थपणे बघू शकतो. माझ्याशी मैत्री करणेही सोपे, आणि माझी मैत्री तोडणेही सोपे. फेसबुकवर देखील असेच घडते. मला अनेक मित्र विनंती येतात. मी त्या स्वीकारतो. अनेक दिवस गप्पा होतात. एकमेकांची सुख दुःखे सांगितली जातात. मग काही दिवसांनी त्या व्यक्तींचे मेसेज येणे बंद होते. कारण त्यांच्या मते मी ‘विचारा तुम्ही, सांगतो आम्ही’ याप्रकारे वागतो. ते मला विसरतात, मी त्यांना विसरतो. काही जण वर्षा दोन वर्षांनी मेसेज करतात आणि मला ‘मी त्यांना विसरलो’ म्हणून दोष देतात. तेही मी स्वीकारतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. परत तेही गप्प, मीही शांत.” मी हसत सांगितले.
“समजा तुला कुणी प्रपोज केले तर?”
“तर त्यावेळी मला जे वाटेल ते करेन. कारण त्यानंतर त्या व्यक्तीने मला मेसेज केला नाही तरीही मी ‘तुझे वागणे का बदलले?’ असेही विचारणार नाही.”
“का?”
“क्या करू... ऐसा ही हू मै...” मी म्हटले आणि पुन्हा पाठीत गुद्दा बसला.
“आई गंऽऽऽ, येड्या... हिंसक प्राणी कुठला. कधीतरी अहिंसेचा वापर कर ना...” मी वेदनेने कळवळून म्हटले.
“क्या करू... ऐसा ही हू मै...” त्याने आठ्ठाहास करत म्हटले आणि मला काय बोलावे तेच कळेना.
-- मित्राचा मार खाणारा नाशिककर, मिलिंद जोशी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा