८ मार्च १९२१ पंजाबमधील लुधियाना शहरात फझ़ल मेहमूद नावाच्या अति श्रीमंत जहागीरदाराच्या घरी एका बालकाचा जन्म झाला. आधीच्या दहा पत्नींना मूलबाळ झाले नव्हते म्हणून फ़झलने सरदारी बेगम नावाच्या गरीब स्त्रीशी अकरावा निकाह केला आणि तिला हे मूल झाले. फ़झल मेहमूद हा अत्यंत क्रूर, खुनशी, धनलोभी, अत्याचारी, भांडखोर, तसेच ऐशोरामी, अय्याश, स्त्री लंपट होता. या फझ़लचे त्याच्या शेजाऱ्याशी दररोज कडाक्याचे भांडण होई आणि ते पोलिस स्टेशन, कोर्टपर्यंत पोहचे. आपल्या या शेजाऱ्याला मनसोक्त शिव्या देता याव्यात म्हणून फझ़ल मेहमूदने, जे नाव त्या शेजाऱ्याचं होतं तेच नाव आपल्या मुलाचंं ठेवलं, अब्दूल हयी. भांडणात फझ़ल शेजाऱ्याला खूप शिव्या देई, आणि मी माझ्या मुलाला शिव्या देत होतो असे पोलिसांना सांगून सुटका करून घेत असे. लहानपणी अब्दुलला चांगल्या संस्कारांऐवजी शिव्यांची लाखोली ऐकावी लागली होती. आपलं नाव ही आपली ओळख असते, अस्मिता असते, स्वाभिमान असतो, 'गुरूर' असतो, आपल्या नावावर आपलं प्रेम असतं, आणि असं हे हक्काचं नाव सुध्दा आपल्याला शेजाऱ्याचं मिळालं आहे हे कळल्यावर अब्दुलच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल ? सरदारी बेगम खानदानी स्त्री होती. मुलाने शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं अशी तिची इच्छा होती. मात्र जहागीरदार असलेल्या फझ़लला ते मान्य नव्हते. एवढी अवाढव्य संपत्ती असताना माझ्या मुलाला शिकायची गरज काय? असं त्याचं म्हणणं होतं. सरदारी बेगमचं नवर्यासोबत पटणं शक्यच नव्हतं. छोटा अब्दुल ११ वर्षांचा झाला तेव्हा तिचा फझ़ल मेहमूदसोबत तलाक झाला. न्यायाधीशांनी छोट्या अब्दुलला 'तुला कोणासोबत राहायचे आहे?' असे विचारले. त्याने 'आईसोबत' असे उत्तर दिले आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला अब्दुल क्षणात कफल्लक झाला. गरिबीमुळे उपासमार, अपमान, तिरस्कार, अवहेलना, कष्ट... हे जीवनाचा भाग बनले. पराकोटीचं दुःख वाटेला आल्याने अब्दुलचा कल शायरीकडे झुकला. महान उर्दू शायर फैज़ अहमद फैज़ यांच्या एका गझ़लेतील 'साहीर' हा शब्द आवडला आणि अब्दुल हयीचा 'साहीर' झाला. लुधियाना शहराचा रहिवासी म्हणून 'लुधियानवी'. साहीर लुधियानवी. हिंदी चित्रपट सृष्टीतील १ नंबरचे गीतकार. साहीर सतत दुःखाला सामोरे गेले. दुःख हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. ते इतरांच्या दुःखानेही दुःखी व्हायचे. जीवनात जरा सुख आलं की त्यापेक्षा अधिक दुःख वाढून ठेवलेलंच असे. त्यामुळे सतत अनामिक भीतीच्या छायेत जीवनभर राहीले. जीवनातील अनुभवांमुळे सुखाची त्यांना भिती वाटायची. वेळ कशी आणि किती बदलेल? हे सांगता येत नाही.
भूतकाळ बदलवता येत नाही, भविष्यकाळ अनिश्चित असतो. अशावेळी वर्तमानात जगा असा संदेश देणारं 'आगेभी जाने ना तू, पिछेभी जाने ना तू, जो भी है बस एक यही पल है' हे गीत साहीर यांनी लिहिले. वेळ सर्वात बलवान असते असे तत्वज्ञान 'वक्तसे है दिन और रात, वक्तसे है कल और आज, वक्तका हर शय गुलाम, वक्तका हर शयपे राज' असं गीतातून मांडलं. ते आपल्या मनातली भीती व्यक्त करतांना या गीतात पुढे म्हणतात, 'आदमी को चाहिए वक्तसे डरकर रहे, कौन जाने किस घडी वक्तका बदले मिजाज'. वेळ या विषयावरील अनेक गाणी साहीरजींनी लिहीली आहेत. बुध्दी आणि भावनांच्या अविरत संघर्षातून साहीर घडले. जे अनुभवलं ते काव्यातून मांडलं. म्हणून साहीरचे शब्द मनाला थेट भिडतात. दुर्दैव हात धुवून पाठीमागे लागलेलं. पण साहीरने त्याचं प्रदर्शन मांडलं नाही. कायम सकारात्मक विचार मांडले. 'बर्बादीयोंका जश्न मनाता चला गया' म्हणत 'संकटाची दिवाळी' साजरी करणारा, 'जिंदगीका साथ निभाता चला गया' म्हणत हसत जीवनाला सामोरा जाणारा, 'हर फिक्र को धुएंमे उडाता चला गया' असं तत्वज्ञान जपणारा आणि शेवटी 'गम और खुषीका फर्क न महसूस हो जहां, मै खुदको उस मकाम पे लाता चला गया' म्हणणारा हा महान तत्ववेत्ता शायर होता. साहीरने १९ वर्षांचा असतांना काॅलेजमधील एका श्रीमंत मुलीवर एकतर्फी प्रेम केले होते. गरीब-श्रीमंत भेदामुळे त्या मुलीने प्रिंसिपाॅलकडे तक्रार केली. गरीब साहीरला कॉलेजातून काढून टाकण्यात आले. साहीरच्या मनावर फार मोठा आघात झाला. समाजातल्या या गरीब-श्रीमंत भेदाने ते व्यथीत झाले आणि कम्युनिस्ट विचारांकडे कायमचे झुकले.
महान पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्यावर साहीरने जीवापाड प्रेम केलं. दोघांनीही या प्रेमाचा खुलेआम स्विकार केला. 'रसीदी टिकट' या पुस्तकात अमृताने हे जाहीरपणे मांडलेलं आहे. मात्र अमृतांच्या आईला त्यांचा विवाह मान्य नव्हता. आणि ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर गायिका सुधा मल्होत्रा यांचेसोबतचं साहीरचं प्रेमही पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. अशा घटनांचा साहीरवर फार मोठा परिणाम झाला. काॅलेजला जायला लागल्यापासून साहीर शायरी करायला लागले. विविध मासिकांत कविता छापून आणाव्यात असे वाटले. पण पदरी निराशाच आली. 'साभार परत' असा शेरा मारून कविता परत आल्या. साहीरचं मन नाराज झालं. पुन्हा एकदा जीवनात कटु अनुभवाला सामोरं जावं लागलं. लाहोर येथे एका मासिकात ब्रिटिश सरकारविरुद्ध लेख लिहीला. साहीरवर अटक वॉरंट बजावले गेले. लाहोरमधून त्यांना अक्षरशः पळ काढावा लागला. ते दिल्लीला आले. साहीर यांचा 'तलखियां' (कटुता) नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह त्यांनी २१व्या वर्षी लिहीला. उर्दू साहित्य जगतात खळबळ उडाली. आजही मिर्झा गालिब यांच्या गझलेच्या पुस्तकाखालोखाल उर्दूतील दोन नंबरच्या खपाचं हे पुस्तक आहे. त्याच्या आजवर १००पेक्षा जास्त आवृत्या निघाल्या आहेत. हा काव्यसंग्रह विद्यापीठाने अभ्यासक्रमाला ठेवला होता. २४व्या वर्षी साहीरने काॅलेजला अॅडमिशन घेतली. साहीर हे जगातले असे एकमेव शायर आहेत ज्यांना परीक्षेत स्वतःच्याच कवितेचं रसग्रहण लिहावं लागलं होतं. साहीर यांचे त्यांच्या आईवर फार प्रेम होते. आईला भेटायला साहीर लाहोरला गेले. जातांना ट्रेनला आग लागली पण हे वाचले. लाहोरला आईची गरीबीची परिस्थिती पाहून प्रचंड दुःखी झाले. गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी आईला अक्षरशः नको ती कामं करावी लागली. जवळच्या नातेवाईकांनीच तिचा फायदा घेतला. साहीर यांना हा धक्का पचवणं फार जड गेलं. आईला घेऊन ते भारतात आले. या सिच्युएशनवर पुढे साहीरने काही गीतं लिहीली.
साधना' चित्रपटात एक अप्रतिम गीत आहे, 'औरतने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाजार दिया...' एन. दत्ता यांचे संयत प्रभावी संगीत, लतादीदींचा दर्दभरा आवाज आणि साहीरचे अस्वस्थ करणारे शब्द ऐकणार्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. ६ कडव्यांचं हे गाणं रेकॉर्ड करतांना लताजींना गहिवरून यायचं आणि वारंवार रिटेक होत. शेवटी मनाचा हिय्या करून लताजींनी गाणं पूर्ण केलं. नंतर त्या साहीर यांना म्हणाल्या, 'क्या गीत लिखते हो तुम साहीर' 'प्यासा' म्हणजे मास्टर पीस चित्रपट! टाईम मॅगझिनने जगातील सर्वोत्तम १० चित्रपटात निवड केलेला. साहीरच्या आयुष्याशी मिळताजुळता चित्रपट. त्यात वेश्यांची वस्ती दाखवलीय. आपल्या रडणार्या लहान मुलाला बाजूला ठेवून ती अगतिक स्त्री गिर्हाईकासाठी नाच करतेय. साहीर येथे जळजळीत प्रश्न विचारतात, 'जिन्हे नाझ़ है हिंदपर वो कहाँ है?' हे दृश्य आणि साहीरचे शब्द माझ्या मनावर जबरदस्त परिणाम करून गेले होते.
'प्यासा'मधलंच 'ये महलो, ये तख्तो, ये ताजोंकी दुनिया' हे अप्रतिम गीत ऐकलं आणि तेव्हापासूनच साहीर मला आवडायला लागले. साहीरच्या शायरीत कटु अनुभवांमुळे शब्दांतून अंगार दिसतो. त्यांची दाहकता जाणवते. शब्द अक्षरशः अंगावर येतात. त्रिशूल' चित्रपटातील 'तू मेरे साथ रहेगा मुन्नै...' या गीतात माझ्यावर अन्याय करणार्यांचा जर तू बदला घेतला नाहीस तर 'मै तुझे दूध नही बक्षुंगी' अशा जळजळीत शब्दांत आई (वहिदा रेहमान) मुलाला (अमिताभ बच्चन) सांगतेय. साहीरचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईने एक शेर म्हटला होता, 'तेरे बचपनको जवानीकी दुवाँ देती हूँ, और दुवाँ देके परेशान हो जाती हूँ.' आपल्या लहान मुलाने तरूण व्हावं असा आशीर्वाद आई देतेय, पण हा मुलगाही अय्याश बापाच्याच वळणावर गेला तर ? या प्रश्नाने चिंतीत होतेय. पुढे 'मुझे जीने दो' या चित्रपटात अशीच सिच्युएशन आली. सुनील दत्त (डाकू) एका वेश्येला (वहिदा रहेमान) पळवून आणतो. तिला मुलगा होतो आणि त्यावेळी ती हेच शब्द वापरून गीत म्हणते. 'तेरे बचपनको जवानीकी दुवाँ देती हूँ, और दुवाँ देके परेशान हो जाती हूँ।' मुलगा मोठा होऊन पुढे डाकू तर होणार नाही नां? ही आईची चिंता साहीरने फार परिणामकारक व्यक्त केली आहे. 'बाबुलकी दुवाँए लेती जा' या 'निलकमल' चित्रपटातील गाण्यात काळजाचा तुकडा असलेली, लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करणार्या वडिलांच्या भावना अप्रतिम शब्दांत मांडल्या आहेत. साहीर यांचे जीवघेणे शब्द, महंमद रफी साहेबांचे स्वरांतील एक्सप्रेशन्स, रवीचं संगीत आणि तार शहनाईचे स्वर थेट काळजात घुसतात. हे गाणं ऐकून रडला नाही तर तो माणूसच नव्हे. 'लागा चुनरीमें दाग' हे उच्च तत्वज्ञान सांगणारं साहीर यांचे एक नितांत सुंदर गीत आहे. 'वो दुनिया मोरे बाबु़लका घर (स्वर्ग), ये दुनिया ससुराल (पृथ्वी)' म्हणत 'कोरी चुनरियां आत्मा मोरी, मैल है मायाजाल' सांगणाऱ्या या अप्रतिम गीताचं गायक मन्नाडे आणि संगीतकार रोशन यांनी सोनं केलं आहे. चित्रलेखा'तील असंच तत्वज्ञान सांगणारं 'संसारसे भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे' हे गाणं आहे. साहीर त्यांचं तत्वज्ञान आपल्या गळी सहज उतरवतात. एक नर्तकी तिचं भोगवादी तत्वज्ञान एका त्यागी साधूला सांगतेय, 'ये भोग भी एक तपस्या है तुम त्याग के मारे क्या जानो', किंवा 'अपमान रचयताका होगा रचनाको अगर ठुकराओगे'. असा कल्पनाविलास फक्त साहीरच करू शकतात. 'ताजमहल' या चित्रपटातील 'जो वादा किया वो निभाना पडेगा' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्म फेअर अवॉर्ड साहीर यांना जाहीर झाले. मात्र माझ्याऐवजी ते शैलेंद्र यांना 'बंदिनी'तील गाण्यांसाठी द्यावे असे पत्र साहीर यांनी निवड समितीला पाठवले होते. ती विनंती मान्य झाली नाही. केवढं मोठं मन होतं साहीर साहेबांचं.
'ताजमहाल' हे प्रेमाचं प्रतीक आहे. पण साहीरजींनी या कल्पनांना तडा जाईल असे वक्तव्य केले आहे. ताजमहाल म्हणजे 'एक अमीर बादशहाने हम गरीबोंके प्यार का उडाया हुँवा मजाक है' असे त्यांचे स्पष्ट मत होते. मात्र असे असुनही 'ताजमहल' मधली गाणी अप्रतिम आहेत. साहीरची भजनं सर्वोत्तम आहेत. 'अल्ला तेरो नाम' (हम दोनो) हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट भजन आहे. लता मंगेशकरांचं हे आवडतं भजन होते. 'तोरा मन दरपन कह लाये' (काजल), मन रे, तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा). अशी एकाहून एक सरस अनेक भजने साहीरने लिहीली आहेत. कव्वाली लिहावी तर साहीर साहेबांनीच. दिल ही तो है' या चित्रपटात अभिनेत्री नूतनवर एक कव्वाली चित्रीत होणार होती. ती आपल्या प्रेमाचा 'इज़हार' प्रेमीजवळ करतेय. साहीरजींनी डायरेक्टरला विचारले, 'प्रेमी कोण आहे?' डायरेक्टरने उत्तर दिले, 'राजकपूर'. यावर साहीर म्हणाले, 'वो नीली आँखोंवाला हिरो? फिर तो कव्वालीके यही शब्द होने चाहिये, निगाहे मिलाने को जी चाहता है'. आणि यमन रागावर आधारित संगीतकार रोशन यांनी एक अप्रतिम कव्वाली आशा भोसलेंकडून गाऊन घेतली. - 'ये इश्क इश्क है इश्क इश्क' ही हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर कव्वाली आहे. १२ मिनीटांच्या या कव्वालीत शारीरीक आकर्षणापासून सुरू झालेला प्रवास शेवटी परमात्म्याशी विलीन होण्यापर्यंत होतो. मला तर ही एक सुफी तत्वज्ञान असलेली कविता वाटते. साहीर साहेबांनी शब्दांची कमाल केली आहे. १४४ वेळा 'इश्क' हा शब्द या कव्वालीत आलेला आहे असे माझ्या वाचनात आले आहे.
- 'पल दो पलका साथ हमारा' ही 'दि बर्नींग ट्रेन' मधली कव्वालीही खूप प्रसिद्ध आहे. 'रोमँटिक गीतांचा बादशहा' असे साहीरजींचं वर्णन करावे लागेल. साहीर इतकी प्रेमाची उत्कट भावना, खोली इतर गीतकारांना गाठता आलेली नाही. 'अभी ना जाओ छोडकर' (हम दोनो) हे माझ्या मते आजवरचं सर्वोत्तम रोमँटिक गाणे आहे. प्रेयसीने (साधना) जाऊ नये म्हणून प्रियकर (देवानंद) १० कारणं सांगतोय. उदा. 'अभी अभी तो आयी हो, ये शाम ढल तो ले जरा, मै थोडी देर जी तो लूं, अभी तो कुछ कहाँ नही, अभी तो कुछ सुना नही'. यावर मला जाणं कसं गरजेचं आहे हे ती त्याला सांगतेय. 'सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे,' आणि गाण्यातली सर्वोत्तम कल्पना 'गर मै रुक गयी अभी तो जा न पाऊंगी कभी', 'यही कहोगे तुम सदा के दिल अभी नही भरा'. काय काय लिहू या गाण्याविषयी ? ही कविता अमृता प्रीतम यांच्यासाठी लिहिली होती.
कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है' (कभी कभी) हे रोमँटिक गीत सुध्दा अमृता प्रीतम यांच्यासाठीच लिहिले होते. साहीरची गीतं ही अनुभवातून प्रकट झालेली आहेत. 'कभी कभी'च्या गीतांसाठी साहीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते. आपल्या अनुभवावर आधारीत तत्वज्ञान 'चलो एकबार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो' या गाण्यात साहीर अत्यंत सोप्या भाषेत मांडतात. ते म्हणतात, 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना नामुमकिन, उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा'. जगणंच सोपं वाटायला लागतं असं काही छान ऐकलं तर. ही किमया साहीरजींचीच.
साहीर म्हणजे गझल सम्राट! साहीर आणि गझल हे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. एकाहून एक सरस गझल साहीरजींनी रसिकांना दिल्या आहेत. या गझला म्हणजे साहीरजींची 'हृदय गीतं' आहेत. 'माझ्या गझल रसिकांचा आरसा बनतील' असे ते म्हणत. या शतकातील सर्वोत्तम गझल म्हणजे 'हम दोनो' चित्रपटातील 'कभी खुदपे कभी हालातपे रोना आया'. देवानंदचा डबल रोल, दुर्गम भागातील एका चौकीवर राखण करणारे दोन्ही सैनिक, घरची आठवण येऊन सैरभैर झालेले. दोघांची अगतिकता, हतबलता साहीरजींनी फार सुंदर मांडलीय. परदुःख शीतल असतं हे तत्त्वज्ञान साहीर या गीतातून मांडतांना म्हणतात, 'कौन रोता है किसीकी खातीर ऐ दोस्त, सबको अपनी किसी बातपे रोना आया'. साहीरजींचे हे शब्द अंगावर शहारे आणतात. जयदेवचं संगीत, रफींचा स्वर्गीय आवाज आणि विजय आनंदचं चित्रिकरण, सगळंच ग्रेट. ज्या काॅलेजने साहीरना 'रस्टिकेट' केले होते त्याच काॅलेजने त्यांना सन्मानाने 'प्रमुख पाहुणा' म्हणून पाचारण केले होते. त्या समारंभात त्यांनी हिंदू मुस्लीम धर्मातील वाढत्या दुराव्याबद्दल खंत व्यक्त केली होती. फाळणीचं दुःख अनुभवलेला कवी मनाचा संवेदनशील माणूस होता तो. मानवता हाच खरा धर्म आहे हेच त्यांचं तत्वज्ञान होतं. धूल का फूल' चित्रपटातील 'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसानकी औलाद है इंसान बनेगा' हे तरल गीत साहीरजींनी लिहीलं. हे गाणं रेकाॅर्डींगला जाईना. रफी साहेबांनी कारण विचारले तर, 'निर्मात्याजवळ पैसे नाहीत' असं उत्तर मिळालं. साहीरचे या गाण्यातले अप्रतिम विचार सर्वांपर्यंत पोहचावेत म्हणून रफी साहेबांनी एकही रुपया मानधन न घेता रेकॉर्डींग केलं. साहीरसाहेब आणि रफीसाहेब दोन्हीही ग्रेट! साहीर यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. सर्व गाण्यांचा उल्लेख केवळ अशक्य आहे. खरंतर साहीरचं एकेक गाणं स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
ठंडी हवाएं लहराके आए, तदबीरसे बिगडी हुयी तकदीर बनाले, ए मेरी जोहराजबीन, जांए तो जांए कहां, जीवनके सफरमे राही, फैली हुयी है सपनोंकी बांहे, जिंदगीभर नही भुलेगी वो बरसातकी रात, परबतोंके पेडोपर, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, वो सुबह कभी तो आयेगी, बच्चे मनके सच्चे, निले गगनके तले धरतीका प्यार पले, उडे जब जब जुल्फे तेरी, छू लेने दो नाजुक होटोंको, सिमटी हुयी ये घडीयां, आजा तुझको पुकारे मेरा प्यार, पांव छू लेनेदो फुलोंको इनायत होगी, जिसे तू कुबुल करले वो सदा कहांसे लाऊं, नगमा और शेरकी सौगाद किसे पेश करूं, मिलती है जिंदगीमे मोहब्बत कभी कभी, ये दिल तुम बीन कही लगता नही हम क्या करे, इस रेशमी पाजेबकी झनकारके सदके, ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है, ये वादियां ये फिजाएं बुला रही है तुम्हे, रंग और नूर की बारात किसे पेश करूं, आप आये तो खयाले दिल-ए-नाशाद आया, कोई पत्थरसे ना मारे मेरे दिवानेको, पोंछकर अश्क अपनी आंखोसे, मेरे दिलमे आज क्या है, संसारकी हर शहका इतनाही फ़साना है, जिंदगी इत्तेफाक है, तुम मुझे भूलभी जाओ तो ये हक है तुमको, सलामे हसरत कुबुल करलो,
साहीरचे काही गाजलेले शेर -
- अपनी तबाहियोंका मुझे कोई गम नही,
तुमने किसीके साथ मोहब्बत निभा तो दी ।
- गर जिंदगीमे मिल गये इत्तफाकसे,
पूछेंगे अपना हाल तेरी बेबसीसे हम ।
- याद मिटती है न मंजर कोई मिट सकता है,
दूर जाकरभी तुम अपनेको यही पाओगी ।
साहीर यांची शब्दांवर हुकुमत होती. हिंदी, उर्दू, पंजाबी, अरबी, फारसी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. काही शब्द कोड्यात टाकतात. काही शब्दांचे अर्थ लावता लावता दमछाक होते. कुणाची तरी मदत घ्यावी लागते. पण अर्थ समजल्यावर साहीरची शब्दकळा समजते. गुरूबाणी त्यांना पाठ होती. साहीरने वापरलेले शब्द इतर गीतकारांनी सहसा वापरले नाहीत. रुखसार (गाल), तकमील (पूर्णत्व), रफाकत (दोस्ती), जोहराजबीन (शुक्राची चांदणी), नाशाद (नाराज), बारहा (वारंवार), तारीफ (परिचय), परसतीस (पूजा), इल्म (माहिती), तक्कलुफ (संकोच), सुरमई (करडा), अजदाद (पूर्वज), चंपई (सोनेरी), जुर्मट (तिरीप), तब्बसूम (मुस्कराहट), कोहेतूर (उंच शिखर), रस्मोदार (फाशीचा फंदा). त्याकाळी चित्रपट गीतकारांना कवी म्हणून मान मिळत नव्हता. त्यांना मुशायरा, कवीसंमेलनात सहभागी केले जात नसे. साहीरने आपल्या काव्यप्रतिभेने चित्रपट गीतं इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की गीतकारांना कवी म्हणून मान्यता मिळाली. गीतकारांचे नाव रेकॉर्ड प्लेटवर लिहिण्याची आणि रेडिओवरून जाहीर करण्याची सक्ती साहीरचीच होती. गीतकारांना राॅयल्टीसुध्दा साहीर यांनीच मिळवून दिली. संगीतकारांपेक्षा १ रुपया जास्त मानधन घेणारा कवी अशी साहीर यांची ओळख होती. एस. डी. बर्मन (१७ चित्रपट), एन. दत्ता (१७), रवी (१९), रोशन, ओ.पी. नय्यर, मदन मोहन, खय्याम, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल इ. संगीतकारांनी साहीरजींच्या शब्दांना सुमधुर सुरात संगीतबद्ध केले. साहीर आपल्याला सुरुवातीला एक कवी, शायर म्हणून भेटतात आणि नंतर फक्त साहीर आणि साहीरच उरतात. ते आपल्याला संमोहित करतात. भारावून टाकतात. मग साहीरचं गारूड मनावरून काही उतरवता येत नाही. आणि यातच साहीरचं मोठेपण लपलेलं आहे. २५ आॅक्टोबर १९८० रोजी आपली भली मोठी काव्यसंपदा आणि रसिकांना पोरके करून या 'असार' संसाराला सोडून साहीरसाहेब 'अल्लाको प्यारे' झाले.
साहीर गेले तेव्हा सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी एक आठवण सांगितली होती. जावेदजींचं त्यांचे वडील जां निसार अख्तर यांचेसोबत पटलं नाही. ते घर सोडून बाहेर पडले. साहीरजींकडे काम मिळावं म्हणून आले. लगेचच काही करणं शक्य नव्हतं. साहीरजींनी जावेद यांना २००/- रूपये दिले आणि काही दिवस निभावून नेण्यास सांगितले. २००/- रुपये ही रक्कम त्याकाळी मोठी होती. ते परत देण्याच्या बोलीवर जावेद यांनी स्विकारले. कालांतराने कथा सलीम जावेद आणि गीतं साहीर यांची अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक भेटीत जावेद 'मी पैसे परत देणार नाही' असे गमतीने म्हणत. यावर 'मी पैसे वसूल करेनच' असे साहीर सांगत असत. अचानक साहीर गेल्याचा निरोप जावेद यांना मिळाला. जावेदजींनी धावपळ करून सर्वांना निरोप दिले. दुसर्या दिवशी साहीरजींना 'सुपूर्द-ए-खाक' करण्यात आले. काही वेळाने सर्वजण निघून गेले. जावेद अख्तर शांतपणे कबरीसमोर उभे होते. एक व्यक्ती धावतच जावेदजींजवळ येऊन म्हणाली, 'साहेब २००/- रुपये आहेत कां ? सकाळी ज्याने कबर खोदली त्याचे पैसे द्यायचे राहीलेत.' आणि जावेदजींनी पैसे काढून दिले. शेवटी साहीर साहेबांनी पैसे वसूल केलेच. साहिर यांच्या जाण्यानंतर अमृता प्रीतम यांनीही एक किस्सा सांगितला होता. साहीरला रशियन सरकारने पुरस्कार जाहीर केला होता. तो घेण्यासाठी मॉस्को येथे साहीर यांच्यासोबत अमृता प्रीतमही गेल्या होत्या. तेथे त्यांच्या सूटवर नेमप्लेटस् लावण्यासाठी एक माणूस आला. त्याचं हिंदीचं ज्ञान जुजबी होतं. त्याने साहीरच्या सूटवर अमृता प्रीतम आणि अमृता प्रीतम यांच्या सूटवर साहीर यांच्या नावाची नेमप्लेट लावली. अमृता यांच्या आग्रहामुळे दोघांनीही ती चूक तशीच राहू दिली. अमृता प्रीतम म्हणाल्या, 'दरअसल वो मौतका पैगाम मेरे लिए था, मगर नेमप्लेट देखकर देवदूत साहीरको ले गये। काश उस दिन मैने नेमप्लेटस् बदल दी होती।'
साहीरजींच्या मागे दुर्दैव कसं लागलं होतं ते बघा.
- १९८० साली साहीरजींना जुहूच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले. २०१० साली नवीन प्रेतांना जागा मिळावी म्हणून संपूर्ण स्मशानभूमी खोदून नव्याने तयार करण्यात आली. साहीर यांच्या नशिबी चिरनिद्रासुध्दा आली नाही. मृत्यूनंतरही शांतता मिळाली नाही.
- २०२०-२१ हे साहीरजींचं जन्मशताब्दी वर्ष!
मात्र कोवीडमुळे लाॅकडाऊनच्या काळात जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण वर्षात रसिकांना साहीरजींवर जाहीर कार्यक्रम करता आले नाहीत. हे साहिरजींचं आणि आपलंही दुर्दैव!
स्वतः एवढे मोठे शायर असतांना ते 'मै पल दो पलका शायर हूँ' असे नम्रपणे म्हणत. पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरी कहानी है असं आपल्या काव्यातून जेव्हा साहीर सांगतात, तेव्हा एक रसिक या नात्याने साहीरजींना सांगावेसे वाटते की साहीरजी आपण 'पल दो पलके शायर' कधी असूच शकत नाहीत. शक्यच नाहीए ते!
त्यांच्याच शब्दांत म्हणायचं तर,
'मै हर एक पलका शायर हूँ, हर एक पल मेरी जवानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर एक पल मेरी कहानी है'
आणि हेच खरं आहे. पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतीय पोस्ट खात्याने साहीरजींवर २०१३ साली टपाल तिकीट काढून सन्मान दिला आहे.
भारत-पाक सीमेवरील एका चौकीला "साहीर लुधियानवी चौकी' असे नाव दिले आहे. हा फार मोठा सन्मान आहे. समग्र साहीर एका लेखात सामावणं अशक्य आहे. साहीरजींचे अनेक पैलू या लेखात आलेले नाहीत. तरीही मला खात्री आहे की हा लेख वाचून आपणही साहीरवर प्रेम करायला लागाल. फक्त तुमच्यापर्यंत हे मर्यादित ठेवू नका. लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि साहीरप्रेमींपर्यंत अवश्य पोहचवा. साहीर पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी आहे. 'सजा' नावाच्या चित्रपटातील एन. दत्तांनी संगीतबद्ध केलेल्या, लतादीदींनी गायलेल्या अप्रतिम गाण्याने शब्दप्रभू शायर साहीरसाहेबांना त्यांच्याच शब्दांत श्रध्दांजली वाहणे संयुक्तिक ठरेल.
'तुम ना जाने किस जहाँमें खो गये,
हम भरी दुनियामें तनहा हो गये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा