शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

660. चुकीच्या जोडीदाराशी लग्न करण्यापेक्षा..

 ती : अक्षय एका टॉपिकवर बोलायचं होतं.   
मी : कोणत्या?
ती : लग्नाळू मुलामुलींच्या अवाजवी अपेक्षा. 
मी : अवाजवी?
ती : हो.  
मी : कसं काय?
ती : आपल्याकडे ना लग्न जुळवताना ज्या गोष्टींना महत्व द्यायला हवं..  
मी : त्यांचं काय?
ती : त्या गोष्टींना महत्व न देता, दुसऱ्याच गोष्टींचा गाजावाजा असतो.   
मी : उदाहरणार्थ?
ती : बहुतेक मुली समोरच्या मुलाचा पगार, फ्लॅट, बँक बॅलन्स किंवा प्रॉपर्टीला प्राधान्य देतात.  
मी : करेक्ट. 
ती : मात्र त्याच मुली समोरच्या मुलाचं व्यसन, मानसिक व शारीरिक आरोग्य किंवा प्रगल्भता यांच्याकडे सर्रास कानाडोळा करतात.  
मी : सहमत. 
ती : नेमका तिथेच घोळ होतो आणि आयुष्याची वाट लागते. 
मी : म्हणजे?
ती : अनुभव शेअर करण्यापूर्वी, माझा थोडक्यात परिचय देऊ?
मी : चालेल. 
ती : मी ३० वर्षांची असून पेशाने इंजिनिअर आहे. 
मी : ओके. 
ती : वयाच्या २४व्या वर्षापासून मी नोकरी करतेय.   
मी : व्वा!
ती : सध्या मला ९५ हजार रुपये पगार आहे. 
मी : ग्रेट. 
ती : स्वावलंबी असल्याने माझ्या पगारावर मला फ्लॅट, कार, बाईक आणि घरातील काही महत्वाच्या गोष्टी खरेदी करता आल्या.    
मी : कमाल. 
ती : माझ्या मोठ्या बहिणीचं ८ वर्षांपूर्वी लग्न झालं.  
मी : तिचं शिक्षण?
ती : तिचं बीसीएस झालेलं. 
मी : मग?
ती : लग्नाच्या वेळी तिनेही इतर मुलींप्रमाणे मुलाच्या प्रॉपर्टीला प्राधान्य दिलं.     
मी : त्यामुळे?
ती : त्यामुळे तिला आजकाल प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. 
मी : का?
ती : माझे दाजी संशयी स्वभावाचे आहेत.  
मी : मग?
ती : माझी बहीण बोलक्या स्वभावाची असल्याने तिला बरेच मित्रमैत्रिणी आहेत.   
मी : ओके. 
ती : तेच माझ्या दाजींना आवडत नाही. 
मी : मग?
ती : ती सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडली, की लगेच ते तिच्याकडे लाईव्ह लोकेशन मागतात.   
मी : अरे.. 
ती : ऑफिसमध्ये पोहचल्यावरही तिला नवऱ्याला लाईव्ह लोकेशन शेअर करावं लागतं.    
मी : का?
ती : दाजींनी तिला बजावुनच ठेवलं आहे. 
मी : अजबच प्रकार आहे. 
ती : अक्षय आजकाल मुलींसोबत हमखास असे प्रकार घडतात. 
मी : का?
ती : मुलांच्या संशयी स्वभावामुळे.   
मी : वाद होतात?
ती : खूप. 
मी : कारण?
ती : दाजी खूप आधीपासून दारू पितात. 
मी : मग?
ती : कुठल्याही व्यसनाचा शरीराप्रमाणेच मनावरही वाईट परिणाम होतो.   
मी : करेक्ट. 
ती : मागील काही वर्षांमध्ये दाजींच्या आणि ताईच्या सेक्स लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरु आहेत. 
मी : तुला कुणी सांगितलं?
ती : माझ्या बहिणीने. 
मी : ओके. 
ती : त्यामुळेच ती काही काळ डिप्रेशनमध्ये होती.   
मी : अरे.. 
ती : ते सगळं मी जवळून पाहिल्याने माझी खात्री पटली. 
मी : कसली?
ती : पैसा सर्वस्व नसतो. 
मी : मग?
ती : मानसिक स्वास्थ्य, समाधान आणि निरोगी आयुष्य सर्वाधिक गरजेचं. 
मी : का?
ती : तरच आयुष्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. 
मी : सहमत. 
ती : दुधाने तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो.   
मी : हो. 
ती : बहिणीच्या आणि मैत्रिणींच्या संसारातील अनुभवांमुळे माझीही खात्री झाली.  
मी : कसली?
ती : अवाजवी अपेक्षा बाळगण्यापेक्षा, काही निकष ठरवायचे.. 
मी : कशासाठी?
ती : जोडीदार निवडण्यासाठी. 
मी : ओके. 
ती : तू कांदे पोह्याच्या कार्यक्रमात घडणाऱ्या प्रकारांबद्दल खूपदा ऐकलं असेल. 
मी : काय?
ती : मुलाच्या घरचे मुलीला लागोपाठ प्रश्न तर विचारतातच, शिवाय..  
मी : शिवाय?
ती : मुलीला जाणूनबुजून एखाद्या विषयावर बोलायला लावलं जातं.    
मी : का?
ती : ती बोबडी तर नाही, हे तपासण्यासाठी..  
मी : हो. 
ती : मुलीला हेतुपुरस्सर चालायला लावलं जातं.  
मी : का?
ती : ती दिव्यांग किंवा अंध तर नाही, याची खात्री करण्यासाठी. 
मी : ओह..  
ती : जाणीवपूर्वक मुलीचं वजन, उंची, जन्मतारीख विचारली जाते.     
मी : हो.  
ती : मात्र त्यातुलनेत.. 
मी : काय?
ती : मुलाला फारच कमी प्रश्न विचारले जातात.   
मी : कदाचित पुरुषसत्ताक व्यवस्था असल्याने. 
ती : माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी मला त्याच गोष्टी खटकल्या होत्या. 
मी : म्हणजे?
ती : म्हणजे मुलाच्या व्यसनांची किंवा समुजतदारपणाची चौकशी करणं माझ्या घरच्यांना तेव्हा गरजेचं वाटलं नव्हतं. 
मी : का?
ती : कारण मुलाचा पगार, बँक बॅलन्स, जमीनजुमला इत्यादींची चौकशी करण्यापासून त्यांना सवड मिळाली नव्हती.  
मी : त्यामुळेच..  
ती : हो. त्यामुळेच माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाताहत सुरु आहे. 
मी : शोकांतिका. 
ती : मला माझ्या आयुष्यात त्या गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ द्यायची नव्हती. 
मी : काय केलं?
ती : मी पॅरामीटर सेट केले. 
मी : म्हणजे?
ती : मी ५ निकष ठरवले. 
मी : कोणते?
ती : मी त्या निकषांची माहिती आधी माझ्या आईवडिलांना दिली. 
मी : ओके.  
ती : त्यांनाही माझी अपेक्षा अगदी रास्त वाटली. 
मी : का बरं? 
ती : पाठीशी असलेल्या माझ्या बहिणीच्या वाईट अनुभवामुळे...  
मी : साहजिकच.  
ती : २०२१ साली माझा पहिला कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला.  
मी : ओके. 
ती : सुरुवातीला मुलाने व त्याच्या नातेवाईकांनी माझा इंटरव्युव्ह घेतला आणि मग..  
मी : मग?
ती : मग मी मुलाच्या परवानगीने क्रमवार माझे निकष सांगितले. 
मी : इंट्रेस्टींग.  
ती : मी सुरुवातीला सुई आणि दोरा घेऊन आले. 
मी : का?
ती : मला पाहायचं होतं..   
मी : काय?
ती : मुलगा शर्टला बटन लावू शकतो की नाही?
मी : मग?
ती : तुला ऐकून हसायला येईल. 
मी : का?
ती : मुलाच्या हाताला अक्षरशः थरकाप सुटलेला.  
मी : का?
ती : घरी त्याची आई किंवा बहीणच त्याच्या शर्टला बटन लावायचं काम करत असेल. 
मी : पण बटन का लावायला सांगितलेलं?
ती : मुलगा स्वतःची छोटी कामं स्वतः करू शकतो की नाही, हे जाणून घेण्यासाठी.   
ती : त्यानंतर मी मुलाला चहा बनवण्याची रिक्वेस्ट केली.  
मी : मग?
ती : तर त्याने साफ नकार दिला. 
मी : का?
ती : त्याला चहा बनवताच येत नव्हता. 
मी : पण चहा का बनवायला सांगितला? 
ती : अक्षय जो मुलगा चहा बनवू शकतो, तो मुलगा किचनमध्ये कोणतंही काम करताना लाजत नाही.   
मी : इच्छाशक्ती.  
ती : करेक्ट. 
मी : पुढे?
ती : त्यानंतर मी माझ्या बेडरुमध्ये ठेवलेला एक बॉक्स घेऊन आले. 
मी : काय होतं त्यात?
ती : त्यात मी सॅनेटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि टेम्पोन ठेवलेले.   
मी : का?
ती : मला अपेक्षित होतं की, त्याला फरक ओळखता येईल.    
मी : ओळखला?
ती : त्या मुलाचं तर एकवेळ समजू शकते, मात्र..  
मी : मात्र?
ती : मात्र मुलाच्या आई आणि बहिणीने तर मेन्स्ट्रुअल कप आणि टेम्पोन पहिल्यांदा पाहिलेले. 
मी : अरे.. 
ती : समाजात अवेअरनेस नाही हीच खंत आहे. 
मी : पण फरक का जाणून घ्यायचा होता?
ती : जो मुलगा एका महिलेच्या मासिक पाळीविषयी माहिती ठेवतो, तो नक्कीच संवेदनशील असतो.   
मी : करेक्ट. 
ती : जोडीदार वेदना समजून घेणारा असेल, तर तो नकळत औषधाचं काम करतो.   
मी : क्या बात!
ती : त्यानंतर..  
मी : काय केलं?
ती : मी मुलाला त्याच्या जवळच्या २ मैत्रिणींना कॉल करण्याची विनंती केली. 
मी : मग?
ती : तुला कदाचित खोटं वाटेल.. 
मी : काय?
ती : त्या मुलाला एकही जवळची मैत्रीण नव्हती. 
मी : अरे.. 
ती : अक्षय ज्या मुलाला एकही जवळची मैत्रीण नाही, तो भविष्यात बायकोच्या भावना, इच्छा अन् अपेक्षा तरी कशा जाणून घेणार?
मी : बरोबर. 
ती : अखेरीस मी मुलाला किमान २५ पुशअप मारण्याचं आव्हान दिलं.  
मी : का?
ती : शारीरिक क्षमता पडताळण्यासाठी. 
मी : मग?
ती : तर त्या पोराने थेट हात वर केले. 
मी : का?
ती : ढेरी सुटलेला पोरगा २५ पुशअप मारायला घाबरणारच.  
मी : सच बात.  
ती : प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याप्रती जागरूक असायलाच हवं.  
मी : १००%
ती : एकंदर पहिल्याच पाहण्याच्या कार्यक्रमात, दूध का दूध और पानी का पानी झाल्यावर..  
मी : काय झालं?
ती : माझ्या आईवडिलांच्या मनात भीती निर्माण झाली.  
मी : कसली?
ती : माझी परीक्षा पास होणारा मुलगा सापडणार की नाही.. 
मी : सापडला?
ती : १६ कांदे पोह्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर, अखेरीस माझे सर्व निकष पूर्ण करणारा मुलगा मी निवडला. 
मी : कमाल.. 
ती : अक्षय माझा निर्णय धाडसी जरी होता, तरी चूक मात्र नव्हता.    
मी : अगदी बरोबर.
ती : तू लिहितो ते अगदी खरं आहे.  
मी : काय?
ती : लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. 
मी : वाचकांचे अनुभव तर तेच सांगतात.  
ती : म्हणूनच तो निर्णय घेताना कुठलीही घाई किंवा निष्काळजीपणा, घातक ठरू शकतो.
मी : का?
ती : कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. 
मी : कोणती?
ती : It's better to wait long than to marry wrong. 
मी : म्हणजेच चुकीच्या जोडीदाराशी लग्न करण्यापेक्षा..    
ती : वाट पाहणं कधीही भल्याचं.     
मी : ज्जे बात!
©️अक्षय भिंगारदिवे,
३ नोव्हेंबर २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...