आयुष्यात जेव्हाही काही अडचणी, संकट आले असेल आणि आयुष्य जागच्या जागी थांबलं असेल तेव्हा आता पुढं आपलं कस होणार ? काय करू आता ? असे प्रश्न भेडसावत असतील त्यावेळी हमखास उपयोगी पडणारा मंत्र आज देतोय."रिस्टार्ट करून पहा" वरवर हे गमतीदार वाटेल किंवा हसू येईल पण विश्वास ठेवा मंडळी या मंत्राच्या मदतीने तुमचे ९५% प्रॉब्लेम सॉल्व झालेले असतील. याचे काही थेट अनुभव सांगतो मग लक्षात येईल.
असेच एकदा सकाळी कामावर आलो आणि कॉम्प्युटर सुरु केला. तर बाकी सगळे ओके सुरु झाले पण श्री लिपी (मराठी टायपिंग सॉफ्टवेयर) सुरूच होईना. हि काय भानगड आता ? कारण ते जोवर ऑन होत नाही तोवर मी डिझाईनिंग कामात मराठी टायपिंग करूच शकत नाही. खूप झट्याझोंब्या केल्या. श्रीलिपी च्या "ट्रबल हेल्पसेंटर" जायचा प्रयत्न केला पण तेही दाद देईना. माझी जाम पंचाईत झाली. शेवटी अर्ध्या तासानंतर हार मानून सरळ श्रीलिपीचे माझे काम पाहणाऱ्या इंजिनियरला फोन केला. त्याने सांगितलं की, "काही नाही. एकदा कॉम्पुटर रिस्टार्ट करून पहा" हे ऑप्शनच माझ्या डोक्यात आले नव्हते. पण तो म्हणतोय तर करूया असं म्हणत कॉम्पुटर रिस्टार्ट केला. आणि काय आश्चर्य नंतर श्रीलिपी सॉफ्टवेयर शिस्तीत ऑन झाले होते.
एकदा पुण्याहून लातूरला गावी कारने जात होतो. आणि इंदापूरजवळ शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी थांबलो. कॅन्टीनला थोडंफार खाल्लं आणि गाडीत येऊन बसलो. निघण्यासाठी स्टार्टर मारला तर काय ? गाडी काही सुरु होईना. म्हटलं.... आतापर्यंत तर बरी होती, आता अचानक काय हिच्या अंगात आलं ? तरी बॉनेट उघडून थोडंफार चेकिंग केलं. पेट्रोल तर भरपूर होते. ऑइल लेव्हल पण ओके होती. तरी गाडी स्टार्ट होत नव्हती. अर्धा तास प्रयत्न केला पण गाडी ढिम्म ! शेवटी वैतागलो आणि माझ्या पुण्यातील नबी शेख (नेहमीचा गॅरेजवाला) त्याला फोन करून अडचण सांगितली. त्यावर तो म्हणाला, "एक काम करो, स्टीयरिंग के निच्चे चार पांच फ्युज रहेंगे.... वो एक एक करके बाहर निकालकर उसे फुंक मारकर फिर से लगाव और फिर गाडी रिस्टार्ट मारो" त्याप्रमाणे मी केलं आणि कहर म्हणजे एका झटक्यात गाडी सुरु झाली. त्यावर गाडी सुरु ठेवून हँडब्रेक लावून लगेच पुन्हा नबीला फोन करून गाडी सुरु झाल्याचे सांगितलं पण हे कस काय झालं ? हेही विचारलं. तर म्हणाला. "क्या है साब. कभी कभी कच्चे रास्ते की धूल मिट्टी थोडी बहुत वो फ्युज के अंदर जाकर बैठती हो तो बॅटरी का करंट पास नही होता, फुंक मार के धूल हट गई और रिस्टार्ट से बॅटरी फिर से जाग उठी और आपका काम हो गया"
एकदा तर असेच कॉम्पुटरवर काम करत बसलेलो आणि अचानक तो हँग झाला. म्हणजे कीबोर्ड आणि माउस दोन्ही काम करेनासे झाले. आता हि काय भानगड ? काही कळेना ? वेगवेगळे उपाय करून पाहिले पण कॉम्पुटर काही हाकेला ओ देईना. शेवटी नाईलाजाने आमचे कॉम्प्युटर सर्व्हिसिंग काम पाहणाऱ्या माउलीला फोन केला. त्याने काय सांगावं ? म्हणाला, "सीपीयू (मशीन सुरु करण्याचा मेन बॉक्स) तिथं स्टार्ट चे बटन आहे न तर ते चार पाच सेकंद दाबून धरा. त्याने कॉम्प्युटर फोर्सफुली रिस्टार्ट होतो" मी तसे केले आणि खरेच हँग झालेला कॉम्प्युटर आपोआप ओके मध्ये सुरु झाला.
यावरून मिशन मंगल सिनेमा आठवला. मंगलयान शेवटच्या टप्प्यात असताना अचानक त्याचा संपर्क तुटतो. सगळेच परेशान. त्यावेळी तापसी पन्नू काय करते ? तर मेन स्विच ऑफ आणि मग ऑन करते. त्यावर सगळेच चिडतात. मात्र ऑन केल्यावर पुन्हा यानाशी संपर्क प्रस्थापित झालेला सगळ्यांना दिसतो. सगळेच खुश होऊन तिला दाद देतात. "यु आर जिनियस" असं अक्षयकुमार तिला म्हणतो.
डीडी क्लास : "रिस्टार्ट करून तर पहा" म्हणजे नेमकं काय ? ते आता कळलं असेलच. काहीवेळा आपलं आयुष्यही असेच एका जागी थांबलेले असते. किंवा अडचणी इतक्या गोळा होतात की आपला मेंदूच हँग होतो. काय करावं हेच सुचत नाही. मार्गही मिळत नाही. त्यावेळी आपण स्वतःला रिस्टार्ट करून पाहावं. मशीनला रिस्टार्ट करता येते पण माणसाला कसे हो करणार ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तेही सांगतो.
आपण स्वतःला रिस्टार्ट करायचे म्हणजे, जो काही प्रॉब्लेम समोर आलाय तो येण्याच्या आधी आपण ओके मध्ये जगत होतो न तर मानसिकरीत्या स्वतःला त्या अवस्थेत घेऊन जायचे आणि मग थंड डोक्याने विचार करायचा. की असे असे का घडले ? तुम्ही त्यावेळी मागे गेल्याने (म्हणजेच रिस्टार्ट मोडवर) असल्याने प्रॉब्लेम मूळ आणि कुळ म्हणजेच कारण पटकन समोर तुम्हाला दिसते. त्यावर सोल्युशन मग शोधायचे अन त्या अडचणीवर मात करून मग पुढे जायचे. हाच तर जुगाडू मंत्र. रिस्टार्ट तर करून पहा"
हाच मंत्र दूर गेलेल्या नात्यासाठी, दूर गेलेल्या मित्र मैत्रिणीसाठी देखील वापरून पहा. जेव्हा हे नाते ओके मोडवर होते तिथं मानसिकरीत्या जा... आणि नंतर असं काय घडलं ? हे शांतपणे विचार करा. आपोआप तुम्हाला कारण सापडेल. मग त्याचे निराकरण करा आणि पुन्हा ते दूर गेलेले नाते जमले तर जवळ घ्या ! यालाच "आयुष्य रिस्टार्ट करणे" असं मी समजतो. पहा.विचार करा आणि करून पहा. झाला तर फायदा तुमचाच आहे"
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा